Share/Bookmark

१५ मार्च, २०१३

'लॉन्ग स्ट्रॅन्गल' - मर्यादीत गुंतवणूक, मर्यादीत तोटा.



या आधीच्या पोस्ट मध्ये आपण ‘टाईम डिके’ विषयी चर्चा केली होती. या ‘टाईम डिके’चा उपयोग प्रत्यक्ष ट्रेडींगमध्ये कसा करतात हे आपण नंतर पाहणारच आहोत, मात्र त्याआधी येथे बघितलेल्या ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ स्ट्रॅटेजीमध्ये जरासा बदल करून तयार होणा-या ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीबद्दल माहिती घेवूया.

आपल्याला आठवतच असेल कि लॉन्ग स्ट्रॅडलही एक वोलॅटिलिटी स्ट्रॅटेजी असून यामध्ये एकाच स्टॉक किंवा इंडेक्सचे, एकाच महिन्याचे, एकाच स्ट्राईक प्राईजचे कॉलआणि पुटअसे दोन्ही ऑप्शन खरेदी केले जातात. ही एक उपयुक्त आणि संभाव्य तोटा आपोआप मर्यादीत राखणारी स्ट्रॅटेजी असली तरी यात आपण खरेदी करत असलेले कॉल आणि पुट हे दोन्ही ऑप्शन्स, हे एकाच स्ट्राईक प्राईजचे असतात, आणि ते ‘ऍट द मनी(ATM)’ असल्याने साहजिकच महाग असतात. ते खरेदी केल्यावर, आपल्याला या स्ट्रॅटेजीत होवू शकणारा तोटा हा मर्यादीत असला तरी तो थोडा जास्त असतो. मग यावर उपाय म्हणून मुळ स्ट्रॅटेजीत थोडा बदल केला जातो. एकाच स्ट्राईक प्राईजचे ATM कॉल व पुट घेण्याऐवजी OTM कॉल व पुट घेतले जातात आणि यालाच ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजी म्हणतात. खालील उदाहरण बघुया.

आजच्या (१५ मार्च) बंद भावानुसार निफ्टी ५९०० च्या जवळ असून आजचा निफ्टी ऑप्शन चार्ट खाली दाखविला आहे.

(मोठा करून पाहण्यासाकृपया चार्टवर क्लिक करा.)
 

मुळ ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ स्ट्रॅटेजीनुसार ५९०० या एकाच स्ट्राईक प्राईजचेच कॉल व पुट खरेदी केले तर आजच्या भावानुसार दोन्हीची बेरीज सुमारे १२२ होते. म्हणजेच आपल्याला १२२*५०=६१०० रु. गुंतवावे लागतील आणि हा आपला जास्तीतजास्त संभाव्य तोटा असेल. जर आपणास ही रक्कम आणखी कमी असावी असे वाटत असेल तर ?

त्यासाठी आपल्याला ५९०० या एकाच स्ट्राईक प्राईज ऐवजी दोन निरनिराळ्या स्ट्राईक प्राईज निवडाव्या लागतील. ATM च्या तुलनेत, OTM कॉल आणि OTM पुट हे स्वस्त असल्याने, ६००० चा कॉल व ५८०० चा पुट असे दोन्ही OTM ऑप्शन्स खरेदी केले जातात. वरील चार्टनुसार त्यांच्या किंमती अनुक्रमे २३.३५ व २८.५० आहेत. दोन्ही मिळून सुमारे ५२ पॉइन्ट्स होतात व म्हणून एकूण गुंतवणूक होते फक्त २६००रु. !

म्हणजेच या ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ मुळे आपला संभाव्य तोटा हा लक्षणीयरित्या कमी झालेला दिसतो. मार्केटच्या दिशेवर अवलंबून नसलेली आणि वोलॅटाईल मार्केटमध्ये फायदेशीर पण कमी खर्चात काम भागवणारी ही स्ट्रॅटेजी असल्याने ती बरीच लोकप्रियही आहे. मात्र प्रत्येक स्ट्रेटेजीचे काही फायदे तसेच तोटेही असतात. लक्षांत घ्या कि आधी बघितलेली ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ आणि आताची ही ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ या दोन्ही स्ट्रॅटेजी खरेतर ‘वोलॅटिलिटी’ स्ट्रॅटेजी आहेत. म्हणजेच यांचे यश हे मार्केटच्या वोलॅटिलिटी वर पूर्णपणे अवलंबून असते. लॉन्ग स्ट्रॅडलच्या बाबत आपण बघितले कि कोणत्यातरी एका बाजूस निफ्टी हा ब्रेक-इव्हन पॉइन्टच्या पलिकडे गेला तरच फायदा होतो. हा ब्रेक-इव्हन पॉइन्ट लॉन्ग स्ट्रॅडलच्या बाबतीत (स्ट्राईक प्राईज + दोन्ही ऑप्शनची बेरीज) इतका असतो. पण लॉन्ग स्ट्रॅन्गल मध्ये मात्र आपण दोन्ही बाजूस १०० पॉइन्टच्या अंतराने स्ट्राईक प्राईज निवडल्याने, ब्रेक इव्हन पॉइन्टही दोन्ही बाजूला दूरवर जातो.

वरील उदाहरणात वरील बाजूस ६०५२ तर खालील बाजूस ५७४८ हा ब्रेक इव्हन पॉइन्ट असेल. म्हणजेच अर्थपूर्ण फायदा होण्यासाठी निफ्टीने महिनाअखेरीस ६१०० किंवा ५७०० च्या आसपास मजल मारणे आवश्यक आहे. आजच्या तारखेपासून एक्सपायरीला जेमतेम ९ दिवस बाकि असताना निफ्टीने कोणत्याही बाजूस एवढी मजल मारणे नेहमीच शक्य असते असे नाही. शेवटच्या आठवड्यापर्यंत जर निफ्टीने अपेक्षीत ती मोठी हालचाल केलीच नाही, तर उरल्यासुरल्या टाईम व्हॅल्युसह दोन्ही ऑप्शन विकून टाकून शक्य तेवढी रक्कम परत मिळवण्याची वेळही येते. 
या उदाहरणात निफ्टीच्या किंमतीच्या दोन्ही बाजूला १०० पॉइन्ट्स अंतराने स्ट्राईक प्राईज निवडल्या असल्या तरशिल्लक मुदत जास्त असेल तर अधिक अंतरावरील स्ट्राईक प्राईजही निवडता येतात. जेवढे अंतर जास्त तेवढे ऑप्शन्स स्वस्त असतात मात्र फायदा मिळणे तेवढेच ीण होत जाते हे ध्यानात घेवून या दोन्ह बाबींचा विचार करूनच स्ट्राईक प्राईज निवडाव्यात.
  

सारांश हा, कि ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीत मुळ गुंतवणूक कमी राखताना फायद्याची शक्यताही कमी होण्याचा संभव असतो. अर्थात एक्सपायरीला भरपूर दिवस शिल्लक असतील आणि काही महत्वाची घटना बाजारावर मोठा परिणाम करण्याची शक्यता वाटत असेल, तर कमी गुंतवणूकीत आणि कमी धोका पत्करूनही मोठा फायदा मिळवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी नक्कीच उपयुक्त आहे.