Share/Bookmark

७ एप्रि, २०१८

BSE डॉलेक्स-३० आणि अमेरिकन इंडेक्स ...

माझ्या सर्व वाचकांना आठवतच असेल कि नववर्षदिनी लिहिलेल्या माझ्या या आधीच्या पोस्टमध्ये आपण मार्केट करेक्शनविषयी बोललो होतो. माझ्या अपेक्षेप्रमाणेच मार्केट तेव्हापासून बरेच घसरलेही. मात्र ही तात्पुरती घसरण आहे कि २००८ प्रमाणे रिसेशनची सुरुवात आहे याबद्दल निष्कर्ष काढणे खरोखर कठीण आहे.
अशा परिस्थितीत सर्व माध्यमातून व चॅनेल्स वरून अनेकदा याविषयी मते मांडली जात आहेत. अशाच चर्चेत अलीकडे एक थोडा वेगळा मुद्दा मांडला गेलाय त्याबद्दल आज बोलूया. 

हा वेगळा मुद्दा आहे तो सेन्सेक्सची खरी किंमत डॉलर टर्ममध्ये मोजण्याचा. आपणा सर्वाना माहीतच आहे कि आपल्या भारतीय शेअरबाजारात विदेशी  गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करत असतात. एवढेच नव्हे तर त्यांची ताकद मोठी असल्याने अनेकदा आपल्या बाजाराची दिशा तेच ठरवतात असे बोलले जाते. असो. आपला विषय तो नाही, मात्र हे परकीय गुंतवणूकदार ज्याना (FII) असे म्हटले जाते, ते  साहजिकच सोने वा पेट्रोलियम या ग्लोबल कमोडीटी प्रमाणेच येथील शेअर्सची वा निर्देशांकाची किंमतही रुपयात न मोजता डॉलरमध्येच मोजतात. या कारणाने बॉम्बे स्टोक एक्सचेंज ने एक खास वेगळा निर्देशांक स्थापन केला आहे. जसा बीएसई 30- सेन्सेक्स तसा हा डॉलेक्स-30. हा इंडेक्स सन २००१ मध्ये सुरु केला गेला. हा खरेतर सेन्सेक्सचेच एक रूप आहे पण त्याची किंमत मात्र डॉलर्स मध्ये मोजली जाते. हे डॉलर टर्म म्हणजे काय प्रकरण आहे आणि आताच त्याची एवढी चर्चा कशाला होत आहे ते आता बघुया.

बरोबर दहा वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी २००८ मध्ये सेन्सेक्स २१००० च्या थोडा वर होता आणि त्या काळची ती सर्वोच्च पातळी होती. आणि आता जानेवारी १८ मध्ये तो सर्वोच्च पातळीवर म्हणजे सुमारे ३६००० वर  पोचला होता म्हणजे २००८ ची उच्च पातळी जरी लक्षात घेतली तरी आता सेन्सेक्स त्या उच्च पातळीच्याही  सुमारे पावणेदोन पट झाल्याचे सहजच कळते आहे. याचाच अर्थ तो आता बराच महाग झाला आहे. पण हे सर्व आपण पहातोय ते भारतीय चलनाच्या मोजमापात. मात्र विदेशी गुंतवणूकदार हेच सर्व आकडे पहातात ते डॉलरच्या मोजमापात.आणि खरी मेख येथेच आहे.

दहा वर्षापूर्वी एका डॉलरची किमत त्यावेळच्या  दरानुसार सुमारे  ४० रु. होती. पण सध्याच्या दरानुसार डॉलरची भारतीय चलनातली किंमत पोचली आहे सुमारे ६५ रु. वर !  भारतीय चलन सुमारे साठ टक्के घसरल्याने भारतात सर्वच वस्तूंच्या किमती वाढलेल्या दिसत आहेत. मात्र अमेरिकेत तशा त्या वाढलेल्या नाहीत. याचाच अर्थ आपल्या दृष्टीकोनातून सेन्सेक्स महागला असला तरी डॉलर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करणा-या विदेशी गुंतवणूकदाराना तो तितकासा महाग वाटत नसणार हे स्पष्ट आहे . विशेषत: याच दहा वर्षांत अमेरिकन इंडेक्स 'डाउ जोन्स' मात्र त्यांच्या दृष्टीकोनातूनही  महागला आहे.

अधिक खुलाशाकारता कृपया खालील डॉलेक्स-30 चा ग्राफ पहा.
   
वरील ग्राफ पाहिल्यास लगेच लक्षात येईल कि २००८ साली डॉलेक्स-३० ने ४४०० ही सर्वोच्च पातळी गाठली होती आणि तब्बल दहा वर्षानंतरही जानेवारी २०१८ मध्ये तो ४६०० ही सर्वोच्च पातळी दाखवतोय. म्हणजे प्रत्यक्षात दहा वर्षानंतरही तो आहे तिथेच आहे. अशा परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदाराना तो महाग वाटायची शक्यता नाही कारण याच दहा वर्षाच्या काळात 'डाउ जोन्स' ने १४००० वरून थेट २६००० ची झेप घेतलेली आहे. ही जवळजवळ दुप्पट वाढ बघता डॉलेक्स हा तुलनेत स्वस्तच आहे. आपला सेन्सेक्स जी वाढ दाखवतोय ती प्रत्यक्षात वाढ नसून रुपयाच्या किमतीत झालेली घट आहे - आता बोला !
मित्रानो वरील मत हे माझे मत नसून अलीकडेच वाचनात आलेला मुद्दा आहे जो काही जाणकार मांडत आहेत. त्यांच्या मते सेन्सेक्स मध्ये आता यापुढेच खरी वाढ दिसणार आहे कारण डाउ जोन्स ने शिखर गाठल्याने आता तेथील बाजारातून पैसा काढून घेवून तोच पैसा इमर्जिंग मार्केट्समध्ये म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशाच्या मार्केट्स मध्ये गुंतवला जाईल. या त्यांच्या विधानाला अधिक जोर येण्यासाठी ते जाणकार हेही सांगत आहेत कि यापुढची दहा वर्षे अमेरिकेची नसून भारतासारख्या देशांची असणार आहेत.
आपल्या देशाविषयी आशादायक वा अनुकूल मत असायला माझी काही हरकत नाही, मात्र हे सगळे प्रत्यक्षात होणार आहे का हाच खरा प्रश्न आहे.
अमेरिकेच्या मार्केटने शिखर गाठलेले आहे हे सत्य आहे पण तसे ते जेव्हा २००७  मध्येही गाठले होते त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबरच सर्व जागतिक बाजार व आपला सेन्सेक्सही कोसळत गेला. म्हणजे एकप्रकारे अमेरिकेच्या बाजाराचे आपण अनुकरण करत गेलो इतकेच. 
त्यातच भारतातील सध्याची परिस्थिती सुद्धा बँकांच्या बुडीत कर्ज प्रकरणामुळे फारशी विश्वासार्ह राहिलेली नाही. एक म्हण आहे कि जर किचनमध्ये एक झुरळ दिसले तर त्याला मारून काम भागत नसते. एक झुरळ फिरताना दिसले याचाच अर्थ सिंकखाली, कपाटात सांदीकोप-यात आणखी झुरळे नक्की असतात. आपल्याकडील भ्रष्टाचार प्रकरणाचेही तसेच आहे. त्यातच अमेरिका व चीन दरम्यान 'ट्रेड वॉर' सुरु झाले आहे. हे ही इतक्यात संपण्याची लक्षणे दिसत नाही आहेत. अशामुळे जर अमेरिकेचे मार्केट कोसळले तरी तो पैसा भारतीय शेअर बाजारातच येईल कि सोने वा रिअल इस्टेट (कि बिटकॉईन ?) सारख्या सुरक्षित (?) समजल्या जाणा-या ठिकाणी गुंतवला जाईल हे कसे सांगता येईल ?
  अशा ग्लोबल 'सेल-ऑफ' च्या वातावरणात फक्त भारतीय कंपन्या मात्र उत्कृष्ट कामगिरी करून अर्निन्गचे आकडे सुधारतील ही शक्यता अगदीच कमी असेल. त्यामुळे याही वेळी ग्लोबल मार्केट्स पडत गेली तर आपणही त्याला अपवाद ठरणार नाही असेच माझे मत आहे. त्यामुळेच बाजारात कमी भावात काही शेअर्स मिळत असले तरी फार आक्रमकपणे खरेदी करण्याची ही वेळ नाही हे लक्षात ठेवावे. 
देशविदेशातील परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला तरच मोठी तेजी दिसेल. मात्र ती शक्यता फार कमी दिसते आहे.
सध्या गेले दोन आठवडे निफ्टी इंडेक्स हा २०० DMA च्या आसपास घोटाळताना दिसत आहे. या दोनशे DMA मूव्हिंग अवरेज विषयी पुढील लेखात.

1 comments:

 • Nordin Ghani says:
  २५ सप्टेंबर, २०१८

  Grow Your Business Today! Apply Now For Credit Facility

  We provide personal finances for debt consolidation, bad credit finances, unsecured finances, finances for bad credit and instant secured finances with cheap rates. Do you have a firm or company that need finance to start up a business or need,personal finance, Debt consolidation? For more information. We will provide you with finance to meet your needs. For more information contact.

  We offer Easy and Fast Credit facility.
  Email: royalworldfundings@gmail.com