Share/Bookmark

४ ऑग, २०१३

'डिव्हिडंड इन्वेस्टींग' म्हणजे काय ?



जुलै महिना हा तिमाही निकालांचा होता. त्यानंतर रुपयामधील घसरणीचे तसेच त्यावर सरकार व RBI यांना योग्य तो प्रभावी उपाय करता येत नसल्याचे जे चित्र निर्माण होत आहे त्याचे निमित्त होवून गेल्या आठवड्यातील बाजार जसा अचानक तीव्रतेने घसरला तसा अनुभव बाजारात वारंवार येत असतोच. क्रिकेटमधील अनिश्चिततेप्रमाणेच काहीजण याला ‘गोल्डन अनसर्टन्टी’ म्हणून संबोधत असले तरीही यात बहुतांश सामान्य ट्रेडर्सचे नुकसानच होत असते.

अशा अनिश्चिततेवर उपाय म्हणून काही लोक 'डिव्हिडंड इन्वेस्टींग' करतात. याचा मुळ अर्थ ‘उत्तम डिव्हीडंड देणा-या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे’ असा असला, तरी यातही शॉर्टकट मारून अल्पावधीत फायदा कमवणेही शक्य असते. तेव्हा प्रथम डिव्हीडंड म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने केले जाणारे इन्वेस्टींग वा ट्रेडींगसंबंधी माहिती असणे गरजेचे आहे.  

साधारणपणे तिमाही वा वार्षिक कालावधीने कंपन्या आपल्या शेअरहोल्डर्सना आपल्याला मिळणा-या फायद्यातील वाटा म्हणून जी रक्कम अदा करतात तीला डिव्हीडंड म्हणतात. शेअरहोल्डर्सना प्रत्यक्ष काही न करताच केवळ शेअर्स धारण केल्याने मिळणारी ही रक्कम म्हणजे बाजारातील शेअरच्या किंमतीत होणा-या वाढीव्यतिरिक्त होणारा जादा फायदा असतो. बाजारात मंदी असताना होणारी शेअरच्या किंमतीतील घट ही अशा प्रकारे मिळणा-या डिव्हीडंडमुळे काही प्रमाणात तरी सुसह्य होत असते. म्हणूनच उत्तम डिव्हीडंड देणारा शेअर हा कुठल्याही मार्केट कंडीशनमध्ये पसंत केला जातो. 
असे म्हणतात कि सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्याप्रमाणेच नियमीतपणे आणि वाढीव डिव्हीडंड देणे हे त्या कंपनीला उत्तम फायदा होत असल्याचे, वा कंपनीजवळ पूरेसा राखीव निधी असल्याचे निदर्शक असते. सातत्याने फायदा मिळवणारी व भविष्यातही मिळवण्याची शक्यता असलेली कंपनीच आपल्या शेअरहोल्डर्सना असा डिव्हीडंड द्यायचे ठरवत असते. त्यामुळेच अशा कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीही वाढत रहाण्याची शक्यता असते.

असा दिला जाणारा डिव्हीडंड हा, प्रतिशेअर अमूक टक्के अशा प्रकारे जाहीर केला जातो. समजा एखाद्या कंपनीने प्रतिशेअर ५० टक्के डिव्हीडंड दिला तर त्याचा अर्थ ‘त्या कंपनीच्या शेअरच्या दर्शनी किंमतीच्या (फेस व्हॅल्युच्या) ५० टक्के इतका डिव्हीडंड’ असा असतो. समजा दर्शनी किंमत १० रु. असेल तर डिव्हीडंडची रक्कम प्रतिशेअर ५ रु. असेल. आणि त्या शेअरची बाजारातील किंमत २०० रु. असेल तर मिळणारा डिव्हीडंड हा  प्रत्यक्षात २०० रु.च्या प्रत्येक शेअरमागे ५ रु. इतका म्हणजे २.५ टक्के इतकाच असतो. अशा प्रत्यक्ष मिळणा-या रकमेला ‘डिव्हीडंड यील्ड’ असे म्हणतात.

डिव्हीडंड यील्ड = (प्रतिशेअर डिव्हीडंड / शेअरची बाजारातील किंमत) * १००

डिव्हीडंड इन्वेस्टींग करताना या डिव्हीडंड यील्डचा प्रामुख्याने विचार केला जातो. डिव्हीडंड यील्ड जेवढा अधिक, तेवढा शेअर गुंतवणूकीस चांगला. मात्र असा डिव्हीडंड यील्ड हा काही वर्षे सातत्याने मिळत रहाणे आणि भविष्यातही त्या कंपनीचा बिझीनेस उत्तम राहणे हे अत्यंत महत्वाचे असते.

आणखी एक महत्वाचा मुद्दा असा कि एखाद्या वेळी त्या शेअरची बाजारातील किंमत काही कारणाने घसरली असेल तर ‘डिव्हीडंड यील्ड’ हा रेशो बराच मोठा दिसू शकतो. आणि ज्या शेअरची किंमत घसरली असेल त्या कंपनीबाबत वा सेक्टरमध्ये काहीतरी प्रतिकूल घडलेले असण्याची वा भविष्यात घडण्याची शक्यता असते. म्हणजे अशी घसरलेली किंमत ही तात्पुरत्या प्रकारची किंवा बाजारातील सेन्टीमेन्ट्सच्या प्रभावामुळे आहे कि त्यामागे काही मोठे कारण आहे ते कळल्याशिवाय असा शेअर खरेदी करणे योग्य ठरणार नाही. म्हणजेच डिव्हीडंड इन्वेस्टींग साठी शेअर निवडताना फक्त डिव्हीडंड यील्डचा विचार करून चालणार नाही तर त्याशिवाय आणखीही काही घटक विचारात घ्यावे लागतील.

सातत्याने उत्तम डिव्हीडंड देणा-या कंपन्या कोणत्या, त्यांचा शोध घेवून त्यांच्याविषयी थोडे वाचन करायला हरकत नाही. कारण बाजारात जेव्हा जेव्हा आतासारखे करेक्शन येते तेव्हा या कंपन्या स्वस्त भावात मिळत असतात. विविध सेक्टरमधील चांगला डिव्हीडंड देणा-या कंपन्यांची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

साधारणपणे कंपनीचे मार्केट कॅपिटल, प्रतिशेअर बूक व्हॅल्यु, प्राईस/अर्निंग रेशो, प्राईस/बूक व्हॅल्यु आणि कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते तो सेक्टर अशा इतर अनेक बाबींचा विचार डिव्हीडंड इन्वेस्टींग करताना केला जातो. या सर्व बाबींचा सविस्तर विचार आपण या ब्लॉगवर पुढील काही पोस्ट्समध्ये करणार आहोत.