Share/Bookmark

११ एप्रि, २०१३

ऑप्शन ट्रेडींगमध्ये 'टाईम डिके'चा वापर !



सर्व वाचकांना 'शेअरबाजार-साधा सोपा' तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

 याआधी आपण ‘टाईम डिके’ विषयी माहिती घेतली होती. आता या टाईम डिकेचा वापर ट्रेडींगमध्ये करून बनवलेल्या स्ट्रॅटेजीजची माहिती घेवूया. या स्ट्रॅटेजीज् नुसार ऑप्शन्स खरेदी न करता ‘विकले’ जातात म्हणून यांची नावे ‘शॉर्ट स्ट्रॅडल’ आणि ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ अशी आहेत.

‘शॉर्ट स्ट्रॅडल’ स्ट्रॅटेजीमध्ये एकाच अंडरलाईंगचे एकाच महिन्याचे व एकाच स्ट्राईक प्राईजचे कॉल व पुट ऑप्शन्स विकले जातात. या ऑप्शन्स विक्रीद्वारे मिळालेला एकूण प्रिमिअम हा या स्ट्रॅटेजीतला जास्तीतजास्त फायदा असतो. सदर दोन्ही ऑप्शन्स हे 'ऍट द मनी' ( ATM) असल्याने त्यांची किंमत जास्त व म्हणून मिळणारा प्रिमिअमही जास्त असतो. मात्र अंडरलाईंगमध्ये मोठी हालचाल झाल्यास मोठा व थिरॉटिकली अमर्याद तोटा होवू शकतो. या कारणाने मला स्वतःला ही स्ट्रॅटेजी धोक्याची वाटते. म्हणून तीची माहिती टाळून या स्ट्रॅटेजीत थोडा फरक करून तयार झालेली ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजी (जी मला अधिक उपयुक्त वाटते) त्याविषयी आज माहिती घेवूया.

‘शॉर्ट स्ट्रॅडल’ मधील धोका टाळण्यासाठी एकाच स्ट्राईक प्राईजच्या कॉल व पुट ऐवजी ‘आऊट ऑफ द मनी’ कॉल व पुट निवडून दोन्ही बाजूच्या ब्रेक इव्हन पॉइन्ट्समधील अंतर वाढविले जाते. यामुळे धोका कमी होत असला तरी (OTM) ऑप्शन्सचा प्रिमिअम कमी असल्याने फायद्याचे प्रमाणही कमी होते. मात्र योग्य स्ट्राईक प्राईजची निवड आणि थोडे धोक्याचे व्यवस्थापन केल्यास स्ट्रॅटेजीची विश्वासार्हता खूपच असते.

एक उदाहरण बघुया. समजा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस निफ्टी इंडेक्स ५५०० आहे. काही कारणाने बाजारात वोलॅटिलिटी असल्याने ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीनुसार कॉल व पुट विक्री करण्याच्या स्ट्राईक प्राईज या थोड्या दूरच्या निवडल्या जातात. ५७००चा कॉल व ५३००चा पुट असे दोन्ही बाजूचे (OTM) ऑप्शन्स विकले जातात. समजा या दोन्ही ऑप्शन्सची एकूण किंमत ६२ रु. असली तर मिळणारा एकत्रित प्रिमिअम हा रु. ३१०० होतो. हा या स्ट्रॅटेजीतला जास्तीतजास्त फायदा असेल.

वरील बाजूचा ब्रेक इव्हन पॉइन्ट हा, 'कॉल'च्या स्ट्राईक प्राईजमध्ये एकूण प्रिमिअम मिळवला असता मिळतो (५७००+ ६२ =५७६२) तसेच खालील बाजूस ब्रेक इव्हन पॉइन्ट हा 'पुट'च्या स्ट्राईक प्राईजमधून एकूण प्रिमिअम वजा केला असता (५३००-६२ =५२३८) मिळतो. याचा अर्थ एप्रिल एक्सपायरीला जर निफ्टी ५७६२ व ५२३८ या दोन पातळींदरम्यान कुठेही राहीला तरी शॉर्ट केलेले दोन्ही ऑप्शन्स हे दर दिवशी किंमत घटत जावून एक्सरसाईझ केले न जाता अखेर वर्थलेस होतात. साहजिकच प्रिमिअम आपल्याकडेच राहून ३१००रु. इतका फायदा होतो.

धोक्याचे व्यवस्थापन (Risk Management) –

समजा महिना पूर्ण होण्याआधीच निफ्टीने अचानक मोठी हालचाल करून ५७६२ या ब्रेक इव्हन पॉइन्टच्या दिशेने वाटचाल सुरु केली तर आपण विकलेल्या ‘कॉल’ ऑप्शनची किंमत वाढत जाते. पुढे जर निफ्टीने ब्रेक इव्हन पॉइन्ट ओलांडला तर (वाढलेल्या किंमतीला एक्सरसाईझ झाल्याने) सदर ऑप्शन परत खरेदी करणे भाग पडते आणि  मोठा तोटा होवू शकतो. हे टाळण्यासाठी मुख्यत्वे दोन उपाय आहेत.

पहिला उपाय म्हणजे अर्थातच स्टॉपलॉस लावून सदर विकलेला ‘कॉल’ ऑप्शन हा थोडासा तोटा सोसून परत घेवून टाकणे हा होय. असा स्टॉपलॉस हा निफ्टीच्या किंमतीवर किंवा ऑप्शनच्या किंमतीवर आधारीत असू शकतो. पण माझ्या मते तो निफ्टीच्या किंमतीवर आधारीत असू नये. तसा तो ठेवल्यास निफ्टीच्या टेक्निकल लेव्हल्सचा उत्तम अभ्यास असणे आवश्यक असते. तसेच स्टॉपलॉस लावण्याच्या वेळी असलेल्या त्या ऑप्शनच्या कमी-अधिक टाईम व्हॅल्युमुळे, निफ्टी लेव्हल आणि होणारा तोटा याचे प्रमाण अनिश्चित असते. याउलट स्टॉपलॉस हा त्या 'कॉल' (वा 'पुट') ऑप्शनच्या किंमतीवरच आधारीत ठेवल्यास आपल्याला होणारा तोटा आपण निर्धारीत करू शकतो.

मोठा तोटा टाळण्याचा दुसरा उपाय हा हेजींग स्वरूपाचा असू शकतो. समजा निफ्टीने एक्सपायरीच्या आधीच ५७६२ ही लेव्हल गाठली तर त्याच वेळी निफ्टी फ्युचर्सचा एक लॉट खरेदी करून एक्सपायरीपर्यंत होल्ड केल्यास, ५७६२ या पातळीच्या वर निफ्टी कितीही वाढला तरी ऑप्शन्स विक्रीत होणारा तोटा हा फ्युचर्स मध्ये झालेल्या फायद्याने 'न्युट्रलाईझ’ करता येतो. मात्र असे करताना फ्युचर्स लॉट खरेदी केल्यावर निफ्टी जर परत खाली घसरू लागला तर त्यालाही पुन्हा सुमारे २० पॉइन्ट्चा स्टॉपलॉस लावणे गरजेचे आहे. अशावेळी ऑप्शन्स विक्रीतील फायदा हा फ्युचर्स मधील तोट्यामुळे कमी होतो, मात्र फार मोठा किंवा अमर्यादीत तोटा होण्यापेक्षा ते नक्कीच परवडते. येथे हे लक्षांत घ्या कि वरीलप्रमाणे हेजींग करताना जितके ‘कॉल’ चे लॉट विकले असतील तितकेच ‘फ्युचर्स’ चे लॉट घेणे आवश्यक असते.

याचप्रमाणे निफ्टीने समजा खालील बाजूचा ब्रेक इव्हन पॉइन्ट गाठला तर तेथे निफ्टी फ्युचर्समध्ये विक्री करून हेजींग करावे लागेल. मार्केटमध्ये वोलॅटिलिटी फार नसेल तर, आणि स्ट्राईक प्राईजची निवड उत्तम असेल तर असे हेजींग करण्याची वेळ सहसा येत नाही. मात्र तशी ती आलीच, तर हेजींग करणे टाळू नका. कधीकधी फायदा कमवण्यापेक्षा मार्केटमध्ये टिकून रहाणे जास्त महत्वाचे असते.   



वरील उदाहरणात निवडलेल्या दोन्ही स्ट्राईक प्राईज या निफ्टीच्या किंमतीच्या २०० पॉइन्ट दूर आहेत मात्र ३०० वा ४०० पॉइन्ट दूर असलेल्या स्ट्राईक प्राईजही निवडता येतात. त्यामुळे धोका कमी होतो मात्र मिळणारा प्रिमिअमही कमी होत असतो. असे ऑप्शन्स विकण्यासाठी मोठा मार्जिन मनी लागतो आणि शॉर्ट पोझिशन्स क्लोज करेपर्यंत वा     एक्सपायरीपर्यंत हा मार्जिन मनी ब्लॉक होतो. ऑप्शनचा एक लॉट विकण्यासाठी जो मार्जिन मनी ब्लॉक होतो तो त्या ऑप्शनची किंमत, एक्सपायरीला शिल्लक असलेले दिवस आणि त्यावेळच्या वोलॅटिलिटीवर अवलंबून असतो.याबाबतीत आपल्या ब्रोकरला विचारून ठेवावे. मात्र महिनाभरासाठी तितक्या मार्जिन मनीची व्याजासाठी अन्यत्र गुंतवणूक केली असे मानले, तर शॉर्ट स्ट्रॅन्गल मधून मिळणारा प्रिमिअमचा फायदा हा त्या मार्जिन मनीच्या एका महिन्याच्या व्याजापेक्षा नक्की जास्त असतो. तेव्हा दर महिन्याला ऑप्शन्स विक्रीसाठी लागणारा मार्जिन, तसेच प्रसंगी हेजींगसाठी लागू शकणारा मार्जिन याची आपल्याजवळ व्यवस्था असेल तर किती ऑप्शन्स विकायचे आणि किती फायदा कमवायचा हे आपण स्वतःच ठरवू शकतो.

योग्य स्ट्राईक प्राईजची निवड आणि धोक्याचे अचूक व्यवस्थापन केले गेले तर एरवी व्हीलन भासणा-या 'टाईम डिके' लाच आपला मित्र बनवून या स्ट्रॅटेजीतून दरमहिना नियमीत नफा मिळवणे सहज शक्य आहे.