Share/Bookmark

२२ फेब्रु, २०१५

बजेटच्या निमित्ताने .......

  बरेच दिवसात येथे काही लिहीलेले नाही मात्र २८ ता. ला सादर होणारे बजेट ही लिखाणाची चांगली संधी चालून आलेली आहे. केन्द्रात नवीन सरकार आल्यापासून व खरेतर त्या आधीपासूनच बाजाराने मोठी घोडदौड केली आहे. त्यामध्ये खनिज तेलाच्या घसरलेल्या किंमती पासून ते सरकार कडून उद्योगक्षेत्राला असलेल्या अपेक्षा आणि पंतप्रधान मोदींनी परराष्ट्रातून होणा-या गुंतवणूकीसंबंधात केलेल्या वेगवान हालचालींचा वाटा होता. मात्र  दिल्ली निवडणूक निकाल आणि एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांच्या प्रतिकूल प्रतिक्रियेनंतर एकीकडे सरकारवरील दडपण वाढलेले आहे, आणि बाजाराला अनुकुल असे बजेट देण्याची जबाबदारीही वाढलेली आहे. त्यामुळे थोडीशी अनिश्चिततेची परिस्थिती असुन बाजारानेही उलटसुलट दिशा दाखविण्यास सुरुवात केलेली आहे. कदाचित बजेटच्या प्रतीक्षेमुळेच बाजाराची गती रोखली गेली असून, बजेटनंतरच बाजार आपली पुढील चाल स्पष्ट करेल असे दिसते आहे.

        अशा परिस्थितीत सामान्य ट्रेडरला एकीकडे बजेटनंतरच्या संभाव्य तेजीचा मोह पडतो तर दुसरीकडे जर बजेट बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नसले तर होणा-या पडझडीच्या शंकेने तो आपला आत्मविश्वास गमावून बसतो. काहीजण तर सरळ बजेटच्या आठवड्यात बाजारापासून दूर रहाणे पसंत करतात. त्यांचे अगदीच चुकते असे मी म्हणणार नाही, कारण बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांच्या वाक्यावाक्यासरशी बाजारात तेजीमंदीच्या लाटा येत असतात. त्यात ट्रेडींग करणे नक्कीच धोक्याचे असते.
याउलट स्थिती म्हणजे, बजेट सादर झाल्यावर बाजार कोणत्यातरी एका दिशेला मोठी हालचाल दाखवेल अशी शक्यता असते व या मोठ्या हालचालीचा फायदा उठविण्यासाठी ऑप्शन बायर्स उत्सुक असतात. खरे सांगायचे तर बजेटच्या आधी, मोठ्या प्रमाणावर कॉल आणि पुट अशा दोन्हीमध्ये झालेल्या खरेदीमुळे  प्रिमिअम ब-यापैकी वाढल्याने अशी खरेदी महागडी ठरते. उदा. निफ्टी ९००० असताना बजेट सादर होणार असेल तर लॉन्ग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजीला अनुसरून ९००० चे कॉल व पुट अशा दोन्ही ऑप्शनमध्ये , किंवा यापेक्षा थोडा स्वस्त पर्याय हवा असेल तर ९१०० चे कॉल ऑप्शन्स आणि ८९०० च्या पुट ऑप्शन्समध्ये  बजेटनंतर मिळणा-या फायद्याच्या आशेने खरेदी होतच असते. मात्र अशा वाढलेल्या प्रिमिअम मुळे महाग झालेल्या दोनही ऑप्शन्सच्या किंमती या,  वोलॅटिलिटी जशी कमी होत जाते तशा वेगाने रोडावत जातात. तेव्हा बजेट नंतर थोड्या कालावधीतच बाजाराने कुठलीतरी एक दिशा राखून मोठी झेप घेतली तरच फायदा होतो. अन्यथा महिना अखेरीची वाट बघत न बसता, वेळीच उरलासुरला प्रिमिअम विकण्यावर समाधान मानावे लागते. या सा-या जर-तर च्या गोष्टी आहेत आणि शेवटी फायदा मिळणे हे ज्याच्या त्याच्या अंदाजावर आणि नशीबावर ठरते असेच मला वाटते.
तेव्हा असे ऑप्शन खरेदी करणे अगदीच चुकीचे नसले तरी प्रत्येकाने ऑप्शन बायर्स सारखाच विचार करण्याची काही आवश्यकता नाही.
तेव्हा मार्केट कुठे जाईल याचा अंदाज बांधत न बसता आपण थोडा वेगळा विचार करूया.  
खरे तर बजेट सादर झाल्यानंतरही ते नेमके कसे आहे यावर कुणातच एकमत नसते. शेवटी बाजारच ते ठरवेल असे म्हणावे, तर बजेटनंतरही आठवडाभर बाजारात प्रचंड वोलॅटिलिटी असल्याचा पुर्वानुभव आहे.
अशा परिस्थितीत निश्चित असे काही असलेच तर ती असते बाजारात येणारी वॉलॅटिलिटी ! कदाचित उद्याच्या सोमवारीच बाजाराच्या वेगवान हालचालींना प्रारंभ होईल. बजेटच्या दिवशी तर वॉलॅटिलिटी कळसाला पोचेल व नंतर कमी होत जाईल. या वाढलेल्या वोलॅटिलिटीचा काही फायदा उठवता येइल का ?
अर्थातच येइल. थोडेसे निरीक्षण आणि योग्य स्टॉपलॉस लावण्याची सावधगिरी बाळगली तर हे शक्य आहे. बजेटच्या दिवशी मार्च महिन्याच्या कॉल आणि पुट ऑप्शन्सच्या अवास्तव वाढलेल्या प्रिमिअमचा फायदा घ्यायला हरकत नाही. उदा. बजेटच्या दिवशी वा त्यानंतरच्या सोमवारी निफ्टी ९००० असेल, तर वाढलेल्या वोलॅटिलिटी मुळे ९५०० किंवा ९६०० चे कॉल्स तसेच ८५०० किंवा ८४०० चे पुट असे दूरचे ओटीएम ऑप्शन्ससुद्धा ब-यापैकी महाग झालेले असतील. असे महाग झालेले ऑप्शन्स विकून त्याचा प्रिमिअम खिशात टाकता येईल. ( कृपया लक्षांत घ्या कि ही माझी शिफारस नसून आपल्या विचारांना चालना देण्यासाठी दिलेले फक्त एक उदाहरण आहे. प्रत्यक्षात त्यावेळच्या परिस्थिती प्रमाणे स्ट्राईक प्राईजेस ची निवड करावी लागेल.)
बजेट नंतरच्या आठवडाभरातच या ऑप्शन्स च्या किंमती उतरत जाण्याची शक्यता आहे. अगदी दूरच्या शक्यतेत समजा निफ्टी एकाच दिशेने सतत जात राहिला तर त्या परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून स्टॉपलॉस लावावा लागेल. असा स्टॉपलॉस हा नेमका कधी लावायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे, मात्र प्रत्यक्ष ट्रेड करण्याच्या आधीच ते ठरवून ठेवावे.
या व्यतिरिक्त निफ्टी फ्युचर्स मध्ये ज्यांच्या पोझिशन्स असतील त्यांनी मात्र त्यांच्या पोझिशन्सना अनुकुल अशी स्ट्रॅटेजी निवडावी लागेल. काही जणांच्या मते बजेट नंतर मार्केट मध्ये एक डीप येईल व त्यावेळी खरेदी करण्याची योग्य संधी असेल. तर काही जणांच्या मते मार्केट तशी खरेदीची संधी न देता बजेटनंतर वेगाने वाढत जाईल. दोनही मतांमध्ये तथ्य असले तरी एका गोष्टीवर मात्र बहुतांशी एकमत असलेले आढळते ते म्हणजे बाजाराची दिशा ही मध्यम कालावधीसाठी वरचीच राहील. तेव्हा बजेटचा विचार बाजूला ठेवला तरी आपल्याजवळ आधीपासून असलेले उत्तम शेअर्स मात्र विकण्याची घाई करू नका. आणि मार्केट वाढलेच तर एक डोळा सतत निफ्टी पी/ई रेशोवर ठेवून द्या !
सर्व वाचकांना बजेट निमित्ताने मनापासून शुभेच्छा !
HAPPY TRADING !!


Read more »