Share/Bookmark

९ ऑक्टो, २०१२

'अर्जुन्स रुल्स'- एक झीरो लॉस स्ट्रॅटेजी !


शेअरबाजारातील अनिश्चिततेवरचे उपाय जगभरचे ट्रेडर्स आणि इन्वेस्टर्स शोधत असतात आणि त्यातून नवे व वेगळे असे सतत काहीतरी निर्माण होते. यापैकीच एक कल्पना ‘अर्जुन्स ट्रेडींग रुल्स’ मी आज येथे मांडतोय. म्युचुअल फंडात गुंतवणूक करणा-या बहूतेकांना ‘SIP योजना’ माहिती असतीलच. ‘SIP’ हे इन्वेस्टमेन्ट प्लॅन असतात त्याप्रमाणेच काहीसे, मात्र ‘इन्वेस्टमेन्ट’ऐवजी ‘ट्रेडींग’ प्लॅन असे या ‘अर्जुन रूल्स’चे स्वरूप आहे. मला जेथे याविषयी वाचायला मिळाले ती लिंक येथे देतच आहे. मात्र SIP पेक्षा या स्ट्रेटेजीचे असलेले वेगळेपण आणि मूळ स्ट्रेटेजीत मला सुचलेले काही फरक यांची चर्चा येथे करणार आहे.
प्रथम  ‘अर्जुन्स रुल्स’ काय आहेत हे पाहूया.
       यात एक आणि एकच क्वालिटी स्टॉकमध्ये डिलीव्हरी बेस्ड ट्रेडींग करायचे आहे. आपल्या एकूण भांडवलाच्या फक्त २०% भांडवल या स्ट्रॅटेजीसाठी वापरायचे आहे-त्यापेक्षा जास्त नाही ! (क्वालिटी स्टॉक कुठला ते आपण ठरवायचे आहे )
)       प्रथम (आपल्या मते) योग्य त्या किंमतीला (उदा. रु.१०० ला) फक्त १० शेअर्सची खरेदी करायची आहे. खरेदी केल्यावर दोन पर्याय असतील - एकतर शेअरची किंमत वाढेल वा कमी होइल.
        जर तो शेअर ११०रु. पर्यंत वाढला तर प्रश्नच नाही. ते १० शेअर्स विकून टाकणे यात अभिप्रेत आहे. पण तसे सहसा होत नाही ;-) आणि जर काही दिवसांनी (वा आठवड्यांनी) तो स्टॉक ९०रु. ला आला (म्हणजेच १०% घसरला) तर तेथे आणखी १० शेअर्स खरेदी करायचे आहेत. असा घसरत जातानाही टेक्निकली तो मध्येच कधी थोडी वाढही दाखवणार आहे, तेव्हा समजा दरम्यान तो पुन्हा १००रु.पर्यंत उसळलाच तर ९०रु.ला घेतलेले १० शेअर्स येथे न चुकता विकून टाकायचे आहेत- अधिक वाट न बघता ! (येथे आपले काही भांडवल फायद्यासहीत मोकळे झाले)
      समजा पुढे त्याची किंमत पुन्हा ९०रु. पर्यंत घसरली तर तेथे पुन्हा १० शेअर्स खरेदी करावेत. त्यानंतर १०% खाली म्हणजे ८१ रु.ला डबल म्हणजे २० शेअर्स खरेदी करावेत. समजा दरम्यान तो ९०रु.पर्यंत उसळला तर ८१रु.ला घेतलेले २० शेअर्स येथे न चुकता विकून टाकायचे आहेत.
       त्यानंतरही तो परत ८१रु.पर्यंत घसरला तर तेथे पुन्हा २० शेअर्स घ्यायचे आहेत.
       जर तो आणखी दहा टक्के म्हणजे ७२रु. पर्यंत घसरला तर येथे ४० शेअर्सची खरेदी करायची आहे. आणि संधी मिळाल्यास हे ४० शेअर्स ८१रु. किंमत मिळेल तेव्हा विकायचे आहेत.
       याप्रमाणे न चुकता दर १०% फरकाने खरेदी आणि विक्री करत जायचे आहे.
       येथे स्टॉपलॉस लावणे अपेक्षित नाही. मुळात येथे (कायमस्वरूपी) ‘लॉस’च अपेक्षित नाही. लेखक याला ‘झीरो लॉस स्ट्रॅटेजी’ असे संबोधतो.
       किमान सहा महिने ते एकवर्ष पर्यंत या स्ट्रॅटेजीचे नियम कडकपणे पाळून ट्रेड करणे गरजेचे आहे. ठरलेल्या पातळीवर ठरलेली क्वांटीटी खरेदी आणि विक्री करत जायचे आहे. स्वतःचे मत वा अंदाज यांना येथे बिल्कूल जागा नाही.
-आणखी बरेच काही लेखकाने लिहीलेले असले तरी एक स्ट्रॅटेजी म्हणून समजून घेण्यासाठी येथे इतकेच पुरेसे आहे असे मला वाटते. वरील उदाहरणातील किंमती या त्या त्या स्टॉकप्रमाणे बदलतील व त्या स्टॉकच्या वोलॅटिलिटीप्रमाणे किंमतीत १०% कि ५% फरक झाल्यास ट्रेड करायचे हे आपल्याला ठरवावे लागेल. साधारणपणे महिन्यातून २-३ वेळा तरी असे ट्रेड करता यावे अशा प्रकारे स्टॉक व त्याची वोलॅटिलिटी बघून वरीलप्रमाणे नियम स्वतःसाठी बनवून घ्यावे लागतील, मात्र एकदा का ते बनवले कि मात्र त्यात बदल न करता त्याबरहुकुम ट्रेड करत जावे.
 या स्ट्रेटेजीची मूळ कल्पना –कमी किंमतीला अधिक शेअर्सची खरेदी करण्यासाठी (मानवी भावनांना स्थान न देता) यांत्रिकपणे केलेली गुंतवणूक- अशी SIP प्रमाणेच असली तरी या दोन्हीतील नेमके फरक खालीलप्रमाणे-
१)       SIP मध्ये ‘दर महिन्याला’ नियमीतपणे काही रक्कम गुंतवली जाते, तर या स्ट्रेटेजीत काळानुसार नव्हे तर शेअरच्या भावपातळीप्रमाणे गुंतवणूक केली जाते.
२)       SIP मध्ये नियमीत गुंतवणूक (रक्कम) फिक्स असते तर अर्जुन्स रुल्स प्रमाणे खालील पातळीवर अधिक रक्कम गुंतवली जाते.
३)       SIP मध्ये गुंतवणूक कशात करायची याचा निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य आपल्याला नसते, तर या स्ट्रॅटेजीत ते पूर्णपणे आपणच ठरवायचे आहे. SIP मध्ये फंड मॅनेजर्सनी केलेली चूकीची निवड आपल्या नुकसानास कारण होवू शकते.
४)       SIP मध्ये आपण कधीही म्हणजे बाजार खूप महाग असतानाही एन्ट्री केली तरी चालते (फंड मॅनेजर्सना त्याचे काय म्हणा ?) अर्जुन्स रुल्स प्रमाणे मात्र प्रथम गुंतवणूक जेथे सुरु करायची ती पातळी ही त्या स्टॉकच्या वर्षभरातील हाय-लो किंमतीच्या साधारणपणे ‘मध्यावर’ असावी, म्हणजे खालील बाजूस खरेदी व वरील बाजूस विक्रीची पूर्ण संधी घेता येते. (याबाबतीत मला काही शंका आहेत)
५)       सर्वात महत्वाचा फरक म्हणजे SIP मध्ये वरील बाजूस आपल्या युनिट्सची विक्री केली जात नाही ! कारण हा ट्रेडींग प्लॅन नाही तर इन्वेस्टमेन्ट प्लॅन असतो. ‘अर्जुन्स रुल्स’ हा मात्र ट्रेडींग प्लॅन असून त्याप्रमाणे दर ठराविक वरचे पातळीस विक्री करून सतत फायदा घेतला जातो. भांडवल प्रत्येक पातळीवर नियमीतपणे मोकळे (व सुरक्षीतही) होत जाते.
६)       दोन्ही स्ट्रेटेजी ‘मानवी भावनांना स्थान न देणा-या’ म्हणजेच यांत्रिकपणे काम करत असल्या तरी अर्जुन्स रुल्स स्ट्रेटेजी ही यांत्रिक असूनही SIP च्या तुलनेत अधिक ‘बुद्धीवान’ आहे असे माझे मत आहे. उदा. सेन्सेक्स २१००० वा निफ्टी P/E रेशो हा २५ पेक्षा जास्त असतानाही SIP योजना गुंतवणूक करणे थांबवत नाहीत, तर ‘अर्जुन्स रुल्स’ मात्र वर्षभरातील ‘हाय’ जवळ खरेदी टाळतातच उलट तेथे सर्व शेअर्स विकून टाकण्याचेही सुचवितात.
असो. आता मला असे वाटते कि यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ‘या स्ट्रेटेजीसाठी निवडायचा शेअर’ हाच आहे. कुठलाही एकच शेअर ट्रेड करायचा असे लेखक म्हणतो कारण बाकिच्या शेअर्समधील हालचाल, बातम्या याकडे लक्ष द्यायची, त्यामुळे विचलीत व्हायची गरजच नाही असे त्याचे म्हणणे आहे. म्हणजेच ज्यांना मार्केट बघायला, बातम्या, घडामोडी अभ्यासायला वेळ नाही असे लोकही यात सहजपणे ट्रेड करु शकतील. खरेदी विक्रीचे निर्णय हे आधीच ठरवलेले असल्याने असे निर्णय घेताना येणारे टेन्शन इ. पासून आपोआपच मुक्तता मिळते हे ही खरे. सर्वात महत्वाची शंका अशी कि ७२रु. नंतरही म्हणजेच ३०% पडल्यावरही तो शेअर घसरतच राहिला तर कसे ? मग आपले सर्व भांडवल कायमचे अडकणार नाही का ? शंका अगदी रास्त असली तरी दर्जेदार शेअर असा सतत पडू शकत नाही अन्यथा तो दर्जेदार शेअरच नाही ! आपली निवड चूकीची आहे असे म्हणावे लागेल !
आता दुसरी शंका- मार्केटच सतत पडत राहिले तर ? पण मग जेव्हा आपण मार्केटवर आधारित अशा म्युचुअल फंडात पैसे गुंतवतो तेव्हाही हे प्रश्न येतातच की ! तेव्हा ज्याला वाईटात वाईट परिस्थितीचीच कल्पना करायची असेल त्याने मार्केट सोडून पोस्टात गुंतवणूक करावी.(तेथेही धोका असतोच!- कसा ? त्याविषयी पुन्हा कधीतरी !)  
माझ्या मते BSE सेन्सेक्स मधल्या कंपन्यांमधून एखाद्या दर्जेदार कंपनीची या स्ट्रॅटेजीसाठी निवड केली तर अगदीच चूकीचे ठरणार नाही. आणि लक्षात घ्या - आपले सगळेच भांडवल या स्ट्रॅटेजीत वापरायचे नाहीये. अगदीच वाईट मार्केट कंडीशन्स वाटल्या आणि आपल्याला वाटले तर आपण खालील बाजूस खरेदी करणे कधीही थांबवू शकतोच की !
मात्र आज कोणत्याही शेअरच्या बाबतीत खात्री द्यावी असे वातावरण आपल्या देशात नाही हे ही दुर्दैवाने तितकेच खरे आहे. मार्केटच्या बाबतीत सगळीच अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नयेत हे जे म्हणतात ते ही चूकीचे नाही. म्हणून या स्ट्रॅटेजीसाठी कुठलाही एक शेअर न निवडता, मिनीनिफ्टीफ्युचर्स वा निफ्टीबीज चा पर्याय मी निवडेन. म्हणजे एकाच शेअरमधला संभाव्य धोका टाळता येइल. मात्र निफ्टीबीज हे ब्रोकरेजच्या दृष्टीने महाग पडतील तसेच कधीकधी पुरेशी वोलॅटिलिटी दाखवणार नाहीत. मिनीनिफ्टी फ्युचर्स हे या दोन्ही दृष्टीने उत्तम असले तरी यासाठी अधिक गुंतवणूक क्षमता तर लागेलच तसेच मुळात हे एक कॉन्ट्रॅक्ट असल्याने एक्सपायर होताना पुढील महिन्याची कॉन्ट्रॅक्ट्स घ्यावी लागतील- पर्यायाने ब्रोकरेज जास्त पडेल.
एकंदर विचार करता ही स्ट्रॅटेजी नियमीतपणे ब-यापैकी फायदा देणारी आहे असेच माझे मत आहे.

4 comments:

  • Abhijit Kadam says:
    १० ऑक्टोबर, २०१२

    Good strategy. pan ekhadya sharechya bhavishyatil kimtichya sarasaricha magil kimativarun andaz karane khup awaghad ahe.trial &error ne changali kamai hou shakate. Great kam kartoy mitra pls. chalu thev.

  • sandip says:
    ११ ऑक्टोबर, २०१२

    Dear अभिजीतजी,प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.एक सांगावेसे वाटते कि अंदाज करणे अवघड आहे म्हणूनच अशी स्ट्रॅटेजी शोधावी लागते. अन्यथा मार्केटची दिशा अचूक कळत असती तर सारेच खरेदी करून बसतील.वा सारेचजण विक्री करून तो स्टॉक शून्य किंमतीवर येइल. मग बाजार चालणार कसा? अनिश्चितता आहे व धोका आहे म्हणून भरघोस फायद्याची शक्यता आहे.यातून मार्ग काढणे आणि मार्केट कुठल्याही दिशेला गेले तरी फायदा कमवणे हे कुठल्याही स्ट्रॅटेजीचे अंतिम उद्दीष्ट असले पाहिजे.असो. अशी चर्चा होणे हे ब्लॉगच्या व ब्लॉगवाचकांच्या दृष्टीने चांगले आहे.म्हणून पुन्हा आभार.

  • सुनिल छाया-प्रकाशचित्रकार says:
    २४ ऑक्टोबर, २०१२

    सुमारे १२ वर्षांपूर्वी आंधळ्या उत्साहाने कर्ज काढून शेअरबाजारात गुंतवणूक केली. परिणाम तसेच मिळाले. चारच महिन्यात चांगलाच अडचणीत आलो. तेव्हा बाकिच्या टेक्निकल फंड्यात न घुटमळता, फक्त याच तंत्राने फार कमी कालावधीत बाहेर आलो. अर्थात बाजाराची दिशा तेजीची होती त्याचा मोठा वाटा होता. पण पुढे जाऊन उत्तम फायदाही मिळवला. तीन वर्षात मूळ गुंतवणूकीवर सव्वादोन पटीहून अधिक ‘मिळवले’(२३२%). ‘मिळवले’ अश्यासाठी की येथे काही न करता आपोआप मिळत नाही तर ‘मिळवावे लागते’.

  • sandip says:
    २५ ऑक्टोबर, २०१२

    अभिनंदन सुनीलजी! आपल्यासारख्यांनी येथे टिप्पणी देणे खूप गरजेचे आहे. आभार !