Share/Bookmark

२४ ऑक्टो, २०१२

विजयादशमीच्या शुभेच्छा ! आणि 'अर्थमित्र' फोरमची स्थापना ...
सर्व वाचक आणि गुंतवणूकदार मित्रांना ‘शेअरबाजार-साधा सोपा’ तर्फे विजयादशमीच्या शुभेच्छा ! आपल्या सर्वांना सुख-समृद्धी, धनधान्य आणि भरभराट यांचा अखंड लाभ होवो हीच सदीच्छा !!
मराठी माणूस हा आपापल्या परीने हुशार, मेहनती, कर्तबगार असला तरी तो एकत्र येवून जेव्हा काही चांगले कार्य हाती घेतो तेव्हा ते कार्य “ हे तो श्रींची इच्छा ” ठरते असाच आपला इतिहास आहे. त्यापासून प्रेरणा घेवून मला असे नेहमी वाटत आले आहे कि या ब्लॉगच्या सर्व वाचकांनी व हितचिंतकांनी एकत्र येवून आपले अर्थविषयक वा गुंतवणूकविषयक विचार, अनुभव, नवीन गुंतवणूकविषयक माहिती, नव्या कल्पना या कुठेतरी एखाद्या कॉमन व्यासपीठावर येवून मांडाव्यात, शेअर कराव्यात. अशा प्रकारच्या व्यासपीठाद्वारे आपण सर्वजण एकमेकांचे विचार समजावून घेवू शकू. त्यातून होणा-या ज्ञानाच्या, माहितीच्या देवाणघेवाणीमुळे हे व्यासपीठ एक ज्ञानपीठ बनून आपणा सर्वांनाच लाभदायक ठरेल आणि ‘एक समुदाय’ म्हणून (इतरांप्रमाणेच) आपण मराठी मंडळीही एकत्र येवू शकतो, सर्वांच्या फायद्यासाठी काही भरीव करू शकतो, हेही सिद्ध होईल.
‘अर्थमित्र विचारमंच’ –
अशा प्रकारच्या काही विचारांमधून दस-याच्या दिवशी काहीतरी उत्तम कार्य करावे, सीमोल्लंघन करावे वा नवीन मोहीम हाती घ्यावी अशा आपल्या परंपरेला अनुसरून आजच्या या शुभमुहुर्तावर आपल्या सर्वांचे प्रेम नेहमीच लाभत आलेल्या या ब्लॉगवर “ 'अर्थमित्र ” या विचारमंचाची (फोरम) स्थापना केली आहे. ‘अर्थमित्र’ विचारमंच हा सर्वांसाठी खुला आणि अर्थातच विनामूल्य राहील. अधिक माहितीसाठी या ब्लॉगच्या मेनूबार मध्ये “अर्थमित्र फोरम” या टॅबवर क्लिक करा. येथे आपल्या नावाने वा टोपणनावाने नोंदणी करून प्रवेश घेतल्यावर विविध विषयांवर आपले मत मोकळेपणे मांडता येईल. यात गुंतवणूक वा ट्रेडींगविषयक स्ट्रॅटेजी, आयडीआ, टीप्स तसेच काही समस्या, अडचणी, सल्ला असे कसलेही लेखन करता येईल, तसेच एकमेकांच्या म्हणण्यावर प्रतिक्रियाही देता येतील, चर्चा करता येईल. अथवा स्वतः काही न लिहीता फक्त इतरांची चर्चा वाचताही येईल. या चर्चेतून, वैचारीक देवाणघेवाणीतून ज्ञानरूपी अमृताचा सर्वांनाच लाभ होईल. अर्थातच एकमेकांचा आदर राखणे व सभ्यतेची मर्यादा पाळणे एवढी मात्र किमान अपेक्षा आहे. यासाठी मराठी वा इंग्लीश कोणतीही भाषा आपण वापरू शकता. यासाठी निरनिराळे ८ मुख्य विषय वा टॉपिक ठेवले आहेत. गरजेप्रमाणे हे वाढवण्यात येतील.
चला तर आजपासून एकमेकांमध्ये ज्ञानरूपी, विचाररूपी सोने लुटून सर्वांनीच एक नवा शुभारंभ करूया !!

Read more »

२१ ऑक्टो, २०१२

Guest Article -शेअर बाजारांतील तोट्याचे व्यवस्थापन-

  मित्रहो, या ब्लॉगवर सुरु असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने आलेली एक मौलिक प्रतिक्रिया एक 'गेस्ट आर्टिकल' म्हणून येथे सर्वांसाठी देत आहे- 
                    *****************************************
  'शेअर बाजारांतील तोट्याचे व्यवस्थापन-'

शेअरबाजार आणि धोका या दोन शब्दांचे नाते सत्यनारायण आणि महापुजा या शब्दांइतकेच जवळचे आहे. यातुनच 'रिस्क मॅनेजमेन्ट’ म्हणजेच अशा धोक्यामुळॆ उद्भवणाया नुकसानाचे नियोजन ही कल्पना उदयास आली. स्टॉपलॉस, ऍव्हरेजींग या पारंपारिक पद्धतींबरोबरच अलिकडॆ ’डेरिव्हेटिव्ज’ ची सुरवांत झाल्यानंतर ऑप्शन्स वा हेजिंग ह्या पद्धतींचाही बोलाबाला आहे. आपण या सर्वच पर्यायांचा विचार करणार आहोत पण सुरवात 'हेजिंग' पासुन करताना माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एक गोष्ट सांगतो. 

बिरबलाच्या असंख्य गोष्टींपैकीच एक गोष्ट अशी की एकेदिवशी अकबर बादशहाच्या राज्यातील दोन  अतिउत्कृष्ट बुद्बळपटु एकमेकांशी अटीतटीचा डाव खेळतांना बिरबलाच्या कोण्या हि्तशत्रुने पाहिले. आणि --- बिरबलाचे नाक खाली करण्याचा नवा मार्गच जणु मिळाला, या आनंदात त्याने दोघांनाही ’चला रे बाबांनो, इथे खेळण्यापेक्षा मी तुम्हाला मोठे इनाम मिळवुन देतो खाविंदांकडुन, आपण भर दरबारांत बिरबलाला तुमच्याविरुध्द बुद्बळांत विजय मिळविण्याचे आव्हान देऊया --- “ असे सांगुन दरबारात हजर केले. आणि बादशहासमोरच  "--- तुमच्या प्रिय बिरबलाने यातील कोणत्याही एका खेळाडुविरुद्ध तरी जिंकुन दाखवावे, अन्यथा बुद्धीची मिजास मारणे बंद करावे "  असे  खुले आव्हान दिले.  बुद्बळाच्या खेळांत फारशी गती नसल्याने ह्या अनपेक्षीत हल्याने गांगरलेला बिरबल  क्षणभरातच सावरला आणि म्हणाला  'जहांपन्हा, एवढ्या तेवढ्या गोष्टीवरुन या प्रामाणिक सेवकाची परीक्षा पहाणे काही ठीक नाही, पण जर आपण आज्ञा द्याल तर यातल्या एकाच नव्हे तर दोघाही खेळाडुंबरोबर एकाच वेळी खेळीन म्हणतो मी. उशीर कशाला? लगेचच  होवुन जाउन दे दुध का दुध ----"

झाले, बिरबलाच्या ह्या तड्फदार उत्तराने आनंदित होवुन बादशहाने लगेचच शेजारच्या दोन महालांत दोन पटांची व्यवस्था केली व दोन्ही डाव रंगु लागले. बादशहासह तमाम दरबारी उत्कंठेने काय होणार हे पहात होते. जसा जसा वेळ जाउ लागला तसे  बादशहाच्या उत्कंठेचे रुपांतर चिंतेत होवु लागले. बिरबल मात्र शांतपणे एका महालातुन दुसरीकडे ’खेळी’ करण्यास जात येत होता. शेवटी ब-याच खटाटोपानंतर बिरबलाचा एक प्रतिस्पर्धी धामाघुम होवुन बाहेर आला व त्याचा पराभव झल्याचे त्याने मान्य केले.--- सर्व दरबारी आणि स्वत: बादशहाने दरबाराची अब्रु वाचली या आनंदात बिरबलाचा जयजयकार केला, तिकडे दुसरा खेळाडु बिरबलाचा हमखास पराभव करण्याच्या स्थितीत होता पण उपयोग नव्ह्ता कारण किमान एक डांव जिंकण्याची पैज बिरबलाने जिंकली होती.
बिरबलाने काय केले असावे हे तुम्ही एव्हाना ओळखलेच असेल, मी त्याची पुनरुक्ती नाही करणार, पण मी एवढेच सांगेन की हे एकप्रकारचे 'हेजिंग' होय, किंबहुना 'हेजिंग' ही संकल्पना समजावायला या सारखे समर्पक उदाहरण नाही.

बाजारासंदर्भात असलेल्या स्टॉपलॉसपिव्होट (pivot) काय किंवा हे ’हेजिंग’ काय, सर्वच संज्ञा विशिष्ट व्याख्येत वा गणिती सुत्रांत बाधण्यापेक्षा त्यांचे स्पष्टीकरण करणे सोपे जाते. त्या दृष्टीने शेअर बाजाराच्या वर आणि खाली जाण्याचा म्हणजेच तेजी व मंदी अशा दोन्ही शक्यता पुरेपुर गृहित धरुन आखलेली गुंतवणुक योजना म्हणजे ’हेजिंग. वरील गोष्टींत बिरबलाने अवलंबलेला ’झीरो-रिस्क गेमप्लान’ म्हणजे 'हेजिंग’, आपणास अपेक्षीत दिशेऐवजी बाजार अनेकदा बरोब्बर विरुद्ध दिशेस जावु लागतो अशावेळी अशा विरुद्ध दिशेसही आपल्या पोटापाण्याची केलेली सोय म्हणजे 'हेजिंग’, निवडणुकींत घरांतील दोन कर्त्या भावांपैकी एकाने UPA चे आणि दुसयाने  NDA प्रणित उमेदवाराचे काम करणे म्हणजे ढोबळमानाने ’हेजिंग’ असे ठरविता येइल.

अधिक तपशीलांत विचार करावयाचा झाल्यास 'हेजिंग’ ही कल्पनाच मुळांत संभाव्य नुकसानाची तीव्रता कमी करणे या गरजेतुन आली असल्याने यांत घेतल्या जाणाया जोखमीचे स्वरुप तेच आणि दिशा परस्पर विरोधी असणे हे अत्यंत आवश्यक गृहित आहे. अन्यथा संभाव्य नुकसानाची मर्यादा निश्चित होणे राहीले दुरच, आगीतुन फुफाट्यांत अशीच स्थिती व्हायची. ’हेजिंग’ ही स्ट्रॅटेजी काहीशी झापडबंद आहे, तेथे उपलब्ध पर्याय फारसे नाहीत.  प्लान A नाही जमला तर मग प्लान B,---- केवळ असा तर्क पुरेसा नाही तर अगदी गणिती भाषेंत बोलायचे झाल्यास (प्लान B) हा जवळपास (प्लान -A) हवा., म्हणजेच कितीही विचार्पुरवक केली असली तरी शेअर्स व सोने यांची सारख्या रकमेची, एकाचवेळी व अगदी परस्पर विरोधी दिशेने केलेली गुंतवणुकही शुदध स्वरूपातील 'हेजिंग’ म्हणुन ओळखले जाणार नाही.

आता प्रत्यक्ष उदाहरणाकडे येतो, समजा एखाद्या  गुंतवणुकदाराने आज (दि, 19 फ़ेब्रुवारी) रोजी  रिलायन्सचे प्रत्येकी 800 रु. प्रमाणॆ 500 असे एकुण रु. 4 लाखाचे शेअर्स बाजारांतुन डिलिव्हरी स्वरुपांत खरेदी केले (दि, 19 फ़ेब्रुवारीचा NSE वरचा बंद भाव रु.800.70) आता त्याच्या ह्या गुंतवणुकीचे संरक्षण 'हेजिंग’ हे शस्त्र वापरुन कसे करावयाचे ???  पाहुया.

पर्याय क्र. 01-  रिलायन्सचेच  फ्युचर्स रु.800 किंमतीस विकायचे. (01 लॊट 500चा, दि, 19 फ़ेब्रुवारीचा NSE वरचा बंद भाव रु.802.00)  स्पोट आणि फ्युचर्स यांच्या किंमतीतील फरक असाच राहील असे मानले व ब्रोकरेज आणि अन्य खर्च नाहीत असे गॄहित धरले तर आता तांत्रिकदृष्ट्या हे अगदी ’परफेक्ट हेजींग’ झाले. अगदी वरील गोष्टींत बिरबलने केलेल्या ’झीरो सम’ गेमसारखे. पण खरे म्हणजे हा डोंगर पोखरुन उंदीर काढणे असा प्रकार होईल. कारण हे असे हेजींग’ या गुंतवणुकदाराचे शेअर्मधील संभाव्य घसरणीमुळॆ होणाया नुकसानापासुन रक्षण करेल एवढेच, मात्र त्याचवेळी हया गुंतवणुकदाराच्या पदरांत शेअरच्या भाववाढीपासुन होणारा कोणताही नफा पडणार नाही (कारण कमी किंमतीने विकलेले फ्युचर्स तेवढ्याच रकमेच्या तोट्यांत जातील) हे ही निश्चित. आणि कोणताही नफा होणारच नाही अशी ’खात्री’ असलेला उद्योग कोण करेल ?? त्यापेक्षा पैसे एफ.डी त ठेवलेले सुध्धा जास्त फायदेशीर नाही का??  खरे म्हणजे ह्या अशा प्रकारच्या व्यवहाराना हेजिंग पेक्षाही ’आर्बिट्रेज’ असे म्हणतात.

पर्याय क्र. 02 – रिलायन्स हा निफ्टी या निर्देशांकाचा  मोठा घटक असल्याने रिलायन्स ऐवजी निफ़्टीचे साधारण तेवढ्याच मुल्याचे फ्युचर्स विकायचे. आता या दोन्ही घटकांची हालचाल समान प्रमाणांत झाली तर ठीक, मात्र निफ्टी काही कारणाने वाढ्ला आणि दुर्दैवाने रिलायन्स त्या प्रमाणांत वाढ्ला नाही तर मात्र आगीतुन सुटुन ---असे वर म्हटल्याप्रमाणे होवुन गुंतवणुकदाराला नुकसानाचा दुहेरी फटका बसेल. अर्थातच नशीब जोरावर असुन रिलायन्स अधिक वेगाने वाढ्ल्यास फायदाही दुणावेल. म्हणजेच येथे जर-तर चा खेळ असल्याने थोडी का  होइना अनिश्चितता असेलच.
जगांतील अनेक नामांकित फंड मॅनेजर्स एखाद्या निर्देशांकातील शेअर्सचे ’वेगवान’ (आउट्परर्फ़ोर्मर्स) व मंद (अंडररर्फ़ोर्मर्स) अशी विभागणी करुन त्याप्रमाणॆ त्यांत तेजी/मंदी करुन तो निर्देशांक ’हे्ज’ करतात. या पद्ध्तीला लॉन्ग/शॉर्ट स्ट्रॅटेजी असा पारिभाषिक शब्द आहे. परिणाम अशा विभागणीच्या यशावर, अर्थातच संमिश्र आहेत.

पर्याय क्र. 03 - येथे गुंतवणुकदार रिलायन्सचा 780 स्ट्राइक प्राइजचा एक कॉल विकेल. (दि, 19 फ़ेब्रुवारीचा NSE वरचा बंद भाव रु.25.00) आता वायदापुर्तीच्या दिवशी समजा रिलायन्स रु. 875.70 (अलिकडील सर्वोच्च बंद भाव) ला बंद झाला तर गुंतवणुकदाराचा प्रत्येक शेअरगणिक रु. 25 असा एकुण रु. 12,500 एवढा नक्त फायदा होइल जो हेजिंगचे ’लोढ्णे’ गळ्यांत नसते तर शेअरगणिक रु. 75.70 असा एकुण रु. 37,850 एवढा असता.  या उलट दुसया शक्यतेनुसार शेअर रु. 763.05 (अलिकडील निम्नतम बंद भाव) ला बंद झाल्यास शेअरच्या किंमतीतली घट रु. 36.95 (800-763.05) –  कॉल विकुन मिळालेला प्रिमियम (र, 25) असा शेअरमागे 11.95 प्रमाणे एकुण रु. 5,975 एवढा तोटा होइल. लक्षांत धेण्यासारखी गोष्ट ही की येथे  गळ्यांतील ’लोढ्ण्याचे’ रुपांतर डोक्यावरच्या ’शिरस्त्राणांत’ झाले असुन गुंतवणुकदाराने हेजिंगचा अवलंब केला नसता तर हा तोटा रु. 18,475 एवढा वाढला असता.

या व अशा आणखीही पर्यायांचा विचार करता ’हेजिंग’ करावयाचे झाल्यास फ्युचर्सच्या तुलनेत ऑप्शनचा वापर मला अधिक व्यवहार्य, खरे म्हणजे अनिवार्य वाटतो.

शेवटी सांगावयाचे हे की ’हेजिंग’ हे नुकसान कमी करण्याचे साधन आहे. अर्थातच ते याच प्रमाणात नफाही कमी करते (पहा पर्याय क्र. 01 व 03 ) बिरबलाच्या गोष्टीचाच आधार घ्यायचा तर या तंत्राचा वापर करुन तो एक विजय मिळवु शकला जे त्याला पुरेसे होते पण ही ’आयडियाची कल्पना’ त्याला कधीही निर्भेळ यश देउ शकणार नव्हती हे लक्षांत घेणे महत्वाचे ठरेल.

’हेजिंग’ आपले नुकसान कमी नक्कीच करु शकेल पण नुकसान होणारच नाही या भ्रमांत रहाणे चुकीचे ठरेल. 'हेज' या क्रियापदाच्या अर्थाप्रमाणे ते एक किरकोळ कुंपण आहे, अभेद्य तट्बंदी नाही. सुरवातीच्या उदाहरणाकडे जायचे तर दोन्ही महत्वाच्या पक्षांना खुश ठेवल्यानंतरही कोणीतरी तिसराच अपक्ष निवड्णुक जिंकु शकतोच ना ?

’हेजिंग’ म्हणजे 10 ही बोटे तुपांत --- असा गैरसमज असतो पण विचार करा की ती खरोखर तशी सदैव असतीलच तर आपल्याला बोटाने तुप चाखायला कसे मिळेल? तेंव्हा ’हेजिंग’ आवश्यक  नक्कीच आहे पण ते काही ‘लाख दुखों की एक दवा‘ किंवा बाजारांत यश मिळविण्याची ’गुरुकिल्ली’ मात्र नक्कीच नाही. ही नीती फक्त योग्य प्रमाणातच वापरावी कारण ही प्रणाली राबविण्यासाठीही किंमत मोजावी लागते शिवाय कागदावर सारेच सोपे वाटले तरी प्रत्यक्षांत व्यावहारिक अडचणीही असु शकतात येथे आवर्जुन नमुद करावेसे वाटते.

बाजरांत म्युचुअल फंड्सच्या सर्वस्वी ह्याच (आर्बिट्रेज) तंत्राचा वापर करणाया योजनाही आहेत पण त्यातील कोणतीही योजना गुंतवणुकदारांना दीर्घकालीन भरीव परतावा देउ शकण्यात यशस्वी झालेली नाही ही गोष्ट आपल्याला या तंत्रावर अधिक विसंबुन रहाता येणार नाही हे दर्शविण्यास पुरेशी आहे.

घराच्या बाहेर आणि घरांत कोठेही, कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने,  कोणा मानवाकडुनही आणि पशूकडुनही, दिवसा वा रात्रीपैकी कधीही मृत्यु येणार नाही असा ’फुलप्रुफ’ वर मिळवुन मृत्युवर सकृतदर्शनी विजय मिळविलेला राजा हिरण्यकश्यपूही मारला गेला ही गोष्ट आपणास दुसरे काही नसेल तरी किमान गाफिल राहु नका अशी शिकवण देते.

धोका वा नुकसान नियंत्रणाची अशी साधने बाजारात खात्रीने उपलब्ध आहेत आणि ती वापरणेही अत्यंत आवश्यक आहे मात्र असे असले तरीही शेअरबाजारांत ’कधीही गाफील राहु नका’ ह्या शिकवणीचे महत्व अनमोल आहे हे आपणसारख्या सुज्ञांस सांगावयास हवे का?? असो. बाकीच्या एव्हरेजिंग सारख्या पर्यायांबद्दल पुन्हा केव्हातरी----.

- श्री.प्रसाद भागवत (prasadbhagwat@vsnl.net)Read more »

१७ ऑक्टो, २०१२

'पोर्टफोलिओ हेजींग' कसे करतात ?मागील पोस्टमध्ये हेजींग म्हणजे काय याची ओळख झाल्यावर आता प्रत्यक्ष हेजींग कसे करतात ते बघुया. मागील पोस्टमध्ये फक्त एका शेअरच्या बाबतीत उदाहरण दिले होते. मात्र आपल्याकडे अनेक शेअर्स असतात, मग त्यासाठी प्रत्येक शेअरचे फ्युचर्सचे लॉट विकत बसण्याची गरज नसते. आपल्याकडे असलेल्या सर्व शेअर्सच्या एकूण किंमतीवरून त्यासाठी किती प्रमाणात हेज करायचे ते ठरवले जाते. त्यालाच ‘पोर्टफोलिओ हेजींग’ असे म्हणतात. असे पोर्टफोलिओ हेजींग करताना स्टॉक फ्युचर्स न विकता इंडेक्स (निफ्टी किंवा अन्य इंडेक्स) फ्युचर्सचे सेलिन्ग करून हेज केले जाते. असे करताना आपल्याकडे असलेले शेअर्स हे त्या विशिष्ट इंडेक्सचा भाग असणे मात्र जरूरीचे आहे.
उदा. आपल्याकडे ३-४ निरनिराळ्या बॅंकांचे शेअर्स असतील तर त्या सर्वांचे हेजींग करण्यासाठी साधारणपणे बॅन्कनिफ्टी मध्ये शॉर्ट पोझिशन घेतली जाते. समजा अशा बॅंकांच्या शेअर्सची एकत्रित किंमत ही ५ लाख रु. असेल तर या पोर्टफॉलिओचे हेजींग करण्यासाठी बॅंकनिफ्टीचे किती लॉट विकावेत ? बेंकनिफ्टीचा एक लॉट हा २५ चा आहे. सध्याची बॅंकनिफ्टीची किंमत १०५०० एवढी असेल तर एका लॉटची किंमत (१०५००*२५)= २,६२,५००रु. होते. म्हणून ५ लाखाचा बॅंकीन्ग शेअर्सचा पोर्टफोलिओ हेज करण्यासाठी बॅंकनिफ्टीचे २ लॉट विकले तर ठीक होइल.(खरे म्हणजे ते थोडेसे ओवर-हेजींग होइल). तात्पर्य हे कि हेजींगमध्ये फ्युचर्सची पोझिशन ही साधारणपणे पोर्टफोलिओच्या किंमतीएवढी असणे अपेक्षित आहे.
यामध्ये आणखी बारकावे असे आहेत - फक्त दोन्ही किंमती सारख्या असल्या म्हणजे झाले असे नाही, कारण एखाद्या इंडेक्समधील सर्वच शेअर्स हे त्या इंडेक्स नुसारच वर वा खाली होतील असे नसते, तसेच त्यांची इंडेक्सच्या तुलनेत होणारी हालचाल ही कमी वा जास्त असते. त्यामुळे ‘अचूक हेज’ करणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून आपला पोर्टफोलिओ हा इंडेक्सच्या तुलनेत किती हालचाल करतो हे माहीत असणे गरजेचे आहे. अशा तुलनात्मक हालचालीला ‘बीटा व्हॅल्यु’ असे म्हणतात. एखाद्या शेअरचे इंडेक्सच्या तुलनेत वर वा खाली होण्याचे प्रमाण जास्त असेल; म्हणजेच तो शेअर हा इंडेक्सपेक्षा जास्त वोलॅटाईल असेल तर त्याची बीटा व्हॅल्यु ही १ पेक्षा जास्त असते; आणि इंडेक्सच्या तुलनेत जे शेअर कमी हालचाल करतात, म्हणजेच थोडेसे स्थिर प्रवृतीचे आहेत त्यांची बीटा व्हॅल्यु ही १ पेक्षा कमी असते. येथे इंडेक्सची बीटा व्हॅल्युही बेस म्हणजेच १ एवढी धरलेली आहे.
सेन्सेक्स मधील शेअर्सच्या सप्टेंबर’१२ च्या (लेटेस्ट) बीटा व्हॅल्यु पहाण्यासाठी येथे क्लिक करा. निफ्टी शेअर्सच्याही अशा बीटा व्हॅल्यु इंटरनेटवर आपल्याला मिळू शकतील. त्यावरून आपल्या पोर्टफोइओची ‘बीटा व्हॅल्यु’ काढून त्याला पोर्टफोलिओच्या एकूण किंमतीने गुणले असता जी किंमत मिळते  तेवढ्या किंमतीचे इंडेक्स फ्युचर्सचे लॉट त्या पोर्टफोलिओच्या हेजींग’साठी विकावेत अशी अपेक्षा आहे.
ज्या हेजींग स्ट्रॅटेजीमध्ये संभाव्य नुकसान हे ‘शून्य’ असते त्याला ‘परफेक्ट हेज’ असे म्हणतात. अर्थात असे परफेक्ट हेज करणे प्रॅक्टिकली जवळजवळ अशक्य आहे. असो. सारांश हा कि आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओचे शक्य तेवढे अचूक हेजींग करणे शक्य आहे. मात्र सदासर्वकाळ आपल्या पोर्टफोलिओचे असे पूर्ण किंमतीचे हेजींग करून ठेवणे कितपत फायद्याचे आहे याबाबत मतभेद आहेत. कारण मग ‘स्टॉपलॉस’ या संकल्पनेची गरज काय ? असाही प्रश्न येतो ! तेव्हा येथे असाही एक मतप्रवाह आहे कि आपण जेव्हा ठराविक शेअर्स इ. चा पोर्टफोलिओ बाळगतो तेव्हा आपली अपेक्षा वा अंदाज त्याची किंमत वाढेल हीच असते, म्हणजेच बाजाराची दिशा आपण मनात ठरवलेली असते, मग असे पूर्ण किंमतीचे हेजींग करणे म्हणजे आपलाच आत्मविश्वास कमी असल्याचे लक्षण नव्हे का ? तेव्हा एकंदरीत विचार करता केवळ इंडेक्स फ्युचर्सच्या आधारे असे पूर्णपणे व पूर्णकाळ हेजींग करणे अधिक खर्चाचे आहेच व ते प्रॅक्टीकली आवश्यक नाही, मात्र बाजार चांगला असताना अचानक विपरीत घटनांमुळे तो ठराविक मर्यादेपलिकडे घसरू लागला तरच इंडेक्स फ्युचर्सचा हेजींगसाठी वापर करावा अथवा बाजाराची दिशा नक्की नसेल तर पूर्ण किंमतीचे हेजींग न करता अर्ध्या किंमतीचे करावे असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या मते फ्युचर्स ऐवजी  ऑप्शन्सच्या आधारे केले जाणारे हेजींग हे नुकसान टाळण्याचे अधिक उत्तम पर्याय आहेत. त्याविषयी नंतर पहाणारच आहोत. तूर्त आपल्या पोर्टफोलिओची बीटा व्हॅल्यु कशी काढता येते ? ते पुढील पोस्टमध्ये बघुया.


Read more »

१२ ऑक्टो, २०१२

हेजींग (Hedging) म्हणजे काय ?


 इतिहासात छ.शिवाजी महाराजांच्या पराक्रमांबद्दल आपण अनेकदा वाचले असेल. मात्र त्याकाळीही शिवाजी महाराजांनी ‘हेजींग’ केले होते असे मी म्हटले तर तुम्ही मला नक्कीच हसाल !
आपण हे वाचले असेल कि अफजलखानाची भेट घेण्यापूर्वी प्रतापगडाखालच्या जंगलात आधीच लपून, दबा धरून बसलेल्या मावळ्यांना त्यांनी एक सूचना देवून ठेवली होती- कि खानाबरोबर होणा-या झटापटीत जर राजे जिंकले तर विजयाची खूण म्हणून गडावरून तोफा उडवून इशारा दिला जाईल. तो इशारा मिळतांच लपलेल्या मराठी सैन्याने अचानक हल्ला करून शत्रूचे गडाखालचे सैन्य बेचिराख करून टाकायचे असे ठरवून ठेवले होते.
पण मी ज्याला ‘हेजींग’ म्हणतोय तो भाग पुढेच होता- महाराजांनीच तो करावा – गडावरील तोफक-यांना अतिशय स्पष्ट सूचना होत्या कि - खानाबरोबरच्या त्या जीवघेण्या झटापटीत राजे जिंकोत अथवा खान- म्हणजेच महाराजांचे काही बरेवाईट झाले असते तरी (आणि खानाची अचाट ताकद बघता ती शक्यताही होती) - काहीही झाले तरीही- तोफा उडवायच्याच आहेत म्हणून !
यामागची कारणे अशी होती कि गडाखालची खानाची फौज फार मोठी होती आणि त्या फौजेपासून मराठी राज्याला  मोठा धोका होता. राजे जिंकोत वा खान - या फौजेला आवरणे स्वराज्याच्या दृष्टीने फार फार महत्वाचे होते. खानाला मारूनही जर ती फौज पराभूत होत नाही तोपर्यंत त्या विजयाला काही अर्थ नव्हता. आणि जर राजांचे काही बरेवाईट झाले असते तरी मावळ्यांचा धीर खचून ते पराभूत झाले असते- आणि मग स्वराज्यातील जनतेचे त्या अफाट फौजेने जे काही हाल केले असते त्याची कल्पना करवत नाही ! स्वराज्याचे अस्तित्वच संपण्याचीही शक्यता होती ! नेमके हेच टाळण्यासाठी, गडाखालच्या मावळ्यांचा धीर खचू नये, उलत ते जोशात यावेत म्हणून महाराजांनी अशी दुहेरी सूचना देऊन ठेवली होती. म्हणजेच कितीही वाईट प्रसंग आला तरी –आपत्कालची योजना ठरवून ठेवून ती अमलात येइल याची तजवीज करून ठेवली होती ! स्वतःचे काही बरेवाईट झाले तरीही स्वराज्याचे कमीतकमी नुकसान होईल याची घेतलेली ती काळजी होती ! केवळ शिवाजी महाराजांनीच ‘हे’ करावे नाही का ?
आता वर्तमानात परत यायला हरकत नाही ! मित्रांनो, हेजींग- हेजींग असे जे म्हणतात ते दुसरे काही नसून व्यवहारात कमीतकमी नुकसान होण्यासाठीची ती एक योजना असते. ट्रेडींगच्या बाबतीत आपला एक अंदाज सपशेल चुकला वा बाजारात काही विपरीत घटना होवून आपला ट्रेडींग प्लॅन “A’ फसला तरीही आपले ‘स्वराज्य’ म्हणजेच भांडवल राखण्यासाठी केलेली व्यवस्था- प्लॅन ‘B’- म्हणजेच हेजींग होय.
आपण इन्शुरन्स वा विमा पॉलिसी घेतो म्हणजे नेमके काय असते ? एखाद्या व्यक्तीचे, मालमत्तेचे, वाहनाचे काही अपघात होवून नुकसान झालेच तर त्याची काही अंशी तरी भरपाई व्हावी असा यामागचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे शेअरबाजारात ट्रेडींग वा इन्वेस्टमेन्ट करताना अचानक होणारे नुकसान टाळण्यासाठी हेजींग केले जाते. असे हेजींग हे मुळ गुंतवणूकीचे नुकसान टाळू शकत नाही मात्र दुस-या प्रकारे केलेल्या गुंतवणूकीद्वारे ते नुकसान भरून काढू शकते. थोडक्यात म्हणजे शेअरबाजारात एका प्रकारच्या गुंतवणूकीचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी विचारपूर्वक केलेली दुसरी गुंतवणूक म्हणजे हेजींग होय !
आता जरा यापूर्वी केलेली रिस्क-रिवॉर्ड रेशोची चर्चा आठवा. कोणतीही इन्वेस्टमेन्ट वा ट्रेड यामध्ये जेवढी फायद्याची शक्यता जास्त तेवढा संभाव्य धोका अधिक असतो. याउलट धोक्याचे प्रमाण कमी करायला जावे तर फायद्याचे प्रमाणही कमी होत असते. या तत्वाला अनुसरून, ‘हेजींग’ हे धोक्याचे प्रमाण कमी करत असले तरी फायद्याचे प्रमाणही यामुळे कमी होत असते यात शंका नाही.
 बाजारात शेअर्समध्ये मूळ इन्वेस्टमेन्ट केली असेल तर साधारणपणे फ्युचर्स वा ऑप्शन्स मध्ये योग्य त्या पोझिशन घेवून अशा मूळ गुंतवणूकीचे हेजींग म्हणजेच संरक्षण केले जाते. एक उदाहरण घेवूया. टाटा स्टील ही प्रसिद्ध कंपनी आहे आणि समजा त्यात माझी लॉन्गटर्म इन्वेस्टमेन्ट आहे. माझ्या मते कंपनी उत्तम असून भविष्यकाळातही ती उत्तम कामगिरी करेल अशा भरवश्याने ही गुंतवणूक मी काही वर्षांसाठी केली आहे. मात्र अशी गुंतवणूक केल्यावर माझ्या वाचनात येते कि येत्या २-३ महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात काही कारणाने स्टीलच्या किंमती उतरणार आहेत, किंवा सरकारची काही धोरणे इ.चा नजिकच्या काळात कंपनीच्या तिमाही निकालांवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. येथे माझा मूळ कंपनीवरील भरवसा कमी झालेला नाही, मात्र नजिकच्या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घट होण्याची शक्यता दिसत आहे. अशा परिस्थितीत घाबरून जावून मी माझे मूळ शेअर्स विकून टाकण्याऐवजी टाटास्टील कंपनीचे पुढील किंवा त्यापुढील महिन्याचे फ्युचर्स लॉट विकून शॉर्ट पोझिशन घेवून बसू शकतो. येत्या दोन महिन्यात होणारी शेअरच्या भावातील घट ही माझ्या मुळ गुंतवणूकीत नुकसान दाखवीत असली तरी दोन महिन्यानंतर खाली घसरलेल्या फ्युचर्सच्या किंमतीमुळे माझी फ्युचर्समधील शॉर्ट पोझिशन फायदाच दाखवत असते. योग्य त्या वेळेस अशी फ्युचर्स पोझिशन स्क्वेअर अप करून मी मुळ गुंतवणूकीत झालेले नुकसान काही अंशी तरी भरून काढू शकतो. कालांतराने स्टीलचे भाव इ. परिस्थिती ताळ्यावर येवून पुन्हा शेअर्सची किंमत वाढू लागते आणि मुळ गुंतवणूकही वाढ दाखवू लागते. मात्र दरम्यानच्या वाईट काळात माझा वेळ आणि पैसा याचे संभाव्य नुकसान फ्युचर्सच्या आधारे हेजींग केल्याने टाळता येते.
वरील व्यवहारात काही निगेटीव्ह गोष्टीही आहेत- फ्युचर्स पोझिशनसाठी लागणारे अधिक भांडवल, अधिक ब्रोकरेज, फ्युचर्समधील पोझिशन स्क्वेअर अप करण्याची योग्य वेळ साधणे इ. ची पूर्तता मला करावी लागेल.
अशा प्रकारे फ्युचर्सच्या आधारे केले जाणारे हे साधे हेजींग आहे. बाजारात याशिवाय ऑप्शन्स आणि त्याची कॉम्बिनेशन्स वापरून निरनिराळ्या प्रकारे हेजींग केले जाते, मात्र त्याची चर्चा ऑप्शन्स या प्रकाराची माहिती घेतल्यानंतरच करूया. यापुढील पोस्टमध्ये मूळ गुंतवणूकीच्या प्रमाणात हेजींग करताना फ्युचर्स मध्ये किती मोठी पोझिशन घ्यावी हे बघुया.

Read more »