Share/Bookmark

२१ फेब्रु, २०१३

लॉन्ग स्ट्रॅडल ( LONG STRADDLE ) स्ट्रॅटेजी –



ऑप्शन ट्रेडींगच्या अनेक स्ट्रॅटेजीज आहेत आणि काही मुख्य स्ट्रॅटेजी सोडल्या तर बाकीच्या एकतर मुख्य स्ट्रॅटेजीजच्या ‘मिरर इमेज’ वा बरोब्बर उलट स्ट्रॅटेजीज आहेत, किंवा अधिक गुंतागुंतीच्या आहेत, शिवाय ऑप्शन्स बरोबर फ्युचर्स वा स्टॉक्स मध्ये पोझीशन्स घेवून त्या तयार केल्या आहेत. अशा विविध स्ट्रॅटेजीज या बाजाराच्या एखाद्या ठराविक स्थितीमध्ये वापरण्यात येतात. उदा. आपण गेल्या भागात पाहिले कि ‘कव्हर्ड कॉल’ ही बुलीश न्युट्रल प्रकारची स्ट्रॅटेजी आहे, म्हणजेच बाजार हा बुलीश वा न्युट्रल रहाण्याची अपेक्षा असेल तर ती वापरतात. त्याच्या बरोब्बर उलट अशी म्हणजेच बेअरीश न्युट्रल स्ट्रेटेजी आहे ती ‘कव्हर्ड पुट’ स्ट्रेटेजी’ ! ज्यात एखादा शेअर हा स्वस्त होईल वा विशेष हालचाल दाखवणार नाही अशा अपेक्षेने त्या स्टॉकमध्ये शॉर्टसेलींग करून त्याचवेळी OTM पुटची म्हणजेच खालील बाजूच्या स्ट्राईक प्राईजच्या पुटची विक्री करणे. याद्वारे जर त्या स्टॉकमध्ये अपेक्षेनुसार घसरण झाली तर वा त्याने विशेष हालचाल केली नाही तरीही फायदा मिळतो. स्टॉक वाढला तर झालेल्या नुकसानातून पुटची विक्री करून मिळालेला प्रिमिअम वजा होतो. अशा प्रकारे ‘कव्हर्ड पुट’ ही ‘कव्हर्ड कॉल’ची मिरर इमेज ठरते. अशा प्रकारे वापरात असलेल्या अनेक स्ट्रॅटेजीजपैकी बाजाराच्या स्थितीनुसार वा आपल्या स्वतःच्या शैलीनुसार आपण आपली निवड करावी लागते. अशा सर्वच स्ट्रॅटेजीजविषयी लिहीणे या ब्लॉगवर शक्य नसले तरी काही वेगळ्या प्रकारच्या आणि मला उपयुक्त वाटलेल्या स्ट्रेटेजीज मात्र आपण बघणारच आहोत.

 आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीची ओळख करून घेवूया. ‘वेगळ्या’ म्हणण्याचे कारण असे की आधी पाहिलेल्या स्ट्रॅटेजीज या बाजाराच्या ठराविक दिशेची अपेक्षा ठेवून तयार केलेल्या आहेत, आणि आजची आपली स्ट्रॅटेजी ही बाजाराच्या दिशेवर मुळीच अवलंबून नाही !

 अनेक वेळा बाजाराची दिशा काय राहील याचा अंदाज आपल्याला मुळीच येत नाही, किंवा एखादी महत्वाची घटना घडणार असते, मात्र त्याचा बाजारावर अनुकुल परिणाम होईल कि प्रतिकूल हे ‘अगोदर’ सांगणे अशक्य असते. उदा. कंपनीचे रिझल्ट कसे असतील वा रिजर्व बॅंकेचा व्याजदराविषयीचा निर्णय काय राहील, याविषयी आधी सांगता येत नाही, मात्र त्याचा मोठा परिणाम बाजारावर होवू शकतो. अशा वेळी बाजार मोठी हालचाल तर करतो, मात्र ती कुठल्या दिशेला ते सांगता येत नसल्याने स्ट्रॅटेजी कशी ठरवणार ?

 फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अशीच एक मोठी घटना होणार आहे- नाही का ? बरोबर ओळखलेत ! बजेट ! या बजेटचा परिणाम मोठा असण्याची शक्यता असली, तरी त्यानंतर बाजाराची दिशा कोणती असेल हे कुणालाच सांगता येत नाही. मग अशा वेळी एक ऑप्शन ट्रेडर काय करेल ?

लॉन्ग स्ट्रॅडल ( LONG STRADDLE ) स्ट्रॅटेजी –

 बाजारात कुठल्याही दिशेला, पण मोठी हालचाल होण्याची शक्यता असताना म्हणजे बाजाराची वोलॅटिलिटी वाढण्याची शक्यता असताना ही स्ट्रॅटेजी वापरतात, म्हणून ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ ही एक ‘वोलॅटिलिटी स्ट्रॅटेजी’ आहे. यामध्ये एकाच स्टॉक किंवा इंडेक्सचे, एकाच महिन्याचे, एकाच स्ट्राईक प्राईजचे ‘कॉल’ आणि ‘पुट’ असे दोन्ही ऑप्शन खरेदी केले जातात. ऑप्शन्सच्या प्राथमिक माहितीत आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे ऑप्शन ‘खरेदी’ करणाराचा तोटा मर्यादीत असतो आणि फायदा अमर्याद होवू शकतो. अर्थातच येथेही कॉल आणि पुट हे दोन्ही ऑप्शन खरेदी केल्याने तोटा मर्यादीत आहे आणि संभाव्य फायदा अमर्यादीत आहे. कसा ते उदाहरणाने पाहूया –

समजा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निफ्टी इंडेक्स हा सुमारे ६००० असेल, तर वर म्हटल्याप्रमाणे महिन्याअखेरीस जाहीर होणा-या अर्थसंकल्पानंतरच्या संभाव्य मोठ्या हालचालीचा फायदा उचलण्यासाठी अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी, मार्च महिन्याचे ६००० या स्ट्राईक प्राईजचे कॉल व पुट असे दोन्ही एकदम खरेदी केले जातात. समजा हे दोन्ही ऑप्शन्स प्रत्येकी ९५ रु. ला उपलब्ध असतील तर प्रतिलॉट एकूण १९०*५०=९५०० रु.ची खरेदी अथवा गुंतवणूक होईल.

 लक्षांत घ्या कि हिशेबास सोपे पडावे म्हणून मदोन्ही ऑप्शनच्या किंमती ९५ घेतल्या आहेत. निफ्टी बरोब्बर ६००० असेल तर या दोन्ही किंमती साधारण समान असतील. जर निफ्टी ५९८० असेल तर ६००० च्या ‘पुट’ची किंमत थोडी जास्त असेल आणि कॉलची किंमत साहजिकच कमी असेल. याउलट जर निफ्टी ६०२० असेल तर ६००० च्या ‘कॉल’ची किंमत पुटच्या किंमतीपेक्षा जास्त असेल. याशिवाय बाजाराच्या त्यावेळच्या वोलॅटिलिटीवरही या किंमती अवलंबून असतील. असो.

एकदा अशी ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ पोझिशन घेतली कि अर्थसंकल्पानंतर निफ्टीने कुठल्याही दिशेला हालचाल केली तर खरेदी केलेल्या कॉल व पुट यांतील एकाची किंमत वाढेल आणि दुस-याची किंमत कमी होईल. निफ्टीमधील हालचाल जितकी मोठी, तितकी या दोन्ही ऑप्शनमधली हालचालही मोठी असेल. मात्र निफ्टीमधील हालचाल पुरेशा वेगानेही व्हायला हवी, म्हणजे मार्चच्या मध्यापर्यंत तरी निफ्टीने कुठल्याही दिशेने उत्तम हालचाल दाखवायला हवी, नाहीतर ‘टाईम डिके’मुळे आपल्या ऑप्शन्सची किंमत, महिना जसा संपत जाईल तशी कमी होत जाण्याचीही शक्यता असते.  खाली याबाबतीतल्या सर्व शक्यता दाखवल्या आहेत, - अर्थातच एक्सपायरीच्या वेळेच्या.


मुळ गुंतवणूक १९० पॉइन्टची असल्याने वरील बाजूस ब्रेक-इव्हन पॉइन्ट हा ६१९० तर खालील बाजूस ५८१० असेल. (स्ट्राईक प्राईज +/- ऑप्शन्सची किंमत). वरील टेबलवरून हे लक्षांत येते कि किमान फायदा मिळवण्यासाठी निफ्टी इंडेक्स हा सुमारे २०० पॉइन्ट तरी वाढावा वा कमी व्हावा लागेल आणि अर्थपूर्ण फायदा मिळवण्यासाठी तो किमान २५० पॉइन्ट तरी हलावा लागेल. अर्थसंकल्पाचा परिणाम म्हणून जर तो वर वा खाली ३०० पॉइन्टनी हालला तर आपल्या मुळ ९५०० गुंतवणूकीवर ५५०० इतका फायदा होवू शकतो, आणि त्याहीपुढे तो थिअरॉटिकली अमर्यादीत असू शकतो, मात्र अर्थातच तशी शक्यता कमी असते.  

जर निफ्टी अगदी रेन्जबाऊंड राहीला आणि कुठल्याच बाजूस किमान १९० पॉइन्टने हालला नाही, तर दोन्ही ऑप्शनच्या बेरजेमध्ये घट होईल आणि असा होवू शकणारा जास्तीत जास्त तोटा मात्र मुळ गुंतवणूकीएवढा म्हणजेच १९०*५०=९५०० एवढाच मर्यादीत असेल, अर्थात असा संपूर्ण तोटा होण्याची शक्यताही कमीच असते.

प्रॅक्टीकली विचार करता मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत जर निफ्टीने मोठी हालचाल दाखवली नाही तर त्यानंतर २५०-३०० पॉइन्टची हालचाल होण्याची शक्यता मावळत जाते आणि ‘टाईम व्हॅल्यु’ कमी झाल्याने ऑप्शन्सची किंमत झपाट्याने कमी होवू लागते, अशा वेळेला आपली स्ट्रॅटेजी काम करत नाही हे ओळखून, एक्सपायरीची वाट न बघता, थोडीशी टाईम व्हॅल्यु शिल्लक असतानाच, मिळेल त्या किंमतीत दोन्ही ऑप्शन विकून टाकून अर्धा-अधिक प्रिमिअम परत मिळवण्याचा पर्याय खुला असतोच.

अशा प्रकारे ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ स्ट्रॅटेजी ही पूर्णपणे ‘वोलॅटिलिटी’वर अवलंबून आहे. तोटा मर्यादीत आणि फायदा अमर्यादीत असे याचे आकर्षक स्वरूप असले, तरी ‘टाईम डिके’ या घटकामुळे महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात फायदा मिळत असेल तर तो खिशात टाकणे जरूरी असते. एकापेक्षा अधिक लॉटचा व्यवहार असेल तर फायदा मिळत असल्यास अर्धे-अधिक लॉट विकून टाकून उर्वरीत लॉटसह एक्सपायरीची वाट बघण्यास हरकत नाही.

माझ्या निरीक्षणानुसार साधारणपणे ३ महिन्यातून एखाद्याच वेळेला निफ्टी हा मोठी हालचाल करतो आणि २ महिने तो रेन्जबाऊंड असण्याची शक्यता असते. कमीतकमी किंमतीला दोन्ही ऑप्शन खरेदी करण्यासाठी काहीजण थोडे उशीरा म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्या अखेर खरेदी करणे पसंत करतात. तसेच बाजारात वोलॅटिलिटी कमी असताना ऑप्शन्सच्या किंमती कमी असतात, तेव्हाही खरेदी करणे उचित ठरते.  अर्थात एखादी मोठी घटना कधी आहे हे लक्षांत घेवून, तसेच याबाबत आपली स्वतःची निरीक्षणे करूनच असे निर्णय घ्यावेत.

बाजाराची दिशा माहीत नसूनही निफ्टीमधील मोठ्या हालचालीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ही स्ट्रॅटेजी वापरायला हरकत नाही, मात्र नेहमीच ऑप्शन बायरच्या विरोधात काम करणा-या ‘टाईम डिके’चे योग्य ते भान ठेवूनच, असे माझे मत आहे. पुढील काही पोस्टमध्ये ऑप्शन्स मार्केटमधील या ‘टाईम डिके’ नावाच्या ‘व्हीलन’ची अधिक माहिती घेवून, त्यावर मात कशी करायची हे बघुया !