Share/Bookmark

१७ ऑक्टो, २०१२

'पोर्टफोलिओ हेजींग' कसे करतात ?मागील पोस्टमध्ये हेजींग म्हणजे काय याची ओळख झाल्यावर आता प्रत्यक्ष हेजींग कसे करतात ते बघुया. मागील पोस्टमध्ये फक्त एका शेअरच्या बाबतीत उदाहरण दिले होते. मात्र आपल्याकडे अनेक शेअर्स असतात, मग त्यासाठी प्रत्येक शेअरचे फ्युचर्सचे लॉट विकत बसण्याची गरज नसते. आपल्याकडे असलेल्या सर्व शेअर्सच्या एकूण किंमतीवरून त्यासाठी किती प्रमाणात हेज करायचे ते ठरवले जाते. त्यालाच ‘पोर्टफोलिओ हेजींग’ असे म्हणतात. असे पोर्टफोलिओ हेजींग करताना स्टॉक फ्युचर्स न विकता इंडेक्स (निफ्टी किंवा अन्य इंडेक्स) फ्युचर्सचे सेलिन्ग करून हेज केले जाते. असे करताना आपल्याकडे असलेले शेअर्स हे त्या विशिष्ट इंडेक्सचा भाग असणे मात्र जरूरीचे आहे.
उदा. आपल्याकडे ३-४ निरनिराळ्या बॅंकांचे शेअर्स असतील तर त्या सर्वांचे हेजींग करण्यासाठी साधारणपणे बॅन्कनिफ्टी मध्ये शॉर्ट पोझिशन घेतली जाते. समजा अशा बॅंकांच्या शेअर्सची एकत्रित किंमत ही ५ लाख रु. असेल तर या पोर्टफॉलिओचे हेजींग करण्यासाठी बॅंकनिफ्टीचे किती लॉट विकावेत ? बेंकनिफ्टीचा एक लॉट हा २५ चा आहे. सध्याची बॅंकनिफ्टीची किंमत १०५०० एवढी असेल तर एका लॉटची किंमत (१०५००*२५)= २,६२,५००रु. होते. म्हणून ५ लाखाचा बॅंकीन्ग शेअर्सचा पोर्टफोलिओ हेज करण्यासाठी बॅंकनिफ्टीचे २ लॉट विकले तर ठीक होइल.(खरे म्हणजे ते थोडेसे ओवर-हेजींग होइल). तात्पर्य हे कि हेजींगमध्ये फ्युचर्सची पोझिशन ही साधारणपणे पोर्टफोलिओच्या किंमतीएवढी असणे अपेक्षित आहे.
यामध्ये आणखी बारकावे असे आहेत - फक्त दोन्ही किंमती सारख्या असल्या म्हणजे झाले असे नाही, कारण एखाद्या इंडेक्समधील सर्वच शेअर्स हे त्या इंडेक्स नुसारच वर वा खाली होतील असे नसते, तसेच त्यांची इंडेक्सच्या तुलनेत होणारी हालचाल ही कमी वा जास्त असते. त्यामुळे ‘अचूक हेज’ करणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून आपला पोर्टफोलिओ हा इंडेक्सच्या तुलनेत किती हालचाल करतो हे माहीत असणे गरजेचे आहे. अशा तुलनात्मक हालचालीला ‘बीटा व्हॅल्यु’ असे म्हणतात. एखाद्या शेअरचे इंडेक्सच्या तुलनेत वर वा खाली होण्याचे प्रमाण जास्त असेल; म्हणजेच तो शेअर हा इंडेक्सपेक्षा जास्त वोलॅटाईल असेल तर त्याची बीटा व्हॅल्यु ही १ पेक्षा जास्त असते; आणि इंडेक्सच्या तुलनेत जे शेअर कमी हालचाल करतात, म्हणजेच थोडेसे स्थिर प्रवृतीचे आहेत त्यांची बीटा व्हॅल्यु ही १ पेक्षा कमी असते. येथे इंडेक्सची बीटा व्हॅल्युही बेस म्हणजेच १ एवढी धरलेली आहे.
सेन्सेक्स मधील शेअर्सच्या सप्टेंबर’१२ च्या (लेटेस्ट) बीटा व्हॅल्यु पहाण्यासाठी येथे क्लिक करा. निफ्टी शेअर्सच्याही अशा बीटा व्हॅल्यु इंटरनेटवर आपल्याला मिळू शकतील. त्यावरून आपल्या पोर्टफोइओची ‘बीटा व्हॅल्यु’ काढून त्याला पोर्टफोलिओच्या एकूण किंमतीने गुणले असता जी किंमत मिळते  तेवढ्या किंमतीचे इंडेक्स फ्युचर्सचे लॉट त्या पोर्टफोलिओच्या हेजींग’साठी विकावेत अशी अपेक्षा आहे.
ज्या हेजींग स्ट्रॅटेजीमध्ये संभाव्य नुकसान हे ‘शून्य’ असते त्याला ‘परफेक्ट हेज’ असे म्हणतात. अर्थात असे परफेक्ट हेज करणे प्रॅक्टिकली जवळजवळ अशक्य आहे. असो. सारांश हा कि आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओचे शक्य तेवढे अचूक हेजींग करणे शक्य आहे. मात्र सदासर्वकाळ आपल्या पोर्टफोलिओचे असे पूर्ण किंमतीचे हेजींग करून ठेवणे कितपत फायद्याचे आहे याबाबत मतभेद आहेत. कारण मग ‘स्टॉपलॉस’ या संकल्पनेची गरज काय ? असाही प्रश्न येतो ! तेव्हा येथे असाही एक मतप्रवाह आहे कि आपण जेव्हा ठराविक शेअर्स इ. चा पोर्टफोलिओ बाळगतो तेव्हा आपली अपेक्षा वा अंदाज त्याची किंमत वाढेल हीच असते, म्हणजेच बाजाराची दिशा आपण मनात ठरवलेली असते, मग असे पूर्ण किंमतीचे हेजींग करणे म्हणजे आपलाच आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण नव्हे का ? तेव्हा एकंदरीत विचार करता केवळ इंडेक्स फ्युचर्सच्या आधारे असे पूर्णपणे व पूर्णकाळ हेजींग करणे अधिक खर्चाचे आहेच व ते प्रॅक्टीकली आवश्यक नाही, मात्र बाजार चांगला असताना अचानक विपरीत घटनांमुळे तो ठराविक मर्यादेपलिकडे घसरू लागला तरच इंडेक्स फ्युचर्सचा हेजींगसाठी वापर करावा अथवा बाजाराची दिशा नक्की नसेल तर पूर्ण किंमतीचे हेजींग न करता अर्ध्या किंमतीचे करावे असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या मते फ्युचर्स ऐवजी  ऑप्शन्सच्या आधारे केले जाणारे हेजींग हे नुकसान टाळण्याचे अधिक उत्तम पर्याय आहेत. त्याविषयी नंतर पहाणारच आहोत. तूर्त आपल्या पोर्टफोलिओची बीटा व्हॅल्यु कशी काढता येते ? ते पुढील पोस्टमध्ये बघुया.


2 comments:

  • नितीन निमकर says:
    २० ऑक्टोबर, २०१२

    तुमच्या या ब्लॉगबद्दल तुमचे अभिनंदन. मला हेजिंगबद्दल काही प्रश्न आहे. तो म्हणजे हेजींगला ऐवजी जर टेक्निकल अभ्यासाची मदत घेतली तर तेच काम होऊ शकेल नाही का? मग हेजिंगचे महत्व काय? अर्थात मला एक मान्य आहे की टेक्निकल अभ्यास गृहित धरतो की तुम्ही तुमच्या अभ्यासाप्रमाणे शॉर्ट किंवा लॉंग जाणार आहात आणि ते फक्त पोर्टफोलिओ ठेवण्यापेक्षा वेगळे असेल.

  • Sandip Sathe says:
    २० ऑक्टोबर, २०१२

    Dear नितीनजी, प्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. यानिमित्ताने आपल्या ब्लॉगवरही नजर टाकली.आपला व्यासंग उत्तमच आहे.आपल्या म्हणण्याप्रमाणे टेक्निकलवर आधारित खरेदी वा विक्रीचा निर्णय वा इंट्राडे ट्रेड जरूर करता येइल.मात्र प्रश्न येतो तो डिलीव्हरी घेवून बसलेले असताना अचानक होणा-या विपरीत व विशेषतः ओव्हरनाईट घटना व त्यामुळे होणारे गॅप-डाऊन ओपनिंन्ग यामुळे! असे गॅपडाऊन ओपनिंग आपल्या स्टॉपलॉसच्याही बरेच खाली होवू शकते.आणि याला हेजींगशिवाय पर्याय नाही.शिवाय टेक्निकल स्टडी हा आपल्याला सपोर्ट /रजिस्टन्स लेव्हल्स जरूर दाखवतो, मात्र मार्केट त्या लेव्ह्ल्स पाळणार कि मोडणार हे टेक्निकल स्टडी कधीच पक्के सांगू शकणार नाही.हेजींग हे सर्व समस्यांवरचा सर्वोत्तम उपाय नाही हे खरे पण त्याचेही महत्व आहेच.निव्वळ ट्रेडींगमधेच हे नसून शेअर्स वि.सोने किंवा शेअर्स वि.रिअल इस्टेट वा फॉरीन एक्सचेन्ज असे प्रकार आपण करत असतोच.हे एक प्रकारचे हेजींगच असते.एकूणात अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यामधून स्वतःचे काही लॉजिक वापरून स्वतःच्या शैलीला फिट होइल असा पर्याय निवडणे योग्य ठरेल. आभार.