Share/Bookmark

१९ सप्टें, २०१०

हीसुद्धा दीर्घकालीन गुंतवणूकच नाही का?

विदेशी गुंतवणूकदारांनी सततची खरेदी करून आपल्या बाजाराला सुमारे अडीच वर्षांतील सर्वोच्च पातळीवर नेवून ठेवले आहे. या पातळीवर बर्याच जणांनी आपला फायदा काढून घेतला असेल अथवा काहीजण अजून किंमती वाढण्याच्या प्रतिक्षेत असतील.
असे म्हणतात कि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणार्यांनी बाजारातील रोजच्या हालचालीकडे बघण्याची गरज नसते.त्यांच्या दृष्टीने ५ किंवा १० वर्षानंतरच खरा फायदा मिळणार असतो.
दीर्घकालीन गुंतवणूकीवर कर नसल्याने हा दृष्टीकोन अधिकच योग्य वाटू लागतो.खरेच नेहमीच असे असते का?
 आता एक उदाहरण घेवूया.
माझ्या अनेक मित्रांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स २००५ पूर्वी खरेदी केले होते आणि त्यावर २००७ च्या शेवटी आलेल्या बुल मार्केटमध्ये त्यांना अनेक पटींनी फायदा झाला.
त्यातल्या अगदी काही मोजक्या लोकांनी अगदी उच्च म्हणजे ३००० रु.च्या आसपास त्या शेअरची विक्री  केली.आणि २००८ मध्ये बाजार तळाला गेल्यावर १००० रु. च्या जवळपास रिलायन्स मध्ये पुन्हा खरेदी केली.
आजही काही जणांकडे जुन्यापैकी शेअर्स आहेत. समजा उदा. म्हणून १०० शेअर्स आहेत असे धरले तर
मुळ गुंतवणूक १०० * ८०० रु.( त्यावेळचा दर) =रु. ८०,००० 
ज्यांनी अजुन ते शेअर्स जतन केलेत त्याची आताची किंमत (बोनस लक्षांत घेता) -
२०० * रु.१०२७ = रु.२,०५,४००. पांच वर्षांत ही वाढ उत्तमच, पण थांबा -
ज्यांनी ३००० च्या आसपास विक्री केली त्यांना त्यावेळी मिळालेली रक्कम = रु.३,००,०००. (यामध्ये RNRL वगैरे त्यावेळी बक्षीस मिळालेल्या शेअर्सचा समावेश नाही)
या तीन लाख रु. मध्ये २००९ च्या सुरुवातीला ज्यांनी रिलायन्स परत खरेदी केले त्यांना त्या रकमेमध्ये रु.१००० च्या भावाप्रमाणे ३०० शेअर मिळाले आहेत. बोनस शेअर मिळाल्यानंतर झालेल्या ६०० शेअर्सची आजची किंमत होते-
६०० * १०२७ = रु.६,१६,२००. 
आता बोला !
रिलायन्स हा बाजाराच्या तुलनेत मागे पडलेला असूनही आज या लोकांना भरघोस फायदा दिसत आहे.
 आज सेन्सेक्स अजून सर्वकालीन उच्च पातळीवर पोचलेला नाही तसेच रिलायन्सलाही त्यावेळच्या किंमतीला गाठायला सुमारे १५०० ते १६०० पर्यंत जावे लागेल.यासाठी किती काळ लागेल ते सांगता येत नाही, पण हे मात्र खरे कि  बाजारातील चढ-उताराचा फायदा घेणार्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करणार्यांपेक्षा जवळ जवळ तीनपट फायदा झाला आहे. दीर्घकाल शेअर धरून ठेवण्याचे धोरण नेहमीच लागू पडते असे नाही.आता फक्त रिलायन्सच्याच बाबतीत असे झाले का? तर नाही. रिलायन्स प्रमाणेच स्टेट बेंक, लारसन, सेसा गोवा, इन्फोसिस अशा सर्वच उत्तम कंपन्यामध्ये अशा प्रकारे जागरूक राहून वेळीच विक्री व खरेदी करणार्यांना अधिक फायदा झाला आहे.
तात्पर्य - बाजार अधिक अधिक उंचीवर जात असताना थोडी थोडी विक्री केली तर नजिकच्या काळात चुकल्यासारखे वाटले तरी भविष्यात भरघोस फायदा होण्याची शक्यता जास्त. तेव्हा उत्तम शेअर्समध्ये उच्च भावाला विक्री करा आणि न विसरता काही काळाने परत खरेदी करा.- एका प्रकारे हीसुद्धा दीर्घकालीन गुंतवणूकच नाही का?
मग आता बाजारात अजिबात पैसा ठेवायचा नाही का? तर तसे मला मुळीच म्हणायचे नाही. मात्र ७५ % शेअर्सच्या विक्रीतून आलेली रक्कम सरळ फिक्स डिपोज़िट मध्ये टाका आणि बाजार पडेपर्यंत किमान ८ % दराने आरामात कमवत रहा.
उर्वरीत २५ % रक्कम मागे सांगितल्याप्रमाणे हाय बीटा शेअर्स मध्ये टाकून स्टोपलोस या आयुधाचा वापर करून फायदा वेगाने कमवत रहा. सध्या कमी दर्जाचे शेअर्सही वाढू लागले आहेत, त्यातही फायदा झाला तर बघावा- मात्र अशा काळात कितीही मोह झाला तरी अप्पर सर्किट लागणारे शेअर्स कधीही घेवू नका.हे शेअर्स आपल्याला खरेदीची संधी तर देतात, मात्र परतीचा रस्ता जवळ जवळ बंद असतो. ज्या वेगाने हे वर  जातात, त्याच वेगात हे लोअर सर्किट लागतच खाली येतात आणि दरम्यान विकीची संधीच न मिळाल्याने आपले सगळे भांडवल नाहीसे होण्याचा धोका यात संभवतो.
ज्या शेअर्सना सर्किट नाही (म्हणजेच "A" ग्रूपचे शेअर्स) तसेच २०% सर्किट लिमिट असलेले (त्यामुळे सहसा सर्किट लागत नसलेले) शेअर्स भरपूर आहेत, तेव्हा धोका पत्करायचे काहीच कारण नाही.
 BEST OF LUCK !


-