Share/Bookmark

३ मार्च, २०१३

'टाईम डिके' -एक व्हीलन ?



(नवीन वाचकांनी ‘ऑप्शन्स’ या विषयावरील माझ्या आधीच्या सर्व पोस्ट्स क्रमाने वाचल्या तर नवे लेखन समजणे सोपे होईल)
ऑप्शन्स मार्केटमध्ये नीट समजून घेतलीच पाहिजे अशी संकल्पना म्हणजे ‘टाईम डिके’ ही होय. यापूर्वीच्या पोस्ट्समध्येही या टाईम डिकेचा उल्लेख आला आहे, मात्र येथे त्याची जरा सविस्तर माहिती घेवूया.
यापूर्वी ऑप्शनच्या किंमतीमध्ये अंतर्भूत असलेल्या ‘इन्ट्रींन्सिक व्हॅल्यु’ आणि ‘टाईम व्हॅल्यु’ या दोन घटकांविषयी मी लिहिले होते ते जरूर तर येथे पुन्हा वाचून घ्या. तसेच OTM (पुट वा कॉल) ऑप्शन्सना इंन्ट्रीन्सिक व्हॅल्यु नसते तर फक्त टाईम व्हॅल्यु असते हे ही लक्षात घ्या. जर अंडरलाईंगची किंमत ही स्थिर राहिली असे धरले तर त्याच्या ऑप्शनची इन्ट्रीन्सिक व्हॅल्यु बदलणार नाही मात्र जसजशी एक्सपायरी जवळ येईल तशी त्याच्या टाईम व्हॅल्युमध्ये घट होत जाईल. आणि शेवटी म्हणजे एक्सपायरीच्या वेळेस ती शून्य होईल. याचाच अर्थ असा कि एक्सपायरीला OTM ऑप्शन्सची किंमत शून्य होईल तर ITM ऑप्शन्सची किंमत ही फक्त त्याच्या इन्ट्रीन्सिक व्हॅल्युइतकीच शिल्लक राहील.
आपल्याकडे फेब्रुवारीपासून ते मे पर्यंत कोकणातील हापूस आंब्याचा सीझन असतो. अगदी सुरुवातीला बाजारात पहिले फळ दिसू लागते तेव्हा ते फक्त बघण्यावरच समाधान मानावे लागते..खरे ना ? कारण तेव्हा हापूसच्या किंमती न परवडण्याजोग्या असतात. मग आपण म्हणतो कि थोडे थांबूया, आणि स्वस्त झाल्यावर घेवूया. एप्रिलच्या सुमारास या किंमती आपल्याला परवडू लागतात. आणि मे च्या शेवटच्या पंधरवड्यात तर या किंमती वेगाने पडू लागतात. आकाशात ढग दिसू लागले कि आंबा विक्रेते आपला माल पटकन विकून टाकण्याच्या मागे लागतात, कारण एकदा पहिला पाऊस पडला कि खरेदीदार मिळणे कठीण होत जाते आणि हापूस आंब्याचा मोसम संपतो. ज्या प्रकारे फळ तेच असले तरी काळानुसार त्याची किंमत उतरत जाते आणि शेवटच्या काही काळात ती वेगाने घटते, अगदी त्याच प्रकारे ऑप्शनची किंमत ही एक्सपायरीची तारीख येईपर्यंत उतरत जाते आणि शेवटच्या काळात तीव्रतेने घटते. खालील आकृती पहा. यात एका OTM ऑप्शनचा चार्ट दाखवला आहे.

सुरुवातीला एक्सपायरीला ९० दिवस शिल्लक असताना सदर ऑप्शनची किंमत ७० होती. एका महिन्यानंतर ती ६० पर्यंत म्हणजे १०ने घसरली. दुस-या महिन्याअखेर ती आणखी २० ने घसरली आणि तिस-या आणि अखेरच्या महिन्यात तब्बल ४० ने घसरून शून्य झाली. शेवटच्या महिन्यात आणि शेवटच्या पंधरा दिवसात ऑप्शनच्या किंमतीत तीव्र घट झालेली दिसून येईल. अशा प्रकारे एक्सपायरीपर्यंतच्या प्रत्येक दिवशी (अंडरलाईंगची किंमत बदलली नाही असे गृहीत धरून) ऑप्शनची किंमत थोडी थोडी कमी होत जाते. असे दर दिवशी किंमत कमी होण्याचे जे प्रमाण (Unit) आहे त्याला ‘थिटा’ या ग्रीक अक्षराने ओळखले जाते. थोडक्यात ‘थिटा’ म्हणजे दर दिवशी ऑप्शनच्या किंमतीत घट होण्याचा दर म्हणजेच ‘डेली टाईम डिके ! 
वरील आकृतीत ऑप्शनची मुळ किंमत ७० ही एकूण ९० दिवसांच्या काळात शून्यापर्यंत घटत जाते म्हणून दर दिवशीची घट काढण्यासाठी ७० /९० दिवस असा हिशेब केल्यास ०.७७ असे उत्तर मिळते तोच या ऑप्शनचा थिअरॉटिकल थिटा होय. म्हणजे अंडरलाईंगची किंमत स्थिर गृहीत धरून या ऑप्शनची किंमत दर दिवशी ०.७७ ने घटत जाईल. थिरॉटिकल म्हणण्याचे कारण हेच कि प्रत्यक्षात मात्र काळानुसार ही घट वाढत जाईल. फक्त शेवटच्या महिन्याचा विचार केला तर सुरुवातीची किंमत ४०/३० दिवस याचे उत्तर १.३३ येते म्हणजेच थिटा जास्त असेल. तसेच प्रत्येक दिवशी थिटा वाढत जाईल. ऑप्शन बायरच्या बाबतीत हा थिटा म्हणजे किंमतीतील घटीचे युनिट असल्याने ते निगेटीव्ह उदा.-०.७७ असे लिहीले जाते.
 असा हा टाईम डिके किंवा ‘थिटा’ म्हणजे ऑप्शन(कॉल वा पुट) ‘बायर’च्या दृष्टीने एक डोकेदुखीच असते म्हणा ना ! कारण अंडरलाईंगच्या किंमतीत त्याला अपेक्ीत दिशेने बदल झाला नाही वा पूरेसा बदल झाला नाही वा पुरेशा वेगाने बदल झाला नाही तरी या सर्व स्थितीमध्ये त्याने खरेदी केलेल्या ऑप्शनची किंमत ही दिवसेंदिवस घटतच जाते आणि फायदा मिळवणे कठीण होत जाते. मग हा थिटा हा कायम आपला शत्रूच असतो का ? तर तसे मात्र नाही.
कोणत्याही खरेदी केलेल्या ऑप्शनची किंमत ही (अंडरलाईंगची किंमत स्थिर असल्याचे गृहीत धरून) टाईम डिकेमुळे कमी होत जाते म्हणजेच तोटा होत जातो म्हणून ऑप्शनमधील सर्व लॉन्ग पोझिशनसाठी हा थिटा निगेटीव्ह असतो, तर सर्व विकलेल्या म्हणजेच शॉर्ट पोझिशनच्याबाबतीत अशी किंमत कमी होत गेल्याने फायदाच होत असतो म्हणून शॉर्ट पोझिशनच्या बाबतीत हा थिटा पॉझिटीव्ह असतो.
पण मग असेही म्हणता येईल कि ऑप्शन बायरसाठी थिटा म्हणजे दर दिवशी होणा-या तोट्याचे प्रमाण असते आणि या उलट ऑप्शन सेलरसाठी थिटा हा दरदिवशी होणारा फायदा दर्शवतो ! म्हणजेच हा थिटा फक्त ऑप्शन बायरचा शत्रू असतो, ऑप्शन सेलरचा नाही ! उलट ऑप्शन सेलरला अपेक्षित असलेल्या दिशेने अंडरलाईंगची हालचाल झाली नाही तरीही टाईम डिके आपले काम करतच असतो आणि ऑप्शनची किंमत रोज थोडीशी घटत गेल्याने ऑप्शन सेलरच्या दृष्टीने थिटा हा अगदी मदतकारक असा मित्र असतो. उदा. निफ्टी ६००० असताना मी जर ६२०० स्ट्राईकचा कॉल विकला असेल तर एक्सपायरीला निफ्टी ६००० च्या खाली घसरला असेल वा स्थिर असेल वा अगदी ६१९९ एवढा वाढला असेल तरी मला फायदाच होईल. 
येथे हे लक्षांत घ्या कि ६१९९ ही किंमत एक्सपायरीच्या दिवशीचा बंद भाव आहे असे गृहीत धरलेले आहे. एक्सपायरीला OTM ऑप्शनला टाईम व्हॅल्यु ून्य असते प त्याआधीच्या काळात निफ्टीत खूप वाढ झाल्याने आणि टाईम व्हॅल्यु शिल्लक असल्याने माझ्या विकलेल्या ऑप्शनची किंमत खूपच वाढलेली असू शकते आणि निफ्टी नेमका कुठे बंद होणार हे माहीत नसल्याने जर तो ६२०० पेक्षा वाढून बंद झाला तर मोठा तोटा होण्याची शक्यता असतेच. अशा वेळी काय करायचे हा प्रत्यक्ष ट्रेडींगचा भाग आहे, त्याविषयी नंतर बघणारच आहोत. तूर्त ‘टाईम डिके’ या ‘व्हीलनचे’ रुपांतर एका मित्रात कसे करून घ्यायचे याविषयी पुढील पोस्ट मध्ये बघुया.