Share/Bookmark

११ डिसें, २०१२

"ऑप्शन्स (भाग १)" - असंख्य पर्याय, अविरत संधी !ब-याच दिवसांपासून काही वाचकांनी कॉल व पुट याविषयी माहिती देण्याची विनंती येथे केली होती. शेअरबाजारात गुंतवणूकीला सुरुवात करताना साधारणपणे म्युचुअल फंडापासून सुरुवात करून मग इक्विटी, ऑप्शन्स व नंतर शेवटी फ्युचर्स अशा क्रमाने जाण्याचा सल्ला दिला जातो. कमीतकमी धोका पत्करत पुढे जाण्याच्या दृष्टीने हा क्रम ठीक असला तरी बाजाराविषयीची समज व वाढत जाणारे भान या दृष्टीने ऑप्शन्स हे शेवटी येतात असे मला वाटते.

माझ्या मते इक्विटी, फ्युचर्स आणि निरनिराळ्या ट्रेडींग स्ट्रेटेजीज यांचा काही वर्ष भलाबुरा अनुभव घेतल्यावर, बाजाराचा एक वेगळा अंदाज येत जातो, तसेच अशी एक स्थिती येते कि बाजाराच्या शॉर्टटर्म मूव्हमेन्टविषयी एक प्रकारची उदासीनता वा स्थितप्रज्ञता येत जाते. बाजाराची उसळी वा तीव्र घसरण यांचे विशेष काही वाटेनासे होते. याचा अर्थ असा नव्हे कि अशा अनपेक्षीत हालचालींमुळे नुकसान होत नाही, मात्र अशा हालचाली गृहीत धरून, "सरावाने, अनुभवाने कुठल्याही परिस्थितीत नियमीतपणे फायदा उठवता आला तर किती बरे !' असे काहीसे विचार मनात येवू लागतात. त्यासाठी काही स्पेशल स्ट्रॅटेजी शोधण्याचा मन प्रयत्न करू लागतं ....

-मित्रांनो, मग हीच ती वेळ असते- "ऑप्शन्स.." या असंख्य पर्याय, अविरत संधी असणा-या अनोख्या क्षेत्राची ओळख करून घेण्याची !

ऑप्शन्स या एका मोठ्या विषयाला हात घालताना - मी अशी ओळख कितपत नीटपणे करून देवू शकेन याची मनात शंका आहे, मात्र आपणां सर्वांच्या पाठिंब्यावर हळू हळू हे जमेल असा विश्वासही आहे.

  हे एक चांगले काम असल्याने ते सुरु करायला मुहुर्ताची वाट न पहाता आजच ते सुरु करत आहे. चांगले काम असे म्हणण्याचे कारण शेअरबाजारात ख-या अर्थाने एक कसलेला ट्रेडर व्हायचे असेल तर ऑप्शन्स समजून घेवून त्यामध्ये प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. असे प्राविण्य मिळवलेत कि उतारवयात, हातपाय थकल्यावरही तुम्ही नियमीत कमाई करू शकाल ! एवढेच नव्हे तर तुमचा नातु तुम्हाला सल्ला विचारत राहील, रिटायर्ड असलात तरी कमावते असाल, आणि घरातला तुमचा मान कधीही कमी होणार नाही !

असो. प्रथम ऑप्शनची व्याख्या काय आहे हे बघुन मग सविस्तर माहिती घेवूया.

ऑप्शनची व्याख्या – ऑप्शन म्हणजे एक असे कॉन्ट्रॅक्ट वा करार आहे, कि जे लिहून देणारा (Seller or Writer) हा, ते कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणा-यास (Buyer) एखादी ठराविक वस्तू किंवा मालमत्ता (Underlying), ठराविक किंमतीत (Strike price or Exercize price), ठराविक मुदतीपर्यंत, (कॉल ऑप्शनच्या बाबतीत) खरेदी करण्याचा, वा (पुट ऑप्शनच्या बाबतीत) विक्री करण्याचा हक्क(Right) देतो, मात्र कॉन्ट्रॅक्टनुसार तशी खरेदी/विक्री करण्याचे बंधन (Obligation) मात्र खरेदी करणा-यावर नसते.

या हक्काच्या(Right) बदल्यात असे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट लिहून देणा-यास (Writer) ते खरेदी करणा-याकडून (Buyer) काही रक्कम (Premium) अदा केली जाते आणि बदल्यात ते कॉन्ट्रॅक्ट पाळण्याचे बंधन मात्र विक्री करणा-यावर रहाते.

या व्याख्येवरून सारे काही स्पष्ट होणार नाही, म्हणून एक उदा. घेवून मी नंतर स्पष्ट करेनच, मात्र तूर्त एवढेच लक्षांत घ्या कि - ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणाराला प्रिमियम भरावा लागतो पण त्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणे बंधनकारक नसते, याउलट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट विक्री करणारा हा प्रिमियमची रक्कम मिळवत असतो, मात्र त्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्ट पाळणे बंधनकारक असते.ऑप्शन्सचे वेगळेपण-

१) ऑप्शन्स हे मुख्यत्वे हेजींगसाठी वापरले जात असले तरी एक स्वतंत्र ट्रेडींग स्ट्रॅटेजी म्हणूनही वापरता येतात.

२) आपले नुकसान मर्यादीत ठेवण्याची उपजतच सोय असणारे ऑप्शन्स हे इन्स्ट्रुमेन्ट आहे. म्हणजे वेगळा स्टॉपलॉस लावण्याची गरज (ऑप्शन्स खरेदी करणा-यांना) पडत नाही.

३) अमर्यादीत फायदा तसेच अमर्यादीत तोटा अशा दोन्ही वैशिष्ट्यांमुळे योग्य काळजी घेतल्यास अफाट संधी.

४) बाजाराची दिशा कुठलीही असली तरी फायद्याच्या संधी नेहमी उपलब्ध.

५) फ्युचर्सच्या तुलनेत कमी मार्जिनमध्ये इंडेक्स ट्रेड करण्याची क्षमता.

६) ऑप्शन्सची विक्री (Writing) करून थोडा पण नियमीत फायदा मिळवण्याची संधी. आता एका उदाहरणाने ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते नीट समजून घेवूया. समजा मला एक टीव्ही खरेदी करायचा आहे. मी चौकशीसाठी एका शोरूममध्ये जातो आणि एक ठराविक मॉडेल सिलेक्ट करतो. त्याची किंमत रु.२०,००० आहे, मात्र येत्या काही दिवसांत टीव्हीच्या किंमती उतरणार असल्याचे मी ऐकले आहे, त्यामुळे मी लगेच खरेदी न करता विक्रेत्याला सांगतो कि मी थोड्या दिवसांनी येतो आणि टीव्ही खरेदी करून घेवून जातो. त्यावर तो विक्रेता म्हणतो कि साहेब, थोड्या दिवसांनी आलात तर चालेल, मात्र हे मॉडेल तेव्हा उपलब्ध असेलच असे नाही तसेच किंमती वाढल्या तर तुम्हाला त्या दिवशी असलेली किंमत द्यावी लागेल. मला तर हेच मॉडेल आवडले आहे आणि खरेदी तर आता करायची नाही, तर उतरलेल्या किंमतीत नंतर करायची आहे, मात्र विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार किंमती वाढण्याचीही शक्यता आहे. ;-) त्यामुळे मी विचारात पडलो.

   शेवटी तो विक्रेता एक पर्याय माझ्यापुढे ठेवतो तो असा - या महिना अखेरपर्यंत तो माझ्यासाठी हे मॉडेल याच किंमतीत राखून ठेवायला तयार आहे, मात्र त्याबदल्यात मी हमी म्हणून त्याला १००० रु. द्यावेत. म्हणजे मी आत्ता फक्त १०००रु. भरून या महिनाअखेर पर्यंत ते मॉडेल त्याच किंमतीत खरेदी करण्याचा हक्क विकत घ्यायचा आहे !

मग असे १०००रु.भरून मी त्याच्याकडून करार करून पावती घेतली. त्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत कधीही मी जर त्याच्याकडे गेलो, तर त्याने दरम्यानच्या काळात टीव्हीच्या किंमती अगदी कितीही वाढल्या असल्या तरी ते मॉडेल मला २०,०००रु. मध्येच देणे त्याच्यावर बंधनकारक आहे. म्हणजे असा करार केल्याने २२,०००रु.चा टीव्ही मला २०,०००रु.तच मिळणार आहे. याउलट जर मी त्या मुदतीत त्याच्याकडे गेलो नाही तर सदर हमीचे १०००रु. हे त्याला मिळणार आहेत.

पण समजा महिनाभरात टीव्हीच्या किंमती २०००रु.ने उतरल्या तर? तर मी त्याच्याकडे जायचे कारणच उरणार नाही, कारण दुस-या दुकानातून मला तो टीव्ही १८,०००रु.तच घेता येइल. म्हणजे त्याला दिलेले हमीचे १०००रु. वजा जावूनही मला १०००रु. फायदा मिळेल.

आता एक शक्यता विचारात घ्या- समजा महिना पुरा होण्याआधीच टीव्हीच्या किंमती २०००रु.ने वाढल्या आहेत, पण दरम्यान मला टीव्ही घ्यायचा विचार काही कारणाने रद्द करावा लागला तर ? अशा वेळी १०००रु.हमी रक्कम भरून मी मिळवलेला २०,०००रु.त टीव्ही खरेदीचा हक्क फुकट जाईल कि नाही ?

पण दरम्यान माझ्या ओळखीच्या एका माणसालाही टीव्ही घ्यायचा असल्याचे मला कळल्याने मी ती हमीची पावती त्याला थोड्या कमी पैशात उदा. ७००रु.त विकून टाकतो. आता ती पावती घेवून त्या हमीनुसार तो माणूस त्या शोरूममध्ये तो २२,०००रु.चा टीव्ही २०,०००रु. मध्ये घेवू शकेल ! अशा प्रकारे त्या माणसाचे १३००रु. वाचले, तर माझ्या हमी रकमेपैकी निदान ७००रु. मला परत मिळाले.

आणखी काही शक्यता- समजा मला टीव्ही घेणे रद्द करावे लागले आणि दरम्यान त्या टीव्हीच्या बाजारातील किंमती हळूहळू उतरल्या किंवा स्थिर राहिल्या तर ? म्हणजे आता या स्थितीत माझ्या हमी पावतीला ७००रु.तही कोणी खरेदी करणार नाही. मला ती कमी किंमतीत विकावी लागेल. म्हणजेच मुळात १०००रु. च्या हमी पावतीची बाजारातील किंमत ही, दिवसागणिक गि-हाईक मिळण्याची शक्यता कमी होत गेल्याने कमी कमी होत जावून महीना अखेर शून्य होइल !  

वरील उदाहरण नीट वाचल्यावर आता ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची सुरुवातीला दिलेली व्याख्या पुन्हा एकदा नीट वाचा बरं ! आता मला खात्री आहे कि ऑप्शन ही संकल्पना एव्हाना नक्की आपल्या ध्यानात येवू लागली असेल. तसे असेल तर पटापट या ब्लॉगला LIKE करा बरं !!

यानंतर आणखी सविस्तर स्पष्टीकरण, तसेच कॉल आणि पुट म्हणजे काय हे बघुया पुढील पोस्टमध्ये !


1 comments:

  • Unknown says:
    १२ डिसेंबर, २०१२

    पुढच्या पोस्ट ची वाट पाहत आहोत.