Share/Bookmark

१८ सप्टें, २०१२

ट्रेडींगपूर्वी रिस्क मॅनेजमेन्ट कसे करावे ?


माझ्या एका CA मित्राने त्याच्या व्यवसायातील एक किस्सा नुकताच मला सांगितला. माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये एक उच्चशिक्षीत अधिकारी गृहस्थ कामानिमित्ताने आले होते. त्यांच्याशी बोलताना मध्येच जरूरी वाटले म्हणून माझ्या मित्राने त्याच्या असिस्टंटला फोनवरून काही शॉर्ट पोझिशन्स पटकन कव्हर करण्यास सांगितले- “ अमुक शेअर्स घेवून टाक पटकन...” असे काहीसे ते वाक्य होते. त्यानंतर त्या गृहस्थांचे बोलणे झाले व ते निघून गेले. मात्र काही दिवसांनी ते परत आले ते तक्रार घेवूनच- कि तुम्ही सुचविलेल्या शेअर्समध्ये मी मोठी रक्कम गुंतवली पण त्यात फार मोठा तोटा झाला म्ह्णून....!! 
आता बोला. एका उच्चशिक्षीत अधिकारपदावर असलेल्याची ही कथा, तर....? फक्त फोनवरचे बोलणे ऐकून, काही पार्श्वभूमी न जाणून घेता, न विचारता परस्पर गुंतवणूकीचा निर्णय त्या गृहस्थांनी घेतला होता आणि वर तक्रारीचा सूर ? हा किस्सा ऐकला त्याच क्षणी मी आजची ही ब्लॉगपोस्ट लिहिण्याचा निर्णय घेतला !
गेल्या काही पोस्ट्स मधून मी इन्ट्राडे ट्रेडींगविषयी लिहितोय खरा, पण इन्ट्राडेच करा अथवा तशा अर्थाचा कुठलाही आग्रह मी केलेला नाही. याउलट आधी पेपर ट्रेडींग करा, छोट्या रकमेचे सौदे करा आणि स्टॉपलॉसचा वापर आवर्जून करा असे मी पुन्हा पुन्हा सांगत असतो हे माझ्या नियमीत वाचकांना माहीत असेलच. जगभरातले ट्रेडर्स काय करतात, कशा पद्धतीने विचार करतात याचा परामर्श घेत टेक्निकल्स, निफ्टी फ्युचर्स, इन्ट्राडे ट्रेडींग,शॉर्टटर्म ट्रेडींग, हेजींग, ऑप्शन्स असे पायरीपायरीने शिकत (जसा मी शिकलो व अजूनही शिकतोय) वाचकांसोबत मी पुढे जाणार आहे. यानिमित्ताने वाचकही विचारप्रवृत्त होतील, त्यांची एक स्वतःची अशी स्ट्रॅटेजी बनेल, शेअरबाजार हा पोरखेळ नसला तरी तो मृत्युगोलही नाही हे त्यांना पटेल, तो एक पद्धतशीरपणे करण्याचा (उप)व्यवसाय आहे या मतापर्यंत ते येतील असे मला वाटते. मात्र वरील किस्सा ऐकल्यावर आधी ट्रेडींगमधील “मनी मॅनेजमेन्ट” आणि “रिस्क रिवॉर्ड रेशो” अशा  विषयांना स्पर्श करून मगच पुढे जायचे असे ठरवले आहे.
ट्रेडींगच्या संदर्भात मनी मॅनेजमेन्ट म्हणजे मुख्यत्वे रिस्क मॅनेजमेन्ट होय. प्रत्येक ट्रेडमध्ये किती फायदा होवू शकेल यापेक्षा किती नुकसान होवू शकेल याचा अंदाज घेणे आणि आपल्या भांडवलाच्या तुलनेत त्याला कसे मर्यादित ठेवायचे हे प्रत्येक ट्रेडरने ठरवणे आवश्यक आहे.
एकाच ट्रेडमध्ये मोठे नुकसान करून घेवून बाजाराला रामराम ठोकणा-या ट्रेडरपेक्षा अनेक ट्रेडमध्ये किंचित नुकसान घेणारा ट्रेडर बाजारात अधिक काळ टिकून राहू शकतो. मोठ्या फायद्याची संधी त्यालाच मिळत असते. साधारणपणे डे-ट्रेडच्या बाबतीत जास्तीत जास्त १% ते २% नुकसान ही मर्यादा पाळण्याची पद्धत आहे. एक उदाहरण बघुया.
समजा माझ्याकडे एक लाख एवढे भांडवल आहे. समजा एका १०० रु. किंमतीच्या शेअरमध्ये मी ट्रेड करण्याचे
ठरवले. उपलब्ध भांडवलात मी एकूण १००० शेअर्सचे ट्रेडींग किंवा प्रत्येकी १०० शेअर्सचा एक ट्रेड याप्रमाणे मी १० ट्रेड करू शकतो. ( येथे मार्जिनवर ट्रेडींगचा विचार त्यातील धोक्यामुळे मुद्दामच केलेला नाही )
१% नुकसानाच्या नियमाप्रमाणे मी प्रत्येक ट्रेडसाठी ९९ रु.चा स्टॉपलॉस लावला. तर काय होइल ? हा छोटासा स्टॉपलॉस बरेचदा हिट  होइल आणि माझे जवळ जवळ सगळेच ट्रेड नुकसान दाखवतील. मग मी काय करायला हवे ?
मग मी १% ऐवजी २%चा म्हणजेच (९८ रु.ला) स्टॉपलॉस लावण्याचे ठरवले, पण माझी एकूण नुकसान झेलण्याची क्षमता १% एवढीच ठेवून हे कसे साध्य केले ? यावेळी हिशेब थोडा वेगळ्या पद्धतीने केला.-  
माझ्या १ लाख भांडवलाच्या १% नुकसान क्षमता म्हणजे १००० रु. जास्तीतजास्त नुकसान होय. म्हणून प्रत्येक शेअरमागील २ रु. नुकसानाची मर्यादा लक्षांत घेऊन मी किती शेअर्सचे ट्रेड करु शकतो ते ठरवण्यासाठी १०००/२ = ५०० असा हिशेब केला. म्हणजे माझ्याजवळ १लाख रु. भांडवल असताना आणि २% स्टॉपलॉससह मी जास्तीत जास्त ५०० शेअर्स चे ट्रेड करावे, त्यापेक्षा जास्त नाही. अशा पद्धतीने विचार केल्यास माझे नुकसान मर्यादित राखूनही स्टॉपलॉस हिट होण्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी होइल. परिणामी मी बाजारात अधिक काळ टिकून राहू शकेन. या उदाहरणात ब्रोकरेजचा विचार केलेला नाही. प्रत्यक्ष ट्रेड करताना ब्रोकरेज विचारात घेवूनच स्टॉपलॉसचे पर्सेन्टेज ठरवावे. वरील उदाहरणात समजा प्रतिट्रेड फिक्स २५ रु.एवढे ब्रोकरेज असेल तर १०० शेअर्सच्या एका ट्रेडसाठी स्टॉपलॉस हा ९८.२५ येथे लावावा लागेल. ब्रोकरनुसार जे पर्सेन्टेज असेल त्याचा विचार करून प्रतिशेअर ब्रोकरेज काढावे.
 हे उदाहरण डे-ट्रेडींगच्या संदर्भातले आहे. शोर्टटर्म ट्रेडींगसाठी स्टॉपलॉस हा साहजिकच थोडा मोठा असणार आहे आणि फायद्याचे प्रमाणही अधिक असणार आहे. शिवाय शोर्टटर्म ट्रेडींगसाठीचा स्टॉपलॉस हा नेहमीच पर्सेन्टेजमध्ये ठरवला जात नाही तर अन्य निरनिराळ्या पद्धतीने कसा लावला जातो हे बघण्यासाठी येथे क्लिक करा.
 फायद्याचे प्रमाण आणि स्टॉपलॉसचा आकार यांचा एकमेकाशी संबंध असतो. त्यालाच “रिस्क रिवॉर्ड रेशो” असे म्हणतात.
वरील उदाहरणात आपण १% किंवा २% असा स्टॉपलॉस लावलेला बघितला. त्याप्रमाणे प्रत्येकी १०० शेअर्सचे ५ ट्रेड केले असता त्यातील किती ट्रेड फायद्यात जातील आणि तो फायदा किती असला तर स्टॉपलॉस हिट झालेल्या ट्रेडमधील तोटा भरून निघून अखेरीला काही फायदा शिल्लक राहील? या बाबींचा अभ्यास म्हणजेच “रिस्क रिवॉर्ड रेशो” होय. त्याविषयी पुढील पोस्टमध्ये !