Share/Bookmark

४ ऑग, २०१३

'डिव्हिडंड इन्वेस्टींग' म्हणजे काय ?



जुलै महिना हा तिमाही निकालांचा होता. त्यानंतर रुपयामधील घसरणीचे तसेच त्यावर सरकार व RBI यांना योग्य तो प्रभावी उपाय करता येत नसल्याचे जे चित्र निर्माण होत आहे त्याचे निमित्त होवून गेल्या आठवड्यातील बाजार जसा अचानक तीव्रतेने घसरला तसा अनुभव बाजारात वारंवार येत असतोच. क्रिकेटमधील अनिश्चिततेप्रमाणेच काहीजण याला ‘गोल्डन अनसर्टन्टी’ म्हणून संबोधत असले तरीही यात बहुतांश सामान्य ट्रेडर्सचे नुकसानच होत असते.

अशा अनिश्चिततेवर उपाय म्हणून काही लोक 'डिव्हिडंड इन्वेस्टींग' करतात. याचा मुळ अर्थ ‘उत्तम डिव्हीडंड देणा-या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे’ असा असला, तरी यातही शॉर्टकट मारून अल्पावधीत फायदा कमवणेही शक्य असते. तेव्हा प्रथम डिव्हीडंड म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने केले जाणारे इन्वेस्टींग वा ट्रेडींगसंबंधी माहिती असणे गरजेचे आहे.  

साधारणपणे तिमाही वा वार्षिक कालावधीने कंपन्या आपल्या शेअरहोल्डर्सना आपल्याला मिळणा-या फायद्यातील वाटा म्हणून जी रक्कम अदा करतात तीला डिव्हीडंड म्हणतात. शेअरहोल्डर्सना प्रत्यक्ष काही न करताच केवळ शेअर्स धारण केल्याने मिळणारी ही रक्कम म्हणजे बाजारातील शेअरच्या किंमतीत होणा-या वाढीव्यतिरिक्त होणारा जादा फायदा असतो. बाजारात मंदी असताना होणारी शेअरच्या किंमतीतील घट ही अशा प्रकारे मिळणा-या डिव्हीडंडमुळे काही प्रमाणात तरी सुसह्य होत असते. म्हणूनच उत्तम डिव्हीडंड देणारा शेअर हा कुठल्याही मार्केट कंडीशनमध्ये पसंत केला जातो. 
असे म्हणतात कि सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्याप्रमाणेच नियमीतपणे आणि वाढीव डिव्हीडंड देणे हे त्या कंपनीला उत्तम फायदा होत असल्याचे, वा कंपनीजवळ पूरेसा राखीव निधी असल्याचे निदर्शक असते. सातत्याने फायदा मिळवणारी व भविष्यातही मिळवण्याची शक्यता असलेली कंपनीच आपल्या शेअरहोल्डर्सना असा डिव्हीडंड द्यायचे ठरवत असते. त्यामुळेच अशा कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीही वाढत रहाण्याची शक्यता असते.

असा दिला जाणारा डिव्हीडंड हा, प्रतिशेअर अमूक टक्के अशा प्रकारे जाहीर केला जातो. समजा एखाद्या कंपनीने प्रतिशेअर ५० टक्के डिव्हीडंड दिला तर त्याचा अर्थ ‘त्या कंपनीच्या शेअरच्या दर्शनी किंमतीच्या (फेस व्हॅल्युच्या) ५० टक्के इतका डिव्हीडंड’ असा असतो. समजा दर्शनी किंमत १० रु. असेल तर डिव्हीडंडची रक्कम प्रतिशेअर ५ रु. असेल. आणि त्या शेअरची बाजारातील किंमत २०० रु. असेल तर मिळणारा डिव्हीडंड हा  प्रत्यक्षात २०० रु.च्या प्रत्येक शेअरमागे ५ रु. इतका म्हणजे २.५ टक्के इतकाच असतो. अशा प्रत्यक्ष मिळणा-या रकमेला ‘डिव्हीडंड यील्ड’ असे म्हणतात.

डिव्हीडंड यील्ड = (प्रतिशेअर डिव्हीडंड / शेअरची बाजारातील किंमत) * १००

डिव्हीडंड इन्वेस्टींग करताना या डिव्हीडंड यील्डचा प्रामुख्याने विचार केला जातो. डिव्हीडंड यील्ड जेवढा अधिक, तेवढा शेअर गुंतवणूकीस चांगला. मात्र असा डिव्हीडंड यील्ड हा काही वर्षे सातत्याने मिळत रहाणे आणि भविष्यातही त्या कंपनीचा बिझीनेस उत्तम राहणे हे अत्यंत महत्वाचे असते.

आणखी एक महत्वाचा मुद्दा असा कि एखाद्या वेळी त्या शेअरची बाजारातील किंमत काही कारणाने घसरली असेल तर ‘डिव्हीडंड यील्ड’ हा रेशो बराच मोठा दिसू शकतो. आणि ज्या शेअरची किंमत घसरली असेल त्या कंपनीबाबत वा सेक्टरमध्ये काहीतरी प्रतिकूल घडलेले असण्याची वा भविष्यात घडण्याची शक्यता असते. म्हणजे अशी घसरलेली किंमत ही तात्पुरत्या प्रकारची किंवा बाजारातील सेन्टीमेन्ट्सच्या प्रभावामुळे आहे कि त्यामागे काही मोठे कारण आहे ते कळल्याशिवाय असा शेअर खरेदी करणे योग्य ठरणार नाही. म्हणजेच डिव्हीडंड इन्वेस्टींग साठी शेअर निवडताना फक्त डिव्हीडंड यील्डचा विचार करून चालणार नाही तर त्याशिवाय आणखीही काही घटक विचारात घ्यावे लागतील.

सातत्याने उत्तम डिव्हीडंड देणा-या कंपन्या कोणत्या, त्यांचा शोध घेवून त्यांच्याविषयी थोडे वाचन करायला हरकत नाही. कारण बाजारात जेव्हा जेव्हा आतासारखे करेक्शन येते तेव्हा या कंपन्या स्वस्त भावात मिळत असतात. विविध सेक्टरमधील चांगला डिव्हीडंड देणा-या कंपन्यांची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

साधारणपणे कंपनीचे मार्केट कॅपिटल, प्रतिशेअर बूक व्हॅल्यु, प्राईस/अर्निंग रेशो, प्राईस/बूक व्हॅल्यु आणि कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते तो सेक्टर अशा इतर अनेक बाबींचा विचार डिव्हीडंड इन्वेस्टींग करताना केला जातो. या सर्व बाबींचा सविस्तर विचार आपण या ब्लॉगवर पुढील काही पोस्ट्समध्ये करणार आहोत.


Read more »

२५ मे, २०१३

'नेकेड ऑप्शन सेलींग'-धोका नव्हे, संधी !!



मित्रांनो, नजिकच्या काळात बाजारात काय होईल याचे अंदाज बांधणे अतिशय कठीण असते याचा अनुभव आपण सर्वच घेत असतो. याबाबतीत माझा अनुभव असा आहे कि बाजारात व एकूणच कुठल्याही क्षेत्रात काय होईल याचा अंदाज बांधण्यापेक्षा काय होणार नाही याचा अंदाज बांधणे अधिक सोपे असते. उदा. यंदा आयपीएल स्पर्धा कोण जिंकणार याचा अंदाज करणे फायनल मॅच पर्यंत कठीणच असते. सध्याच्या फिक्सिंगच्या वावटळीत ते अधिकच कठीण झाले आहे नाही का ? :-) मात्र यंदा पूणे वा दिल्लीचे संघ विजेते होवू शकत नाहीत याचा अंदाज खूप दिवस आधीच करणे सहज शक्य होते. मार्केटमध्येही हा फंडा लागू पडतो, आणि त्याचा फायदा ऑप्शन्स द्वारे उठवता येतो. कसे ते पाहूया.

या आधीच्या पोस्टमध्ये 'टाईम डिकेचा' वापर करून घेणा-या ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीविषयी माहिती घेतली होती त्याच अनुषंगाने पुढे जात आता ‘नेकेड ऑप्शन सेलींग’ म्हणजे काय, त्यातील रिस्क मॅनेजमेंट, योग्य स्ट्राईक प्राईजची निवड आणि महत्वाचे म्हणजे ऑप्शन सेलींगचे टाईमींग या बाबी समजून घेवूया.

असेही काही ट्रेडर्स आहेत कि जे कुठल्याही शेअरमध्ये वा इंडेक्स मध्ये गुंतवणूक वा खरेदी न करता निव्वळ ‘ऑप्शन्स सेलींग’ करूनच फायदा कमवतात. अशा ऑप्शन सेलींगला बाकि कुठल्याही लॉन्ग पोझिशनचा आधार वा कव्हर नसल्याने याला ‘नेकेड’ ऑप्शन्स सेलींग म्हणतात. तुम्ही जर तुमच्या ब्रोकरला ‘असे’ काही करण्याबद्दल विचारलेत तर तो तुम्हाला त्यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. त्याच्या मते असे निव्वळ ऑप्शन सेलींग हे अतिशयच धोक्याचे असून तुम्ही तो धोका अजिबात पत्करू नये.

‘नेकेड ऑप्शन सेलींग’मध्ये थिरॉटिकली धोका असतोच, पण त्याला मॅनेज करता येतो हे समजून घेवून शिस्तबद्ध रिस्क मॅनेजमेंट केली तर कुठलेही टेन्शन न येता, आपली इतर कामे, उद्योग सुरू ठेवून शांतपणे ट्रेडींग करता येते असाच माझा अनुभव आहे. शिवाय बाजार कुठल्याही दिशेस जात असला तरी याद्वारे फायदा कमवणे शक्य असते. आधीच्या पोस्ट्मधील शॉर्ट स्ट्रॅंगल स्ट्रॅटेजीमध्ये जशा प्रकारची रिस्क मॅनेज केली आहे तशाच प्रकारची रिस्क मॅनेजमेंट येथे अपेक्षीत आहे, मात्र अतिशय दूरच्या स्ट्राईक प्राईज म्हणजे ज्याला ‘Far OTM’ म्हणतात अशा निवडून तेथे विक्री केली जाते. अशा स्ट्राईक प्राईज या अंडरलाईगच्या किंमतीपेक्षा (निफ्टीच्या संदर्भात) ४०० किंवा अगदी ५०० पॉइन्टही दूर असू शकतात. थोडक्यात म्हणजे येथील ऑप्शन्सना इंट्रींन्सिक व्हॅल्यु तर नसतेच पण नजिकच्या काळात ती असण्याची शक्यताही फारच कमी असते. अशा फार दूरच्या OTM ऑप्शन्स ना असते ती केवळ टाईम व्हॅल्यु ! ही टाईम व्हॅल्यु विकूनच आपल्याला फायदा कमवायचा आहे. वेगळ्या प्रकारे सांगायचे तर जिंकणा-या घोड्याचा अंदाज बांधून त्यावर पैसे लावण्यापेक्षा, जे घोडे मरतुकडे आहेत, जे कधीच जिंकू शकणार नाहीत अशा घोड्यांवर पैसे लावणारे लोक (ऑप्शन बायर) शोधा आणि त्यांचा पैसा आपल्या पदरात पाडून घ्या. म्हणजेच असे ऑप्शन्स शोधा कि जे कधी ‘इन द मनी’ होणार नाहीत, आणि तेच विकून पैसे कमवा. अर्थातच तेथील थोडा कमी असलेला प्रिमिअम लक्षांत घेतल्यास फायद्याचे प्रमाण कमी वाटू शकते. मात्र एकाऐवजी दोन लॉट विकून त्याची भरपाई केली जाते. अर्थातच त्यासाठी अधिक मार्जिनची गरज असते. आपल्याकडे फक्त ऑप्शन सेलींगसाठी राखून ठेवलेला किमान एक लाख रु. एकूण मार्जिन असला तरच अशा प्रकारचे ट्रेडींग करा. निफ्टीची किंमत ६००० असेल तर त्याच महिन्याचे ६४०० वा ६५०० चे कॉल विकण्यात धोका कमी असतो. त्याच प्रकारे ५५०० वा ५६०० चे पुट ऑप्शन विकण्यातही धोका कमी असतो. कारण महिनाअखेर पर्यंत निफ्टी ५०० पॉइन्ट वाढण्याची वा कमी होण्याची शक्यता फार कमी असते. अशा प्रकारे स्ट्राईक प्राईजची निवड कशी करायची हे आपण पाहिले, पण थांबा – या व्यतिरिक्त ऑप्शन्स सेल करण्याची वेळ आणि सेलींगची संधी या दोन बाबी नीट लक्षांत घ्या. प्रथम सेलींगची योग्य वेळ ठरवूया.

आपल्याला हे माहीतच आहे कि महिन्याच्या सुरुवातीला त्या महिन्याच्या ऑप्शन्सच्या किंमती जास्त असतात आणि एक्सपायरी जवळ येइल तशा त्या कमी कमी होत जातात. मात्र नेकेड सेलींग च्या बाबतीत जास्त किंमतींच्या मोहात पडून महिन्याच्या सुरुवातीला सेलींग करण्याची घाई करू नका. महिन्याचा पहिला आठवडा काहीही सेलींग करू नका. मार्केटला जिथे हवे तिथे फिरू द्या. साधारण दहा तारखेच्या आसपास पहिले सेलींग करायला हरकत नाही. निफ्टीच्या संदर्भात ४०० किंवा चक्क ५०० पॉइंट दूर असलेल्या स्ट्राईक प्राईजचे वरील बाजूचे कॉल व खालील बाजूचे पुट ऑप्शन्स निवडून प्रिमिअम निदान ६ रु. पेक्षा मोठा असल्यास विकणे ठीक राहील. वोलॅटिलिटी जास्त असेल तर असा प्रिमिअम जास्त असतो. म्हणजे दोन्ही बाजूच्या मिळून दोन लॉटमागे ब्रोकरेज वगळता किमान ५०० रु. तरी मिळतील. हा फायदा कमी आहे असे वाटले तरी जास्त लॉट्स विकण्याची घाई करू नका. कारण प्रत्येक लॉटमागे १५,००० ते १८,००० मार्जिन ब्लॉक होत असतो हे लक्षांत घ्या. नंतर अजून एखादा आठवडा वाट बघा. बाजार मंद हालचाली करत असला तर ठीकच, पण मोठ्या हालचाली करत असला तरी घाबरून जाऊ नका. निफ्टीने आपली स्ट्राईक प्राईज ओलांडल्याशिवाय आपला तोटा होणार नाही हे लक्षांत घ्या. १५ ते १८ तारखेनंतर निफ्टीची नवी लेव्हल पाहून त्याप्रमाणे पुन्हा ३०० ते ४०० पॉइंट्स दूरचे ऑप्शन विकण्याचा प्रयत्न करा. आता एक्सपायरीला कमी दिवस शिल्लक असल्याने ४०० पॉइन्ट दूरचे ऑप्शन २ किंवा ३ रु.चे म्हणजे खूपच स्वस्त असतील तर ते न विकता ३०० पॉइंट दूरचे १ किंवा २ लॉट विका. असे निर्णय परिस्थिती पाहून, बाजाराची गती व दिशा पाहून घ्यायचे असतात. अशा प्रकारे सुमारे एक लाख मार्जिन असल्यास ४ ते ६ लॉट विकता येतात, मात्र रिस्क मेनेजमेंटसाठी किमान २ लॉट एवढा मार्जिन राखीव ठेवावा लागतो. यासाठी दुस-या वा तिस-या आठवड्याअखेर निफ्टी एका बाजूला झुकला असेल तर विरुद्ध बाजूच्या, सुरुवातीस आपण विकलेल्या ऑप्शन्सची किंमत अगदी कमी झालेली असेल; ते ऑप्शन्स ‘वर्थलेस’ होण्याची वाट न बघता १रु. वा त्यापेक्षा कमी किंमतीला मिळाल्यास परत खरेदी करून ब्लॉक झालेला मार्जिन सोडवता येतो. हाच मोकळा झालेला मार्जिन हा पुन्हा नव्याने संधी आल्यास लॉट सेलींग करण्यासाठी किंवा रिस्क मॅनेजमेंट ( याकरता कृपया या आधीची पोस्ट पहा) करता उपयोगी येत असतो.

अशा प्रकारे ऑप्शन सेलींगची वेळ ही महत्वाची असते. आता सेलींग करण्यासाठीच्या अन्य संधींविषयी बघुया. समजा एखाद्या महिन्यात RBI व्याजदरात बदल करण्याची शक्यता असेल वा कंपनीचे रिजल्ट जाहीर होणार असतील वा महत्वाच्या निवडणूकांचे निकाल असतील तर त्या तारखेआधी सेलींग करणे टाळावे. अशा महत्वाच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून बाजार मोठी हालचाल करण्याची शक्यता असते. अशी मोठी हालचाल पूर्ण होवू द्यावी आणि त्यानंतर १-२ दिवसांनी थोडी स्थिरता आल्यावर निफ्टीच्या वा त्या स्टॉकच्या नव्या पातळीनुसार स्ट्राईक प्राईज निवडून तेथे सेलींग करावे. उदा. या महिन्याच्या सुरुवातीला हिंदूस्तान युनिलीव्हर मधील बातमीमुळे तो शेअर सुमारे १५० रु.ने अचानक वाढला होता. अशी मोठी हालचाल होवू द्यावी. या मोठ्या वाढीमुळे साहजिकच त्याचे दूरचे कॉल ऑप्शनही महाग झाले होते. त्याचाच फायदा उठवून त्यातील हालचाल मंदावल्यावर कॉल ऑप्शन विकणे फायद्याचे ठरते. त्याचप्रमाणे एखाद्या महिन्यात निफ्टीने मोठी हालचाल केल्यास त्यानंतर नेकेड सेलींग करणे योग्य ठरते. ज्या अंडरलाईंगमध्ये ऑप्शन सेलींग करायचे त्याविषयी बातम्यांवर नजर ठेवून अशी संधी साधायची असते. येथे एक बाब लक्षांत घ्या कि मोठ्या हालचालीनंतर कधी कधी त्या हालचालीची उलट प्रतिक्रियाही तीव्र असू शकते, तेव्हा रिस्क मॅनेजमेंन्टला पर्याय नाही !

 अतिशय धोक्याच्या समजल्या जाणा-या, पण योग्य आणि शिस्तबद्धपणे रिस्क मॅनेजमेंट केल्यास नक्कीचा फायदा देणा-या ‘नेकेड ऑप्शन सेलींग’ ची माहिती देवून, आणि आतापर्यंतचे माझे लिखाण अनेकांना उपयुक्त ठरले असेल अशी आशा व्यक्त करून ‘ऑप्शन्स’ या विषयावरील माझे लिखाण पूर्ण करत आहे.

आतापर्यंत आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आणि यापूढे आवश्यक वाटेल तेव्हा मार्केटबद्दल टिप्पणी व मधून मधून काही टीप्स देण्याचा विचार आहे. आपल्या सर्वांचे प्रेम असेच राहू द्या ही विनंती.

Read more »

११ एप्रि, २०१३

ऑप्शन ट्रेडींगमध्ये 'टाईम डिके'चा वापर !



सर्व वाचकांना 'शेअरबाजार-साधा सोपा' तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

 याआधी आपण ‘टाईम डिके’ विषयी माहिती घेतली होती. आता या टाईम डिकेचा वापर ट्रेडींगमध्ये करून बनवलेल्या स्ट्रॅटेजीजची माहिती घेवूया. या स्ट्रॅटेजीज् नुसार ऑप्शन्स खरेदी न करता ‘विकले’ जातात म्हणून यांची नावे ‘शॉर्ट स्ट्रॅडल’ आणि ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ अशी आहेत.

‘शॉर्ट स्ट्रॅडल’ स्ट्रॅटेजीमध्ये एकाच अंडरलाईंगचे एकाच महिन्याचे व एकाच स्ट्राईक प्राईजचे कॉल व पुट ऑप्शन्स विकले जातात. या ऑप्शन्स विक्रीद्वारे मिळालेला एकूण प्रिमिअम हा या स्ट्रॅटेजीतला जास्तीतजास्त फायदा असतो. सदर दोन्ही ऑप्शन्स हे 'ऍट द मनी' ( ATM) असल्याने त्यांची किंमत जास्त व म्हणून मिळणारा प्रिमिअमही जास्त असतो. मात्र अंडरलाईंगमध्ये मोठी हालचाल झाल्यास मोठा व थिरॉटिकली अमर्याद तोटा होवू शकतो. या कारणाने मला स्वतःला ही स्ट्रॅटेजी धोक्याची वाटते. म्हणून तीची माहिती टाळून या स्ट्रॅटेजीत थोडा फरक करून तयार झालेली ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजी (जी मला अधिक उपयुक्त वाटते) त्याविषयी आज माहिती घेवूया.

‘शॉर्ट स्ट्रॅडल’ मधील धोका टाळण्यासाठी एकाच स्ट्राईक प्राईजच्या कॉल व पुट ऐवजी ‘आऊट ऑफ द मनी’ कॉल व पुट निवडून दोन्ही बाजूच्या ब्रेक इव्हन पॉइन्ट्समधील अंतर वाढविले जाते. यामुळे धोका कमी होत असला तरी (OTM) ऑप्शन्सचा प्रिमिअम कमी असल्याने फायद्याचे प्रमाणही कमी होते. मात्र योग्य स्ट्राईक प्राईजची निवड आणि थोडे धोक्याचे व्यवस्थापन केल्यास स्ट्रॅटेजीची विश्वासार्हता खूपच असते.

एक उदाहरण बघुया. समजा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस निफ्टी इंडेक्स ५५०० आहे. काही कारणाने बाजारात वोलॅटिलिटी असल्याने ‘शॉर्ट स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीनुसार कॉल व पुट विक्री करण्याच्या स्ट्राईक प्राईज या थोड्या दूरच्या निवडल्या जातात. ५७००चा कॉल व ५३००चा पुट असे दोन्ही बाजूचे (OTM) ऑप्शन्स विकले जातात. समजा या दोन्ही ऑप्शन्सची एकूण किंमत ६२ रु. असली तर मिळणारा एकत्रित प्रिमिअम हा रु. ३१०० होतो. हा या स्ट्रॅटेजीतला जास्तीतजास्त फायदा असेल.

वरील बाजूचा ब्रेक इव्हन पॉइन्ट हा, 'कॉल'च्या स्ट्राईक प्राईजमध्ये एकूण प्रिमिअम मिळवला असता मिळतो (५७००+ ६२ =५७६२) तसेच खालील बाजूस ब्रेक इव्हन पॉइन्ट हा 'पुट'च्या स्ट्राईक प्राईजमधून एकूण प्रिमिअम वजा केला असता (५३००-६२ =५२३८) मिळतो. याचा अर्थ एप्रिल एक्सपायरीला जर निफ्टी ५७६२ व ५२३८ या दोन पातळींदरम्यान कुठेही राहीला तरी शॉर्ट केलेले दोन्ही ऑप्शन्स हे दर दिवशी किंमत घटत जावून एक्सरसाईझ केले न जाता अखेर वर्थलेस होतात. साहजिकच प्रिमिअम आपल्याकडेच राहून ३१००रु. इतका फायदा होतो.

धोक्याचे व्यवस्थापन (Risk Management) –

समजा महिना पूर्ण होण्याआधीच निफ्टीने अचानक मोठी हालचाल करून ५७६२ या ब्रेक इव्हन पॉइन्टच्या दिशेने वाटचाल सुरु केली तर आपण विकलेल्या ‘कॉल’ ऑप्शनची किंमत वाढत जाते. पुढे जर निफ्टीने ब्रेक इव्हन पॉइन्ट ओलांडला तर (वाढलेल्या किंमतीला एक्सरसाईझ झाल्याने) सदर ऑप्शन परत खरेदी करणे भाग पडते आणि  मोठा तोटा होवू शकतो. हे टाळण्यासाठी मुख्यत्वे दोन उपाय आहेत.

पहिला उपाय म्हणजे अर्थातच स्टॉपलॉस लावून सदर विकलेला ‘कॉल’ ऑप्शन हा थोडासा तोटा सोसून परत घेवून टाकणे हा होय. असा स्टॉपलॉस हा निफ्टीच्या किंमतीवर किंवा ऑप्शनच्या किंमतीवर आधारीत असू शकतो. पण माझ्या मते तो निफ्टीच्या किंमतीवर आधारीत असू नये. तसा तो ठेवल्यास निफ्टीच्या टेक्निकल लेव्हल्सचा उत्तम अभ्यास असणे आवश्यक असते. तसेच स्टॉपलॉस लावण्याच्या वेळी असलेल्या त्या ऑप्शनच्या कमी-अधिक टाईम व्हॅल्युमुळे, निफ्टी लेव्हल आणि होणारा तोटा याचे प्रमाण अनिश्चित असते. याउलट स्टॉपलॉस हा त्या 'कॉल' (वा 'पुट') ऑप्शनच्या किंमतीवरच आधारीत ठेवल्यास आपल्याला होणारा तोटा आपण निर्धारीत करू शकतो.

मोठा तोटा टाळण्याचा दुसरा उपाय हा हेजींग स्वरूपाचा असू शकतो. समजा निफ्टीने एक्सपायरीच्या आधीच ५७६२ ही लेव्हल गाठली तर त्याच वेळी निफ्टी फ्युचर्सचा एक लॉट खरेदी करून एक्सपायरीपर्यंत होल्ड केल्यास, ५७६२ या पातळीच्या वर निफ्टी कितीही वाढला तरी ऑप्शन्स विक्रीत होणारा तोटा हा फ्युचर्स मध्ये झालेल्या फायद्याने 'न्युट्रलाईझ’ करता येतो. मात्र असे करताना फ्युचर्स लॉट खरेदी केल्यावर निफ्टी जर परत खाली घसरू लागला तर त्यालाही पुन्हा सुमारे २० पॉइन्ट्चा स्टॉपलॉस लावणे गरजेचे आहे. अशावेळी ऑप्शन्स विक्रीतील फायदा हा फ्युचर्स मधील तोट्यामुळे कमी होतो, मात्र फार मोठा किंवा अमर्यादीत तोटा होण्यापेक्षा ते नक्कीच परवडते. येथे हे लक्षांत घ्या कि वरीलप्रमाणे हेजींग करताना जितके ‘कॉल’ चे लॉट विकले असतील तितकेच ‘फ्युचर्स’ चे लॉट घेणे आवश्यक असते.

याचप्रमाणे निफ्टीने समजा खालील बाजूचा ब्रेक इव्हन पॉइन्ट गाठला तर तेथे निफ्टी फ्युचर्समध्ये विक्री करून हेजींग करावे लागेल. मार्केटमध्ये वोलॅटिलिटी फार नसेल तर, आणि स्ट्राईक प्राईजची निवड उत्तम असेल तर असे हेजींग करण्याची वेळ सहसा येत नाही. मात्र तशी ती आलीच, तर हेजींग करणे टाळू नका. कधीकधी फायदा कमवण्यापेक्षा मार्केटमध्ये टिकून रहाणे जास्त महत्वाचे असते.   



वरील उदाहरणात निवडलेल्या दोन्ही स्ट्राईक प्राईज या निफ्टीच्या किंमतीच्या २०० पॉइन्ट दूर आहेत मात्र ३०० वा ४०० पॉइन्ट दूर असलेल्या स्ट्राईक प्राईजही निवडता येतात. त्यामुळे धोका कमी होतो मात्र मिळणारा प्रिमिअमही कमी होत असतो. असे ऑप्शन्स विकण्यासाठी मोठा मार्जिन मनी लागतो आणि शॉर्ट पोझिशन्स क्लोज करेपर्यंत वा     एक्सपायरीपर्यंत हा मार्जिन मनी ब्लॉक होतो. ऑप्शनचा एक लॉट विकण्यासाठी जो मार्जिन मनी ब्लॉक होतो तो त्या ऑप्शनची किंमत, एक्सपायरीला शिल्लक असलेले दिवस आणि त्यावेळच्या वोलॅटिलिटीवर अवलंबून असतो.याबाबतीत आपल्या ब्रोकरला विचारून ठेवावे. मात्र महिनाभरासाठी तितक्या मार्जिन मनीची व्याजासाठी अन्यत्र गुंतवणूक केली असे मानले, तर शॉर्ट स्ट्रॅन्गल मधून मिळणारा प्रिमिअमचा फायदा हा त्या मार्जिन मनीच्या एका महिन्याच्या व्याजापेक्षा नक्की जास्त असतो. तेव्हा दर महिन्याला ऑप्शन्स विक्रीसाठी लागणारा मार्जिन, तसेच प्रसंगी हेजींगसाठी लागू शकणारा मार्जिन याची आपल्याजवळ व्यवस्था असेल तर किती ऑप्शन्स विकायचे आणि किती फायदा कमवायचा हे आपण स्वतःच ठरवू शकतो.

योग्य स्ट्राईक प्राईजची निवड आणि धोक्याचे अचूक व्यवस्थापन केले गेले तर एरवी व्हीलन भासणा-या 'टाईम डिके' लाच आपला मित्र बनवून या स्ट्रॅटेजीतून दरमहिना नियमीत नफा मिळवणे सहज शक्य आहे.        





          

Read more »

१५ मार्च, २०१३

'लॉन्ग स्ट्रॅन्गल' - मर्यादीत गुंतवणूक, मर्यादीत तोटा.



या आधीच्या पोस्ट मध्ये आपण ‘टाईम डिके’ विषयी चर्चा केली होती. या ‘टाईम डिके’चा उपयोग प्रत्यक्ष ट्रेडींगमध्ये कसा करतात हे आपण नंतर पाहणारच आहोत, मात्र त्याआधी येथे बघितलेल्या ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ स्ट्रॅटेजीमध्ये जरासा बदल करून तयार होणा-या ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीबद्दल माहिती घेवूया.

आपल्याला आठवतच असेल कि लॉन्ग स्ट्रॅडलही एक वोलॅटिलिटी स्ट्रॅटेजी असून यामध्ये एकाच स्टॉक किंवा इंडेक्सचे, एकाच महिन्याचे, एकाच स्ट्राईक प्राईजचे कॉलआणि पुटअसे दोन्ही ऑप्शन खरेदी केले जातात. ही एक उपयुक्त आणि संभाव्य तोटा आपोआप मर्यादीत राखणारी स्ट्रॅटेजी असली तरी यात आपण खरेदी करत असलेले कॉल आणि पुट हे दोन्ही ऑप्शन्स, हे एकाच स्ट्राईक प्राईजचे असतात, आणि ते ‘ऍट द मनी(ATM)’ असल्याने साहजिकच महाग असतात. ते खरेदी केल्यावर, आपल्याला या स्ट्रॅटेजीत होवू शकणारा तोटा हा मर्यादीत असला तरी तो थोडा जास्त असतो. मग यावर उपाय म्हणून मुळ स्ट्रॅटेजीत थोडा बदल केला जातो. एकाच स्ट्राईक प्राईजचे ATM कॉल व पुट घेण्याऐवजी OTM कॉल व पुट घेतले जातात आणि यालाच ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजी म्हणतात. खालील उदाहरण बघुया.

आजच्या (१५ मार्च) बंद भावानुसार निफ्टी ५९०० च्या जवळ असून आजचा निफ्टी ऑप्शन चार्ट खाली दाखविला आहे.

(मोठा करून पाहण्यासाकृपया चार्टवर क्लिक करा.)
 

मुळ ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ स्ट्रॅटेजीनुसार ५९०० या एकाच स्ट्राईक प्राईजचेच कॉल व पुट खरेदी केले तर आजच्या भावानुसार दोन्हीची बेरीज सुमारे १२२ होते. म्हणजेच आपल्याला १२२*५०=६१०० रु. गुंतवावे लागतील आणि हा आपला जास्तीतजास्त संभाव्य तोटा असेल. जर आपणास ही रक्कम आणखी कमी असावी असे वाटत असेल तर ?

त्यासाठी आपल्याला ५९०० या एकाच स्ट्राईक प्राईज ऐवजी दोन निरनिराळ्या स्ट्राईक प्राईज निवडाव्या लागतील. ATM च्या तुलनेत, OTM कॉल आणि OTM पुट हे स्वस्त असल्याने, ६००० चा कॉल व ५८०० चा पुट असे दोन्ही OTM ऑप्शन्स खरेदी केले जातात. वरील चार्टनुसार त्यांच्या किंमती अनुक्रमे २३.३५ व २८.५० आहेत. दोन्ही मिळून सुमारे ५२ पॉइन्ट्स होतात व म्हणून एकूण गुंतवणूक होते फक्त २६००रु. !

म्हणजेच या ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ मुळे आपला संभाव्य तोटा हा लक्षणीयरित्या कमी झालेला दिसतो. मार्केटच्या दिशेवर अवलंबून नसलेली आणि वोलॅटाईल मार्केटमध्ये फायदेशीर पण कमी खर्चात काम भागवणारी ही स्ट्रॅटेजी असल्याने ती बरीच लोकप्रियही आहे. मात्र प्रत्येक स्ट्रेटेजीचे काही फायदे तसेच तोटेही असतात. लक्षांत घ्या कि आधी बघितलेली ‘लॉन्ग स्ट्रॅडल’ आणि आताची ही ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ या दोन्ही स्ट्रॅटेजी खरेतर ‘वोलॅटिलिटी’ स्ट्रॅटेजी आहेत. म्हणजेच यांचे यश हे मार्केटच्या वोलॅटिलिटी वर पूर्णपणे अवलंबून असते. लॉन्ग स्ट्रॅडलच्या बाबत आपण बघितले कि कोणत्यातरी एका बाजूस निफ्टी हा ब्रेक-इव्हन पॉइन्टच्या पलिकडे गेला तरच फायदा होतो. हा ब्रेक-इव्हन पॉइन्ट लॉन्ग स्ट्रॅडलच्या बाबतीत (स्ट्राईक प्राईज + दोन्ही ऑप्शनची बेरीज) इतका असतो. पण लॉन्ग स्ट्रॅन्गल मध्ये मात्र आपण दोन्ही बाजूस १०० पॉइन्टच्या अंतराने स्ट्राईक प्राईज निवडल्याने, ब्रेक इव्हन पॉइन्टही दोन्ही बाजूला दूरवर जातो.

वरील उदाहरणात वरील बाजूस ६०५२ तर खालील बाजूस ५७४८ हा ब्रेक इव्हन पॉइन्ट असेल. म्हणजेच अर्थपूर्ण फायदा होण्यासाठी निफ्टीने महिनाअखेरीस ६१०० किंवा ५७०० च्या आसपास मजल मारणे आवश्यक आहे. आजच्या तारखेपासून एक्सपायरीला जेमतेम ९ दिवस बाकि असताना निफ्टीने कोणत्याही बाजूस एवढी मजल मारणे नेहमीच शक्य असते असे नाही. शेवटच्या आठवड्यापर्यंत जर निफ्टीने अपेक्षीत ती मोठी हालचाल केलीच नाही, तर उरल्यासुरल्या टाईम व्हॅल्युसह दोन्ही ऑप्शन विकून टाकून शक्य तेवढी रक्कम परत मिळवण्याची वेळही येते. 
या उदाहरणात निफ्टीच्या किंमतीच्या दोन्ही बाजूला १०० पॉइन्ट्स अंतराने स्ट्राईक प्राईज निवडल्या असल्या तरशिल्लक मुदत जास्त असेल तर अधिक अंतरावरील स्ट्राईक प्राईजही निवडता येतात. जेवढे अंतर जास्त तेवढे ऑप्शन्स स्वस्त असतात मात्र फायदा मिळणे तेवढेच ीण होत जाते हे ध्यानात घेवून या दोन्ह बाबींचा विचार करूनच स्ट्राईक प्राईज निवडाव्यात.
  

सारांश हा, कि ‘लॉन्ग स्ट्रॅन्गल’ स्ट्रॅटेजीत मुळ गुंतवणूक कमी राखताना फायद्याची शक्यताही कमी होण्याचा संभव असतो. अर्थात एक्सपायरीला भरपूर दिवस शिल्लक असतील आणि काही महत्वाची घटना बाजारावर मोठा परिणाम करण्याची शक्यता वाटत असेल, तर कमी गुंतवणूकीत आणि कमी धोका पत्करूनही मोठा फायदा मिळवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी नक्कीच उपयुक्त आहे.     

Read more »