Share/Bookmark

१४ मे, २०१४

खरोखरच 'अच्छे दिन' येणार का...?

मित्रहो,
बर-याच दिवसात ब्लॉग अपडेट केला नाही. मात्र निवडणूक निकालापूर्वीच्या आठवड्यात बाजाराने  विलक्षण उसळी मारलेली आहे. निफ्टीने ७००० च्याही पुढे धडक मारली आहे आणि १६ मे च्या निकालानंतर काय होणार याची उत्सुकता प्रत्येक गुंतवणूकदार/ ट्रेडरला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर थोडे लिहावेसे वाटतेय.
सुमारे दोन वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल २०१२ मध्ये या ब्लॉगवर मी गुंतवणूकीसाठी "बचावात्मक परंतु उत्तम दर्जाच्या शेअर्स " विषयी लेख लिहीला होता .(तो लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा )
 त्यात मी उल्लेख केलेल्या  शेअर्सनी तेव्हापासून ते आजपर्यंत विशेषतः बाजार नवीन उच्चांकावर असताना कशी कामगिरी केली आहे ते बघुया.
१) आयटीसी - दोन वर्षापूर्वी २३६ रु.ला मिळणारा आणि एफएमसीजी सेक्टरमधील एक बचावात्मक समजला जाणारा  हा शेअर आज ३६५ रु. झाला आहे. म्हणजेच दोन वर्षांतच सुमारे दीडपट वाढ आणि दोन डिव्हीडंड !
२) हिंदुस्तान लीवर - आयटीसीच्याच सेक्टर मधील हा शेअर दोन वर्षापूर्वी ४०६ रु.ला ला मिळत होता आणि आजची किंमत आहे ५७७ रु. म्हणजेच येथेही जवळजवळ दीडपट वाढ आणि चार वेळा डिव्हीडंड !
३) टायटन कं. -  तेव्हाची किंमत २३८ रु. आणि सध्याचा भाव २९८ रु.  म्हणजे दोन वर्षात सव्वापट आणि दोन डिव्हीडंड !
४) नेस्टले इंडीया- तेव्हाची किंमत ४९२० रु.  आणि आजची किंमत ४७३८ रु. म्हणजे येथे मात्र बिल्कूल वाढ दिसत नाही मात्र या दोन वर्षात कंपनीने सहावेळा डिव्हीडंड दिला आहे.
५) कोलगेट - दोन वर्षापूर्वी ११०० रु.ला मिळत असलेला हा शेअर सध्या १४२० रु.चा भाव दाखवतोय. म्हणजे सुमारे सव्वापट वाढ आणि दोन वर्षांत तब्बल सहावेळा डिव्हीडंड !
६) एलआयसी हाऊसींग फायनान्स - तेव्हाची किंमत २६५ रु. व सध्याचा भाव २९५ रु. म्हणजे ११ टक्के वाढ आणि दोनवेळा डिव्हीडंड.
७) बॅंक ऑफ बरोडा - तेव्हाचा भाव ७८७ रु. आणि सध्याचा भाव ९०० रु. म्हणजे १४ टक्के वाढ आणि तीन वेळा डिव्हीडंड
वरील आकडेवारी वरून असे दिसते कि नेस्टले इंडीया चा अपवाद वगळता इतर सहा कंपन्यांनी दोन वर्षांच्या काळात किमान ११ टक्के ते कमाल सुमारे ५० टक्के वाढ दाखवली आहे. येथे पुन्हा हे लक्षांत घ्या कि या सर्व कंपन्या वाईट काळातील स्वीकारलेल्या बचावात्मक धोरणाचा भाग म्हणून निवडलेल्या सुरक्षीत कंपन्या होत्या. त्या दृष्टीने ही वाढ उत्तमच म्हणावी लागेल. तेव्हा जर खरोखरच "अच्छे दिन " आले तर पुढील तीन वर्षांत या कंपन्यांमध्ये अधिक वाढीला नक्कीच वाव आहे,तेव्हा या कंपन्या यापूढेही होल्ड करायला हरकत नाही.
असो. आता निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीचा अंदाज घेवूया. गेल्या आठवड्यातील वाढ ही विलक्षण म्हणावी लागेल. निफ्टी व सेन्सेक्सने पूर्वीची सर्व रेकॉर्ड्स तोडली आहेत. मात्र खरा प्रश्न आहे तो निवडणूक निकालानंतरही बाजार असाच मजबूत राहील कि अपेक्षाभंग होवून कोसळेल हा !
मजबूत सरकार आले तर बाजार सध्याच्या पातळीच्या खाली जाण्याची शक्यता कमी आहे, मात्र मजबूत सरकार आल्यास तो सतत वाढत राहील असे काही नाही. सध्या बाजार अशा पातळीवर आहे कि पूर्वी कधीही नव्हता, त्यामुळे टेक्निकल लेव्हल्सना येथे फार महत्व उरत नाही कारण निफ्टी ६८०० च्या वरील प्रदेशात नुकताच पोचलाय आणि या संपूर्णपणे नव्या प्रदेशात टेक्निकल लेव्हल्स तयार व्हायला काही काळ जावा लागेल असे मला वाटते.
फक्त एनडीएचे सरकार येणार अशा हवेमुळे रुपया वधारला आहे आणि जेवढा बाजार वाढायचा तेवढा वाढून झाला आहे. आता १६ ता.च्या प्रत्यक्ष निकालासाठी तो येथे रेंगाळणार आहे. जर निकाल अपेक्षेप्रमाणे लागले व निर्णायक बहूमतासह सरकार स्थापन झाले तर तात्कालिक अशी उसळी मिळू शकेल मात्र जोपर्यंत नवे मंत्रीमडळ कारभार संभाळून प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय वा तशा घोषणा करत नाही तोपर्यंत फार अधिक वाढीची अपेक्षा करता येणार नाही.
समजा कोणालाच पूर्ण बहूमत मिळाले नाही तर बाजार कोसळेल हे नक्की. अशा परिस्थितीत निफ्टी त्वरीत ६८०० ची पातळी गाठेल आणि काही काळात  ६३०० पर्यंत घसरू शकेल.
मात्र असे झाले तरी आपल्याकडील वरील डीफेन्सीव्ह शेअर्स असलेले विकण्याची गरज नाही. रुपयाची पुन्हा घसरण झाली तरी अशा वाईट काळासाठी आयटी, फार्मा इ. शेअर्समध्येही धोका कमी असतो.
बाजाराने एका नव्या 'बुलरन' ला सुरुवात केली आहे असे मत प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मांडले आहे. सध्या निफ्टी चा पी/ई (प्राईस/अर्निंग) रेशो अजूनही १९ च्या आसपास आहे आणि त्या अनुषंगाने निफ्टीमध्ये अजूनही वाढीला वाव आहे. जोपर्यंत निफ्टी पी/ई हा २३ ते २५ पर्यंत वाढत नाही तोपर्यंत सर्व शेअर्स विकून टाकण्याची वेळ नक्कीच आलेली नाही. अशा परिस्थितीत काही कारणाने बाजारात मोठी घसरण झाली तरी उत्तम शेअर्स घेण्याची ती एक संधी असेल असेच मला वाटते.
सध्या तरी आपण -'अच्छे दिन आनेवाले हैं'  असेच मानून चालूया ! सर्वांना शुभेच्छा !!