Share/Bookmark

१२ एप्रि, २००९

आजच्या युगात महागाईला तोंड देणे सामान्य नोकरदार वर्गाला अधिकाधिक कठीण होत आहे.ज्या वेगाने महागाई वाढते आहे त्या वेगाने पगार वाढणे शक्य नसते. स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी भांडवलाव्यतिरिक्त जी अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात - यात त्या व्यवसायाविषयीच्या तांत्रिक माहितीबरोबरच मार्केटींगचे तंत्र व विविध सरकारी खात्यांचे परवाने तसेच करविषयक माहिती, आजच्या काळाला अनुसरून इंग्रजीवरील प्रभुत्व एवढेच नव्हे तर चक्क पटवापटवी करण्याच्या कौशल्याचाही समावेश करावा लागेल -प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अनेक विषयांतील पारंगतता कशी बरे असेल? आपल्या मराठी लोकांमध्ये तर गुजराती लोकांच्या तुलनेत व्यवसायाला पुरक असे गुण अजुनही कमी आहेत. अशा परिस्थितीत एखाद्याने प्रयत्न केलाच तरी कुठल्याही व्यवसायात यशाची १००% हमी देता येईल का? मात्र अपयश आले तर आपली होती नव्हती ती सर्वच कमाई घालवून बसणे कोणाला परवडेल?
या सर्व गोष्टींचा विचार करून मराठी माणूस धंद्यात शक्यतो पडत नाही आणि छोटी मोठी नोकरी करत रहातो. वाढत्या महागाईमुळे तो अप्रत्यक्षरित्या हळूहळू पण निश्चितपणे गरीब होत जातो. मग त्याला कधीतरी कोणीतरी शेअरबाजाराची दिशा दाखवतो. त्या अमक्याचे पाच हजाराचे महिन्याभरात वीस हजार झाले,त्या तमक्याने शेअरबाजारातील कमाईवर नवीकोरी कार घेतली वगैरे अविश्वसनीय पण तितक्याच रम्य गोष्टी ऐकून तो हरखतो.हो नाही करता करता आपणही थोडे नशीब अजमावायला काय हरकत आहे असा विचार करून तो दबकतच काही रक्कम गुंतवतो.एखादा अनुभवी म्हणवणारा दोस्त त्याला खास आतल्या गोटातली " टीप" म्हणून पाच-पंचवीस रुपये किंमतीच्या एखाद्या नवीन कंपनीच्या शेअरचे नाव सुचवतो. त्याच खास सोर्सकडून आलेली आधीची टीप ही "गोल्डन टीप" ठरलेली असते आणि त्यावर अनेकांनी अल्पकाळात बदाबदा पैसा कमावलेला असतो वगैरे!
आणि मग व्हायचे तेच होते. आपला हा मराठी मित्र कळत नकळत तो छोटा शेअर खरेदी करतो आणि नेमका त्याच दिवशी बाजार कोलमडतो.’आज बाजारात "सेन्टीमेंट"च निगेटीव्ह होते, आता उद्या बाजार सावरला ना कि बघ आपला शेअर कसा दणादण ऊड्या मारतो ते-’ दोस्ताचे बोलणे सुरूच असते. तसा हा दोस्त चांगला असतो आणि त्याने स्वत:ही तो शेअर घेतलेला असतोच की! अशी आपल्या मनाची समजूत घालत तो दुसर्या दिवसाची आतुरतेने वाट पहातो.
दुसर्या दिवशी काही कारणाने परदेशी बाजार पडतात म्हणुन आपला बाजार पडलेला असतो.असे करता करता आठवडाभर बाजार पडतच रहातो आणि आपल्या शेअरची किंमत पंचवीस रुपयावरून सतरा रुपयावर आलेली असते.आपला मित्र निराश झालेला असतो, त्याला आपले कुठेतरी चुकल्याची जाणिव नक्कीच झालेली असते पण एवढ्या कमी किमतीत शेअर विकून तरी काय मिळणाराय असा विचार करून तो आणखी काही दिवस वाट बघायचे ठरवतो आणि मग चक्क बाजार पुन्हा वर येऊ लागतो, सेन्से़क्स पुन्हा उंच उंच झेपावू लागतो -पण कसचे काय - आपला शेअर वर येणे तर दूरच उलट आणखीच रोडावतो.शेवटी निराश मनाने आपल्या नशिबाला बोल लावत आपला हा मरा्ठी माणुस पंचवीस रुपयाला घेतलेला शेअर अकरा रुपये पन्नास पैशाला विकतो आणि आलेल्या अकरा हजाराचे एन.एस.सी.काढतो.मला सांगा वाईट वाटते ना हे वाचून?
पण खरी दर्दभरी घटना तर पुढेच आहे.आपल्या मित्राने विकलेला तो शेअर दुसर्याच दिवसापासून वाढायला सुरुवात होते आणि महिनाभरातच त्याने चक्क पस्तीस रुपयाची पातळी गाठलेली असते.आपला हा मित्र मात्र पुन्हा शेअरबाजाराचे तोंड बघायचे नाही असा निश्चय करून आपल्या पोराबाळांना सांगण्यासाठी हा अनुभव पदराला लावतो.
मित्रहो, ही सारी कपोलकल्पित कहाणी नव्हे, तर आपल्यापैकी बहुतेकांची थोड्याफार फरकाने झालेली खरीच हकिकत आहे.
मग मराठी माणसाने शेअरबाजारात कधी पडूच नये का? त्याने कायम काबाड कष्ट करूनच पैसा कमवावा का? की याला काही अन्य पर्याय आहे? हे आणि असे बरेच प्रश्न मला पडले आणि मी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि सामान्य मराठी माणसाला शेअरबाजारातील धोके सांगण्याबरोबरच त्याच्या मनातील अनावश्यक भीती काढुन त्या जागी आत्मविश्वास जागविण्यासाठी मी हा blog लिहीत आहे.माझ्या मते मराठीतील या विषयाला वाहिलेला हा पहिलाच blog आहे.या माझ्या लिखाणात शेअरबाजाराची तोंडओळख नसून अगोदरच प्राथमिक माहिती व थोडीफार गुंतवणुक असलेल्या पण विशेष फायदा न मिळवलेल्या वा बाजारात नुकसान झालेल्या मराठी मित्रांसाठी चार युक्तीच्या गोष्टी ,काही सोपे आडाखे तसेच किचकट व गुंतागुंतीचे विश्लेषण टाळून सोप्या भाषेतील व सर्वसामान्यांना कळेल अशी माहिती असेल.मी दिलेली माहिती आंधळेपणाने न स्वीकारता वाचकांनी त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी अवश्य पडताळून पहावी ही नम्र विनंती,तसेच थोडेही आर्थिक नुकसान झाल्याने ज्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य बिघडते त्यांच्यासाठी हे क्षेत्र नाही हे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.
आज प्रस्तावना म्हणून एवढे पुरे झाले.सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी बाजाराचा आढावा घेवून आगामी चाहूल घेण्याचा माझा प्रयत्न राहील.तसेच वाचकांनी रोजच्या बातम्या नियमीतपणे वाचण्याची सवय लावून घेणे श्रेयस्कर आहे.माझ्या वाचकांकडुन आलेल्या योग्य त्या सुचना वा प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्याचा माझा प्रयत्न राहील.
येथे नोंदविलेली मते ही कुठल्याही प्रकारची शिफारस नसून आर्थिक निर्णय घेताना ज्याचे त्यानी आपल्या जबाबदारीवर घ्यावेत, ही नम्र विनंती.

Read more »