मित्रांनो, नजिकच्या काळात बाजारात काय होईल याचे अंदाज बांधणे अतिशय
कठीण असते याचा अनुभव आपण सर्वच घेत असतो. याबाबतीत माझा अनुभव असा आहे कि बाजारात
व एकूणच कुठल्याही क्षेत्रात काय होईल याचा अंदाज बांधण्यापेक्षा काय होणार नाही
याचा अंदाज बांधणे अधिक सोपे असते. उदा. यंदा आयपीएल स्पर्धा कोण जिंकणार याचा
अंदाज करणे फायनल मॅच पर्यंत कठीणच असते. सध्याच्या फिक्सिंगच्या वावटळीत ते अधिकच
कठीण झाले आहे नाही का ? :-) मात्र यंदा पूणे वा दिल्लीचे संघ विजेते होवू शकत
नाहीत याचा अंदाज खूप दिवस आधीच करणे सहज शक्य होते. मार्केटमध्येही हा फंडा लागू
पडतो, आणि त्याचा फायदा ऑप्शन्स द्वारे उठवता येतो. कसे ते पाहूया.
या आधीच्या पोस्टमध्ये 'टाईम डिकेचा' वापर करून घेणा-या ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीविषयी माहिती
घेतली होती त्याच अनुषंगाने पुढे जात आता ‘नेकेड ऑप्शन सेलींग’ म्हणजे काय,
त्यातील रिस्क मॅनेजमेंट, योग्य स्ट्राईक प्राईजची निवड आणि महत्वाचे म्हणजे ऑप्शन
सेलींगचे टाईमींग या बाबी समजून घेवूया.
असेही काही ट्रेडर्स आहेत कि जे कुठल्याही शेअरमध्ये वा इंडेक्स मध्ये
गुंतवणूक वा खरेदी न करता निव्वळ ‘ऑप्शन्स सेलींग’ करूनच फायदा कमवतात. अशा ऑप्शन
सेलींगला बाकि कुठल्याही लॉन्ग पोझिशनचा आधार वा कव्हर नसल्याने याला ‘नेकेड’
ऑप्शन्स सेलींग म्हणतात. तुम्ही जर तुमच्या ब्रोकरला ‘असे’ काही करण्याबद्दल
विचारलेत तर तो तुम्हाला त्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल.
त्याच्या मते असे निव्वळ ऑप्शन सेलींग हे अतिशयच धोक्याचे असून तुम्ही तो धोका
अजिबात पत्करू नये.
‘नेकेड ऑप्शन सेलींग’मध्ये थिरॉटिकली धोका असतोच, पण त्याला मॅनेज करता
येतो हे समजून घेवून शिस्तबद्ध रिस्क मॅनेजमेंट केली तर कुठलेही टेन्शन न येता,
आपली इतर कामे, उद्योग सुरू ठेवून शांतपणे ट्रेडींग करता येते असाच माझा अनुभव
आहे. शिवाय बाजार कुठल्याही दिशेस जात असला तरी याद्वारे फायदा कमवणे शक्य असते.
आधीच्या पोस्ट्मधील शॉर्ट स्ट्रॅंगल स्ट्रॅटेजीमध्ये जशा प्रकारची रिस्क मॅनेज
केली आहे तशाच प्रकारची रिस्क मॅनेजमेंट येथे अपेक्षीत आहे, मात्र अतिशय दूरच्या
स्ट्राईक प्राईज म्हणजे ज्याला ‘Far OTM’ म्हणतात अशा निवडून तेथे विक्री केली
जाते. अशा स्ट्राईक प्राईज या अंडरलाईगच्या किंमतीपेक्षा (निफ्टीच्या संदर्भात)
४०० किंवा अगदी ५०० पॉइन्टही दूर असू शकतात. थोडक्यात म्हणजे येथील ऑप्शन्सना
इंट्रींन्सिक व्हॅल्यु तर नसतेच पण नजिकच्या काळात ती असण्याची शक्यताही फारच कमी
असते. अशा फार दूरच्या OTM ऑप्शन्स ना असते ती केवळ टाईम व्हॅल्यु ! ही टाईम
व्हॅल्यु विकूनच आपल्याला फायदा कमवायचा आहे. वेगळ्या प्रकारे सांगायचे तर जिंकणा-या
घोड्याचा अंदाज बांधून त्यावर पैसे लावण्यापेक्षा, जे घोडे मरतुकडे आहेत, जे कधीच
जिंकू शकणार नाहीत अशा घोड्यांवर पैसे लावणारे लोक (ऑप्शन बायर) शोधा आणि त्यांचा
पैसा आपल्या पदरात पाडून घ्या. म्हणजेच असे ऑप्शन्स शोधा कि जे कधी ‘इन द मनी’
होणार नाहीत, आणि तेच विकून पैसे कमवा. अर्थातच तेथील थोडा कमी असलेला प्रिमिअम
लक्षांत घेतल्यास फायद्याचे प्रमाण कमी वाटू शकते. मात्र एकाऐवजी दोन लॉट विकून
त्याची भरपाई केली जाते. अर्थातच त्यासाठी अधिक मार्जिनची गरज असते. आपल्याकडे
फक्त ऑप्शन सेलींगसाठी राखून ठेवलेला किमान एक लाख रु. एकूण मार्जिन असला तरच अशा
प्रकारचे ट्रेडींग करा. निफ्टीची किंमत ६००० असेल तर त्याच महिन्याचे ६४०० वा ६५०० चे कॉल विकण्यात धोका कमी असतो. त्याच प्रकारे ५५०० वा ५६०० चे पुट ऑप्शन विकण्यातही
धोका कमी असतो. कारण महिनाअखेर पर्यंत निफ्टी ५०० पॉइन्ट वाढण्याची वा कमी
होण्याची शक्यता फार कमी असते. अशा प्रकारे स्ट्राईक प्राईजची निवड कशी करायची हे
आपण पाहिले, पण थांबा – या व्यतिरिक्त ऑप्शन्स सेल करण्याची वेळ आणि सेलींगची संधी
या दोन बाबी नीट लक्षांत घ्या. प्रथम सेलींगची योग्य वेळ ठरवूया.
आपल्याला हे माहीतच आहे कि महिन्याच्या सुरुवातीला त्या महिन्याच्या ऑप्शन्सच्या
किंमती जास्त असतात आणि एक्सपायरी जवळ येइल तशा त्या कमी कमी होत जातात. मात्र
नेकेड सेलींग च्या बाबतीत जास्त किंमतींच्या मोहात पडून महिन्याच्या सुरुवातीला सेलींग
करण्याची घाई करू नका. महिन्याचा पहिला आठवडा काहीही सेलींग करू नका. मार्केटला
जिथे हवे तिथे फिरू द्या. साधारण दहा तारखेच्या आसपास पहिले सेलींग करायला हरकत
नाही. निफ्टीच्या संदर्भात ४०० किंवा चक्क ५०० पॉइंट दूर असलेल्या स्ट्राईक
प्राईजचे वरील बाजूचे कॉल व खालील बाजूचे पुट ऑप्शन्स निवडून प्रिमिअम निदान ६ रु.
पेक्षा मोठा असल्यास विकणे ठीक राहील. वोलॅटिलिटी जास्त असेल तर असा प्रिमिअम जास्त असतो. म्हणजे दोन्ही बाजूच्या मिळून दोन लॉटमागे
ब्रोकरेज वगळता किमान ५०० रु. तरी मिळतील. हा फायदा कमी आहे असे वाटले तरी जास्त लॉट्स
विकण्याची घाई करू नका. कारण प्रत्येक लॉटमागे १५,००० ते १८,००० मार्जिन ब्लॉक होत
असतो हे लक्षांत घ्या. नंतर अजून एखादा आठवडा वाट बघा. बाजार मंद हालचाली करत असला
तर ठीकच, पण मोठ्या हालचाली करत असला तरी घाबरून जाऊ नका. निफ्टीने आपली स्ट्राईक
प्राईज ओलांडल्याशिवाय आपला तोटा होणार नाही हे लक्षांत घ्या. १५ ते १८ तारखेनंतर
निफ्टीची नवी लेव्हल पाहून त्याप्रमाणे पुन्हा ३०० ते ४०० पॉइंट्स दूरचे ऑप्शन
विकण्याचा प्रयत्न करा. आता एक्सपायरीला कमी दिवस शिल्लक असल्याने ४०० पॉइन्ट
दूरचे ऑप्शन २ किंवा ३ रु.चे म्हणजे खूपच स्वस्त असतील तर ते न विकता ३०० पॉइंट
दूरचे १ किंवा २ लॉट विका. असे निर्णय परिस्थिती पाहून, बाजाराची गती व दिशा पाहून
घ्यायचे असतात. अशा प्रकारे सुमारे एक लाख मार्जिन असल्यास ४ ते ६ लॉट विकता
येतात, मात्र रिस्क मेनेजमेंटसाठी किमान २ लॉट एवढा मार्जिन राखीव ठेवावा लागतो.
यासाठी दुस-या वा तिस-या आठवड्याअखेर निफ्टी एका बाजूला झुकला असेल तर विरुद्ध
बाजूच्या, सुरुवातीस आपण विकलेल्या ऑप्शन्सची किंमत अगदी कमी झालेली असेल; ते ऑप्शन्स
‘वर्थलेस’ होण्याची वाट न बघता १रु. वा त्यापेक्षा कमी किंमतीला मिळाल्यास परत खरेदी करून ब्लॉक झालेला
मार्जिन सोडवता येतो. हाच मोकळा झालेला मार्जिन हा पुन्हा नव्याने संधी आल्यास लॉट
सेलींग करण्यासाठी किंवा रिस्क मॅनेजमेंट ( याकरता कृपया या आधीची पोस्ट पहा) करता
उपयोगी येत असतो.
अशा प्रकारे ऑप्शन सेलींगची वेळ ही महत्वाची असते. आता सेलींग
करण्यासाठीच्या अन्य संधींविषयी बघुया. समजा एखाद्या महिन्यात RBI व्याजदरात बदल
करण्याची शक्यता असेल वा कंपनीचे रिजल्ट जाहीर होणार असतील वा महत्वाच्या
निवडणूकांचे निकाल असतील तर त्या तारखेआधी सेलींग करणे टाळावे. अशा महत्वाच्या
घटनेची प्रतिक्रिया म्हणून बाजार मोठी हालचाल करण्याची शक्यता असते. अशी मोठी
हालचाल पूर्ण होवू द्यावी आणि त्यानंतर १-२ दिवसांनी थोडी स्थिरता आल्यावर निफ्टीच्या वा
त्या स्टॉकच्या नव्या पातळीनुसार स्ट्राईक प्राईज निवडून तेथे सेलींग करावे. उदा.
या महिन्याच्या सुरुवातीला हिंदूस्तान युनिलीव्हर मधील बातमीमुळे तो शेअर सुमारे १५०
रु.ने अचानक वाढला होता. अशी मोठी हालचाल होवू द्यावी. या मोठ्या वाढीमुळे
साहजिकच त्याचे दूरचे कॉल ऑप्शनही महाग झाले होते. त्याचाच फायदा उठवून त्यातील
हालचाल मंदावल्यावर कॉल ऑप्शन विकणे फायद्याचे ठरते. त्याचप्रमाणे एखाद्या
महिन्यात निफ्टीने मोठी हालचाल केल्यास त्यानंतर नेकेड सेलींग करणे योग्य ठरते.
ज्या अंडरलाईंगमध्ये ऑप्शन सेलींग करायचे त्याविषयी बातम्यांवर नजर ठेवून अशी संधी
साधायची असते. येथे एक बाब लक्षांत घ्या कि मोठ्या हालचालीनंतर कधी कधी त्या
हालचालीची उलट प्रतिक्रियाही तीव्र असू शकते, तेव्हा रिस्क मॅनेजमेंन्टला पर्याय
नाही !
अतिशय धोक्याच्या समजल्या जाणा-या, पण योग्य आणि
शिस्तबद्धपणे रिस्क मॅनेजमेंट केल्यास नक्कीचा फायदा देणा-या ‘नेकेड ऑप्शन सेलींग’
ची माहिती देवून, आणि आतापर्यंतचे माझे लिखाण अनेकांना उपयुक्त ठरले असेल अशी आशा
व्यक्त करून ‘ऑप्शन्स’ या विषयावरील माझे लिखाण पूर्ण करत आहे.
आतापर्यंत आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आणि यापूढे आवश्यक वाटेल तेव्हा मार्केटबद्दल टिप्पणी व मधून मधून काही टीप्स देण्याचा विचार आहे. आपल्या सर्वांचे प्रेम असेच राहू द्या ही विनंती.
Surekh lekh aahet. Mi share market madhe nahi, pan aaple lekh vaachun share market madhe padave aase vaatat aahe.
Sandip sadhya ahes kuthe, tuza mobile pan out of reach ahe...
You said : "… जे घोडे मरतुकडे आहेत, जे कधीच जिंकू शकणार नाहीत अशा घोड्यांवर पैसे लावणारे लोक (ऑप्शन बायर) शोधा… "
शेअरबाजारात इतकी खात्री कशाचीच देता येत नाही. सगळ्या गोष्टी price/earnings zombies च्याच तंत्राने चालल्या असत्या तर weaker section ला ह्या जगात जगताच आलं नसतं…