Share/Bookmark

६ ऑक्टो, २०१२

ट्रेडींगमधील रिस्क्स आणि 'रिस्क-रिवॉर्ड रेशो' ..


‘रिस्क-रिवॉर्ड रेशो’ -
रिस्क आणि रिवॉर्ड या दोन शब्दातुन पूरेसा अर्थ निघत आहेच ! तरीही अधिक स्पष्टता येण्यासाठी, गुंतवणूक वा ट्रेडींगच्या संदर्भात असे म्हणता येइल कि एखाद्या गुंतवणूकीतून मिळू शकणारा फायदा आणि तो फायदा मिळवण्यासाठी पत्करलेला धोका- म्हणजेच संभाव्य तोटा- या दोघांचे गुणोत्तर म्हणजे रिस्क-रिवॉर्ड रेशो ! हा रेशो मिळवण्यासाठी सदर गुंतवणूकीतील वा ट्रेडमधील संभाव्य फायद्याला संभाव्य तोट्याने भाग दिला जातो.      म्हणजेच रिस्क / रिवॉर्ड हा रेशो.
उदा. समजा आपण एखाद्या कंपनीचे १०० शेअर्स प्रत्येकी २०० रु.ला खरेदी केले आहेत आणि होणारे नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी १७५ रु.चा स्टॉपलॉस लावला आहे. याचाच अर्थ या व्यवहारात होणारा संभाव्य तोटा हा २५००रु. पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घेतली आहे. या शेअर्सची किंमत काही काळानंतर २५०रु. होइल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच या व्यवहारातून होवू शकणारा एकूण फायदा हा ५,०००रु. इतका आहे.
आता संभाव्य फायदा/संभाव्य तोटा = ५०००/२५००= २/१ म्हणजेच रिस्क रिवॉर्ड रेशो. म्हणजेच वरील ट्रेडच्या बाबतीत रिस्क/रिवॉर्ड रेशो हा २:१ असा आहे. अर्थात प्रत्येक ट्रेडसाठी एकच रेशो योग्य ठरेल असे नसून त्या त्या संदर्भात असा रेशो निरीक्षणाने ठरवावा लागतो.
एका ट्रेडच्या बाबतीतले हे उदाहरण (सिंगल ट्रेड रिस्क मॅनेजमेंट) असले तरी आपला संपूर्ण पोर्टफोलिओ अशा प्रकारे ‘रिस्क-रिवॉर्ड’ चा विचार करून नियंत्रीत करणे गरजेचे आहे. आपल्या पोर्टफोलिओ मध्ये विविध सेक्टर मधले (Divesified) उत्तम शेअर्स, म्युचुअल फंड्स तसेच कमॉडिटी (सोने इ.) चा समावेश असावा आणि त्यातील प्रत्येक घटकाला स्टॉपलॉस अशा रितीने लावावा कि पूर्ण पोर्टफोलिओचे २०% पेक्षा नुकसान कधीही होता कामा नये.
इन्ट्राडे ट्रेडच्या बाबतीत हा रेशो २.५:१ किंवा ३:१ असा असला तर अधिक चांगले. मात्र रेशो जेवढा मोठा म्हणजेच संभाव्य फायदा अथवा टारगेट जेवढे मोठे, तेवढीच आपण वापरत असलेली ट्रेडींग स्ट्रॅटेजी अधिक विश्वासार्ह असायला हवी ! तसे नसेल तर हा रेशो कमी म्हणजे २:१ इतकाच ठेवावा लागेल. यापेक्षा कमी रेशोने ट्रेडींग करणे मात्र  निरर्थक ठरते.   
शॉर्टटर्म वा इन्ट्राडे ट्रेडच्या बाबतीत जसा स्टॉपलॉस (वा ट्रेलींगस्टॉपलॉस) महत्वाचा तसेच एकदा ट्रेड सुरू केल्यावर आपले नेमके प्राईस टारगेट हे आपल्याला नीट माहीत असायला हवे (Exit Strategy) आणि तेथे सेलिंग ऑर्डर लावून ठेवणे वा सतत लक्ष ठेवून टारगेट गाठताच पोझिशन पटकन स्क्वेअरअप करणे ही गोष्टही एक चांगला ट्रेडर बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
लॉन्गटर्म इन्वेस्टमेंटच्या बाबतीतला एक सर्वसाधारण पण चूकीचा समज आहे कि ‘येथे स्टॉपलॉस, रिस्क मॅनेजमेंट वा ट्रेडींग प्लॅनची गरज नाही.’ लक्षात ठेवा- कुठलाही शेअर फक्त ५ वा १० वर्षे होल्ड करून ठेवणे म्हणजे भरघोस फायद्याची हमी नसते ! येथेही रिस्क मॅनेजमेंट करावीच लागते आणि पडत्या शेअरमधून अंग काढून घेऊन जरूर तर ‘स्विच-ओव्हर’ करणेही गरजेचे असते !
 स्विच-ओव्हर म्हणजे एखाद्या शेअरमधील गुंतवणूक काढून घेवून दुस-या फायदेशीर ठरणा-या शेअर्समध्ये ती रक्कम गुंतवणे होय ! असे करणे ब-याच जणांना कठीण जाते, कारण जास्त किंमतीला खरेदी केलेला एखादा ‘लाडका’ शेअर कमी किंमतीला विकणे म्हणजे आपणच आपले नुकसान करून घेणे असे त्यांना वाटत असते. पण नीट विचार करा- अशा पडत्या शेअरच्या बाबतीत (उदा. गेली काही वर्षे टेलीकॉम, स्टील तसेच शुगर सेक्टरमधील शेअर्सच्या किंमतीत वाईट बातम्या इ. मुळे झालेली घसरण) आपले नुकसान आपण विक्री केली नाही तरी अगोदरच झालेले असते- आपण कमी किंमतीला ते शेअर विकल्यामुळे नव्याने होणार नसते ! आणि ‘लाडका’ शेअर वगैरे कल्पनांपासून दूर रहा - बाजारात ट्रेड करताना ‘भावनिक’ निर्णय कधीच घ्यायचे नसतात. आपले घर जसे आपण नियमीतपणे स्वच्छ ठेवतो त्याच प्रमाणे मधूनमधून आपल्या पोर्टफोलिओ मधील कचरा साफ करणेही निकडीचे आहे. याउलट असे पडते शेअर विकून आलेल्या रकमेतून चांगल्या शेअरची खरेदी करणे म्हणजे आपल्या अडकलेल्या पैशाला नव्याने वाढीची संधी देणे आहे - पूनर्जन्म देणे आहे ! यात नुकसान असेलच तर ते फक्त ब्रोकरेजचे ! अर्थात नवा शेअर घेताना योग्य निवड करणे गरजेचे आहे. तेही कुणाला पुन्हा धोक्याचे वाटत असेल तर मध्यम मार्ग म्हणजे असे वाईट वा नुकसानीतील शेअर्स विकून बचावात्मक (Defencive) समजल्या जाणा-या फार्मा. वा FMCG सेक्टर मधील शेअर्सची वा सरळ निफ्टीबीजची (ETF) खरेदी करणे !
‘ओव्हरनाईट रिस्क’ –
 अनेकदा असे होते कि बाजार बंद झाल्यावर उशीरा एखादी वाईट बातमी येते वा परदेशी बाजार जोरात घसरतात आणि साहजिकच दुस-या दिवशी गॅप-डाऊन ओपनिंग होते. आपल्या सर्वच शेअर्सची किंमत अचानकरित्या ‘एका रात्रीत’ कमी झालेली दिसते. अशा वेळेला आपण काहीच करू शकत नाही का? येथेच ‘हेजींग’ ची सर्वाधिक गरज असते. साधारणपणे ‘हेजींग’ हे फ्युचर्स वा ऑप्शन्सचा वापर करून केले जाते. शेअर्स वा फ्युचर्समध्ये मोठ्या पोझिशनची डिलीव्हरी घेणा-यांनी अशा ओव्हरनाईट रिस्क पासून आपला बचाव करण्यासाठी ‘हेजींग’ची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
 फ्युचर्सची माहिती आपण घेतली आहेच ! ऑप्शन्स आणि हेजींग याविषयीही आपण येथे चर्चा करणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एका वेगळ्या आणि फारशा प्रसिद्ध नसलेल्या ट्रेडींग स्ट्रॅटेजीविषयी पुढील पोस्टमध्ये मला लिहायचेय- ती स्ट्रेटेजी आहे – ‘Arjun’s Rule’ ! लवकरच भेटूया !