मित्रहो, याआधीच्या पोस्टमध्ये उत्तम दर्जाच्या शेअर्सचा उल्लेख मी केला होता. शेअरबाजारात गुंतवणूक करण्यातला अतिशय महत्वाचा भाग म्हणजे ज्यात आपला घामाचा पैसा ओतायचा त्या "शेअर्सची निवड" हे आपल्याला माहीतच आहे.
शेअर्सची निवड करताना त्या कंपनीचा म्हणजेच तिच्या बिझिनेसचा अभ्यास करणे आवश्यक असते, त्यालाच ' फंडामेंटल ऍनालिसीस ' म्हणतात. मात्र सर्वचजणांना असा अभ्यास करता येणे जमेल का ?
खरं सांगू का ? मलाही त्यातले फार काही कळत नाही.
मात्र 'फंडामेन्टल' म्हणता येईल अशा सर्वच बाबींचा अभ्यास तर सोडाच, पण एखाद्या महाकाय कंपनीच्या सर्व व्यावसायिक आणि आर्थिक आणि राजकिय बाबींची तसेच भविष्यातल्या योजनांची साधी माहिती - (म्हणजे खरी-खुरी) तरी पूर्णपणे सामान्य माणसापर्यंत पोचत असेल का याबाबत मला शंका आहेत.
मग माझ्यासारख्या अनेकजणांना बाजारात फायदा मिळवणे शक्यच नाही का? तर असे मात्र मुळीच नाही.
हा ब्लॉग अल्प मुदतीच्या (SHORT TERM) गुंतवणूकीला वाहिलेला असला तरी तशा प्रकारची SHORT TERM गुंतवणूक सुद्धा नक्की कुठल्या शेअर्स मध्ये करायची हे ठरवताना कंपनीच्या कामगिरीचा विचार करावाच लागतो. आणि आपल्याला माहितच आहे कि एखाद्या कंपनीच्या सर्व फंडामेन्टल्सचा परिणाम त्या शेअरच्या किंमतीवर होत असतो, सर्व चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब बाजारातल्या किंमतीवर पडतच असते हे तर "टेक्निकल ऍनलिसीस" चे मुळ गृहितक आहे.
मग याच आधारावर असेही म्हणता येइल कि (या आधीची पोस्ट कृपया पुन्हा वाचा )उत्तम कंपनीत केलेली गुंतवणूक ही दीर्घ मुदतीमध्ये फायदेशीर ठरायला हवी, म्हणजे ज्या कंपनीच्या शेअर्सची किंमत दीर्घ काळापासून स्थिरपणे वाढत आहे, ती कंपनी उत्तम आहे असे मानायला ढोबळ मानाने जागा आहे. प्रत्येक कंपनीची पूर्वीची कामगिरी यापुढेही अशीच राहील अशी खात्री देता येत नाही हे खरे असले तरी, अनेक वर्षापासून फायद्यात असणारी कंपनी ही आपत्काळासाठी साहजिकच मजबूत राखीव निधी बाळगून असते, तसेच त्यांचा बाजारातील सहभाग ( MARKET-SHARE) , उत्तम नांव व किर्ती (BRAND AND REPUTATION) तसेच गूडविल या गोष्टी सहजासहजी नाहीशा होत नाहीत, हे ही तितकेच खरे आहे. असो.
मग अशा कंपन्या पटकन कशा शोधता येतील ?
इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतल्यास ही माहिती सहज मिळू शकते, मात्र तेवढाही त्रास न घेता अगदी रेडीमेड माहितीसाठी "गूगल फायनान्स" या मोफत सेवेचा उपयोग करता येतो.
प्रथम सेन्सेक्समधल्या ३० वा निफ्टीमधल्या ५० कंपन्यांची यादी हाताशी असू द्या. या भारतातल्या प्रमुख आणि मोठ्या कंपन्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. किंवा आपल्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू बनवणार्या वा सेवा पुरवणार्या कंपन्यांची नावे आठवा बरं ! यातील काही नावे तर आपल्या विशेष ओळखीची आहेत, नाही का ? उदा. हिंदुस्तान लीवर, कोलगेट, टायटन , आणि अशी कितीतरी नावे तुम्हाला आठवतील. मग निम्मे काम तर झाले. आता असे करा -
इंटरनेट उघडून http://www.google.com/finance या लिंकवर जा. गूगल फायनान्सच्या या साईटवर जगातल्या प्रमुख मार्केट्सची अद्ययावत माहिती दिलेली असते.
( आकृती मोठी करण्यासाठी कृपया तीवर क्लिक करा )
वरील बाजूस दिसणार्या सर्च बार मध्ये NSE:ITC असे टाईप करा आणि सर्च करा. आयटीसी कंपनीच्या शेअरचा चार्ट आणि लेटेस्ट किंमत दाखवणारे पेज उघडेल. या चार्टच्या चौकटीमध्ये वरील बाजूस डाव्या हाताला ZOOM असे लिहिले आहे, त्यापुढे 1d 5d 1m 3m 6m..... असे पर्याय आहेत, याचा अर्थ १ दिवसाचा,५ दिवसांचा, १ महिन्याचा ...असे निरनिराळ्या कालावधीचे चार्ट उपलब्ध असून त्यातील 5y अशा पर्यायावर क्लिक करा, म्हणजे आयटीसीचा ५ वर्षांचा चार्ट आपल्यासमोर उलगडेल.
आता आपला माऊस या चार्टवरून मागे- पुढे सरकवल्यास त्या त्या काळातील आयटीसीची किंमत चौकटीत वरील बाजूस दिसेल. कर्सर चौकटीत एका ठिकाणी दाबून ठेवून सरकवल्यास पूर्ण चार्टही मागे पुढे सरकवता येतो. ( Thanks to Google ! )यायोगे सहजपणे गतकाळातील एखाद्या शेअरची किंमत पाहून आजपर्यंत त्यात किती वाढ झाली आहे हे पहाता येते.
याप्रमाणे निदान ५ वर्षाच्या कालावधीत स्थिरपणे वाढत गेलेल्या किंमतीचे शेअर शोधा. चार्टच्या वरील बाजूस असणार्या compare असे लिहिलेल्या चौकटीत NSE:NIFTY असे लिहून Add वर क्लिक केल्यास आपण पहात असलेल्या कंपनीच्या चार्टशी निफ्टी निर्देशांकाची तुलना करणारा चार्टही मिळेल. याचप्रकारे दोन वा अधिक कंपन्यांच्या चार्टची तुलनाही शक्य आहे. .मात्र शेअरच्या नावाआधी NSE: असे लिहायला विसरू नका. तसेच त्या त्या कंपनीचे NSE चे कोडनेम ठरलेले आहे ते अचूक लिहिल्यास पटकन हवा तो चार्ट उघडत येतो. थोड्याशा सरावाने हे सगळे सोपे व सहज होवून जाईल.
जेव्हा बाजार दिशा शोधत असतो, वातावरणात अनिश्चितता असते अशा काळात हळूहळू पण स्थिरपणे वाढ दाखवणार्या अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे मानसिक दृष्टीनेही फायद्याचे ठरते. या प्रकारची डिफेन्सीव्ह गुंतवणूक करण्यासाठी वरील प्रकारे अलिकडेच मी काही कंपन्या निवडल्या आणि त्यात गुंतवणूकही केली.
गेल्या ५ वर्षांमध्ये स्थिर व उत्तम वाढ दाखवणार्या (मला आढळलेल्या) काही शेअर्सची माहिती खाली देत आहे. तीव्र तेजी व तितक्याच तीव्रतेची मंदी दाखवणार्या या ५ वर्षांच्या काळातून, तावून सुलाखून निघालेल्या या कंपन्यांची ही माहिती मी उदाहरणादाखल देत आहे, कृपया ही माहिती "गुंतवणूक सल्ला" या अर्थाने घेवू नये. कदाचित आपल्याला अधिक उत्तम कंपन्याही सापडतील, तेव्हा आपण स्वतः शोध घेतल्यास अधिक आत्मविश्वासाने गुंतवणूक करू शकाल.
१) आयटीसी- APRIL 2007 मध्ये ७५ रुपयाच्या आसपास मिळत असलेला हा शेअर आज २३६ रु. किंमत दाखवतो आहे.(पांच वर्षांत तिप्पट-यात डिव्हिडंड धरलेला नाही !)
२) हिंदुस्तान लीवर- APRIL '07 -२०० रु. आज ४०६रु. म्हणजेच दुप्पट - ( डिव्हिडंड व स्प्लिट समाविष्ट नाही)
३)टायटन -APRIL'07 -सुमारे १००० रु. , आज रु.२३८ म्हणजेच २०११ मधील बोनस/स्प्लिट धरून २३८*२० =रु. ४७६० !-जवळ जवळ पांचपट वाढ !
४) नेस्टले इंडीया-जाने.१० - सुमारे २५०० (आधीची किंमत उपलब्ध नाही), आजची किंमत ४९२० रु. म्हणजेच २ वर्षातच दुप्पट !( डिव्हिडंड समाविष्ट नाही)
५) कोलगेट -Dec.'07- रु.४००, (आधीची किंमत उपलब्ध नाही), आजची किंमत- रु.११०० ! साडेचार वर्षांत जवळजवळ तिप्पट !
६) एलआयसी हाउसिंग फायनान्स - APRIL'07-रु.१४५, आजची किंमत २६५*५(स्प्लिट) =१३२५! पांच वर्षांत चक्क नऊपट !(डिव्हिडंड समाविष्ट नाही)
७) बॅंक ऑफ बरोडा -APRIL'07- 230 रु., आजची किंमत ७८७ रु. म्हणजेच तिपटीपेक्षा जास्त !(डिव्हिडंड समाविष्ट नाही)
या सर्व कंपन्या पुढील काळातही अशीच कामगिरी करण्याची शक्यता खूपच आहे नाही का ? अजून ५ वर्षांमध्ये म्हणजे २०१७ च्या एप्रिलमध्ये जर आपणांस भरघोस फायदा झाला तर "एन्जॉय" करतांना थोडी माझी आठवण पण ठेवा बरं का !
apla ha upakram khupach stutya ahe aplya karyala samasta marathi samajakadun khup khup shubhechha
Khupach chan ahe hi mahiti... Agadi samanyatalya samanyana suddha sahaj samajel asha bhashet ahe.... Thanks a lot..!
आभारी आहे. असेच प्रेम राहू द्या.