Share/Bookmark

१७ ऑग, २०१२

निफ्टी फ्युचर्स -ओपनिंग रेन्ज ब्रेक आऊट (ORB) स्ट्रॅटेजी -


या आधीच्या पोस्टमधे उल्लेख केल्याप्रमाणे निफ्टी ट्रेड करण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज सामान्यपणे वापरल्या जातात त्याची चर्चा आपण येथे करणार आहोत. अशा स्ट्रॅटेजीज या असंख्य असल्याने तसेच निफ्टी ट्रेडींग  हे इन्ट्राडे व शॉर्टटर्म अशा दोन्ही प्रकारात केले जात असल्याने साहजिकच हा विषय बराच मोठा आहे. निफ्टी फ्युचर्स ट्रेडींगची चर्चा  ही हेजींग शिवाय, तसेच हेजींग हे ऑप्शन्सच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण रहात असल्याने आपल्याला हेजींग व ऑप्शन्सचीही चर्चा  येथे करावी लागणार आहे, मात्र हळूहळू आपण तेथपर्यंत पोचणार आहोत.
येथे हे लक्षांत घ्या कि कोणतीही एक स्ट्रॅटेजी ही हमखास फायदा देणारी जादूची छडी ठरत नसल्याने अनेक प्रकारच्या ट्रेडींग स्ट्रॅटेजीज् चा जन्म झाला आहे आणि जगभरचे ट्रेडर्स यापुढेही अशा स्ट्रॅटेजीज कायम शोधत रहातील हे नक्की.
मी माझ्या वाचनात आलेल्या काही महत्वाच्या स्ट्रॅटेजीजचा उल्लेख येथे करणार असलो तरी 'त्याप्रमाणेच ट्रेड करा' असा सल्ला देण्याचा माझा उद्देश नसून , जगभरचे ट्रेडर्स साधारणपणे काय करतात याची  माहिती घेवून त्यानुसार, आपल्या शैलीनुसार व  उपलब्ध साधनांनुसार त्यात थोडेफार बदल करून आपल्याला स्वतःची अशी काही स्ट्रॅटेजी तयार करता येते का ? या दिशेने  आपले विचार व्हावेत म्हणून ही माहिती देत आहे. कारण अशा प्रकारे अनेक पर्यायांमधून तावूनसुलाखून निघाल्याशिवाय मार्केटमध्ये  सलगपणे फायदा मिळवणे शक्य नसते.
 
ट्रेडींग स्ट्रॅटेजी म्हणजे काय ? -
शेअर बाजारातील ट्रेडींगपुरते बोलायचे तर कोणतीही अशी ट्रेडींगची पद्धत, जी आपल्याला पुढील ५ बाबींविषयी निर्णय घायला मदत करेल-
१) ट्रेडींग करायचे कि नाही ?
२) BUY करायचे कि SELL ?
3) नेमके कधी BUY/SELL करायचे ?(एन्ट्री पॉइंट)
४) कधी स्क्वेअर अप करायचे ?(EXIT / PROFIT BOOKING)
5) कधी LOSS BOOK करुन बाहेर पडायचे ( STOPLOSS)

 सुरुवातीला आपण फक्त इन्ट्राडे निफ्टी फ्युचर्स ट्रेडींग स्ट्रॅटेजीज ची (DAYTRADE NIFTY) चर्चा (यापुढील काही पोस्ट्समध्ये) करुया .

१)ओपनिंग रेन्ज ब्रेक आऊट (ORB) स्ट्रॅटेजी -
इन्ट्राडे ट्रेड करताना दिवसाच्या सुरुवातीच्या वेळेत खरेदी वा विक्री करून दिवसअखेर पर्यंत ( मात्र शक्य तेवढे लवकर) स्क्वेअर अप करणे अभिप्रेत आहे. मात्र  निफ्टी खरेदी का विक्री करायची आणि नेमके कधी ट्रेड करायचे या प्रश्नांची उत्तरे शोधताना ORB  पद्धतीचा उपयोग होतो. ORB स्ट्रॅटेजीचे ढोबळ स्वरूप असे आहे कि यामध्ये दिवसाच्या अगदी सुरुवातीचा काही काळ निफ्टीने (निफ्टी स्पॉट किंवा निफ्टी फ्युचर्स - दोन्ही किंमती विचारात घेणारे  लोक आहेत-आपली निवड अनुभवाने करावी) नोंदवलेला उच्चांक व नीचांक याची नोंद केली जाते.- यात १५ मिनिटे, ३० मिनिटे,४५ मिनिटे व १ तासापर्यंत अशा अनेक पर्यायांमधून एक निवड आपआपल्या निरीक्षणाप्रमाणे केली जाते. अशा ठरलेल्या पिरीअडनंतर निफ्टीने या पिरीअडमध्ये नोंदवलेला उच्चांक वरील बाजूस मोडला (ब्रेक आऊट) तर निफ्टी खरेदी (LONG POSITION) करण्याचा निर्णय घेतला जातो.  आणि निफ्टीने जर खालील बाजूस ब्रेक केले तर निफ्टीमध्ये विक्री (SHORT POSITION) केली जाते.
उदा. दिवसाच्या पहिल्या अर्ध्या तासात (यात प्री-ओपन ट्रेड ची १५ मिनिटे धरु नयेत) म्हणजे प्रत्यक्ष ट्रेडींग सुरु झाल्यावरच्या अर्ध्या तासात  निफ्टीने जर ५३७८ हा उच्चांक आणि ५३५१ हा नीचांक नोंदवला असेल तर या दोन्ही किंमतींमधील रेन्ज ही ओपनिंग रेन्ज समजली जाते.या अर्ध्या तासानंतर जेव्हा कधी निफ्टी कुठल्याही दिशेस ही रेन्ज मोडेल तेव्हा ट्रेड सुरु करण्याचा निर्णय घेतला जातो. निफ्टी जेव्हा ५३७८ हा आकडा ओलांडेल तेव्हा तो खरेदीचा सिग्नल समजला जातो, त्याऐवजी  जर निफ्टीने खालील बाजूस ५३५१ ही पातळे ओलांडली तर निफ्टी शोर्ट केला जातो. आता FALSE SIGNAL टाळण्यासाठी काहीजण सदर पातळी ब्रेक झाल्यावरही प्रत्यक्ष ट्रेड करण्यासाठी २ मिनिटे वा २ कॅन्डल्स थांबतात, किंवा कन्फर्मेशनसाठी अन्य एखाद्या टेक्निकल इंडीकेटर्सचा वापर करणारेही लोक आहेत. मात्र ते कसेही असले तरी या पद्धतीत महत्व आहे ते अशी ओपनिंग रेन्ज ब्रेक होण्याला !
अशा प्रकारे आपण  खरेदी करायची कि विक्री आणि ती कधी करायची हे दोन प्रश्न तर सोडवले, पण एखादे दिवशी असे कुठल्याही दिशेला निफ्टीने ओपनिंग रेन्जला ब्रेक केलेच नाही तर ? उत्तर सोपे आहे - त्या दिवशी (निदान ORB स्ट्रॅटेजीने तरी) ट्रेड करायचे नाही ! म्हणजे ट्रेड करायचे कि नाही याचेही उत्तर मिळाले.
साधारणपणे ट्रेन्डींग मार्केट असलेल्या दिवशी ही स्ट्रॅटेजी प्रभावी ठरते तर रेन्जबाऊंड मार्केटमध्ये हीचा उपयोग न होण्याची शक्यता असते. तेव्हा सुरुवातीच्या दोन तासात जर ब्रेक आऊट मिळाला नाही तर ही स्ट्रॅटेजी वापरणे टाळावे. तसेच एके दिवशी जास्तीत जास्त दोन वेळेला या स्ट्रेटेजीने ट्रेड करावे -यापेक्षा जास्त वेळेला करू नये असेही अनुभवी लोकांचे मत आहे.
आता अशा प्रकारे सुरू केलेला ट्रेड फायद्यात जात असेल तर प्रॉफिट कधी घ्यायचा म्हणजेच कधी ट्रेड्मधून बाहेर पडायचे हा निर्णय घेण्याचे खूपच पर्याय आहेत, खूपच मते मतांतरे आहेत. उदा. मिनिमम १० ते १५ पोइन्ट फायदा घेणे व बाहेर पडणे,  पुढील रेजिस्टन्स लेवलला बाहेर पडणे, वा RSI इंडीकेटरने ओवरबॉट सिग्नल(८०+) दिल्यावर बाहेर पडणे वा EMA क्रोसओवर वा अन्य टेक्निकल इंडीकेटरचा वापर करून विक्रीचा निर्णय घेणे, अशा अनेक पर्यायांमधून अनुभवाने जी पद्धत जास्तीतजास्त अचूक रिझल्ट देते ती पद्धत वापरली जाते.  तसेच निफ्टी शॉर्ट केला असेल तर परत खरेदी करण्याचा (COVERING) निर्णयही याच प्रकारे घेतला जातो.
राहता राहिला तो STOPLOSS कसा व कधी लावावा हा अतिशय महत्वाचा प्रश्न !
जेथे खरेदी वा विक्री केली आहे त्या पातळीला निफ्टीने (प्रॉफिट बूक करण्याआधी )परत छेद दिला तर, किंवा त्यापातळीला छेद दिल्यावर २ मिनिटे वा २  कॅन्डल्सनंतर, किंवा  निफ्टीचे ५ किंवा १० पोइंट्स, किंवा EMA क्रॉसओवर, किंवा पिवोट पोइण्ट लेवल(याबद्दल नंतर पाहूया) ब्रेक झाल्यास LOSS BOOK करणे, ट्रेलींग स्टॉपलॉस लावणे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामधून निवड पुन्हा आपणासच करावयाची आहे, कारण किती तोटा झेलावा हे शेवटी आपणच ठरवायचे असते. 
ओपनिंग रेन्ज ही त्याच दिवशीची न घेता आधल्या दिवशीचीही घेणारे लोक आहेत, तर काहीजण दोन्ही दिवशीच्या रेन्जचा व दोन्ही दिवशीच्या वोलॅटिलिटीचाही एकत्रितपणे वापर करतात. एक लक्षांत घ्या कि कोणतीही सिस्टीम जेवढी अचूक बनवायला जावे तर ती अधिक गुंतागुंतीची बनत जाते. तेव्हा आपली स्ट्रॅटेजी साधी सोपी असणेही गरजेचे आहे. माझ्या मते कोणतीही स्ट्रॅटेजी सोपी असूनही तिचे नियम काटेकोरपणे पाळणे व नियमीतपणे एकच बंदीस्त सिस्टीम काही महिने वापरणे गरजेचे आहे. एके दिवशी तोटा झाला म्हणून दुसरे दिवशी दुसरी स्ट्रॅटेजी शोधणे चूकीचे आहे.

कुठल्याही स्ट्रॅटेजीचे एक उद्दीष्ट असते ते म्हणजे ट्रेडींगमधील निर्णयप्रक्रियेमधून मानवी भावना अलग करणे ! म्हणजेच ट्रेडींगच्या बाबतीत प्रामुख्याने लोभ व भिती या भावना  चुकीचा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरतात. यापासून सुटका करून घेण्यासाठी अशी एखादी बंदीस्त ट्रेडींग स्ट्रॅटेजी गरजेची असते. ती आपण नक्की केली कि मात्र त्याबरहुकुम ट्रेड करत जावे अशी एकंदर यामागील भूमिका असते.
अशा प्रकारे एक बंदीस्त सिस्टीम बनवून त्याप्रमाणे स्टॉपलॉस लावून नियमीतपणे ट्रेड करत गेले तर कालांतराने आपण फायद्यात असल्याचे दिसेल.
वरील पद्धत एक उदाहरण म्हणून विचारात घ्या, त्यानुसार आधी किमान महिनाभर पेपर ट्रेडींग करा व अपेक्षीत रिजल्ट दिसले तरच प्रत्यक्षात ट्रेड करा.
HAPPY TRADING !!

3 comments:

  • Unknown says:
    २९ ऑगस्ट, २०१२

    Surekh lekh lihila aahes..

  • संदीप says:
    २९ ऑगस्ट, २०१२

    आभार महेश...तुझी कॉमेन्ट १०० कॉमेन्टबरोबर मानतो मी. असेच प्रेम असू द्या..

  • w.Bhushan says:
    ०१ सप्टेंबर, २०१४

    amazing !