फ्युचर्स ट्रेडींगचे फायदे -
१) कमी ब्रोकरेज- निफ्टी फ्युचर्सचा एक लॉट खरेदी वा विक्री करणे म्हणजे सध्याच्या किंमतीप्रमाणे सुमारे अडीच लाखाचा व्यवहार असतो व खरेदी व विक्री दोन्ही मिळून साधारणपणे रु.२५० इतके ब्रोकरेज पडते. तेवढ्याच किंमतीचे शेअर्स फक्त घेताना वा फक्त विकताना किमान ०.३ % ब्रोकरेज धरले तरी
रु.७५० ब्रोकरेज पडते. ब्रोकरप्रमाणे हे दर थोडेफार कमी जास्त असले तरी मोठा फरक हा रहातोच.
२) माफक मार्जिन -
निफ्टी फ्युचर्सचा एक लॉट म्हणजेच सुमारे अडीच लाखाचा व्यवहार करण्यासाठी हल्ली सुमारे रु. २५,००० एवढ्याच मार्जिनची गरज असते. शेअर्सच्या व्यवहारात अडीच लाख रु.चे शेअर्स खरेदी केल्यास हाच मार्जिन सुमारे रु.५०,००० इतका असू शकतो, आणि शेअर्सची डिलीव्हरी घेतल्यास ३ दिवसात उर्वरीत सर्व रक्कम भरावी लागते. निफ्टी फ्युचर्सचा लॉट मात्र महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत होल्ड करता येतो. शिवाय योग्य ते ब्रोकरेज भरून पुढील महिन्याच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये रुपांतरीत करता येतो.
३) शोर्ट सेल व हेजींग साठी वापर
पडत्या बाजारात आपल्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत साहजिकच कमी होत जाते, अशा मंदीसदृश वातावरणात होणार्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी निफ्टी फ्युचर्सचा शॉर्टसेल केला जातो. शेअर्सचा शॉर्टसेल केला असेल तर ते विकलेले शेअर्स त्याचदिवशी परत खरेदी करण्याचे बंधन असते, तसे फ्युचर्स ट्रेडींग मध्ये नसून आपण शॉर्ट केलेले निफ्टी फ्युचर्सचे लॉट त्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत कधीही खरेदी केले तरी चालतात. तसे जर केले नाही तर त्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ते आपोआप खरेदी म्हणजे SQUARE UP केले जातात आणि फायदा वा तोटा जो काही असेल तो तुमच्या f&o च्या क्रेडीट्मध्ये जमा/वजा केला जातो. साधारणपणे आपल्याकडील शेअर्सच्या एकूण किंमतीएवढे निफ्टी फ्युचर्सचे लॉट विकून असे हेजींग ' केले जाते . -(हेजींगचेही काही तोटे असतातच त्याविषयी पुन्हा कधीतरी)
४) उत्तम लिक्विडीटी -
आपल्या बाजारात CASH SEGMENT/ शेअर्सच्या व्यवहारापेक्षा फ्युचर्सचे व्यवहार हे खूपच अधिक प्रमाणात केले जातात. त्यामुळे फ्युचर्समध्ये लिक्विडीटी भरपूर असते. म्हणजेच buy/sell किंवा bid price व ask price मध्ये फरक फार कमी असतो.
५) निफ्टी फ्युचर्सचा एक लॉट खरेदी करणे म्हणजे भारतातील ५० उत्तम कंपन्यांमध्ये एकाचवेळी गुंतवणूक करण्यासारखे असल्याने सुरक्षितता वाढते. यातील एखादी कंपनी बुडाली (उदा. सत्यम कॉम्प्युटर्स ) तरी निफ्टी इंडेक्स त्या प्रमाणात कधीच कोसळत नाही.
६) आपण ऑफिसात वा अन्य कामात व्यस्त असतानाही टीव्ही,मोबाईल वा इंटरनेट द्वारे फक्त निफ्टीचा भाव बघून बाजाराविषयी पटकन अंदाज घेवू शकतो. आपल्याकडील प्रत्येक शेअर्सचा भाव बघणे वा विचारणे वेळेच्या दृष्टीने व प्रायव्हसीच्या दृष्टीने सोईस्कर नसते.
७) निफ्टी फ्युचर्सचे ट्रेडींग अधिकाधिक लोकांना सोइस्कर व्हावे म्हणून गेल्या काही वर्षात ट्रेडींगसाठी आवश्यक असलेला मार्जिन बराच कमी करण्यात आला आहे , तसेच "मिनिनिफ्टी" हे सुमारे एक लाख किंमत असणारे छोटे कॉन्ट्रॅक्टही अस्तित्वात आले आहे. यासाठीचा मार्जिनही फक्त १५००० रु.च्या आसपास असल्याने अधिक सोइस्कर आहे. अनेकजण निफ्टीमधील मोठ्या रिस्कला टाळण्यासाठी आणि सुरुवातीला फ्युचर्स ट्रेडींगचा अनुभव म्हणून अलिकडे मिनिनिफ्टीचे व्यवहार करताना दिसतात.
८) निफ्टी प्रमाणेच ( ठराविक शेअर्सच्या बाबतीत ) स्टॉक फ्युचर्स मध्येही ट्रेडींग करता येते. जसा निफ्टीचा लॉट ५० चा आहे तसेच विविध शेअर्सच्या किंमतीप्रमाणे त्या त्या स्टॉकचा फ्युचर्सचा लॉट ठरलेला आहे. अशा स्टॉक फ्युचर्समध्ये शॉर्टसेल करून आपलेकडील शेअर- होल्डींग चे हेजींग केले जाते.
९) या व्यतिरिक्त बॅंकनिफ्टी, CNXINFRA, CNXIT असे विशिष्ट क्षेत्रातील निर्देशांकही ट्रेडींगसाठी उपलब्ध आहेत.
८) निफ्टी फ्युचर्स मध्ये असलेल्या भरपूर वोल्युममुळे आणि त्यामागे असलेल्या ५० कंपन्यांच्या अप्रत्यक्ष प्रतिमेमुळे निफ्टीची हालचाल बर्याचदा टेक्निकल लेव्हल्सनुसार होताना दिसते. टेक्निकल ऍनालिसीसचा ट्रेडींगसाठी वापर करणारे लोक, निफ्टीच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स तसेच विविध मूव्हींग ऍवरेजेसचा अभ्यास करून त्यानुसार फ्युचर्स ट्रेडींगमधले निर्णय घेतात. याउलट काही शेअर्सच्या बाबतीत -विशेषतः ज्यांचा वोल्युम कमी आहे अशांच्या बाबतीत- या लेव्ह्ल्स फारशा परिणामकारक ठरत नाहीत.
९) आपल्याकडील निरनिराळ्या शेअर्सच्या किंमती, लेव्हल्स, तिमाही निकाल,त्यासंदर्भातील घडामोडी अशा अनेक घटकांवर एकाचवेळी लक्ष ठेवण्यापेक्षा फक्त निफ्टीवर लक्ष ठेवणे अनेकजणांना सोपे वाटते.
१०) निफ्टी हा जागतिक बाजारातील बदलांना प्रतिसाद देतो, त्यामुळे बाजार सुरू होण्यापूर्वी जागतिक विशेषतः आशियाई बाजाराचा मूड पाहून निफ्टीचा अंदाज घेता येतो. सिंगापूर एक्सचेंज (त्यावर ट्रेड होणारा "SGX NIFTY") तर आपल्याकडील बाजार ओपन होण्याच्या सुमारे दोन तास आधीच फ्युचर्सचा आकडा दाखवत असल्याने आपलेकडील ओपनिंगचा अंदाज बरेचदा अचूक घेता येतो. ( moneycontrol.com वर pre-market विभागात SGX NIFTY ची किंमत बघता येते. )
फ्युचर्स ट्रेडींगमधील तोटे वा धोके -
१) फ्युचर्स ट्रेडींगमध्ये कॅश सेगमेंटच्या तुलनेत कमी मार्जिनची गरज असली तरी त्यामुळेच मार्जिन ट्रेडींगचा फायदा उठवण्याच्या नादात आपल्या क्षमतेपेक्षा अधिक ट्रेडींग करण्याची मानसिकता बळावते. अधिक फायदा कमवण्याच्या इच्छेने अनेकजण मोठे नुकसान करून घेतात. फ्युचर्स ट्रेडींगमध्ये फायदा जेवढा अधिक तेवढेच नुकसानही मोठे होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात ट्रेड करणे टाळावे आणि स्टॉपलॉसचा जरूर जरूर वापर करावा.
२) निफ्टी फ्युचर्स हे जागतिक बाजारातील घडामोडींना प्रतिसाद देतात. आपले मार्केट बंद झाल्यावर युरोप व अमेरिकेतील मार्केट्स आणि आपले मार्केट सुरू होण्याआधी अशियाई मार्केट्समधील बदलत्या ट्रेन्ड्समुळे निफ्टी ओपन होताना आधल्या दिवशीच्या ट्रेन्डच्या विपरीत ट्रेन्ड दाखवण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच्या दिवशी फायद्यात असलेली फ्युचर्समधील आपली पोझिशन सकाळी एकदम तोट्यात असलेली दिसते.
३) आपले मार्केट अनेकदा खूप वर वा खूप खाली ( GAP UP / GAP DOWN ) ओपनिंग होते. अशा प्रकारचे ओपनिंग हे सामान्य आणि छोट्या ट्रेडर्ससाठी एक डोकेदुखी होवून बसले आहे. त्यामुळे अनेकजण निफ्टी फ्युचर्स मध्ये ओवरनाईट पोझिशन न ठेवता नकळत डे-ट्रेडींग कडे ओढले जावून तेथील अन्य धोक्यांना बळी पडण्याची शक्यता असते.
३) फ्युचर्स ट्रेडींग मधील त्वरीत फायद्याच्या आकर्षणामुळे अनेकजण दीर्घकालीन गुंतवणूकीकडे पाठ फिरवतात. निफ्टी फ्युचर्सचा उपयोग निव्वळ ट्रेडींग व्यतिरिक्त आपल्याकडील दीर्घकालीन गुंतवणूकीच्या हेजींगसाठी करणे श्रेयस्कर ठरते.
४) फ्युचर्स ट्रेडींगमधील नुकसानाने खचून जाऊन बाजाराविषयी तिटकारा येवून अनेक लोक आपली दीर्घकालीन गुंतवणूकही अल्प किंमतीत विकून टाकतात. असे करणे अत्यंत चूकीचे आहे. हे टाळण्यासाठी LONG TERM INVESTMENT व SHORT TERM TRADE या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेवून त्यासाठी वेगवेगळा निधी राखून ठेवण्याची गरज असते.
असे सर्व फायदे-तोटे नीट लक्षांत घेवून ट्रेडींग केल्यास उत्तम फायदा मिळवणे शक्य आहे. यापुढील पोस्ट्समध्ये निफ्टी फ्युचर्स मध्ये ट्रेडींग वा हेजींग करण्याच्या ज्या अनेक पद्धती ( STRATEGY ) आहेत, त्याविषयीही येथे लिहिण्याचा विचार आहे, मात्र तोपर्यंत आपण अन्यत्र वाचन करून त्याआधारे सुरुवातीला छोट्या प्रमाणावर ट्रेड करून या आव्हानात्मक तितक्याच आकर्षक अशा फ्युचर्स ट्रेडींगचा अनुभव घ्यायला हरकत नसावी ! BEST LUCK !
mininifty che trading kuthun karta yete, wa tyache maret rate kuthe milti.
mininifty चे ट्रेडींग- तुमच्या ब्रोकरकडे तुमचे f&o चे अकाउंट असेल तर त्यावर करता येते.रेट्स साठी या लिंकवर जा.
http://www.nseindia.com/live_market/dynaContent/live_watch/get_quote/GetQuoteFO.jsp?underlying=MINIFTY&instrument=FUTIDX&expiry=30AUG2012&type=-&strike=-
प्रतिक्रियेबद्दल आभार.
sgx nifty stock exchange
sgx nifty