इतिहासात छ.शिवाजी महाराजांच्या पराक्रमांबद्दल आपण अनेकदा वाचले
असेल. मात्र त्याकाळीही शिवाजी महाराजांनी ‘हेजींग’ केले होते असे मी म्हटले तर
तुम्ही मला नक्कीच हसाल !
आपण हे वाचले असेल कि अफजलखानाची भेट घेण्यापूर्वी प्रतापगडाखालच्या
जंगलात आधीच लपून, दबा धरून बसलेल्या मावळ्यांना त्यांनी एक सूचना देवून ठेवली होती-
कि खानाबरोबर होणा-या झटापटीत जर राजे जिंकले तर विजयाची खूण म्हणून गडावरून तोफा
उडवून इशारा दिला जाईल. तो इशारा मिळतांच लपलेल्या मराठी सैन्याने अचानक हल्ला
करून शत्रूचे गडाखालचे सैन्य बेचिराख करून टाकायचे असे ठरवून ठेवले होते.
पण मी ज्याला ‘हेजींग’ म्हणतोय तो भाग पुढेच होता- महाराजांनीच तो
करावा – गडावरील तोफक-यांना अतिशय स्पष्ट सूचना होत्या कि - खानाबरोबरच्या त्या
जीवघेण्या झटापटीत राजे जिंकोत अथवा खान- म्हणजेच महाराजांचे काही बरेवाईट झाले
असते तरी (आणि खानाची अचाट ताकद बघता ती शक्यताही होती) - काहीही झाले तरीही-
तोफा उडवायच्याच आहेत म्हणून !
यामागची कारणे अशी होती कि गडाखालची खानाची फौज फार मोठी होती आणि त्या
फौजेपासून मराठी राज्याला मोठा धोका होता.
राजे जिंकोत वा खान - या फौजेला आवरणे स्वराज्याच्या दृष्टीने फार फार महत्वाचे
होते. खानाला मारूनही जर ती फौज पराभूत होत नाही तोपर्यंत त्या विजयाला काही अर्थ
नव्हता. आणि जर राजांचे काही बरेवाईट झाले असते तरी मावळ्यांचा धीर खचून ते पराभूत
झाले असते- आणि मग स्वराज्यातील जनतेचे त्या अफाट फौजेने जे काही हाल केले असते
त्याची कल्पना करवत नाही ! स्वराज्याचे अस्तित्वच संपण्याचीही शक्यता होती ! नेमके
हेच टाळण्यासाठी, गडाखालच्या मावळ्यांचा धीर खचू नये, उलत ते जोशात यावेत म्हणून
महाराजांनी अशी दुहेरी सूचना देऊन ठेवली होती. म्हणजेच कितीही वाईट प्रसंग आला तरी
–आपत्कालची योजना ठरवून ठेवून ती अमलात येइल याची तजवीज करून ठेवली होती ! स्वतःचे
काही बरेवाईट झाले तरीही स्वराज्याचे कमीतकमी नुकसान होईल याची घेतलेली ती काळजी
होती ! केवळ शिवाजी महाराजांनीच ‘हे’ करावे नाही का ?
आता वर्तमानात परत यायला हरकत नाही ! मित्रांनो, हेजींग- हेजींग असे
जे म्हणतात ते दुसरे काही नसून व्यवहारात कमीतकमी नुकसान होण्यासाठीची ती एक योजना
असते. ट्रेडींगच्या बाबतीत आपला एक अंदाज सपशेल चुकला वा बाजारात काही विपरीत घटना
होवून आपला ट्रेडींग प्लॅन “A’ फसला तरीही आपले ‘स्वराज्य’ म्हणजेच भांडवल
राखण्यासाठी केलेली व्यवस्था- प्लॅन ‘B’- म्हणजेच हेजींग होय.
आपण इन्शुरन्स वा विमा पॉलिसी घेतो म्हणजे नेमके काय असते ? एखाद्या
व्यक्तीचे, मालमत्तेचे, वाहनाचे काही अपघात होवून नुकसान झालेच तर त्याची काही
अंशी तरी भरपाई व्हावी असा यामागचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे शेअरबाजारात
ट्रेडींग वा इन्वेस्टमेन्ट करताना अचानक होणारे नुकसान टाळण्यासाठी हेजींग केले
जाते. असे हेजींग हे मुळ गुंतवणूकीचे नुकसान टाळू शकत नाही मात्र दुस-या प्रकारे केलेल्या
गुंतवणूकीद्वारे ते नुकसान भरून काढू शकते. थोडक्यात म्हणजे शेअरबाजारात एका प्रकारच्या
गुंतवणूकीचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी विचारपूर्वक केलेली दुसरी गुंतवणूक
म्हणजे हेजींग होय !
आता जरा यापूर्वी केलेली रिस्क-रिवॉर्ड रेशोची चर्चा आठवा. कोणतीही
इन्वेस्टमेन्ट वा ट्रेड यामध्ये जेवढी फायद्याची शक्यता जास्त तेवढा संभाव्य धोका अधिक
असतो. याउलट धोक्याचे प्रमाण कमी करायला जावे तर फायद्याचे प्रमाणही कमी होत असते.
या तत्वाला अनुसरून, ‘हेजींग’ हे धोक्याचे प्रमाण कमी करत असले तरी फायद्याचे
प्रमाणही यामुळे कमी होत असते यात शंका नाही.
बाजारात शेअर्समध्ये मूळ इन्वेस्टमेन्ट
केली असेल तर साधारणपणे फ्युचर्स वा ऑप्शन्स मध्ये योग्य त्या पोझिशन घेवून अशा मूळ
गुंतवणूकीचे हेजींग म्हणजेच संरक्षण केले जाते. एक उदाहरण घेवूया. टाटा स्टील ही
प्रसिद्ध कंपनी आहे आणि समजा त्यात माझी लॉन्गटर्म इन्वेस्टमेन्ट आहे. माझ्या मते कंपनी
उत्तम असून भविष्यकाळातही ती उत्तम कामगिरी करेल अशा भरवश्याने ही गुंतवणूक मी
काही वर्षांसाठी केली आहे. मात्र अशी गुंतवणूक केल्यावर माझ्या वाचनात येते कि येत्या
२-३ महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात काही कारणाने स्टीलच्या किंमती उतरणार आहेत, किंवा
सरकारची काही धोरणे इ.चा नजिकच्या काळात कंपनीच्या तिमाही निकालांवर प्रतिकूल
परिणाम होणार आहे. येथे माझा मूळ कंपनीवरील भरवसा कमी झालेला नाही, मात्र नजिकच्या
काळात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घट होण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत घाबरून
जावून मी माझे मूळ शेअर्स विकून टाकण्याऐवजी टाटास्टील कंपनीचे पुढील किंवा त्यापुढील
महिन्याचे फ्युचर्स लॉट विकून शॉर्ट पोझिशन घेवून बसू शकतो. येत्या दोन महिन्यात होणारी
शेअरच्या भावातील घट ही माझ्या मुळ गुंतवणूकीत नुकसान दाखवीत असली तरी दोन
महिन्यानंतर खाली घसरलेल्या फ्युचर्सच्या किंमतीमुळे माझी फ्युचर्समधील शॉर्ट
पोझिशन फायदाच दाखवत असते. योग्य त्या वेळेस अशी फ्युचर्स पोझिशन स्क्वेअर अप करून
मी मुळ गुंतवणूकीत झालेले नुकसान काही अंशी तरी भरून काढू शकतो. कालांतराने स्टीलचे
भाव इ. परिस्थिती ताळ्यावर येवून पुन्हा शेअर्सची किंमत वाढू लागते आणि मुळ
गुंतवणूकही वाढ दाखवू लागते. मात्र दरम्यानच्या वाईट काळात माझा वेळ आणि पैसा याचे
संभाव्य नुकसान फ्युचर्सच्या आधारे हेजींग केल्याने टाळता येते.
वरील व्यवहारात काही निगेटीव्ह गोष्टीही आहेत- फ्युचर्स पोझिशनसाठी
लागणारे अधिक भांडवल, अधिक ब्रोकरेज, फ्युचर्समधील पोझिशन स्क्वेअर अप करण्याची
योग्य वेळ साधणे इ. ची पूर्तता मला करावी लागेल.
अशा प्रकारे फ्युचर्सच्या आधारे केले जाणारे हे साधे हेजींग आहे.
बाजारात याशिवाय ऑप्शन्स आणि त्याची कॉम्बिनेशन्स वापरून निरनिराळ्या प्रकारे
हेजींग केले जाते, मात्र त्याची चर्चा ऑप्शन्स या प्रकाराची माहिती घेतल्यानंतरच
करूया. यापुढील पोस्टमध्ये मूळ गुंतवणूकीच्या प्रमाणात हेजींग करताना फ्युचर्स
मध्ये किती मोठी पोझिशन घ्यावी हे बघुया.
संदीप,
सर्व सामान्य छोट्या गुंतवणूकदारासाठी अतिशय उपयुक्त अशी ही लेख मालिका सुरु ठेवल्या बद्दल व शेयर बाजारातील गुंतवणुकी विषयी वेगवेगळ्या पैलूंनी त्याचा शोध घेत असल्या बद्दल व त्याची माहिती देत असल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
पुढील लेखाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत...
Dear Mynacजी,
नेहमीप्रमाणेच आपली अनुकुल प्रतिक्रिया आली आणि बरे वाटले, मात्र काही दोष असला तरी अवश्य दाखवून द्यावा.माझ्या नियमीत वाचकांना तो हक्क आहेच! आभार.