काल निफ्टी ६००० तर सेन्सेक्स २०००० या जादुई आकड्यांच्या अगदी जवळ जावून ठेपले आहेत. आता बाजारात रोजच वाढीची शक्यता गृहित धरून इण्ट्रा-डे किंवा फक्त ३-४ दिवसासाठी ट्रेडिंग करून झटपट फायदा कमवणे सुरू झाले आहे.अशा प्रकारे वेगाने फायदा कमवण्याच्या संधी क्वचितच येतात, मात्र त्यात अचानक होणारे नुकसान कमीतकमी राखण्यासाठी
अनुभवी ट्रेडर्स स्टॉपलॉसचा प्रभावी वापर करतात- हे आपणाला माहितच आहे.
अनुभवी ट्रेडर्स स्टॉपलॉसचा प्रभावी वापर करतात- हे आपणाला माहितच आहे.
मात्र हा स्टॉपलॉस नेमका कसा आणि कुठे लावावा याबाबत मात्र काही जणांच्या मनात शंका वा अस्पष्टता असल्याचे जाणवल्याने याबाबतीत थोडेसे लिहिणे सध्याच्या वातावरणात योग्य ठरेल.
अनेक प्रकारे स्टोपलॉस लावता येतो मात्र यात सर्वात सोपा प्रकार आधी बघुया -
स्टॉपलॉस लावण्याचे जे कारण आहे ते म्हणजे आपले नुकसान मर्यादित ठेवणे - हे कारणच आपल्याला स्टॉपलॉस कुठे लावावा याविषयी मार्गदर्शन करत असते. समजा आपण १०० रु.चे १००० शेअर डॆ-ट्रेडिंग करण्यासाठी घेतले म्हणजेच आपण या सौद्यामध्ये एक लाख रु.लावले आहेत. अर्थातच शेअरची किंमत वाढून किमान २ ते ५ रुपयांची वाढ आपल्याला अपेक्षीत आहे. म्हणजेच आपल्याला २००० चे ५००० रु.चा फायदा अपेक्षीत आहे. मात्र बाजार हा मुळातच बेभरवशी असल्याने काही वेळाने त्या शेअरची किंमत घसरू लागते. आणि मग आपण काही वेळ वाट बघण्याचे ठरवतो. आणखी काही वेळाने किंमत अधिकच कमी होवू लागते. एव्हाना फायदा सोडाच पण नुकसान कमी कसे करता येइल हेच आपले उद्दिष्ट बनते, मात्र या मानसिक आंदोलनांमध्ये नुकसान वाढत जाते आणि आपले भांडवल भराभर कमी होत जाते. हा सर्व प्रकार (विशेषत: मानसिक) टाळण्यासाठी खरेदी वा विक्रीच्या वेळीच स्टॉपलॉस लावणे अति-आवश्यक आहे. मग आपल्याला किती नुकसान झालेले परवडू शकेल, अथवा किती नुकसान झाल्याने आपण आणखी दुसरा व्यवहार करण्यासाठी (आर्थिक व मानसिकदृष्ट्या) सक्षम राहू हे ठरवावे लागेल. समजा एक लाखाच्या या व्यवहारात आपल्याला १००० रु. ते १५०० रु.यापेक्षा नुकसान परवडणार नसेल, तर व्यवहाराचे वेळीच ९९ वा ९८.५० येथे स्टॉपलॉस लावावा लागेल. या प्रकारामध्ये फक्त आपल्या नुकसान झेलण्याच्या मर्यादेचा विचार करण्यात आला आहे. मात्र काही वेळेला इतका कमी स्टोपलॉस लावून चालत नाही, कारण त्या विशिष्ट शेअरची सामान्य हालचालच २ ते ३ रु.ची असू शकते- अशा वेळी ९९ रु.चा स्टॉपलॉस हिट होवून नंतर किंमत परत १०१ अथवा जास्त होवू शकते. मग अशा वेळी काय करावे? याकरता आपण ज्या शेअरमध्ये ट्रेडींग करणार आहोत त्या शेअरची किंमत ही सामान्यपणे किती मर्यादेत वर-खाली होत असते, त्याचे निरीक्षण करणे गरजेचे ठरते. बाजारात ज्यांचे मोठ्या संख्येने शेअर आहेत म्हणजेच इक्विटी जास्त असून शेअरची दर्शनी किंमत कमी म्हणजे १ रु. असेल तर त्या शेअरमध्ये होणारी हालचाल मंद असते. मात्र असे शेअर सुरक्षीत असले तरी त्यात फायदा मिळण्याची शक्यताही कमी असते.
स्टॉपलॉस लावण्याचा दुसरा प्रकार म्हणजे सपोर्ट लेवलवर आधारित स्टॉपलॉस होय. यात त्या शेअरच्या त्यादिवशीची, अथवा आधल्या दिवशीची किंवा आठवड्याची सपोर्ट लेवल ठरवली जाते. ही लेवल निरीक्षणाने अथवा ट्रेन्डलाईन्सच्या आधारे ठरवता येते, समजा वरील उदा.मध्ये ही सपोर्ट लेवेल ९८ रु. आहे तर त्यावेळी स्टॉपलॉस हा त्याखाली म्हणजे ९७.५० किंवा ९७ असा गरजेप्रमाणे लावता येइल.
स्टॉपलॉस किती जवळ (TIGHT) लावायचा हे सर्वस्वी त्या शेअरच्या हालचालीवर आणि अनुभवाद्वारे ठरवता येते.
अशा प्रकारे स्टॉपलॉस लावला आणि समजा काही वेळाने त्या शेअरची किंमत १०२ रु. झाली. ती किंमत १०३ अथवा १०४ होण्याची शक्यता दिसत आहे, मात्र खात्री नसल्याने मिळणारा फायदा काढून घ्यावा कि अधिक फायद्याची वाट बघावी हा एक नेहमी पडणारा प्रश्न असतो. अशा वेळी कधी मिळत असलेला फायदाही परत नाहीसा होण्याची शक्यता टाळण्यासाठी ट्रेलींग स्टॉपलॉस लावण्याची गरज असते. म्हणजेच शेअरची किंमत १०३ रु. झाली तर आपला स्टॉपलॉस हा १०२ वा १०२.५० असा सरकवावा, म्हणजे मिळणा-या फायद्याचे संरक्षण करूनही संभाव्य अधिक फायद्याची वाट बघता येते.
अशाप्रकारे आपले संभाव्य नुकसान मर्यादित ठेवणारे ट्रेडर्सच यशस्वी होवू शकतात.
जागतिक किर्तीचा प्रसिद्ध गुंतवणूकदार वोरेन बफेट याने सांगितलेले दोन नियम आपल्याला कायम मार्गदर्शन करणारे आहेत.-
नियम क्र.१) कधीही आपले नुकसान होवू देवू नका.( म्हणजेच मर्यादित ठेवा)
नियम क्र.२) पहिला नियम कधीही विसरू नका.
HAPPY TRADING !