Share/Bookmark

१४ जुलै, २०१२

निफ्टी फ्युचर्स म्हणजे काय ?


  आपल्यापैकी अनेकजण आधीपासून निफ्टी फ्युचर्सचे व्यवहार करीत असतील याची मला कल्पना आहे, मात्र बहुतांश मराठी लोक अजूनही याकडे वळलेले नाहीत आणि याचे कारण माहितीचा अभाव हेच आहे. पूर्वीच्या तुलनेत आता फ्युचर्स ट्रेडींगसाठी आवश्यक असणारे मार्जिन मनी (क्रेडीट) बरेच कमी झाले असल्याने फ्युचर्स ट्रेडींग हे फक्त श्रीमंतांसाठी असल्याचे चित्र बदलून हल्ली ते सामान्यांच्या आवाक्यात आले आहे .म्हणूनच निफ्टी फ्युचर्स या प्रकारामध्ये
फायदा कमवण्याची व नुकसान भरून काढण्याची जी मुलभूत क्षमता आहे तिचा परिचय त्यातील संभाव्य धोक्यांसहीत आपल्याला असणे गरजेचे वाटल्याने याविषयी लिहीत आहे.

प्रथम निफ्टी म्हणजे काय ते बघुया. आपल्या राष्टीय शेअरबाजारात म्हणजेच NSE या एक्स्चेंजवर नोंदणी असलेल्या हजारो कंपन्यांपैकी निवडक  ५० कंपन्यांच्या बाजारातील भावावर आधारीत निर्देशांक म्हणजे निफ्टी हे तर आपल्याला माहीत असेलच. हा निर्देशांक म्हणजेच NSE INDEX चा उद्देश हा असतो कि निफ्टी किती आहे यावरून आजचा बाजार कसा आहे, कालच्या, गेल्या आठवड्याच्या, गेल्या महिन्याच्या वा वर्षीच्या तुलनेत किती वाढ वा घट दाखवतोय हे आपल्या पटकन लक्षांत यावे आणि बाजाराचा कल कळावा .
मात्र यातील सर्व ५० कंपन्या निर्देशांकाप्रमाणेच वाढ वा  घट दाखवतील असे नसते कारण निफ्टी इंडेक्स ही एक प्रकारची सरासरी आहे आणि यातल्या विविध कंपन्यांना निरनिराळे वेटेज आहे.
 या ५० कंपन्यांच्या कामगिरीवर निफ्टी हा आधारीत असल्यामुळे त्यातील एखाद्या कंपनीविषयी समजा वाईट बातमी बाजारात आली आणि त्या कंपनीचा भाव पडू लागला तरी निफ्टी हा त्या प्रमाणात पडण्याचे कारण नसते. एखाद्या अधिक वेटेज असलेल्या म्हणजे रिलायन्स किंवा ONGC सारख्या शेअर्समधील वाढीचा वा घटीचा  निफ्टीवर पडणारा प्रभाव थोडा जास्त असतो त्याउलट कमी वेटेज असलेल्या शेअर्समधील वाढीचा वा घटीचा निफ्टीवर तेवढासा प्रभाव पडत नाही. म्हणजेच एकाच कंपनीत गुंतवणूक असण्यापेक्षा निफ्टीमध्ये- पर्यायाने अनेक महत्वाच्या शेअर्समध्ये- गुंतवणूक करण्यात अधिक सुरक्षा असते असे म्हणता येइल, आणि तशी" गुंतवणूक" निफ्टीबीस  (बेन्चमार्क निफ्टी) च्या माध्यमातून कशी करता येते ते आपण पूर्वी बघितलेच आहे. मात्र निफ्टीबीस हा काहीसा संथ हालचाल करणारा असल्याने तसेच जास्त ब्रोकरेज पडत असल्याने बरेच जण त्याला टाळतातही !
मग निफ्टी मध्ये वेगाने तसेच कमी ब्रोकरेजसह "ट्रेडींग" करायचे असेल (येथे ट्रेडींग आणि "गुंतवणूक" यातील फरक लक्षांत घ्या !) तर निफ्टी फ्युचर्सचा पर्याय आहे. अर्थात कुठल्याही ट्रेडींगचे जसे फायदे तसेच तोटेही असतात आणि त्याविषयीच हे लिखाण आहे.
फ्युचर म्हणजे भविष्य वा आगामी काळ आणि अशा आगामी काळासाठी केलेला करार वा कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच "फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट' होय. निफ्टी फ्युचर्स म्हणजे ठराविक कालासाठी ( १ ते ३ महिन्यासाठी ) केलेले निफ्टी इंडेक्सचे असे कॉन्ट्रॅक्ट होय. अर्थातच यासाठी निफ्टीची किंमत  हीच आधारभूत असते आणि या संदर्भात निफ्टीला UNDERLYING असे संबोधले जाते.
निफ्टीची म्हणजेच UNDERLYING ची किंमत जशी वरखाली होइल तशीच निफ्टी फ्युचर्सची बाजारातील किंमत वरखाली होते असे ढोबळमानाने म्हणता येइल. ढोबळमानाने असे म्हणण्याचे कारण विविध काळाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी तसेच विभिन्न मार्केट कंडीशन्स मध्ये या दोघांमधील किंमतीचा फरक हा कमीजास्त असू शकतो. हा फरक अशासाठी असतो कि निफ्टीची भविष्यातील किंमत काय असेल त्याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे फ्युचर्समधे ट्रेडींग केले जाते- ही गुंतवणूक नसून " निव्वळ ट्रेडींग " आहे म्हणजेच अधिक आक्रमक प्रकारचे ट्रेडींग आहे हे येथे लक्षांत घ्या. म्हणूनच त्यात अंतर्भूत असलेल्या धोक्याची त्या ठराविक काळासाठी घेतलेल्या जबाबदारीची (Cost of Carry) किंमत म्हणून प्रत्यक्ष निफ्टी (spot) आणि निफ्टी फ्युचर्सच्या बाजारातील किंमतीत नेहमी फरक दिसतो.
येथे जास्त खोलात न जाता एवढे समजले म्हणजे पूरेसे आहे कि साधारणपणे सामान्य वा बुलीश वातावरणात निफ्टी फ्युचर्सची किंमत ह्री निफ्टीच्या (spot) किंमतीपेक्षा थोडी अधिक असते, - येथे या दोन्हीमधील फरकाला प्रीमीअम असे म्हटले जाते आणि बेअरीश म्हणजेच मंदीच्या वातावरणात फ्युचर्सची किंमत ही निफ्टीच्या ( spot) किंमतीपेक्षा कमी असते. याला  डिस्काऊंट असे म्हटले जाते.
निफ्टी फ्युचर्सचे व्यवहार हे एकाचवेळी तीन महिन्याचे -म्हणजे चालू महिना (उदा. जून -near month) पुढील महिना (जुलै -next month) आणि त्यापुढील महिना (ऑगस्ट- far month) अशा तीन काळासाठी करता येतात.  यापैकी कोणत्याही महिन्याचे कॉन्ट्रॅक्टची आपण खरेदी  वा विक्री करू शकतो. दर महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट हे त्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपते-(expiry). म्हणजेच जून महिन्याचे सर्व व्यवहार हे जूनच्या शेवटच्या गुरुवार पर्यंत कधीही करता येतात. गुरुवारी सुटी असेल तर त्याआधीच्या दिवशी expiry असते. जून सीरीजच्या Expiry च्या दुसर्याच दिवसापासून सप्टेंबर सिरीजचे (नवीन far month) व्यवहार सुरू होतात. अशा प्रकारे ३ महिन्याचे सायकल सुरू राहते.
निफ्टी फ्युचर्सचे व्यवहार हे  किमान ५० च्या संख्येने आणि त्या पटीतच करता येतात. म्हणजे ५० चा एक लॉट याप्रमाणे एक वा दोन वा अधिक लॉट खरेदी (वा विक्री) करता येतात. त्यामुळे एका लॉटची किंमत सध्याच्या भावानुसार ५२५० * ५० म्हणजे सुमारे अडीच लाखांवर इतकी होते. मग एकदम अडीच लाखाचा व्यवहार कसा करायचा ? दचकू नका. एक लॉट म्हणजे अडीच लाखाचा व्यवहार असला तरी तो करण्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे असण्याची गरज नाही- सुमारे २५००० रु.  (निरनिराळ्या ब्रोकरप्रमाणे थोडे कमी अधिक) तुमच्या डेरिवेटव खात्यात असतील तर तुम्हाला एका लॉटची खरेदी वा विक्री करता येइल.  हा फ्युचर्स ट्रेडींगचा एक फायदा आहे, मात्र मार्जिन ट्रेडींग मध्ये जो धोका असतो तो येथे आहेच. फ्युचर्स ट्रेडींगचे फायदे आणि तोटे या विषयी विस्ताराने  पुढील पोस्टमध्ये बोलूच.
आता प्रत्यक्ष ट्रेडींग कसे केले जाते ते पाहूया. आपण नेहमी करतो ते शेअर्सचे व्यवहार -याला कॅश सेगमेंटचे व्यवहार असे म्हणतात तर फ्युचर्सचे व्यवहार हे फ्युचर्स सेगमेंटमध्ये केले जातात. अशा फ्युचर्स सेग्मेंटमध्ये ट्रेडींग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रोकरकडे f&o ट्रेडींगसाठी एक फॉर्म भरून द्यावा लागेल आणि त्यानंतर म्हणजे तुमचे f&o किंवा डेरिवेटीव्ह खाते Active झाल्यावर (यासाठी फारतर एक आठवडा लागतो) व त्या खात्यात आवश्यक तो बॅलन्स ठेवल्यावर  तुम्हाला ट्रेडींग सुरू करता येइल.
 समजा चालू (जून) महिन्याच्या सुरुवातीला निफ्टी इन्डेक्स ५००० ही किंमत दाखवत आहे. आणि बाजारात चांगले वातावरण आहे, चांगल्या बातम्या येत आहेत, पाऊसपाणी उत्तम झाले आहे अणि कंपन्यांचे निकालही चांगले आहेत, अशा वातावरणात साहजिकच निफ्टीपेक्षा, जून सीरीज  निफ्टी फ्युचर्सची किंमत ही जास्त उदा.५०१० असू शकेल. जुलै महिन्याच्या फ्युचर्सचा भाव त्याहून अधिक म्हणजे सुमारे ५०२५ असा असू शकतो आणि ऑगस्ट सिरीजचा फ्युचर्सचा भाव त्याहूनही अधिक असू शकतो. समजा जून सिरीजची किंमत सुमारे ५०१० आहे.(म्हणजेच प्रिमिअम १० पोइन्टचा आहे). आता आणखी काही दिवस बाजारात अशीच तेजी राहील असे वाटत असेल तर आपण ५०१० च्या आसपास निफ्टी फ्युचर्स खरेदी करू शकतो,आणि जून महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत कधीही फायदा होत असेल तेव्हा विकू शकतो. साधारणपणे निफ्टीच्या एका लॉटला ५ पॉइण्ट इतके म्हणजे ५ * ५० = २५० रु. इतके ब्रोकरेज असू शकते. टॅक्सेस व इतर खर्च धरून सुमारे ७ पोइण्ट पेक्षा  भाव वाढला असता फायदा सुरू होतो. हे एक भविष्यातील कॉन्ट्रॅक्ट असल्याने यात इन्ट्राडे वा डिलीव्हरी असा फरक नसतो आणि म्हणून त्याच दिवशी वा नंतर कधीही हा खरेदी केलेला लॉट विकला तरी ब्रोकरेज तेव्हढेच पडते.
समजा बाजारात याऊलट म्हणजे मंदीसदृश वातावरण आहे. येत्या काही दिवसात बाजार खाली  जाण्याची शक्यता दिसत आहे. अशा वेळी आपण निफ्टी फ्युचर्स खरेदी न करता विकणे इष्ट ठरते. येथे हे लक्षांत घ्या कि शेअर्सच्या म्हणजेच इक्विटी मार्केटच्या बाबत जसे आपल्या कडील नसलेले शेअर्स विकले (short sell) तर ते त्याच दिवशी परत खरेदी करावे लागतात तसे करणे फ्युचर्स मार्केट मध्ये गरजेचे नाही. आज विकलेला लॉट आपण महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत कधीही परत घेवू शकतो आणि बाजारातील मंदीचा फायदा करून घेवू शकतो. समजा काही दिवसांनी निफ्टी १०० पॉइन्ट खाली आला तर निफ्टी फ्युचर्सही साधारणपणे तितकाच खाली आलेला असेल आणि आपण वरच्या किंमतीत short  केलेला निफ्टी लॉट अशा पडेल भावात खरेदी करून १०० * ५० =५००० रु. इतका फायदा मिळू शकतो.
हे एक उदाहरण म्हणून दिले असले तरी बाजाराची दिशा अतिशय अनिश्चित असल्याने तोटाही  याच प्रमाणात  होण्याची शक्यता असते. तेव्हा बाजाराच्या दिशेचे अचूक अंदाज घेवून आणि तरीही योग्य तो स्टॉपलॉस लावूनच हे व्यवहार करणे गरजेचे आहे. 
 निफ्टी फ्युचर्स वा स्टॉक फ्युचर्स मध्ये ट्रेड करण्याआधी, शेअर्स ट्रेडींग च्या तुलनेत, फ्युचर्स ट्रेडींगचे फायदे आणि तोटे काय आहेत ते यापूढील पोस्टमध्ये बघुया- तोपर्यंत याविषयी अन्यत्र अधिक वाचन व माहिती मिळवणे गरजेचे आहे. NSE च्या वेबसाईटवरही बरीच माहिती उपलब्ध आहे ती जरूर वाचा.