Share/Bookmark

१४ ऑग, २०११

शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय?

शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय?-१०० टक्के अचूक (Sure-Shot) टिप्स-
  "आमच्या वर्षानुवर्षाच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर आणि अतिशय मेहनत घेवून आम्ही अशी एक ट्रेडींगची पद्धत(STRATEGY) तयार केलेली आहे कि त्यानुसार  पुढील महिन्यात शेअरबाजार वर चढणार कि खाली येणार याचा १०० टक्के अचूक अंदाज करता येतो.दर महिन्याच्या सुरुवातीला आम्ही  तुम्हाला इमेल ने ही "१०० टक्के अचूक टीप" पाठवत जावू. आपणांस जर आमचा परफोर्मन्स पहायचा असेल तर ४ टिप्स ट्रायल म्हणून/पूर्णपणे मोफत दिल्या जातील. इच्छूकांनी आपला इमेल पत्ता आम्हाला कळवावा." 
           थांबा...थांबा ....हे मी म्हणत नाहीये ! तर -अशा प्रकारची जाहिरात इंटरनेटवर पाहिलीत तर आपली प्राथमिक प्रतिक्रिया काय होईल?
  मला खात्री आहे कि बहूतेक जण - "बघु या तरी या टीप्स किती अचूक ठरतायत त्या-" असे म्हणून यात (चकटफू म्हणून तरी नक्की) रस घेतील.
 विविध मिडीया,इंटरनेट आणि सोशल नेटवर्कच्या मदतीने, सदर जाहिरात वाचलेल्या लाखो वाचकांपैकी  हजारो जण आपले इमेल पत्ते पाठवून या "फ्री टीप्स" ची मागणी करतील.

    समजा "अमोल" हा या फ्री टीप्सचा एक सबस्क्राइबर आहे. १०० टक्के अचूक टीप्सची त्याला उत्सुकता आहे, मात्र तो तसा विचारी आहे. या टीप्सच्या अचूकतेबद्दल त्याला शंकाही आहेत.
त्याला इमेल द्वारे पहिली टीप मिळते - त्यानुसार या महिन्यात बाजार तेजी दाखवणार असून खरेदीचा सल्ला दिला जातो. अमोल आता महिनाभर नुसते निरीक्षण करायचे ठरवतो.बाजारात हळूहळू पण सतत वाढ होत जाते, आणि महिनाअखेरीस बाजाराने चांगलीच वाढ दाखवलेली असते.अशा प्रकारे पहिल्या महिन्याची टीप १०० टक्के अचूक ठरलेली असते.अमोल खूष होतो,पण सावधही असतो. सलग तीन टीप्स बरोबर आल्या तरच तो त्यानुसार बाजारात पैसे लावायचे ठरवतो.
अमोलला आता दुसर्या महिन्याच्या टीप्सविषयी उत्सुकता लागून रहाते.

अखेर दुसर्या महिन्याची टीप येते- त्यानुसार बाजार आणखी वर जाणार असतो.अमोलला जरा नवल वाटते, कारण बाजार आता महाग झाला आहे याची त्याला जाणीव असते.काही दिवस बाजार त्याच पातळीवर राहून पुन्हा एकदा उसळी घेतो आणि महिना अखेरीस त्याने नवी उंची गाठलेली असते.याही वेळी प्रत्यक्ष बाजारात पैसे न घालता त्याने नुसतेच निरीक्षण केलेले असते.जर टीप्सनुसार पैसा लावला असता तर- त्याला वाटून जाते. पण सलग तीन टीप्स अचूक ठरल्या तरच पैसे लावू या -उगाच रिस्क कशाला घ्या? असे म्हणून तो पूढील महिन्याच्या टीप्सची वाट बघू लागतो.

लवकरच तिसर्या महिन्याची टीप येते. यावेळेस जरा वेगळी टीप असते.बाजारात या महिन्यात घसरण होणार असल्याचा इशारा देवून वेळीच विक्री करून पैसा मोकळा करण्याचा सल्ला दिलेला असतो.याचवेळी टीव्हीवरचे एक्स्पर्ट, इतर मिडीयावाले मात्र बाजाराची तेजी अशीच काही काळ चालू रहाणार असल्याचे सांगत असतात.त्यासाठी उत्तम औद्योगिक प्रगतीचे दाखलेही दिले जात असतात.अमोलची उत्सुकता आता ताणली जाते.यावेळी तरी टीप खोटी ठरणार असेच त्याला वाटत असते.पण घडते उलटेच! बराच महाग झालेला बाजार वाढायचा थांबतो, आणि रोज थोडा थोडा घसरत जावून महिना अखेरीस तर जोराने खाली येतो. याही वेळी टीप १०० टक्के अचूक ठरलेली असते.अमोल आता मात्र उत्साहित होतो.या टीप्सच्या खरेपणाबद्दल त्याला आता खात्री पटत चाललेली असते. तेव्हा आता चौथ्या म्हणजेच शेवटच्या फ्री टीप्सचा थोडा फायदा करून घ्यायचे तो ठरवतो. यावेळी तो टीप्सनुसार बाजारात व्यवहार करायचे ठरवतो, मात्र तरीही थोडी  सावधगिरी म्हणून फक्त २५००० रु. लावायचे ठरवतो.

अखेर शेवटची फ्री टीप देणारा इमेल येतो. यावेळेला बाजारात खरेदीचा सल्ला दिलेला असतो.कारण बाजार पुन्हा वरची दिशा धरणार असल्याचे स्पष्ट म्हटलेले असते.अमोल त्यानुसार काही शेअर निवडून त्यात खरेदी करतो. खरेतर महिन्याच्या सुरुवातीला तरी बाजारात मंदीचे वातावरण असते.संथपणाने बाजार खाली खालीच जात असतो.वाढती महागाई,महाग होत असलेले क्रूड तेल,आखातातील युद्ध इत्यादी बातम्या वातावरण अधिकच गढूळ करत असतात.सर्व एक्स्पर्टही बाजार आणखी किती खाली जावू शकेल याचे विश्लेषण करत असतात. अमोलने घेतलेले शेअरही तोट्यात जावू लागतात.अमोलला आता आपले चूकले असे वाटू लागते, पण तो महिनाअखेर पर्यंत थांबायचे ठरवतो. दरम्यान अर्थमंत्री काही निवेदन करतात, रिजर्व बेंक आणि म्युचुअल फंड काही धोरणात्मक निर्णय घेतात-आणि काय आश्चर्य! बाजार अचानक उलटा फिरतो.वेगाने वाढत जावून महिन्याच्या शेवटी तर प्रचंड वाढलेला असतो. अमोलचे शेअर्सही ८००० रु.ची भरघोस वाढ दाखवत असतात.
"१०० टक्के अचूक टीप्स"वर त्याचा आता मात्र पक्का विश्वास बसतो. अमोलला दुहेरी आनंद झालेला असतो, कारण त्याला झालेल्या फायद्याबरोबरच भविष्यातील गडगंज फायद्याची स्वप्ने पडू लागलेली असतात.
अमोलसारखाच फायदा झालेले आणखीही बरेच "लकी" लोक असतात. त्या सर्वांना काही दिवसांनी एक इमेल येतो.-
"आम्ही आतापर्यंत आपल्याला ४ महिन्याच्या ४ अचूक टीप्स पाठवल्या असून त्याची विश्वासार्हता आपल्याला नक्कीच पटली असेल.आपल्यापैकी काहीजणांनी तर भरघोस फायदाही कमवला असेल. हे सर्व आमच्या वर्षानुवर्षाच्या सखोल अभ्यासाचे फलित आहे.सदर टीप्सचा लाभ यापूढेही मिळत रहाण्यासाठी आपल्याला आमची वार्षिक सबस्क्रीप्शन फी म्हणून फक्त २५००० रु. भरायचे आहेत, आणि अशाच १०० टक्के अचूक टीप्स आम्ही तुम्हाला वर्षभर पाठवत जावू.

अमोलला आता करायचे असते एवढेच कि "१०० टक्के अचूक टीप्स" कायम मिळण्यासाठी सब्स्क्रीप्शन म्हणून थोडेसे पैसे भरायचे आणि नंतर? नंतर अफाट फायदा कमवायचा.
अमोल मग वेळ घालवत नाही.वर्षभराची फी म्हणून २५००० रु. भरतो आणि "१०० टक्के अचूक टीप्स" नुसार ट्रेड करून मोठा फायदा कमवण्यासाठी बाजारात बराच पैसाही ओततो.
पण होते काय, कि दर महिन्याला नियमीतपणे टीप्स तर येतात पण कधी त्या बरोबर ठरतात तर कधी चूक ! -म्हणजे पहिल्या ४ महिन्याप्रमाणे "१०० टक्के अचूक" असे काही होताना दिसत नाही. अशा प्रकारे काही महिने जातात. बाजारात अमोलचा बराच पैसा अडकून बसतो.त्याने पाहिलेली गडगंज फायद्याची स्वप्ने कुठल्याकुठे विरून जातात.  - त्यांनी तर १०० टक्के अचूकतेची खात्री दिली होती ! मग हे असे कसे झाले? का झाले ? त्याने पुन्हा पुन्हा त्यांची जाहिरात अणि इमेल वाचून काढले- तर त्याखाली बारीक अक्षरात एक तळटीप दिलेली आढळली-
डिस्क्लेमर- "आमच्या टीप्स या खरोखरच अचूक असल्या आणि आमच्या सबस्क्राईबर्सना आम्ही त्याची खात्री देत असलो तरी कायदेशीररित्या आम्ही तशी हमी देवू शकत नाही."
आता काय करावे ते त्याला कळेचना!
 तुम्ही अंदाज करू शकाल का कि नेमके झाले होते तरी काय ?

नेमके झाले होते असे कि सुशिक्षीत आणि विचारी असलेला अमोल सुद्धा चक्क एका "STOCK-TIPS-SCAM" ला बळी पडला होता.
कसा ते आपण बघुया-
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जाहिरातीच्या मदतीने इमेल पत्ते किंवा मोबाइल क्रमांक मिळवून किमान दहाहजार जंणांचा एक सबस्क्राइबर ग्रूप केला जातो.यापैकी निम्म्या म्हणजे ५००० लोकांचे दोन गट केले जातात.यापैकी एका गटाला बाजार वाढणार असल्याचा म्हणजेच खरेदीचा सल्ला दिला जातो, तर दुसर्या गटाला बाजार घसरणार असल्याचा म्हणजेच विक्रीचा सल्ला दिला जातो.
महिन्याच्या शेवटी साहजिकच कोणत्यातरी एका गटाला म्हणजेच तब्बल ५००० जणांना "१०० टक्के अचूक" टीप पोचलेली असते.
दुसर्या महिन्यात आधीच्या दोन गटांपकी फक्त या "लकी" ठरलेल्या ५००० लोकांनाच पुन्हा टीप दिली जाते -अर्थातच पुन्हा २५०० जणांचे दोन गट केले जातात, व त्यातील एका गटाला खरेदीचा तर दुसर्या गटाला विक्रीचा सल्ला दिला जातो. दुसर्या महिन्याअखेरीस ज्या गटाला अचूक सल्ला पोचला आहे अशा २५०० जणांचे पुन्हा एकदा प्रत्येकी १२५० जणांचे दोन गट करून त्यांना तिसर्या महिन्यासाठी पूर्वीप्रमाणेच खरेदी व विक्रीचा सल्ला दिला जातो. तिसर्या महिन्याच्या अखेरीस साहजिकच १२५० जणांना अचूक टीप मिळालेली असते.यातले बहूतेक लोक आता या टीप्सवर पक्का विश्वास ठेवू लागलेले असतातच. त्यातच चौथ्या महिन्यासाठीची टीप येते-अर्थातच याहीवेळी ६२५ जणांना खरेदीचा व ६२५ जणांना विक्रीचा सल्ला दिलेला असतो.
अशा प्रकारे चार महिने सलगपणे चार अचूक टीप्सचा लाभ झालेले तब्बल ६२५ लोक असतात. आणि अमोल नेमका याच लकी(!) ६२५ जणांमध्ये होता.

आता पुढचा हिशेब मी सांगायला हवा ? थोड्याफार फरकाने या ६५० पैकी सर्वच जण अमोलप्रमाणेच विचार करतात आणि १०० टक्के अचूक टीप्सच्या आशेने एका वर्षासाठी २५००० रु.हसत हसत भरतात. समजा अगदी कमीतकमी म्हणजेच सुमारे ३०० जणांनी जरी पैसे भरले तर एकूण रक्कम होते चक्क ७५ लाख रु.!!!
शेअरबाजाराचा कुठलाही अभ्यास न करता काही मंडळी फक्त असे उद्योग करतात आणि अमाप पैसा कमावतात.या आणि अशा प्रकारांपासून मराठी गुंतवणूकदार/ट्रेडर्सनी नेहमी सावध राहिलेले बरे म्हणून, इंटरनेटवर मुशाफिरी करता करता अशा SCAM बद्दल वाचनात आले ते माझ्या वाचकांपुढे ठेवावेसे वाटले.
आशा आहे कि आपणा सर्वांस ही माहिती उपयुक्त वाटेल.

Read more »