Share/Bookmark

२९ ऑग, २०१२

पिवोट पोइंट ट्रेडींग -इन्ट्राडे स्ट्रॅटेजी


ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट विषयीच्या यापूर्वीच्या पोस्टमध्ये मी असे म्हटले होते कि सुरुवातीच्या दोन तासात जर असा ब्रेकआऊट मिळाला नाही तर त्या दिवशी ORB स्ट्रॅटेजी वापरू नये. म्हणजेच मार्केट हे ट्रेंन्डींग वा रेन्जींग असे कसेही असू शकते. तेव्हा रेन्जींग मार्केटच्या बाबतीत ज्या अन्य स्ट्रॅटेजी वापरल्या जातात, यापैकीच एक लोकप्रिय पद्धत म्हणजे - ' पिवोट पॉइंट ट्रेडींग '.
 ORB स्ट्रॅटेजी वापरताना काहीवेळा असा अनुभव येतो कि ओपनिंग रेन्ज ब्रेक केल्यावरही त्या इंडेक्स वा स्टॉकची किंमत एका ठराविक पातळीला स्पर्श करून पुन्हा उलट्या दिशेने प्रवास करू लागते आणि काही वेळानंतर पुन्हा मुळ दिशा पकडते. असे कशामुळे होते तर अर्थातच डिमांड आणि सप्लायमुळे !
 डिमांड काही ठराविक लेवल्स वर  कमी होतो व सप्लाय वाढतो तेथे साहजिकच किंमत वाढायची थांबते आणि मग या दोन घटकांमधील फरक वा ढळलेला तोल पुन्हा सावरेपर्यंत म्हणजे डिमांड हा साधारणपणे सप्लायएवढा वाढेपर्यंत किंमत कमी होत जाते. डिमांड हा सप्लायपेक्षा वाढला तर ती पुन्हा वाढू लागते. हे सर्व आपल्याला माहीत असूनही पुन्हा येथे अशासाठी लिहिले कि अशा डिमांड आणि सप्लायने तयार होणा-या इन्ट्राडे लेवल्स शोधून त्यानुसार अनेक लोक ट्रेड करत असतात आणि त्यामुळे या लेवल्स अधिकच परिणामकार ठरत असतात. तेव्हा या लेवल्स माहीत असणे इन्ट्राडे ट्रेडरला अतिशय गरजेचे आहे. भरपूर वोल्युम असलेल्या शेअर्स वा निफ्टीच्या बाबतीत या लेवल्स अधिक परिणामकारक असतात.
 पिवोट पॉइंट सिस्टीमच्या आधारे या लेवल्स शोधून काढणे अगदी सोपे आहे.
शालेय गणितातील ' सरासरी ' ही संकल्पना आपल्याला आठवतच असेल.  पिवोट पोइंट म्हणजे अशीच काहीशी सरासरी किंमत आहे. यात आधल्या दिवशीच्या किंमतीचा उच्चांक, नीचांक आणि बंद भाव या तीन घटकांची बेरीज करून त्याला ३ ने भागले जाते-म्हणजेच सरासरी काढली जाते. या सरासरीलाच आजच्या दिवसासाठीचा ' पिवोट पोइंट ' वा ' डेली पिवोट '( DP) असे म्हणतात. आता या पिवोट पोइंटच्या वर व खाली प्रत्येकी दोन लेवल्स शोधल्या जातात. साहजिकच डेली पिवोटच्या वरील लेवल्स या रजिस्टन्स व खालील लेवल्स या सपोर्ट म्हणून वापरल्या जातात. डेली पिवोट आणि या ४ लेवल्स मिळून तयार होणा-या सिस्टीमला ' 5 point system ' असेही नांव आहे.
पिवोट व अन्य लेव्ल्स शोढून काढण्यासाठीचा सोपा फॉम्युला असा आहे -

डेली पिवोट पॉइन्ट  (PP) = आधल्या दिवशीच्या high, low व close ची सरासरी. तेव्हा -               PP =(H + L + C) / 3
पहिली  रजिस्टन्स लेवल  R1 = 2 * PP - L
दुसरी रजिस्टन्स लेवल    R2 = PP + (R1 - S1)
पहिली सपोर्ट लेवल          S1 = 2 * PP - H
दुसरी सपोर्ट लेवल            S2 = PP - (R1 - S1)

(सर्व वाचकांच्या सोयीसाठी लवकरच मी या ब्लॉगवर पिवोट पोइंट लेवल्सचे रेडीमेड टेबलही कायमस्वरूपी देणार आहे. त्यात आधल्या दिवशीच्या इंडेक्स वा स्टॉकच्या ओपन ,हाय व क्लोज या किंमती टाकल्या कि आपणास आजच्या दिवशीसाठीच्या पिवोट व अन्य ४ लेवल्स आपोआप मिळतील)

अशा प्रकारे प्रत्येक दिवशीच्या ट्रेडींगसाठी ५ लेवल्स आपल्याला मिळतात. लक्षांत घ्या कि या लेवल्स फक्त आजच्या दिवसातील (इन्ट्राडे) संभाव्य  लेवल्स असतील आणि पुढील दिवसासाठीच्या नव्या लेवल्स , आजच्या किंमतींच्या आधारे पुन्हा शोधाव्या लागतील.
जे लोक ऑनलाईन ट्रेडींग प्लॅटफॉर्म वापरतात, त्यांना या लेवल्स त्यांच्या चार्टवर रेडीमेड मिळू शकतात. मात्र इतरांसाठी गूगल वा याहू फायनान्स आहेतच ! या मोफत सेवांच्या आधारे आपण जे चार्ट बघतो त्यावर आपण शोधलेल्या पिवोट लेवल्सची कल्पना करू शकतो, व त्या आधारे ट्रेड करू शकतो.
पिवोट पॉइन्ट सिस्टीमच्या आधारे मुख्यत्वे दोन बाबींचा बोध होतो-
१) मार्केटचे सेन्टीमेन्ट- बाजार जर पिवोट पॉइन्टच्या वर उघडून ट्रेड करत असेल तर  बुलीश ,आणि पिवोटच्या खाली उघडून तेथे ट्रेड करत असेल तर बेअरीश सेन्टीमेन्ट असे ढोबळमानाने म्हणता येइल.
२)  सपोर्ट व रजिस्टन्स लेवल्स- खरे म्हणजे पिवोट पोइन्ट व अन्य ४ लेवल्स या सपोर्ट व रजिस्टन्स अशा दोन्ही प्रकारे काम करतात. किंमत ही पिवोटच्या वर  असेल तर पिवोट हा सपोर्टचे काम करतो, व किंमत पिवोटच्या खाली असेल तर तो रजिस्टन्सचे काम करतो. त्याचप्रमाणे किंमतीने रजिस्टन्स लेवल ओलांडली तर तीचे सपोर्टमध्ये रुपांतर होते, आणि पुढील लेवल ही रजिस्टन्स म्हणून काम करते.
आता या लेवल्सचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते बघुया. पिवोट ट्रेड हे दोन प्रकारे करणारे लोक आहेत. १) रेन्ज ट्रेडींग आणि २) ब्रेकआऊट ट्रेडींग.



१) रेन्ज ट्रेडींग -वरील आकृती बघा. इंडेक्स वा स्टॉक हा पिवोटच्या खाली ओपन होवून तेथे ट्रेड करत आहे. अशा स्थितीत पिवोट लेवल ही रजिस्टन्स लेवल असून (S1) हा पहिला सपोर्ट आहे. जेव्हा किंमत सपोर्ट लेवलच्या अगदी जवळ येवून परत फिरू पहाते तेथेच रेन्ज ट्रेडींग करणारे खरेदी करण्याचा निर्णय घेतात. साहजिकच पहिले टारगेट असते ते पिवोट लेवल. तेथे विक्री करून पुन्हा सपोर्टला येण्याची वाट बघता येते. अशा प्रकारे एका रेन्जमध्ये (जमल्यास पुन्हापुन्हा ) ट्रेडींग करण्याचा प्रयत्न केला जातो. मार्केटमध्ये काही महत्वाची बातमी वा रिजल्ट असे काही विशेष घडत नसेल, परदेशी बाजारही स्थिर (FLAT) असतील तर अशा प्रकारचे ट्रेडींग यशस्वी होते. मात्र खरेदी करताना सपोर्ट लेवलच्या किंचित खाली स्टॉपलॉस लावून ठेवणे अगदी गरजेचे आहे. कारण मार्केट हे कधीही आपला मूड बदलू शकते, त्यासाठी एक ट्रेडर म्हणून आपली तयारी हवीच.



2) ब्रेकआऊट ट्रेडींग - आता वरील आकृती पहा.  सुरुवातीला किंमत ही पिवोटच्या अगदी जवळ फिरत आहे. जेव्हा ती खालील बाजूस सरकते तेव्हा रेन्ज ट्रेडींगवाले विक्री करतीलही, पण ब्रेकआऊट ट्रेडींगवाले वाट बघतील ती क्लिअर ब्रेकआऊटची ! नंतर किंमत S1 या सपोर्टजवळ आली आहे. येथे रेन्ज ट्रेडींग करणारे स्क्वेअर-अप करून प्रॉफिट घेतील, तर काही आक्रमक रेन्ज ट्रेडर पुन्हा खरेदीही करतील, मात्र ब्रेकआऊट ट्रेडींगवाले येथेही वाट बघतील ती S1 लेवल (वा पिवोट लेवल) ब्रेक होण्याची. त्यानंतर जेव्हा किंमत वाढत जावून  पिवोट लेवलजवळ आली तेव्हा  रेन्ज ट्रेडींगवाले पुन्हा प्रॉफिट बूक करतील आणि अखेर जेव्हा किंमत पिवोट लेवलला ब्रेक करेल तेव्हा मात्र ब्रेकआऊट ट्रेडींगवाले ACTIVE होतील आणि खरेदी करतील. अर्थात त्यांचे पहिले टारगेट असेल ते R1 या लेवलचे ! खरेदीचे वेळेस पिवोट लेवलच्या किंचित खाली स्टॉपलॉस लावायला मात्र ते विसरणार नाहीत. पुढे R1 जवळ फक्त अर्धीच (partial profit booking) विक्री करून किंमत R2 या नव्या टारगेटकडे जाण्याचीही ते वाट बघतील. बाजारातील सेन्टीमेन्ट, बातम्या, ट्रेडरची शैली या गोष्टींनुसार असे निर्णय घेतले जातात.
काही लोक S3 आणि R3 अशा वाढीव लेवल्सचाही वापर करतात तर काही लोक दोन लेवल्सच्या मध्ये आणखी half level ची ही कल्पना करतात.

सारांश मुख्य संकल्पना ' पिवोट लेवल्स' च्या आधारे ट्रेडींग ही असली तरी त्याचा वापर कसा करायचा, मदतीसाठी आणखी कुठले टेक्निकल इंडीकेटर वापरायचे, स्टॉपलॉस नेमका कुठे लावायचा, किती मोठे ट्रेड करायचे, पूर्ण प्रॉफिट घेवून बाहेर पडायचे कि अर्धा प्रॉफिट घेवून पुढील टारगेटची वाट बघायची अशा अनेक बाबी प्रत्येकाने स्वतःच्या शैली व गरजेनुसार ठरवायच्या असतात.
पिवोट पोइन्ट ही जगभर लोकप्रिय असलेली उपयुक्त पद्धत आहे आणि प्रत्येक इन्ट्राडे ट्रेडरने ती अभ्यासणे गरजेचे आहे हे नक्की !
नेहमीप्रमाणेच आधी पेपर ट्रेडींग करा आणि मगच स्टोपलॉससह प्रत्यक्ष ट्रेड करा !
HAPPY TRADING !!