Share/Bookmark

२९ सप्टें, २०१८

तीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची !

  माझ्या नियमित वाचकांना आठवतच असेल कि या वर्षाच्या सुरुवातीलाच मी लिहिले होते कि निफ्टी पी/ई रेशो हा 27 पेक्षा जास्त झालेला आहे आणि आता मार्केट खूपच महागले आहे तेव्हा याहून फार जास्त वाढेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा अधिकांश शेअर्स विकून आपला पैसा बँक एफ डी सारख्या सुरक्षित. ठिकाणी वा इतरत्र गुंतवावा आणि मार्केट खाली येण्याची वाट बघावी.

मी हे लिहील्यानंतरही सहा महिने मार्केट थोडे कन्सॉलिडेट होत होते व थोडे वाढलेही. शेवटी तर निफ्टी पी/ई रेशो 28 च्याही वर गेला आणि अखेर सप्टेंबरमध्ये व्हायचे तेच झाले .
बाजाराचा गुणधर्मच असा असतो कि दर वेळेस तेजीच्या शिखरावर असताना वा तीव्र मंदीमध्ये सर्वसामान्यांना असे वाटत राहाते कि यावेळी काहीतरी निराळे होणार . 2008 प्रमाणे आता होणार नाही व आताची परिस्थिती निराळी आहे म्हणून. 
याच मानसिकतेचा फायदा घेऊन गेले सात आठ महिने विशेष चांगली काहीही बातमी नसताना देखील बाजार अत्युचच पातळीवर झुलवत ठेवला गेला आणि मोठे प्लेअर्स त्यांच्याकडील शेअर्स याचवेळी हळूहळू विकत गेले. दरवेळी अगदी असेच होत असते फक्त कारणे वेगवेगळी असतात . चार्ट पॅटर्न थोडेफार निराळे दिसतात. पण मूलभूत सत्य हेच असते कि अतीउंचावर टिकून राहणे फार काळ जमत नसते.
अनेकांचा असा विश्वास असतो कि थेट शेअर्स न घेता म्युच्युअल फंड वा सिप च्या माध्यमातून पैसे गुंतवले तर धोका नसतो म्हणून. पण हे अर्धसत्य आहे. फंडाचा पैसा हा बाजारातच गुंतवलेला असतो आणि कितीही उत्तम शेअर्स मध्ये ही गुंतवणूक असली तरी हे उत्तम शेअर्सही मंदीच्या झळीपासून अलिप्त राहू शकत नाहीत.
एक मात्र खरं कि उत्तम शेअर्स दीर्घावधीत पुन्हा जुनी उंची गाठतात व त्यापुढेही वाढू शकतात. पण कळीचा मुद्दा हाच आहे कि दरम्यान जो दोन ते तीन वर्षांचा मंदीचा कालावधी असतो तेवढ्यापुरते तरी हे उत्तम शेअर्ससुद्धा निगेटिव्ह रिटर्न्स देण्याची शक्यता अधिक असते
मग तेवढ्या काळापुरते हे पैसे बँक एफ डी सारख्या ठिकाणी फिक्स इन्कम मध्ये गुंतवले तर त्यात वाढ होत राहील आणि खूप स्वस्ताईच्या काळात म्हणजे निफ्टी पी/ई 15 पेक्षा खाली गेल्यावर हाच पैसा त्याच उत्तम शेअर्समध्ये गुंतवता येइल व त्याच रकमेमध्ये अधिक शेअर्स खरेदी करता येतील.
अर्थात ज्यांनी आधीच सिप द्वारे गुंतवणूक सुरु केली आहे त्यांनी बाजार उतरत असताना सिप थांबवू नये तर सुरु ठेवणेच हिताचे. मात्र नव्याने सिप सुरु करण्याची ही वेळ नव्हे.
सिप योजनासुद्धा बाजार स्वस्त असताना सुरु केली तर तूलनेने लवकर नफ्यात येते हाच अनुभव आहे.

हल्ली दुसरा एक चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे डॉलारच्या तुलनेत घसरलेला रुपया. याकारणाने अनेक जण बाजारात गुंतवणूक धोक्याची मानत आहेत.मात्र याबाबत माझे मत अगदी विरुद्ध आहे.
घसरत्या रुपयामुळे महागाई वाढते व सर्वच वस्तू उत्पादने तसेच कमोडिटीज व सेवा (सर्व्हिसेस ) या महागतात हे सर्वानाच माहीत आहे.
आता असा विचार करा कि आपण एका खाद्यपदार्थ बनवणार्या कंपनीचा शेअर घेतो म्हणजे नेमके काय करतो ? तर त्या कंपनीचे छोटेसे मालकच बनतो. कंपनीची उत्पादनाची जी क्षमता आहे ती क्षमताच छोट्या प्रमाणात का होईना आपण धारण करत असतो. वाढत्या महागाईमुळे त्या उत्पादनाची किंमत वाढणारच असते आणि उत्पादक म्हणजे मालक अशा वाढीव किमतीला उत्पादन विकून फायदा मिळवणारच असतात.
तीच गोष्ट आहे सेवा पुरवण्याची. अमूक एक सेवा महागाईमुळे स्वस्त झाली असं
कधी आपण ऐकलंय का ? तर सर्व प्रकारच्या सेवासुद्धा घसरत्या रुपयामुळे महागच होत असतात.
याचाच अर्थ असा कि शेअर धारण करणे म्हणजे अप्रत्यक्ष रित्या उत्पादन व सेवा पुरवण्याची क्षमताच धारण करण्यासारखे असल्याने ही क्षमता महागली कि शेअरची किंमत नक्कीच वाढणार असते.
उत्तम कंपन्यांची उत्पादने व सेवा या कितीही महाग झाल्या तरी लोक त्यांचा वापर करणारच आहेत. व अशा कंपन्यांना फायदा होतच राहाणार आहे .
तेव्हा डॉलर रूपया दराबाबत मिडीया मध्ये व राजकीय ओरड होत असली तरी 
कंपन्या फायदा कमावण्याचे थांबवणार नाहीत. मग चढत्या भावाच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवायचा कि घसरत्या चलनाला धरून राहायचे हे आपण ठरवायचे आहे.
एक मात्र खरे कि अशा निगेटीव्ह बातम्या येत असताना व 2019 हे निवडणूक वर्ष येत असल्याने मार्केट सावधगिरी बाळगेल.आक्रमक खरेदी कुणीच न केल्याने वीकनेस राहील .तशात एकूणच मार्केटने शिखर आधीच गाठल्याने कदाचित बेअर मार्केट सुरु झाले तर आता दोन तीन वर्षे खाली येण्याची वा नरमाईचीच शक्यता जास्त असेल. मात्र केवळ रुपया घसरला म्हणून बाजार कायम पडत रहाणार नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
शेवटी एकच सांगतो कि 1990 पासून रुपया दरवर्षी सरासरी पाच टक्के घसरत आहे मात्र याच काळात सेन्सेक्स ने तब्बल वार्षिक 14 टक्के वाढ दाखवली आहे हे नाकारता येईल का ?

Read more »