Share/Bookmark

८ जाने, २०१३

ऑप्शन्स (भाग ४) -धोक्याची अदलाबदल !ऑप्शन्सविषयी पहिल्या तीन भागात या विषयातले काही महत्वाचे शब्द आणि त्यांचा नेमका अर्थ काय हे आपण बघितले. प्रत्यक्ष ऑप्शन्स ट्रेडींगकडे वळण्यापूर्वी मुळात या ऑप्शन्स मार्केटची निर्मीती कशासाठी झाली हे बघणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन्सचा वापर का व कसा करतात याविषयीची समज वाढायला, तसेच ‘ऑप्शन्स मार्केट हे धोक्याचे आहे’ असा जो एक गैरसमज आहे तो दूर व्हायला मदत होईल.

शेअरबाजाराची निर्मीती ही भांडवल उभारणीसाठी झाली हे आपल्याला माहितच आहे. उदा. मायक्रोसॉफ्ट किंवा इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपन्यांना सुरुवातीला भासलेली भांडवलाची गरज शेअरबाजारात IPO द्वारेच भागवली गेली. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. म्हणजे भांडवल उभारणी कशी करावी या प्रश्नावर ‘शेअरबाजार’ हे उत्तर तर मिळाले, मात्र त्यातून नवीन एक प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे ‘त्यात अंतर्भूत असलेला (संभाव्य) धोका ! कारण यशस्वी कंपन्यांच्या बाबतीत सारे काही छान असले, तरी अशाही अनेक कंपन्या असतात, ज्या आवश्यक ते  भांडवल शेअरबाजाराद्वारे उभे तर करतात, मात्र त्या त्यांच्या बिझीनेसमध्ये अयशस्वी ठरल्याने लवकरच नामशेष होतात. अशा परिस्थितीत त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या शेअरहोल्डर्सचे प्रचंड नुकसान होते. उदा. अमेरिकेतील एनर्जी बिझीनेस मधली एकेकाळची अग्रगण्य असलेली ‘एन्रॉन’ ही कंपनी किंवा आपल्याकडील ‘R-POWER’ चा IPO, वा सत्यम कॉम्प्युटर्स ! गुंतवणूकदारांचे शेअरबाजारात असे होणारे नुकसान ही नेहमीच मोठी समस्या होती आणि त्यावर काही उपाय शोधणे गरजेचे होते. गुंतवणूकदारांना धोक्यापासून वाचवण्यासाठी असे काही साधन देणे गरजेचे होते कि ज्यामुळे शेअरबाजार सुरळीत चालेल.
आणि त्यातूनच जन्म झाला- ‘ऑप्शन्स’ या कल्पनेचा ! त्यामुळे ऑप्शन मार्केट हे मुळातच ‘धोका’ या प्रकाराशी निगडीत मार्केट आहे. आता तुम्हाला हे वाचायला विचित्र वाटेल कि – ऑप्शन मार्केटमध्ये ‘धोक्या’च्या अदलाबदलीचे व्यवहार केले जातात ! चक्क धोक्याची अदलाबदल ! तुम्ही म्हणाल- असा दुस-याचा धोका स्वतःहून कोणी स्वीकारेल का ? पण खरे म्हणजे आपण सर्वजण आपल्या नेहेमीच्या आयुष्यात असे धोकयाच्या अदलाबदलीचे व्यवहार करतच असतो. एक उदाहरण देतो - आपण आपल्या कार वा बाईकचा विमा उतरवितो म्हणजे नेमके काय करतो? तर आपण प्रवास करत असताना, त्यात अंतर्भूत असलेला अपघाताचा धोका आपण एखाद्या इन्शूरन्स कंपनीला देवू करत असतो. कंपनीला मिळणा-या प्रिमिअमच्या बदल्यात ती कंपनी तो धोका पत्करत असते, आणि आपल्याला नकोसा असलेला हा अपघाताचा ‘धोका’ आपण त्या विमा कंपनीच्या नावे करत असतो !  मग ही ‘धोक्या’ची अदलाबदलच नाही का ? म्हणजे आपण, आणि ती विमा कंपनी यामध्ये अदलबदलीचा असा करार करून आपण एक प्रकारचे ‘धोक्याचे व्यवहार करणारे मार्केट’ तयार करत असतो !  

तेव्हा ‘असा धोका स्वतःहून कोणी स्वीकारेल का?’ या प्रश्नाचे उत्तर असे आहे कि – होय ! पूरेशा रकमेच्या बदल्यात असा धोका स्वीकारला जातो, किंवा धोका स्वीकारण्याबद्दलच चक्क काहीजण पैसे मिळवत असतात !

ऑप्शन्स मार्केट हे अशा प्रकारे धोक्याची अदलाबदल करणारे मार्केट असून ‘धोका’ हे एकच प्रॉडक्ट येथे विकले वा खरेदी केली जाते ! आता हा धोका नेमका कधी खरेदी करायचा कि विकायचा यावर आपला फायदा तोटा अवलंबून आहे.

इन्शूरन्स मार्केट हे कुणाला धोक्याचे वाटते का ? ते तर धोक्यापासून वाचण्याचे साधन मानले जाते, मात्र विमा कंपनीच्या दृष्टीकोनातून इन्शूरन्स मार्केट हे काही वेगळेच दिसत असणार ! म्हणजेच ‘आपण या धोका अदलाबदलीच्या कराराच्या कोणत्या बाजूस आहोत’ यावर सारे अवलंबून आहे, नाही का ?

ऑप्शन्स मार्केट हे एकाच ‘वस्तूस्थिती’वर चालते ते म्हणजे या मार्केटमध्ये अनेकजण आपली रिस्क ही दुस-याच्या नावे करू इच्छितात तर त्याचवेळेला अनेकजण स्वतःहून अशी रिस्क घेवूही इछितात. अशी स्वतःहून रिस्क घेणारे मोठ्या रकमेच्या प्रिमिअमच्या मोहाने मोठी रिस्क घेत असतात, जणू अशा रिस्कच्या शोधातच ते असतात ! इन्शूरन्स कंपन्यांप्रमाणेच लॉटरी स्कीम्स वा कॅसिनो चालविणारे लोक म्हणजेही असे रिस्कच्या शोधातले लोक असतात. मग असे रिस्कच्या शोधातले लोक मार्केटमध्ये मुबलक असताना आपली रिस्क त्यांना देवून टाकण्यात काय चूकीचे आहे ? अशा प्रकारे आपल्या गुंतवणूकीतली रिस्क दुस-याला देवून टाकायची असेल तर योग्य तो प्रिमिअम देवून ऑप्शन खरेदी करावेत. या उलट धोका मोजूनमापून तो पत्करण्याची आपली तयारी असली, तर दुस-याकडून त्याचा धोका स्वीकारून त्या बदल्यात रक्कम स्वीकारावी, म्हणजेच ऑप्शनची विक्री करावी आणि प्रिमिअमची रक्कम कमवावी !

ऑप्शन्स मार्केटची अशी दोन्ही दृष्टीकोनातून समज आली कि ‘ऑप्शन्स मार्केट हे धोक्याचे आहे’ असा जो  गैरसमज काही प्रमाणात पसरलेला आहे तो कसा अनाठायी आहे हे ध्यानात येईल. दुर्दैवाने अशा गैरसमजामुळे आणि पूरेशा माहितीच्या वा वाचनाच्या अभावामुळे अनेकजण ऑप्शन्स मार्केट पासून दूर रहातात. अलिकडच्या काळातील बेभरवशी मार्केटमध्ये ‘ऑप्शन्स’ या पर्यायापासून दूर रहाणे चूकीचे आहे असे मला जरूर वाटते. सतत विस्तारत असलेल्या बाजारात अनेक नवी नवी प्रॉडक्ट येत असतात आणि प्रत्येक प्रॉडक्ट हे कुठल्या ना कुठल्या विशिष्ट समस्येवर उपाय म्हणून निर्माण झालेले असते. ‘ऑप्शन्स’ हे ही असेच एक प्रॉडक्ट आहे ‘जे आपल्याला हवी (वा नको) असलेली रिस्क निवडण्याची संधी देते जी अन्य कुठलेही प्रॉडक्ट देवू करत नाही. शेअरबाजारातली रिस्क कमी करायची असल्यास ऑप्शन हे त्यावरचे उत्तर आहे, तसेच ज्यादा धोका पत्करून मोठा फायदा कमवायचा असेल तरी त्यासाठीही ऑप्शन हेच साधन आहे !

आता या विवेचनानंतर ऑप्शनचा वापर प्रत्यक्ष बाजारात कसा करता येतो ते पुढील काही पोस्ट्स मधे पाहूया.