Share/Bookmark

२७ जुलै, २०१०

रिजर्व बेंक क्रेडिट पोलिसी आणि रिलायन्स,एल.एंड टी.चे निकाल...

    मंगळवार दि.२७ जुलाई-
  काल सोमवारी चांगल्या आशियाई बाजारांच्या पार्श्वभूमीवरही आपला बाजार सुरुवातीपासून घसरत गेला. असे का झाले आणि नजिकच्या काळात आणखी काय काय घडेल याचा अंदाज घेवूया.
    युरोपीयन बेंकांची स्ट्रेस टेस्ट व त्याच्या निकालामुळे शुक्रवारी अमेरिकन बाजार मजबूत झाले होते. सोमवारी सकाळी आशियाई बाजारही मजबूत होते. याचाच अर्थ आपला बाजार पडण्याची कारणे स्थानिक आहेत.
  प्रमुख कारण म्हणजे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिजर्व बेंकेच्या, मंगळवारी जाहीर होणार्या क्रेडिट पोलिसीमध्ये रेपो रेट व रिवर्स रेपो रेट ( कदाचित सी.आर. आर. रेट) वाढण्याची शक्यता !
  थोडक्यात सांगायचे तर -  "रेपो रेट" म्हणजे रिजर्व बेंकेकडून इतर बेंकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर व "रिवर्स रेपो" म्हणजे रिजर्व बेकेने (सिक्युरिटीज च्या मोबदल्यात) इतर बेंकांकडून जमा केलेल्या निधीवरील व्याजदर होय.
  "सी.आर.आर. रेट" म्हणजे देशातील इतर सर्व बेंकांना , आपल्या केश रिजर्वच्या ( राखीव निधी) ठराविक टक्के रक्कम रिजर्व बेंकेकडे नियमानुसार ठेवावी लागते- त्याची टक्केवारी होय.
       हे रेट कमी - जास्त करून रिजर्व बेंक देशातील पैशाची उपलब्धता ( LIQUIDITY) कमी - जास्त करू शकते आणि त्याद्वारे इन्फ्लेशन ( महागाई ) तसेच डिफ्लेशन ( अनुत्पादकता, तुटपुन्जे पगार, व उलाढालीतील अनुत्साह ) या गोष्टी नियंत्रणात आणू शकते.
 अशा प्रकारच्या ( मंगळवारी जाहीर होणार्या ) क्रेडिट धोरणामुळे विविध उद्योगांना लागणार्या कर्जाचा दरही ठरत असल्याने  बाजारावर परिणाम होणे साहजिक असते.
  सर्वसाधारण अंदाजानुसार रेपो व रिवर्स रेपो दर हे ०.२५ % वाढण्याची शक्यता आहे.
  जर रेपो आणि रिवर्स रेपोबरोबर सी.आर.आर. रेटही वाढल्रे तर त्याचा शेअरबाजारावर प्रतिकूल परिणाम होवू शकतो. त्याचीच चूणूक आपल्याला बेंकाच्या शेअरमध्ये काल झालेल्या विक्रीतून दिसली आहे.
  माझ्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार अशा प्रकारे व्याजदरातील बदलाने होणारा बाजारावरील परिणाम हा तात्कालिक स्वरुपाचा असतो आणि त्यामुळे चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असेल तर आपले काहीही बिघडणार नाही.
      बाजार पडण्याचे दुसरे कारण म्हणजे मारुतीचे अनपेक्षीत आलेले वाईट तिमाही निकाल  ! यामुळे सर्व वाहन कंपन्यांमध्ये विक्री झाली - अर्थात त्यांच्या किंमती गेल्या आठवड्यात वाढल्याचे आपण बघितलेच असेल. तेव्हा वर-खाली होणारे भाव हे तर शेअरबाजाराचे वैशिष्ट्यच आहे - त्याचा फायदा वेळीच घेणे महत्वाचे असते.
 तिसरे कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज, एल.एन्ड टी., स्टेट बेंक या व इतर मोठ्या कंपन्यांचे या आठवड्यात जाहीर होणारे तिमाही निकाल हे होय.
      अशा विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बाजाराने थोडा दम टाकणे अगदी साहजिक आहे. सी.आर.आर.रेट वाढला नाही आणि कंपन्याचे निकाल वाईट नसले तर बाजार आणखी पडण्याचे काही कारण दिसत नाही. तांत्रिक दृष्ट्या महत्वाची असलेली ५४०० ही पातळी निफ्टीने काल निर्णायकरित्या तोडलेली नाही, मात्र वरील घटनांच्या प्रभावामुळे टेक्निकल लेवल्स काही प्रमाणात ओलांडल्या जावू शकतात -  मात्र घटनांचा तात्कालिक प्रभाव ओसरेपर्यंतच !
२९ जुलाई रोजीच्या F & O सेटलमेंट नंतर परिस्थिती अधिकाधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
   

1 comments:

  • Deepak says:
    ०५ जून, २०१५

    Pl join me to the blog as a member. So that i can receive updates. My email id is deepak16759@gmail.com Thanks.