Share/Bookmark

१९ डिसें, २०१२

ऑप्शन्स (भाग २)-'कॉल' आणि 'पुट' म्हणजे काय ?‘ऑप्शन’ म्हणजे मराठीत ‘पर्याय’ ! आता या ऑप्शन्स मध्ये ‘कॉल’ आणि ‘पुट’ हे दोन पर्याय आहेत. आपण यापूर्वीच्या पोस्टमधील उदाहरणात बघितले कि मी टीव्ही खरेदीच्या बाबतीत, १०००रु. हमी रक्कम भरून ठराविक किंमतीला टीव्ही खरेदीचा हक्क ठराविक काळासाठी विकत घेतला होता. हा मी स्वीकारलेला पर्याय म्हणजेच ‘कॉल ऑप्शन’ होय ! आता त्या उदाहरणातील सर्व घटकांचा अर्थ आपण मार्केटच्या संदर्भात बघुया म्हणजे पुढचे सारे समजून घ्यायला सोपे होइल.

टीव्ही – म्हणजे ज्या वस्तूच्या संदर्भातला सौदा आहे ‘ती’ म्हणजेच ‘Underlying’ – इंडेक्स वा एखादा स्टॉक वा कमॉडिटी.

मी- टीव्हीचा खरेदीदार वा तशी हमी घेणारा – म्हणजेच रक्कम देवून ‘कॉल ऑप्शन’ खरेदी करणारा – ‘कॉल बायर’.

विक्रेता – हा हमी देणारा व बदल्यात रक्कम स्वीकारणारा – म्हणजेच ‘कॉल ऑप्शन’ विकणारा किंवा ‘कॉल सेलर’ वा ‘Call Writer’ – प्रत्यक्षात मात्र स्टॉक (वा कमॉडिटी) एक्स्चेन्ज हे कॉल बायर व सेलर यांच्यामधील दुवा असते. जसे शेअर खरेदी-विक्रीच्या बाबतीत असते तसेच.

हमी रक्कम – याला ‘प्रिमिअम’ असे म्हणतात. ही त्या कॉल ऑप्शनची त्यावेळची किंमत असते.- लक्षात घ्या कि सदर करार संपायला जास्त काळ असेल तर तेवढा हा प्रिमिअम जास्त असेल, व (टीव्हीच्या किंमतीत विशेष वाढ न झाल्यास वा घट झाल्यास) काळ संपत जाईल तसा तो कमी कमी होत जाईल. शेवटच्या दिवशी हा प्रिमिअम म्हणजेच ऑप्शनची किंमत ही शून्य म्हणजेच हे कॉल ऑप्शन ‘Worthless’ होईल. अशा काळानुसार कमी होणा-या ऑप्शनच्या प्रिमिअमला ‘Time Decay’ असे म्हणतात. ‘टाईम डीके’ ही संकल्पना नीट लक्षांत घ्या, कारण ऑप्शन ट्रेडींगमध्ये याला अतिशय महत्व आहे. त्याविषयी नंतर पाहणारच आहोत.

एक महिन्याची मुदत – जसे फ्युचर्स व्यवहाराच्या बाबतीत आपण पूर्वी बघितले कि चालू महिना, पुढील महिना व त्यापुढील महिना या काळासाठी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट केली जातात तशीच ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टही तीन महिन्यासाठी ट्रेड केली जातात, तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या महिन्याच्या सिरीजची एक्स्पायरी असते. अर्थातच चालू महिन्याच्या ऑप्शनचे प्रिमिअम हे पुढील महिन्याच्या ऑप्शनच्या प्रिमिअमच्या तुलनेत स्वस्त असतात आणि त्यांचा वॉल्युमही चांगला असतो. उदा. निफ्टी डिसेंबर कॉल ऑप्शन हा, जानेवारी कॉल ऑप्शनपेक्षा स्वस्त असतो. दोन महिन्याच्या कालावधीसाठी मी जर टीव्ही विक्रेत्याला हमी मगितली तर तो जास्त प्रिमिअम घेणार कारण जास्त काळामध्ये टीव्हीच्या किंमतीत बदल होण्याची शक्यताही जास्त असेल.

कराराची पूर्तता – सदर हमी रक्कम भरून केलेल्या कराराप्रमाणे मी जर तो टीव्ही मुदतीच्या आत खरेदी केला तर या कराराची पूर्तता झाली, म्हणजेच मार्केटच्या भाषेत म्हणायचे तर सदर ‘कॉल ऑप्शन एक्सरसाईझ’ केला गेला. आपल्याकडे निफ्टी वा स्टॉकच्या बाबतीतले असे ‘एक्सरसाईझ’ हे (जाने.’११ पासून) फक्त शेवटच्या गुरुवारी करता येते. म्हणजेच सदर ‘Underlying’ (निफ्टी वा स्टॉक) ठरलेल्या किंमतीत खरेदी करता येतो. त्या ‘Underlying’ ची बाजारात त्या दिवशी जी किंमत असेल त्यावर कॉल एक्सरसाईझ करणाराचा फायदा वा तोटा ठरतो.

हमी पावती अन्य व्यक्तीस विकणे – समजा मी टीव्ही खरेदी न करता ती हमीची पावती अन्य व्यक्तीस विकली तर मी माझा ‘कॉल’ हा विकून टाकला असे होते. दरम्यान ‘Underlying’ ची किंमत वाढली असेल तर कॉल ऑप्शनची किंमतही वाढेल म्हणजेच असा कॉल ऑप्शन ‘घेवून विकणा-याचा’ फायदा होईल मात्र ‘Underlying’ ची किंमत कमी झाली असेल किंवा ती स्थिर राहिली वा पूरेशी वाढली नसेल तर मात्र कॉल ऑप्शनची बाजारातील किंमत कमी झाल्याने तोटा होईल. असे ऑप्शन ट्रेड हे मात्र त्या काळातील कोणत्याही दिवशी करता येते.

समजा मी टीव्ही खरेदीही केला नाही व ती हमीची पावती म्हणजेच घेतलेला कॉल ऑप्शन मुदत संपेपर्यंत विकलाही नाही, तर आपोआपच त्याची किंमत कमी कमी होत जावून शून्य होईल आणि एक्स्पायरीच्या दिवशी तो आपोआप स्क्वेअर-अप होईल. मात्र दरम्यानच्या काळात  ‘Underlying’ ची किंमत भरपूर वाढली असेल तर मात्र त्या कॉल ऑप्शनची किंमत वाढली असल्याने किंमतीतल्या फरकाएवढा फायदा मला मिळेल.

निफ्टीच्या बाबतीत असे ऑप्शन ट्रेडींगचे व्यवहार करून विविध मार्केट कंडीशन्समध्ये फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. निफ्टीचा एक लॉट ५० चा असल्याने, बाजारातील ऑप्शनची किंमत १०रु. असेल तर ५००रु इतका प्रिमिअम भरून आपल्याला एक लॉट खरेदी करता येतो. ऑप्शनच्या विक्रीविषयी आपण नंतर माहिती घेणारच आहोत.

ही झाली ‘कॉल ऑप्शन’ विषयी माहिती. आता ‘पुट ऑप्शन’ म्हणजे काय ते बघुया.

समजा मी एक शेतकरी असून सुमारे महिन्यानंतर पिकणारे धान्य मला दुकानदाराला विकायचे आहे. वरील टीव्हीच्या उदाहरणाप्रमाणेच एका महिन्याच्या मुदतीत एका ठराविक( स्ट्राईक प्राईज वा एक्सरसाईझ प्राईज) किंमतीत एक धान्याचे पोते त्याला विकण्याचा हक्क मी खरेदी करू शकतो. या वर्षी पीक उत्तम आल्याने धान्याच्या किंमती कमी होणार अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मी आज असा करार करून ठेवतो. महिनाअखेर धान्याच्या किंमती उतरल्या तर हा ‘विक्रीचा हक्क’ खरेदी करून ठेवल्याने मला आजच्या भावानेच विक्री करता येइल, किंवा धान्याच्या किंमती उतरल्याने माझ्या या हमी पावतीची किंमत वाढेल व तशा स्थितीत प्रत्यक्ष धान्य न विकता मी तो हक्क अन्य शेतक-याला विकूनही फायदा कमवू शकेन. म्हणजेच येथे ‘धान्य’ या ‘Underlying’ चा विक्री करण्याचा हक्क म्हणजे ‘पुट ऑप्शन’ मी खरेदी केला व परिस्थितीनुसार प्रत्यक्ष धान्याची विक्री करून किंवा हा पुट ऑप्शन विकून मी फायदा कमवला. अर्थात माझ्या अपेक्षेनुसार धान्याच्या किंमती कमी झाल्या नाहीत, वा स्थिर राहिल्या, वा वाढल्या तर माझ्या पुट ऑप्शनची किंमत कमी होत जाईल जसे कि आधीच्या टीव्हीच्या उदाहरणात, कॉल ऑप्शनच्या बाबत आपण पाहिले.

या दोन्ही उदाहरणावरून असा निश्कर्ष निघतो कि कॉल व पुट या दोन्ही ऑप्शनच्या बाबतीत जो खरेदीदार (बायर) असतो त्याला प्रिमिअम भरावा लागतो, मात्र कॉन्ट्रॅक्ट पूर्ण (एक्सरसाईझ) करायचे कि नाही हे तो ठरवू शकतो. याउलट करार लिहून देणारास म्हणजेच कॉल वा पुट ऑप्शनची विक्री करणारास (सेलर वा रायटर) करार पाळणे बंधनकारक असते आणि त्याबदल्यात त्याला प्रिमिअमच्या रकमेचा लाभ होणार असतो. यात हे महत्वाचे आहे कि ‘Underlying’ ची किंमत ठरलेल्या काळात वाढेल कि कमी होईल याचा अंदाज ज्याला आला तो फायदा कमवेल. निफ्टीच्या बाबतीत असे कॉल व पुट हे दोन्ही ऑप्शन्स, खरेदी-विक्री करण्याचे केन्द्र म्हणजे स्टॉक एक्सचेन्ज असून ते ऑप्शन बायर व सेलर यामधील दुवा असते. या माध्यमातून ज्या ट्रेडरला निफ्टी वा बाजार वाढेल असे वाटते त्याने ‘कॉल’ खरेदी करणे अपेक्षीत आहे तर ज्याला तो पडेल असे वाटते त्याने ‘पुट’ खरेदी करणे अपेक्षीत आहे. वरील उदाहरणात ‘आजचा भाव’ ही एकच स्ट्राईक प्राईज असली तरी प्रत्यक्बाजारात निफ्टीच्या दर १०० पॉइन्ट्च्या अंतराने अनेक स्ट्राईक प्राईज उपलब्ध असतात. यातील कोणत्याही स्ट्राईक प्राईजचे ऑप्शन्स आपण खरेदी-विक्री करू शकतो. NSE च्या वेबसाईट वर, तसेच आपण ऑनलाईन टर्मिनल वापरत असाल तर त्यावरही निफ्टी वा अन्य इंडेक्स आणि स्टॉकच्या सर्व स्ट्राईक प्राईजच्या कॉल व पुटच्या सध्याच्या किंमती आपण LIVE बघु शकतो. निफ्टी ऑप्शन्सचा बाजारातील वॉल्युम चांगला असतो, मात्र इतर इंडेक्सचा व काही स्टॉक्स सोडल्यास स्टॉक ऑप्शन्सचा वॉल्युम तुलनेने कमी असतो. निफ्टी ऑप्शन्सच्या NSE वरील किंमती पहाण्यासाठी येथे क्लिक करा. याच पेजवर वरील बाजूस असलेल्या पर्यायांचा वापर करून आपण निफ्टी, इतर इंडेक्स वा स्टॉक यातील निवड करू शकतो तसेच चालू, तसेच पुढील वा त्यापुढील महिन्याची ऑप्शन कॉन्ट्रॅक्टही आपण येथे बघू शकतो.

मध्यभागी असलेल्या कॉलममध्ये निफ्टीच्या सध्याच्या किंमतीच्या वरील व खालील बाजूस १०० पोइंट्सच्या  अंतराने असलेल्या विवि स्ट्राईक प्राईज दिसत आहेत, तसेच डावीकडे 'कॉल' व उजवीकडे 'पुट'च्या किंमती दिसत आहेत. मार्केट चालू असताना रिफ्रेश बटन दाबून आपण ही माहिती अपडेट करू शकतो. कॉल आणि पुटच्या किंमती या निफ्टीच्या सध्याच्या किंमतीच्या दोन्ही बाजूस कशा क्रमाने कमी वा जास्त होत गेल्या आहेत हे नीट पहा. तसेच तांबूस व पांढ-या रंगाने या पेजचे पडलेले विभाग लक्षांत घ्या. यावरून काही अंदाज,आडाखे बांधण्याचा प्रयत्न करा. पुढील पोस्टमध्ये या बाबतीतली सविस्तर माहिती येणारच आहे, तोपर्यंत थोडा सेल्फ स्टडी आणि जमल्यास या ब्लॉगला लाईक करा !!