Share/Bookmark

१६ जाने, २०१३

ऑप्शन्स (भाग ५) - लॉन्ग कॉल व शॉर्ट कॉल स्ट्रॅटेजीज..याआधीच्या चार भागातून ऑप्शन्सविषयक बरीचशी प्राथमिक माहिती घेतल्यावर आता प्रत्यक्ष ट्रेडींग करताना विविध ऑप्शन स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे उपयोगात आणता येतात ते बघुया. त्याआधी हे परत एकदा लक्षांत घ्या कि ‘ऑप्शन बायर’ हा अमर्याद फायदा मिळवू शकतो, आणि त्याचा तोटा हा मर्यादित असतो. या उलट ‘ऑप्शन सेलर’ हा मर्यादीत फायदा मिळवत असतो आणि त्याचा तोटा मात्र अमर्याद असू शकतो. मात्र थिअरॉटिकली वरील विधाने सत्य असली तरी दोन्हीही बाबतीत अमर्याद फायदा वा अमर्याद तोटा होण्याची संभाव्यता साहजिकच कमी असते. तसेच मर्यादीत फायदा वा मर्यादीत तोटा होण्याची शकयता अधिक असते. असे मी का म्हणतोय ते पुढील प्राथमिक स्वरूपाच्या काही ऑप्शन स्ट्रॅटेजीज् समजून घेतल्या कि आपोआप स्पष्ट होईल.१) लॉन्ग कॉल स्ट्रॅटेजी –

 ही सर्वात प्राथमिक आणि नैसर्गिक स्ट्रॅटेजी असून ऑप्शनचे व्यवहार प्रथमच करणा-यांसाठी समजण्यासही सोपी आहे. ज्याप्रमाणे बाजार वाढण्याची अपेक्षा असणारा ट्रेडर शेअर्स खरेदी करतो, त्याचप्रमाणे बाजार वाढण्याची अपेक्षा असताना कॉल ऑप्शन खरेदी केले जातात. उदा. निफ्टीची सध्याची किंमत ६००० आहे आणि या महिन्यातच ती अधिक वाढेल अशी अपेक्षा असणारा ट्रेडर, ६१०० स्ट्राईक प्राईजचा कॉल खरेदी करेल. समजा बाजारात ६१०० कॉल ऑप्शनची किंमत ४० रु. असेल तर त्याला (४०*५०) = २००० इतका प्रिमिअम भरावा लागेल. महिन्याच्या एक्स्पायरीच्या वेळेस जर निफ्टीने (६१००+४०) म्हणजेच ६१४० ही पातळी ओलांडली असेल तर तेथपासून व त्यापुढे या व्यवहारात फायदा होत जाईल. म्हणजेच ६१४० ही नफा व तोटा यामधली सीमारेषा असेल. याला ‘ब्रेक इव्हन पॉइन्ट’ असे म्हटले जाते. ६१४० या ब्रेक इव्हन पॉइन्टवर निफ्टी असल्यास ‘ना नफा ना तोटा’ अशी परिस्थिती असेल.

एक्सपायरीच्या वेळेस जर निफ्टी हा ६१४० या ‘ब्रेक इव्हन पॉइन्ट’ च्या कितीही खाली राहीला तरी या ऑप्शन खरेदीदाराला होणारा जास्तीतजास्त तोटा हा त्याच्या प्रिमिअमएवढा म्हणजे २००० एवढाच होईल. याउलट जर निफ्टीने ६२०० ची पातळी गाठली तर या व्यवहारात (६०*५०) = ३००० एवढा फायदा होईल, आणि निफ्टीने ६३००ची पातळी गाठल्यास हा फायदा ८००० इतका होवू शकेल. म्हणजेच या व्यवहारात होवू शकणारा जास्तीतजास्त तोटा हा २००० इतकाच असेल, मात्र होवू शकणारा फायदा हा निफ्टीच्या किंमतीच्या प्रमाणात कितीही होवू शकतो. अर्थात प्रत्यक्षात निफ्टी असा  खूपच वाढण्याची शक्यता कमी असल्याने अमर्याद फायदा हा थिरॉटिकल असून, प्रॅक्टिकली त्याची शक्यता कमी असते.

खालील तक्ता पाहिल्यास ही ‘लॉन्ग कॉल स्ट्रॅटेजी’ आणि त्यातून मिळणा-या फायद्या तोट्याची नीट कल्पना येईल.

        

येथे कृपया हे लक्षांत घ्या कि सदर ऑप्शन हे एक्सपायरीपर्यंत होल्ड केले असे गृहीत धरून ही (व यापुढील) स्ट्रॅटेजी एक उदाहरण म्हणून मांडलेली आहे. त्यामुळे एक्सपायरीला टाईम व्हॅल्यु शून्य असल्याने यात टाईम व्हॅल्यु हिशेबात धरलेली नाही. प्रत्यक्षात मात्र एक्सपायरीच्या आधीच ६१४० पेक्षा अधिक पातळी गाठली गेल्यास योग्य वेळेस हा फायद्यातील (टाईम व्हॅल्युसह) कॉल ऑप्शन विकून टाकता येतो, कारण त्यानंतर पुन्हा निफ्टी खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याउलट एक्सपायरीच्या आधीच काही दिवस जर निफ्टी ६१० पर्यंत वाढणार नाही वा घसरू शकेल असा अंदाज आल्यास (तेव्हा काहीशी टाईम व्हॅल्यु शिल्लक असल्याने) वेळीच हा ऑप्शन विकून २००० पैकी थोडासा तरी प्रिमिअम आपण परत मिळवू शकतो.

सारांश हा कि या स्ट्रॅटेजीतील जास्तीत जास्त तोटा हा २००० असला तरी तो कमीही राखणे शक्य असते. अशा प्रकारे प्रत्यक्ष निफ्टी फ्युचर्स खरेदी न करताही फक्त प्रिमिअमची रक्कम भरून, निफ्टीमधील वाढीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अशी ‘लॉन्ग कॉल स्ट्रेटेजी’ वापरता येते. निफ्टी फ्युचर्समध्ये आपला तोटा मर्यादीत राखण्यासाठी जसा स्टॉपलॉस हा अनिवार्य असतो तसे येथे नसून भरलेल्या प्रिमिअमपेक्षा अधिक तोटा कधीच संभवत नसल्याने आपोआपच हा स्टॉपलॉसचा हेतू साध्य होतो. 


२) ‘शॉर्ट कॉल स्ट्रॅटेजी’ –

‘लॉन्ग कॉल स्ट्रॅटेजी’ ही बुलीश स्ट्रॅटेजी असून त्यानुसार, बाजार वाढेल अशा अपेक्षेने कॉल खरेदी केला जातो, मात्र ‘शॉर्ट कॉल स्ट्रॅटेजी’ ही बेअरीश स्ट्रॅटेजी असून त्यानुसार, जर बाजार पडेल असे वाटत असेल तर उलट क्रिया म्हणजेच कॉल ऑप्शन हा विकला जातो वा शॉर्ट केला जातो. यातील महत्वाची बाब म्हणजे ‘शॉर्ट कॉल स्ट्रॅटेजी’ मध्ये कॉल ऑप्शन विकून मिळणारा प्रिमिअम हा मर्यादीत असून संभाव्य तोटा हा अमर्यादीत असू शकतो.

उदा. निफ्टी ६००० असताना बाजार पडण्याच्या अपेक्षेने ५९०० स्ट्राईक प्राईजचा कॉल जर १५० ला विकला तर लगेचच (१५०*५०) = ७५०० इतका प्रिमिअम मिळू शकतो, मात्र अपेक्षेच्या विरूद्ध जर निफ्टी वाढतच गेला तर या ५९०० कॉल ऑप्शनची किंमत वाढत जाते आणि एक्सपायरीच्या दिवशी अशा वाढलेल्या किंमतीला तो खरेदी करण्याची वेळ आली तर होणारा तोटा हा निफ्टीच्या किंमतीच्या प्रमाणात कितीही मोठा असू शकतो. कृपया खालील तक्ता पहा.


अशा प्रकारे ‘शॉर्ट कॉल स्ट्रॅटेजी’ वापरून पडत्या बाजारात निफ्टी फ्युचर्स न विकता, कॉल ऑप्शन्स विकूनह फायदा घेता येतो. वरील उदाहरणात ७५०० एवढा घसघशीत प्रिमिअम मिळत असला तरी निफ्टी आणखी कितीही पडला तरी फायदा तेवढाच मर्यादीत असतो. यातील संभाव्य तोटा मात्र अमर्यादीत असल्याने ही स्ट्रॅटेजी रिस्की समजली जाते.

समजा या उदाहरणात ५९०० ही स्ट्राईक प्राईज न निवडता समजा ६१०० या स्ट्राईक प्राईजचा कॉल विकला तर ? असा ६१०० चा कॉल विकणे हे साहजिकच कमी रिस्की असेल, पण तो विकून मिळणारा प्रिमिअमही कमी असेल. तेव्हा पूर्वी म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रिमिअमच्या आशेने किती धोका पत्करायचा हे आपण ठरवायचे आहे.

आता वरील दोन्ही स्ट्रॅटेजींच्या बाबतीत विविध स्ट्राईक प्राईज निवडून फायदा, तोटा व रिस्क यांच्या विविध शक्यता कशा निर्माण होतात याचा थोडा सेल्फ स्टडी केलात तर ‘ऑप्शन्स’ हे आपल्या नावाप्रमाणेच अनेक ‘पर्याय’ कसे देवू करतात ते आपल्या लक्षांत येईल. यापुढील पोस्ट्स मध्ये आणखी काही स्ट्रॅटेजी बघणारच आहोत, मात्र तोपर्यंत थोडा सेल्फ स्टडी करा आणि जमल्यास या ब्लॉगला एखादा लाईक ठोका !!