Share/Bookmark

७ डिसें, २०११

शेअरबाजाराचे तोंड पहाणार नाही असा निर्णय घेतला असेल तर ...........


मित्रहो,
       खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्भ येणे साहजिक आहे. आपल्यापैकी सर्वचजण या 'जागतिक' घसरणीमुळे कमी अधिक प्रमाणात तोटा झेलत असणार, पण असे असले तरी अशा वाईट काळामधून प्रत्येक वेळेला बाजार सावरत आलेला आहे हाच इतिहास आहे. तेव्हा सर्वप्रथम मला सांगायचे आहे कि निराश न होता वाट बघा. बाजार स्वस्त झालेला असताना खरेदी करणे मानसिकदृष्ट्या कठीण असते. मात्र काही खरेदी करता नाही आली तरी चालेल, पण हातातील 'उत्तम कंपन्यांचे शेअर्स' पडेल भावात विकण्याची चूक करू नका, कारण याच क्षणाची बाजारातले 'मोठे मासे' वाट बघत असतात.
       आता मी म्हटले कि 'उत्तम कंपन्यांचे शेअर्स...'- म्हणजे नेमके काय ?  उत्तम कंपन्या निवडण्याचे अनेक मार्ग आहेत, त्याप्रमाणे अभ्यास करूनच आपण त्यांची खरेदी केलेली असणार, तरीही तुमच्या मनात शंका असेल कि 'जेव्हा कधी बाजार चढेल तेव्हा माझ्याकडील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव नक्की वाढतील ना ?'
        आता असे वाटण्याला कारणही तसेच आहे- २००८ मधील मंदीपूर्वी जे शेअर्स तेजीचे नवनवे विक्रम करत होते- (आठवा... पुंज लोइड, डीएलएफ, सुझलोन, युनिटेक इ. अनेक)- ते शेअर्स काही वाईट
कंपन्यांचे नव्हते, मात्र २००९ मध्ये बाजार सावरला गेल्यानंतर आणि पुन्हा सेन्सेक्स २१००० झाल्यानंतरही हे काही शेअर्स पूर्वीची तेजी दाखवू शकले नाहीत. आजही यात गुंतवणूक असलेले माझे अनेक मित्र मला माहीत आहेत.
        तर हे सर्व सांगायचा हेतू हा कि ' सार्वत्रिक मंदीमध्ये आपलेकडील शेअर्स घसरले तर त्याला उपाय नसतो आणि दुःखही तितके होत नाही, मात्र बाजार चढत असतानाही 'फक्त आपलेकडील' शेअर्स
वाढत नसतील तर तीव्र दुःख होते...' मग सर्व शेअरबाजाराचाच राग येवू लागतो आणि अनेकजण निराशेने पुन्हा बाजाराचे तोंड न बघण्याचे ठरवितात. - माझे आजचे लिखाण अशाच मित्रांसाठी आहे.
 आता बाजार चढतो म्हणजे नक्की काय होते? आपल्याकडे सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांच्या आधारे वध-घट ठरवली जाते.  सेन्सेक्समध्ये BSE मधील निवडक ३०, व निफ्टीमध्ये NSE मधील
निवडक ५० शेअर्सच्या भावांनुसार निर्देशांक ठरवला जातो, हे आपल्याला माहीत असेलच. यात प्रत्येक कंपनीला एक ठराविक वेटेज (वजन) दिलेले असते. उदा. रिलायन्स, ओएन्जीसी, कोल इंडीया या काही
मोठ्या आकाराच्या कंपन्यांना जास्त वेटेज असते. साहजिकच जास्त वेटेज असलेल्या कंपन्याच्या भावामधील चढ-उताराचा निफ्टी वा सेन्सेक्सवर अधिक परिणाम होतो, आणि कमी वेटेज असलेल्या
शेअर्सच्या भावामधील चढ-उताराचा निर्देशांकावर तितकासा परिणाम होत नाही. याचाच परिणाम असा होतो कि, काही प्रमुख कंपन्यांमध्ये खरेदी होवून सेन्सेक्स वा निफ्टी वाढलेला तर दिसतो, मात्र तरीही कमी वेटेज असलेले काही शेअर्स न वाढता तसेच राहिलेले किंवा उतरलेलेही असू शकतात. आता बाजारातले 'मोठे मासे' कधी कुठल्या शेअर्समध्ये  खरेदी करतील हे आपल्याला नेहेमीच कळू शकत नाही. आणि म्हणूनच सामान्य गुंतवणूकदार निराशेचा धनी होतो.
 मग यावर उपाय काय? यावर एक 'ढोबळ उपाय' असा कि जास्त वेटेज असलेल्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक ठेवणे. (सेन्सेक्स मधील लेटेस्ट वेटेज ची यादी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)   पण मग काही उदाहरणे अशीही आहेत कि एखादी जास्त वेटेज असलेली कंपनी, उदा. रिलायन्स गेले २ वर्षभर बाजाराच्या तुलनेत पडेल भाव दाखवत आहे. आता काय करावे ?
मग चढत्या बाजारात तरी निर्देशांकानुसार नक्की चढत जाईल असा कुठला शेअर असेल का? - तर मित्रांनो,... होय, आहे...! त्याचीच माहिती आज घेवूया.
    बेन्चमार्क या असेट मेनेजमेंट कंपनीने २००८ च्या जानेवारीमध्ये भारतातील  Nifty BeES या पहिल्या ETF (एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड) ची स्थापना केली.
हा एक शेअर नसून, ETF असला तरी तो
NSE वर अगदी एखाद्या शेअरप्रमाणेच खरेदी अथवा विक्री करता येतो. म्हणजेच बाजारात कधीही  NiftyBeES चे अगदी एक युनिटही आपण खरेदी वा विक्री करू शकतो, कितीही काळ 'होल्ड' करून ठेवू शकतो.-
प्रत्येक NiftyBeES युनिट  हे रु.१० एवढ्या दर्शनी मूल्याचे(Face Value) असून बाजारातील त्याची किंमत ही निफ्टी निर्देशांकाच्या सुमारे एक दशांश (१/१०) एवढी असते. (किंवा आपण येथे 'युनिट' ऐवजी 'शेअर' म्हणायलाही काही हरकत नाही, कारण आपल्या दृष्टीने हा एखाद्या शेअरप्रमाणेच असून त्याप्रमाणेच बाजारात त्याचे व्यवहार होतात) म्हणजेच आजची निफ्टी इंडेक्सची किंमत ५००० असेल तर या NiftyBeEs ची बाजारातील किंमत साधारणपणे ५०० रु.च्या आसपास असते. जसा बाजार किंवा निफ्टी वर-खाली होइल तसाच हाही स्वस्त आणि महाग होत असतो, किंवा असेही म्हणता येइल कि  निफ्टीवरच हा आधारभूत असतो.
 
  
NSE वर याचा सिम्बोल 'NIFTYBEES'असा आहे, तर BSE वर याचा 'टिकर नं.' 590103 आहे. मात्र याचे व्यवहार NSE वरच करावेत, कारण BSE वर याचे  व्यवहार अतिशय मर्यादीत होतात म्हणजेच
Volume कमी असल्याने Bid price - Ask price मध्ये खूप तफावत राहून त्यामुळे योग्य किंमत न मिळण्याची शक्यता असते. एनएसई वर मात्र भरपूर Volume असतो.
   निफ्टीबीझ चे फायदे -
 # इतर कोणत्याही शेअरप्रमाणे आपण आपल्या ब्रोकरला सांगून सहजपणे खरेदी वा विक्री करू शकतो.
 # निफ्टीच्या म्हणजे बाजाराच्या चढउतारानुसार हा वर-खाली होत असल्याने Short Term वा Long Term दोन्ही प्रकारच्या ट्रेडर्सना सोयीस्कर.
 # निफ्टीच्या किंमतीच्या एक दशांश किंमतीस मिळत असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना सहज घेता येतो. (निफ्टी फ्युचर्सचे व्यवहार हे तुलनेने अधिक महाग असून Risky ही असू शकतात)
 # वरीलप्रमाणे ट्रेडींगसाठी सोयीस्कर असल्याने बाजारात उत्तम Volume असतात.
 # याची किंमत ही निफ्टीमधील ५० शेअर्सच्या किंमतीवर आणि त्यांच्या Demand-Supply वर थेट अवलंबून असून कोणा फंड मेनेजरच्या कामगिरीवर अवलंबून नसते.
 # निफ्टीबीझचा एक शेअर घेणे म्हणजे भारतातल्या ५० प्रमुख कंपन्यांमध्ये एकाचवेळी गुंतवणूक करण्यासारखे आहे. यामुळे सगळा पैसा एकाच कंपनीमध्ये वा सेक्टरमध्ये गुंतवला जात नाही, आणि  भांडवल नष्ट होण्याचा धोका रहात नाही.
 वरील सर्व फायद्यांमध्ये थोडासा तोटा असा आहे कि  निफ्टीबीझ हा इतर शेअर्सच्या तुलनेत मंद हालचाल करतो, कारण तो ५० शेअर्सशी निगडीत आहे. म्हणजेच निफ्टी १०० पोइन्टने हालेल तेव्हा निफ्टीबीझ साधारणपणे १० पोइन्टने हालेल, पण याला तोटा न म्हणता मी स्थिरता आणि सुरक्षितता म्हणेन !
 यापूर्वी 'निफ्टी पी/ई' आणि त्याआधारे करता येणारी गुंतवणूक याविषयी मी येथे लिहिलेले आपणास आठवत असेलच. मग आता जेव्हा 'निफ्टी पी/ई रेशो' स्वस्त होवून गुंतवणूक करावीशी वाटेल तेव्हा नक्की कुठला शेअर घ्यावा हा प्रश्न पडायला नको ...  निफ्टीबीझ घ्या आणि बाजार वाढेल तेव्हा हमखास फायद्याची हमी बाळगा !
शेअरबाजारात कधी कोणी फायद्याची हमी देत नसतो, मात्र 'चढत्या बाजारात तरी' नक्कीचा फायदा याद्वारे मिळवा आणि शेअरबाजाराचे तोंड पुन्हा पहाणार नाही असा निर्णय घेतला असेल तर पुन्हा एकदा
विचार करा ....!

Read more »