मागील पोस्टमध्ये
दिलेल्या NSE च्या वेबसाईटवरील पेजचाच संदर्भ घेवून आपण आज चर्चा करणार आहोत.
तेव्हा कृपया येथे क्लिक करा व ते पेज उघडा. डाव्या बाजूला कॉल व उजव्या बाजूला
पुट च्या किंमती आहेत.
आता प्रथम डावीकडील
‘कॉल्स’ विभागाकडे पहा. आजच्या निफ्टीच्या किंमतीपेक्षा (उदा.५९००) कमी स्ट्राईक
प्राईज असलेल्या ऑप्शन्सच्या किंमती या तांबूस रंगाने दाखविल्या आहेत. तसेच
स्ट्राईक प्राईज जेवढी कमी (उदा. ५८००, ५७०० इ.) होत जाते तेवढ्या प्रमाणात त्या
कॉल ऑप्शनची किंमत वाढत जाते हे आपल्या लक्षांत येईल. या उलट आजच्या निफ्टीच्या
किंमतीपेक्षा जास्त स्ट्राईक प्राईजच्या म्हणजेस पांढ-या रंगाने दाखविलेल्या
विभागात, स्ट्राईक प्राईज जेवढी जास्त असेल (उदा. ६०००, ६१०० इ.) तेवढ्या प्रमाणात
त्या कॉल ऑप्शन्सच्या किंमती या कमी होत गेलेल्या दिसतील.
याचा अर्थ असा, कि
निफ्टी ५९०० वा जवळपास असताना ६१०० स्ट्राईक प्राईजचा कॉल ऑप्शन हा ६००० च्या कॉल
पेक्षा स्वस्त असतो कारण या महिन्याच्या( उदा. जानेवारी ’१३ सिरीज) मुदतीत निफ्टीने
६००० ची पातळी ओलांडण्याची जी शक्यता असते, त्यापेक्षा ६१०० ची पातळी ओलांडण्याची
शक्यता ही थोडी कमी असते. म्हणजेच जर मी आज ६०००चा कॉल खरेदी केला तर माझ्या
फायद्याची शक्यता, ही ६१०० चा कॉल खरेदी करणा-यापेक्षा जास्त असेल व म्हणूनच ६०००
च्या कॉलची किंमत (प्रिमिअम वा हमी रक्कम) मला जास्त द्यावी लागेल. ६१०० वा ६२००,
६३०० वा त्यापुढचे कॉल हे अधिकाधिक स्वस्त मिळत असतील, मात्र महिन्याच्या मुदतीत निफ्टी तेथपर्यंत जायची
शक्यता कमी असल्याने असे स्वस्त कॉल खरेदी केल्यास फायदा मिळण्याची शकयताही कमी
कमी होत जाईल. अर्थात जर निफ्टी ५९०० असताना जर ६२०० चा कॉल खरेदी केला असेल आणि
जर निफ्टी हा अल्प मुदतीत ६१०० जरी झाला तरी ६२०० च्या कॉलची किंमत वाढल्याने तो
विकून फायदा होणे शक्य असते. मात्र निफ्टी किती काळात आणि किती मोठी हालचाल करतो
या दोन्ही गोष्टींवर सारे अवलंबून असते.
अशा प्रकारच्या अंडरलाईंगच्या
च्या भावापेक्षा जास्त किंमतीच्या स्ट्राईक प्राईजच्या कॉल ऑप्शन्स ना
‘आऊट ऑफ द मनी’ कॉल ऑप्शन्स (OTM) म्हणतात. ते जेवढे अधिक ‘आऊट ऑफ द मनी’ असतील
तेवढे स्वस्त असतील.
निफ्टीच्या आजच्या भावापेक्षा कमी स्ट्राईक
प्राईजच्या म्हणजेच ५८००, ५६०० इ. च्या ऑप्शनच्या किंमती या वाढत गेलेल्या दिसतील.
कारण सध्या ५९०० ला मार्केटमध्ये मिळत असलेला निफ्टी, हा फक्त ५६०० मध्येच खरेदी
करण्याचा हक्क हा महाग असणारच ! समजा मी असा ५६०० चा कॉल खरेदी केला आणि तो लगेच
एक्सरसाईज केला तर मला लगेचच आणि हमखास असा ३०० रु. चा फायदा होईल. आणि म्हणूनच
अशा अंडरलाईंगच्या किंमतीपेक्षा स्ट्राईक प्राईज कमी असलेल्या कॉल ऑप्शन्सना ‘इन द
मनी’ (ITM) कॉल ऑप्शन असे म्हणतात. असे ITM कॉल ऑप्शन हे जेवढे अधिक ‘इन द मनी’
असतील तेवढे महाग असतील.
आता उजव्या बाजूला
असलेल्या पुट विभागावर लक्ष द्या. निफ्टीच्या किंमतीपेक्षा कमी स्ट्राईक
प्राईजच्या पुट ऑप्शनच्या किंमती या पांढ-या रंगाने दाखविल्या आहेत. तर निफ्टीच्या
किंमतीपेक्षा जास्त स्ट्राईक प्राईज असलेल्या ऑप्शनच्या किंमती या तांबूस रंगाने
दाखविल्या आहेत.
अंडरलाईंगच्या
किंमतीपेक्षा कमी स्ट्राईक प्राईज असलेल्या पुट ऑप्शनना ‘आऊट ऑफ द मनी’ (OTM) पुट ऑप्शन
म्हणतात. असे OTM पुट ऑप्शन, हे जेवढे ‘आऊट ऑफ मनी’ असतील म्हणजेच अंडरलाईंग
प्राईजपेक्षा यांची स्ट्राईक प्राईज ही जेवढी कमी असेल तेवढे हे स्वस्त होत गेलेले
दिसतील.
याउलट तांबूस रंगाने
दाखविलेले पुट ऑप्शन ज्यांची स्ट्राईक प्राईज ही अंडरलाईंगच्या किंमतीपेक्षा जास्त
आहे हे ‘इन द मनी’ म्हणजेच ITM पुट ऑप्शन्स आहेत. हे जेवढे ‘इन द मनी’ असतील तेवढी
यांची किंमत ही जास्त होत गेलेली दिसेल. असे ITM पुट ऑप्शन खरेदी केल्यावर लगेच
एक्सरसाईज केले तर हमखास फायद्याचे ठरतील. (अर्थात NSE ने युरोपिअन ऑप्शन पद्धती
स्वीकारल्याने अशा प्रकारे ऑप्शन केव्हाही एक्सरसाईज करणे शक्य नसून हल्ली फक्त
शेवट्च्या गुरुवारी शक्य असेल हे आपण पूर्वी बघितले आहे. अमेरिकन पद्धतीप्रमाणे
ऑप्शन्स हे कोणत्याही दिवशी एक्सरसाईज करता येतात. मात्र आपल्याकडे जाने.’११ पासून
फक्त युरोपिअन पद्धती आहे.)
याव्यतिरिक्त
अंडरलाईंगच्या किंमतीएवढ्याच स्ट्राईक प्राईजचे ऑप्शन हे ‘ऍट द मनी’ (ATM) ऑप्शन्स
या नावाने ओळखले जातात. उदा. निफ्टी ५९०० वा जवळपास असताना ५९०० स्ट्राईक प्राईजचे
ऑप्शन्स हे ‘ऍट द मनी ऑप्शन’ असतात.
कोणत्याही ऑप्शनची
किंमत ही त्याच्या स्ट्राईक प्राईज व्यतिरिक्त त्याच्या शिल्लक मुदतीवरही अवलंबून
असते व ही मुदत जशी संपत जाईल तशी ऑप्शनची किंमत कमी होत जाते.
उदा. समजा मी
निफ्टीची किंमत ५९०० असताना ६००० चा म्हणजेच OTM कॉल खरेदी केला आणि लगेचच
एक्सरसाईज केला तर ? पण निफ्टी मार्केटमध्ये ५९०० ला मिळत असताना तो ६०००ला
घेण्याचा हक्क बजावणे तोट्याचे म्हणजेच निरर्थक ठरते ! म्हणजे या OTM कॉल ऑप्शनला तात्काळ
मिळणारी अशी स्वतःची अंगभूत किंमत नाहीच. म्हणजेच अशा OTM कॉल ऑप्शनची किंमत ही त्याच्या
टाईम व्हॅल्युवर म्हणजे शिल्लक मुदतीवर अवलंबून असते.
याचप्रमाणे निफ्टी
५९०० असताना मी ५८००चा OTM पुट खरेदी केला आणि लगेच एक्सरसाईज केला तर ते निरर्थक ठरते.
म्हणजेच OTM पुट ऑप्शनलाही अंगभूत किंमत नसते आणि अशा OTM पुटची किंमत ही सुद्धा त्याच्या
टाईम वॅल्युवर म्हणजेच शिल्लक मुदतीवर अवलंबून असते.
मग प्रश्न असा येतो
कि अशा अंगभूत किंमतच नसलेल्या OTM ऑप्शनना बाजारात किंमत का असते ? ते बाजारात
ट्रेड का केले जातात ?
याचे कारण असे कि OTM कॉल वा पुट हे ‘आज’
एक्सरसाईज करणे निरर्थक असले तरी ते मुदतीच्या शेवटी एक्सरसाईज करताना अंडरलाईंगची
किंमत बदलल्याने फायदेशीर ठरण्याची शक्यता असते. उदा. निफ्टी ५९०० असताना घेतलेला ६०००
चा कॉल हा त्या क्षणी ‘आऊट ऑफ मनी’ असल्याने त्याची अंगभूत किंमत शून्य असली, तरी दिलेल्या
मुदतीमध्ये जर निफ्टी ६०५० एवढा वाढला तर मात्र तो आपोआपच ‘इन द मनी’ कॉल होईल व
त्याची अंगभूत किंमत वाढेल. किंवा मुदतीपूर्वीच निफ्टी ५९८० एवढा जरी झाला तरी
६०००च्या कॉल ऑप्शनची किंमत वाढल्याने तो विकून फायदा होवू शकतो. अशा परिस्थितीत
तो शेवटच्या गुरुवारी एक्सरसाईज करणे किंवा केव्हाही विकून फायदा घेणे शक्य असते. मात्र
निफ्टी किती काळात आणि किती मोठी हालचाल करतो या दोन्ही गोष्टींवर सारे अवलंबून
असते.
अशा प्रकारे ठराविक
मुदतीत होवू शकणा-या (संभाव्य) फायद्याच्या शक्यतेमुळेच आऊट ऑफ मनी (कॉल वा पुट)
ऑप्शन्सना ‘टाईम व्हॅल्यु’ असते व त्यामुळेच स्वतःची अंगभूत किंमत नसूनही त्यांना
बाजारात किंमत असते.
म्हणून आपण असे
म्हणू शकतो कि –
ऑप्शनची बाजारातील किंमत
= (अंगभूत किंमत Intrinsic Value + शिल्लक मुदतीवर ठरणारी किंमतTime Value).
सर, शेअर बाजाराविषयी मराठीमधून माहिती देणारा हा ब्लॉग पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. हा ब्लॉग मला खुपच आवडला. कृपया ऑप्शन या प्रकाराविषयी आणखी लेखन प्रकाशित करावे. धन्यवाद.
सर शेअर बाजाराची मराठीतून माहिती देणारा आपला ब्लॉग अत्यंत उपयुक्त आहे. कृपया ऑप्शन्स या प्रकाराविषयी आणखी माहिती प्रकाशित करा. धन्यवाद.