शेअरबाजारा विषयी ज्या अनेक उलट-सुलट समजूती आहेत त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि वर्षानुवर्षे अनेकांच्या मनात घर करून बसलेली एक समजूत म्हणजे -
शेअरबाजार ? नको रे बाबा ! त्याच्या वाटेला जाणे म्हणजे जुगार खेळण्यासारखेच आहे.
या समजुतीला कारण म्हणजे इतरांचे ऐकिव अनुभव आणि जुन्या पिढीतील लोकांच्या परंपरागत विचारांचा आपल्या मनावर असलेला पगडा होय.
असे अनुभव आणि विचार खोटे वा सर्रास चुकीचे आहेत असे मला म्हणायचे नाही, मात्र त्या लोकांना आलेले अनुभव नेमके कशा परिस्थितीत आले आणि त्याची खरी कारणे काय होती याचा विचार न करता, नीट पारखून न पाहता, त्यावर आंधळा विश्वास ठेवणे चूकीचे आहे असे मात्र मला वाटते.
गेल्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये जगातील सर्वच बाजारांनी मंदीचा अनुभव घेतला. जपानमधली त्सुनामी, ग्रीससारख्या देशांची डबघाई, तसेच खुद्द अमेरिकेतील तथाकथित मंदी या सर्व घटकांचा परिणाम म्हणून आपला बाजारही नरम राहिला.त्यातच आपल्याकडील घोटाळे, महागाई ,आंदोलने यांचाही प्रभाव जाणवला. मात्र २०१२ वर्ष उजाडले आणि बाजार कोसळायचा थांबला, थोडीफार तेजी दाखवू लागला. तरीही मध्येच अचानक गटांगळ्या खात राहिला. अनिश्चिततेचे वातावरण तसेच राहिले. यामुळे सामान्य गुंतवणूकदाराला अधिकच अविश्वास वाटू लागला. अशा परिस्थितीत वरील प्रकारचे समज अधिकच दृढ होत जातात हे मात्र खरे.
पण मग हा खरोखरच जुगार आहे का ? तेच आपण आज पहाणार आहोत.
समजा आपण एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतले आहेत. त्या कंपनीचे काही उत्पादन व सेवा असतात त्याचा लाभ सामान्य जनता घेत असते. त्या बदल्यात त्या उत्पादनाची किंमत वा सेवा पुरवण्यासाठीचा मोबदला जनतेकडून गोळा केला जातो. याच जमा झालेल्या निधीमधून त्या उत्पादनाला लागणारा कच्चा माल, कामगारांचे पगार, कारखान्यासाठी जागा, यंत्रसामुग्री, वीज ,पाणी तसेच जाहिरात, ट्रान्सपोर्ट इ. सर्वासाठी लागणारा खर्च केला जातो. हे सर्व आपणास माहित आहेच.
हा सर्व खर्च वजा जाता जी शिल्लक उरते तेव्हढीच रक्कम त्या कंपनीच्या भागधारकांची (यात मालकही आलेच) हक्काची असते. मात्र त्या कंपनीच्या परिस्थिती नुसार ही रक्कम मोठी, लहान वा अगदी निगेटीव्हही असू शकते.
म्हणजेच त्या कंपनीचे सप्लायर्स,कामगार आणि अगदी कर्जरोखे घेणारे सुद्धा एक निश्चित रक्कम मिळवणार असतात, आणि या प्रत्येकाला देय असलेली रक्कम दिल्यावर शेवटी नंबर येतो तो भागधारकांचा ! अर्थातच भागधारकाला मिळणारी रक्कम (डिव्हिडंड) ही नेहमी अनिश्चित असल्याने म्हणजेच भागधारक हा एक प्रकारची 'रिस्क' घेत असल्याने त्याची अशी रास्त अपेक्षा असते कि त्याला मिळणारा फायदा (यात डिव्हीडंड व भांडवली वृद्धी हे दोन्ही आले) हा (निदान दीर्घ कालावधीमध्ये तरी) वरील संबंधीतांपेक्षा अधिक असावा !
- आणि तसा तो असेल तरच कंपनी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल, नाही का ?
नजिकच्या काळात वा SHORT-TERM साठी मात्र शेअरबाजार ( म्हणजे आपण गुंतवणूकदारच !) याचाच सतत अंदाज बांधत असतो कि या कंपनीच्या भागधारकांना काय आणि किती फायदा मिळत आहे आणि भविष्यात मिळणार आहे ? यामुळेच त्या शेअरची किंमत सतत वर-खाली होत असते. म्हणूनच अल्पकालावधीचा विचार करता भागधारकांचे उत्पन्न हे इतर स्थिर उत्पन्न मिळवणार्या वरील घटकांपेक्षा कमीही असू शकते. मात्र कोणत्याही फायद्यात असणार्या आणि दीर्घकाळासाठी आपले व्यवसायातील अस्तित्व वा सहभाग टिकवणार्या वा वाढवणार्या कंपनीच्या भागधारकांना दीर्घ कालावधीचा विचार करता इतर संबंधित घटकांपेक्षा अधिक फायदा होणार हे ठरलेलेच आहे.
याचाच अर्थ असा कि अल्पकाळात होणार्या शेअरच्या किंमतीतील चढ-उतारामुळे विचलीत न होता सदर शेअर्स 'होल्ड' करून ठेवले असता अशी एक वेळ येते कि कालांतराने अशा पातळीवर त्या शेअरचे भाव पोचतात कि तेथून एका ठराविक पातळीच्या खाली ते यापूढे कधीही येणार नाहीत ! म्हणजेच तेव्हा मिळणारा फायदा हा 'कायमस्वरूपी' होतो ! तसेच तो इतर स्थिर उत्पन्न देणार्या योजनांपेक्षा अधिकच असतो.
आणि येथेच शेअरमधील गुंतवणूक आणि जुगार यातला फरक स्पष्ट होतो-
जुगारामध्ये अल्पकाळात श्रीमंत होता येतही असेल मात्र दीर्घकाळ जुगार खेळल्यास दिवाळे निघणार हे नक्की असते. त्याउलट शेअरबाजाराचे असते -एखादा उत्तम कंपनीचा शेअर जेवढा जास्त काळ धरून ठेवाल तेवढा फायदा अधिक !
आता असे का होत असावे हे आपण बघुया -
आपण एखाद्या शेअरची खरेदी केली आणि दीर्घकाळासाठी तो होल्ड केला तर त्याच्या किंमतीत होणारी वाढ ही अन्य कोणाचे तरी नुकसान केल्याने होत नसते तर त्या कंपनीची बाजारातील पत म्हणजेच 'VALUE' वाढल्यामुळे झालेली शेअरच्या किंमतीतील वाढ असते.
(लक्षांत घ्या- येथे मी मुद्दाम 'VALUE' असा शब्द वापरतोय ! ही 'VALUE' आणि बाजारातील त्या शेअरची किंमत यातील फरक कृपया समजून घ्या !)
'VALUE' म्हणजे त्या कंपनीने केलेल्या दर्जेदार उत्पादनाची, निर्मितीची आणि त्यामुळे वाढलेल्या बाजारातल्या पतीची, विश्वासाची पावती असते. कंपनीच्या अशा प्रकारच्या क्षमतेमुळेच बाजारातील शेअरची किंमत वाढून भागधारकाला फायदा होत असतो.
मात्र जुगारात एखाद्याला होणारा फायदा हा अन्य कुणालातरी कफल्लक बनवूनच होतो. जुगारात हे असं का असतं ? कारण जुगारात कोणतेच उत्पादन होत नाही - कशाचीच निर्मिती होत नाही - ते फक्त पैशाचं फिरवणं असतं - एकाला श्रीमंत तर दुसर्याला कफल्लक बनवणारं ! बाकि काही नाही !
म्हणजेच आपण एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक ही त्या कंपनीला केलेली 'डायरेक्ट' मदत असते, त्या मदतीचा योग्य उपयोग करून ती कंपनी उत्पादन करते आणि त्यामुळे त्या कंपनीची 'VALUE' वाढत जाते. कालांतराने त्या कंपनीच्या शेअरच्या वाढलेल्या किंमतीमुळे संपूर्ण समाजाची संपत्ती वाढत असते. जुगारात हे कधीच शक्य नाही.
सारांश हा कि आपण जर आपला पैसा हा दर्जेदार उत्पादने वा सेवा वर्षानुवर्षे देणार्या विविध सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये विभागून (DIVERSIFY) गुंतवला तर कालांतराने मोठा फायदा होणार हे शेअरबाजाराच्या अनेक वर्षांच्या इतिहासात सिद्ध झालेले आहे.
याचसाठी गुंतवणूक आणि जुगार यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे. बाजारात यशस्वी होण्यासाठी जी एक मनाची बैठक लागते ती तयार होण्यास यामुळे नक्कीच हातभार लागेल !
हा लेख वाचताना तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल कि उत्तम कंपनी कशी निवडायची त्यासंबंधात तसेच शॉर्टटर्म ट्रेडींग मध्ये खरेदी -विक्रीचे अचूक 'टाईमिंग' ज्याला जमते त्यालाच शेअरबाजारात यश मिळते का ? या विषयी पुढील पोस्ट मध्ये !
तुम्ही हा ब्लॉग काढल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद ... खर्च ग्रुप खुपच चंगला आहे
sir
kharach sir tumhi je amhala mahiti dilit mi tyabbadal khup abhari ahe...
please sir keep it up....
आभारी आहे.असेच प्रेम राहू द्या.
Apan aplya blog var jekahi vel kadhun lihitat se marathi mansasala share market badalche opiniun badalayla kharech bhag padel. Tumhi asech liha v tumche anubhav v tumchya kadil tips shares kara. Tumhala majhya kadun v samasta marathi mansankadun hat's off.
Thanks
Ravi
Dear Ravi ji, आभारी आहे.अशा प्रतिक्रिया म्हणजे ब्लॉगर्सचा प्राणवायू असतो !