Share/Bookmark

२१ ऑक्टो, २०१२

Guest Article -शेअर बाजारांतील तोट्याचे व्यवस्थापन-

  मित्रहो, या ब्लॉगवर सुरु असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने आलेली एक मौलिक प्रतिक्रिया एक 'गेस्ट आर्टिकल' म्हणून येथे सर्वांसाठी देत आहे- 
                    *****************************************
  'शेअर बाजारांतील तोट्याचे व्यवस्थापन-'

शेअरबाजार आणि धोका या दोन शब्दांचे नाते सत्यनारायण आणि महापुजा या शब्दांइतकेच जवळचे आहे. यातुनच 'रिस्क मॅनेजमेन्ट’ म्हणजेच अशा धोक्यामुळॆ उद्भवणाया नुकसानाचे नियोजन ही कल्पना उदयास आली. स्टॉपलॉस, ऍव्हरेजींग या पारंपारिक पद्धतींबरोबरच अलिकडॆ ’डेरिव्हेटिव्ज’ ची सुरवांत झाल्यानंतर ऑप्शन्स वा हेजिंग ह्या पद्धतींचाही बोलाबाला आहे. आपण या सर्वच पर्यायांचा विचार करणार आहोत पण सुरवात 'हेजिंग' पासुन करताना माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एक गोष्ट सांगतो. 

बिरबलाच्या असंख्य गोष्टींपैकीच एक गोष्ट अशी की एकेदिवशी अकबर बादशहाच्या राज्यातील दोन  अतिउत्कृष्ट बुद्बळपटु एकमेकांशी अटीतटीचा डाव खेळतांना बिरबलाच्या कोण्या हि्तशत्रुने पाहिले. आणि --- बिरबलाचे नाक खाली करण्याचा नवा मार्गच जणु मिळाला, या आनंदात त्याने दोघांनाही ’चला रे बाबांनो, इथे खेळण्यापेक्षा मी तुम्हाला मोठे इनाम मिळवुन देतो खाविंदांकडुन, आपण भर दरबारांत बिरबलाला तुमच्याविरुध्द बुद्बळांत विजय मिळविण्याचे आव्हान देऊया --- “ असे सांगुन दरबारात हजर केले. आणि बादशहासमोरच  "--- तुमच्या प्रिय बिरबलाने यातील कोणत्याही एका खेळाडुविरुद्ध तरी जिंकुन दाखवावे, अन्यथा बुद्धीची मिजास मारणे बंद करावे "  असे  खुले आव्हान दिले.  बुद्बळाच्या खेळांत फारशी गती नसल्याने ह्या अनपेक्षीत हल्याने गांगरलेला बिरबल  क्षणभरातच सावरला आणि म्हणाला  'जहांपन्हा, एवढ्या तेवढ्या गोष्टीवरुन या प्रामाणिक सेवकाची परीक्षा पहाणे काही ठीक नाही, पण जर आपण आज्ञा द्याल तर यातल्या एकाच नव्हे तर दोघाही खेळाडुंबरोबर एकाच वेळी खेळीन म्हणतो मी. उशीर कशाला? लगेचच  होवुन जाउन दे दुध का दुध ----"

झाले, बिरबलाच्या ह्या तड्फदार उत्तराने आनंदित होवुन बादशहाने लगेचच शेजारच्या दोन महालांत दोन पटांची व्यवस्था केली व दोन्ही डाव रंगु लागले. बादशहासह तमाम दरबारी उत्कंठेने काय होणार हे पहात होते. जसा जसा वेळ जाउ लागला तसे  बादशहाच्या उत्कंठेचे रुपांतर चिंतेत होवु लागले. बिरबल मात्र शांतपणे एका महालातुन दुसरीकडे ’खेळी’ करण्यास जात येत होता. शेवटी ब-याच खटाटोपानंतर बिरबलाचा एक प्रतिस्पर्धी धामाघुम होवुन बाहेर आला व त्याचा पराभव झल्याचे त्याने मान्य केले.--- सर्व दरबारी आणि स्वत: बादशहाने दरबाराची अब्रु वाचली या आनंदात बिरबलाचा जयजयकार केला, तिकडे दुसरा खेळाडु बिरबलाचा हमखास पराभव करण्याच्या स्थितीत होता पण उपयोग नव्ह्ता कारण किमान एक डांव जिंकण्याची पैज बिरबलाने जिंकली होती.
बिरबलाने काय केले असावे हे तुम्ही एव्हाना ओळखलेच असेल, मी त्याची पुनरुक्ती नाही करणार, पण मी एवढेच सांगेन की हे एकप्रकारचे 'हेजिंग' होय, किंबहुना 'हेजिंग' ही संकल्पना समजावायला या सारखे समर्पक उदाहरण नाही.

बाजारासंदर्भात असलेल्या स्टॉपलॉसपिव्होट (pivot) काय किंवा हे ’हेजिंग’ काय, सर्वच संज्ञा विशिष्ट व्याख्येत वा गणिती सुत्रांत बाधण्यापेक्षा त्यांचे स्पष्टीकरण करणे सोपे जाते. त्या दृष्टीने शेअर बाजाराच्या वर आणि खाली जाण्याचा म्हणजेच तेजी व मंदी अशा दोन्ही शक्यता पुरेपुर गृहित धरुन आखलेली गुंतवणुक योजना म्हणजे ’हेजिंग. वरील गोष्टींत बिरबलाने अवलंबलेला ’झीरो-रिस्क गेमप्लान’ म्हणजे 'हेजिंग’, आपणास अपेक्षीत दिशेऐवजी बाजार अनेकदा बरोब्बर विरुद्ध दिशेस जावु लागतो अशावेळी अशा विरुद्ध दिशेसही आपल्या पोटापाण्याची केलेली सोय म्हणजे 'हेजिंग’, निवडणुकींत घरांतील दोन कर्त्या भावांपैकी एकाने UPA चे आणि दुसयाने  NDA प्रणित उमेदवाराचे काम करणे म्हणजे ढोबळमानाने ’हेजिंग’ असे ठरविता येइल.

अधिक तपशीलांत विचार करावयाचा झाल्यास 'हेजिंग’ ही कल्पनाच मुळांत संभाव्य नुकसानाची तीव्रता कमी करणे या गरजेतुन आली असल्याने यांत घेतल्या जाणाया जोखमीचे स्वरुप तेच आणि दिशा परस्पर विरोधी असणे हे अत्यंत आवश्यक गृहित आहे. अन्यथा संभाव्य नुकसानाची मर्यादा निश्चित होणे राहीले दुरच, आगीतुन फुफाट्यांत अशीच स्थिती व्हायची. ’हेजिंग’ ही स्ट्रॅटेजी काहीशी झापडबंद आहे, तेथे उपलब्ध पर्याय फारसे नाहीत.  प्लान A नाही जमला तर मग प्लान B,---- केवळ असा तर्क पुरेसा नाही तर अगदी गणिती भाषेंत बोलायचे झाल्यास (प्लान B) हा जवळपास (प्लान -A) हवा., म्हणजेच कितीही विचार्पुरवक केली असली तरी शेअर्स व सोने यांची सारख्या रकमेची, एकाचवेळी व अगदी परस्पर विरोधी दिशेने केलेली गुंतवणुकही शुदध स्वरूपातील 'हेजिंग’ म्हणुन ओळखले जाणार नाही.

आता प्रत्यक्ष उदाहरणाकडे येतो, समजा एखाद्या  गुंतवणुकदाराने आज (दि, 19 फ़ेब्रुवारी) रोजी  रिलायन्सचे प्रत्येकी 800 रु. प्रमाणॆ 500 असे एकुण रु. 4 लाखाचे शेअर्स बाजारांतुन डिलिव्हरी स्वरुपांत खरेदी केले (दि, 19 फ़ेब्रुवारीचा NSE वरचा बंद भाव रु.800.70) आता त्याच्या ह्या गुंतवणुकीचे संरक्षण 'हेजिंग’ हे शस्त्र वापरुन कसे करावयाचे ???  पाहुया.

पर्याय क्र. 01-  रिलायन्सचेच  फ्युचर्स रु.800 किंमतीस विकायचे. (01 लॊट 500चा, दि, 19 फ़ेब्रुवारीचा NSE वरचा बंद भाव रु.802.00)  स्पोट आणि फ्युचर्स यांच्या किंमतीतील फरक असाच राहील असे मानले व ब्रोकरेज आणि अन्य खर्च नाहीत असे गॄहित धरले तर आता तांत्रिकदृष्ट्या हे अगदी ’परफेक्ट हेजींग’ झाले. अगदी वरील गोष्टींत बिरबलने केलेल्या ’झीरो सम’ गेमसारखे. पण खरे म्हणजे हा डोंगर पोखरुन उंदीर काढणे असा प्रकार होईल. कारण हे असे हेजींग’ या गुंतवणुकदाराचे शेअर्मधील संभाव्य घसरणीमुळॆ होणाया नुकसानापासुन रक्षण करेल एवढेच, मात्र त्याचवेळी हया गुंतवणुकदाराच्या पदरांत शेअरच्या भाववाढीपासुन होणारा कोणताही नफा पडणार नाही (कारण कमी किंमतीने विकलेले फ्युचर्स तेवढ्याच रकमेच्या तोट्यांत जातील) हे ही निश्चित. आणि कोणताही नफा होणारच नाही अशी ’खात्री’ असलेला उद्योग कोण करेल ?? त्यापेक्षा पैसे एफ.डी त ठेवलेले सुध्धा जास्त फायदेशीर नाही का??  खरे म्हणजे ह्या अशा प्रकारच्या व्यवहाराना हेजिंग पेक्षाही ’आर्बिट्रेज’ असे म्हणतात.

पर्याय क्र. 02 – रिलायन्स हा निफ्टी या निर्देशांकाचा  मोठा घटक असल्याने रिलायन्स ऐवजी निफ़्टीचे साधारण तेवढ्याच मुल्याचे फ्युचर्स विकायचे. आता या दोन्ही घटकांची हालचाल समान प्रमाणांत झाली तर ठीक, मात्र निफ्टी काही कारणाने वाढ्ला आणि दुर्दैवाने रिलायन्स त्या प्रमाणांत वाढ्ला नाही तर मात्र आगीतुन सुटुन ---असे वर म्हटल्याप्रमाणे होवुन गुंतवणुकदाराला नुकसानाचा दुहेरी फटका बसेल. अर्थातच नशीब जोरावर असुन रिलायन्स अधिक वेगाने वाढ्ल्यास फायदाही दुणावेल. म्हणजेच येथे जर-तर चा खेळ असल्याने थोडी का  होइना अनिश्चितता असेलच.
जगांतील अनेक नामांकित फंड मॅनेजर्स एखाद्या निर्देशांकातील शेअर्सचे ’वेगवान’ (आउट्परर्फ़ोर्मर्स) व मंद (अंडररर्फ़ोर्मर्स) अशी विभागणी करुन त्याप्रमाणॆ त्यांत तेजी/मंदी करुन तो निर्देशांक ’हे्ज’ करतात. या पद्ध्तीला लॉन्ग/शॉर्ट स्ट्रॅटेजी असा पारिभाषिक शब्द आहे. परिणाम अशा विभागणीच्या यशावर, अर्थातच संमिश्र आहेत.

पर्याय क्र. 03 - येथे गुंतवणुकदार रिलायन्सचा 780 स्ट्राइक प्राइजचा एक कॉल विकेल. (दि, 19 फ़ेब्रुवारीचा NSE वरचा बंद भाव रु.25.00) आता वायदापुर्तीच्या दिवशी समजा रिलायन्स रु. 875.70 (अलिकडील सर्वोच्च बंद भाव) ला बंद झाला तर गुंतवणुकदाराचा प्रत्येक शेअरगणिक रु. 25 असा एकुण रु. 12,500 एवढा नक्त फायदा होइल जो हेजिंगचे ’लोढ्णे’ गळ्यांत नसते तर शेअरगणिक रु. 75.70 असा एकुण रु. 37,850 एवढा असता.  या उलट दुसया शक्यतेनुसार शेअर रु. 763.05 (अलिकडील निम्नतम बंद भाव) ला बंद झाल्यास शेअरच्या किंमतीतली घट रु. 36.95 (800-763.05) –  कॉल विकुन मिळालेला प्रिमियम (र, 25) असा शेअरमागे 11.95 प्रमाणे एकुण रु. 5,975 एवढा तोटा होइल. लक्षांत धेण्यासारखी गोष्ट ही की येथे  गळ्यांतील ’लोढ्ण्याचे’ रुपांतर डोक्यावरच्या ’शिरस्त्राणांत’ झाले असुन गुंतवणुकदाराने हेजिंगचा अवलंब केला नसता तर हा तोटा रु. 18,475 एवढा वाढला असता.

या व अशा आणखीही पर्यायांचा विचार करता ’हेजिंग’ करावयाचे झाल्यास फ्युचर्सच्या तुलनेत ऑप्शनचा वापर मला अधिक व्यवहार्य, खरे म्हणजे अनिवार्य वाटतो.

शेवटी सांगावयाचे हे की ’हेजिंग’ हे नुकसान कमी करण्याचे साधन आहे. अर्थातच ते याच प्रमाणात नफाही कमी करते (पहा पर्याय क्र. 01 व 03 ) बिरबलाच्या गोष्टीचाच आधार घ्यायचा तर या तंत्राचा वापर करुन तो एक विजय मिळवु शकला जे त्याला पुरेसे होते पण ही ’आयडियाची कल्पना’ त्याला कधीही निर्भेळ यश देउ शकणार नव्हती हे लक्षांत घेणे महत्वाचे ठरेल.

’हेजिंग’ आपले नुकसान कमी नक्कीच करु शकेल पण नुकसान होणारच नाही या भ्रमांत रहाणे चुकीचे ठरेल. 'हेज' या क्रियापदाच्या अर्थाप्रमाणे ते एक किरकोळ कुंपण आहे, अभेद्य तट्बंदी नाही. सुरवातीच्या उदाहरणाकडे जायचे तर दोन्ही महत्वाच्या पक्षांना खुश ठेवल्यानंतरही कोणीतरी तिसराच अपक्ष निवड्णुक जिंकु शकतोच ना ?

’हेजिंग’ म्हणजे 10 ही बोटे तुपांत --- असा गैरसमज असतो पण विचार करा की ती खरोखर तशी सदैव असतीलच तर आपल्याला बोटाने तुप चाखायला कसे मिळेल? तेंव्हा ’हेजिंग’ आवश्यक  नक्कीच आहे पण ते काही ‘लाख दुखों की एक दवा‘ किंवा बाजारांत यश मिळविण्याची ’गुरुकिल्ली’ मात्र नक्कीच नाही. ही नीती फक्त योग्य प्रमाणातच वापरावी कारण ही प्रणाली राबविण्यासाठीही किंमत मोजावी लागते शिवाय कागदावर सारेच सोपे वाटले तरी प्रत्यक्षांत व्यावहारिक अडचणीही असु शकतात येथे आवर्जुन नमुद करावेसे वाटते.

बाजरांत म्युचुअल फंड्सच्या सर्वस्वी ह्याच (आर्बिट्रेज) तंत्राचा वापर करणाया योजनाही आहेत पण त्यातील कोणतीही योजना गुंतवणुकदारांना दीर्घकालीन भरीव परतावा देउ शकण्यात यशस्वी झालेली नाही ही गोष्ट आपल्याला या तंत्रावर अधिक विसंबुन रहाता येणार नाही हे दर्शविण्यास पुरेशी आहे.

घराच्या बाहेर आणि घरांत कोठेही, कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने,  कोणा मानवाकडुनही आणि पशूकडुनही, दिवसा वा रात्रीपैकी कधीही मृत्यु येणार नाही असा ’फुलप्रुफ’ वर मिळवुन मृत्युवर सकृतदर्शनी विजय मिळविलेला राजा हिरण्यकश्यपूही मारला गेला ही गोष्ट आपणास दुसरे काही नसेल तरी किमान गाफिल राहु नका अशी शिकवण देते.

धोका वा नुकसान नियंत्रणाची अशी साधने बाजारात खात्रीने उपलब्ध आहेत आणि ती वापरणेही अत्यंत आवश्यक आहे मात्र असे असले तरीही शेअरबाजारांत ’कधीही गाफील राहु नका’ ह्या शिकवणीचे महत्व अनमोल आहे हे आपणसारख्या सुज्ञांस सांगावयास हवे का?? असो. बाकीच्या एव्हरेजिंग सारख्या पर्यायांबद्दल पुन्हा केव्हातरी----.

- श्री.प्रसाद भागवत (prasadbhagwat@vsnl.net)



1 comments:

  • अनामित says:
    १५ डिसेंबर, २०१२

    Heya i'm for the first time here. I found this board and I find It really useful & it helped me out a lot. I hope to give something back and help others like you aided me.
    Also visit my webpage : about iscsi