Share/Bookmark

२९ सप्टें, २०१८

तीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची !

  माझ्या नियमित वाचकांना आठवतच असेल कि या वर्षाच्या सुरुवातीलाच मी लिहिले होते कि निफ्टी पी/ई रेशो हा 27 पेक्षा जास्त झालेला आहे आणि आता मार्केट खूपच महागले आहे तेव्हा याहून फार जास्त वाढेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा अधिकांश शेअर्स विकून आपला पैसा बँक एफ डी सारख्या सुरक्षित. ठिकाणी वा इतरत्र गुंतवावा आणि मार्केट खाली येण्याची वाट बघावी.

मी हे लिहील्यानंतरही सहा महिने मार्केट थोडे कन्सॉलिडेट होत होते व थोडे वाढलेही. शेवटी तर निफ्टी पी/ई रेशो 28 च्याही वर गेला आणि अखेर सप्टेंबरमध्ये व्हायचे तेच झाले .
बाजाराचा गुणधर्मच असा असतो कि दर वेळेस तेजीच्या शिखरावर असताना वा तीव्र मंदीमध्ये सर्वसामान्यांना असे वाटत राहाते कि यावेळी काहीतरी निराळे होणार . 2008 प्रमाणे आता होणार नाही व आताची परिस्थिती निराळी आहे म्हणून. 
याच मानसिकतेचा फायदा घेऊन गेले सात आठ महिने विशेष चांगली काहीही बातमी नसताना देखील बाजार अत्युचच पातळीवर झुलवत ठेवला गेला आणि मोठे प्लेअर्स त्यांच्याकडील शेअर्स याचवेळी हळूहळू विकत गेले. दरवेळी अगदी असेच होत असते फक्त कारणे वेगवेगळी असतात . चार्ट पॅटर्न थोडेफार निराळे दिसतात. पण मूलभूत सत्य हेच असते कि अतीउंचावर टिकून राहणे फार काळ जमत नसते.
अनेकांचा असा विश्वास असतो कि थेट शेअर्स न घेता म्युच्युअल फंड वा सिप च्या माध्यमातून पैसे गुंतवले तर धोका नसतो म्हणून. पण हे अर्धसत्य आहे. फंडाचा पैसा हा बाजारातच गुंतवलेला असतो आणि कितीही उत्तम शेअर्स मध्ये ही गुंतवणूक असली तरी हे उत्तम शेअर्सही मंदीच्या झळीपासून अलिप्त राहू शकत नाहीत.
एक मात्र खरं कि उत्तम शेअर्स दीर्घावधीत पुन्हा जुनी उंची गाठतात व त्यापुढेही वाढू शकतात. पण कळीचा मुद्दा हाच आहे कि दरम्यान जो दोन ते तीन वर्षांचा मंदीचा कालावधी असतो तेवढ्यापुरते तरी हे उत्तम शेअर्ससुद्धा निगेटिव्ह रिटर्न्स देण्याची शक्यता अधिक असते
मग तेवढ्या काळापुरते हे पैसे बँक एफ डी सारख्या ठिकाणी फिक्स इन्कम मध्ये गुंतवले तर त्यात वाढ होत राहील आणि खूप स्वस्ताईच्या काळात म्हणजे निफ्टी पी/ई 15 पेक्षा खाली गेल्यावर हाच पैसा त्याच उत्तम शेअर्समध्ये गुंतवता येइल व त्याच रकमेमध्ये अधिक शेअर्स खरेदी करता येतील.
अर्थात ज्यांनी आधीच सिप द्वारे गुंतवणूक सुरु केली आहे त्यांनी बाजार उतरत असताना सिप थांबवू नये तर सुरु ठेवणेच हिताचे. मात्र नव्याने सिप सुरु करण्याची ही वेळ नव्हे.
सिप योजनासुद्धा बाजार स्वस्त असताना सुरु केली तर तूलनेने लवकर नफ्यात येते हाच अनुभव आहे.

हल्ली दुसरा एक चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे डॉलारच्या तुलनेत घसरलेला रुपया. याकारणाने अनेक जण बाजारात गुंतवणूक धोक्याची मानत आहेत.मात्र याबाबत माझे मत अगदी विरुद्ध आहे.
घसरत्या रुपयामुळे महागाई वाढते व सर्वच वस्तू उत्पादने तसेच कमोडिटीज व सेवा (सर्व्हिसेस ) या महागतात हे सर्वानाच माहीत आहे.
आता असा विचार करा कि आपण एका खाद्यपदार्थ बनवणार्या कंपनीचा शेअर घेतो म्हणजे नेमके काय करतो ? तर त्या कंपनीचे छोटेसे मालकच बनतो. कंपनीची उत्पादनाची जी क्षमता आहे ती क्षमताच छोट्या प्रमाणात का होईना आपण धारण करत असतो. वाढत्या महागाईमुळे त्या उत्पादनाची किंमत वाढणारच असते आणि उत्पादक म्हणजे मालक अशा वाढीव किमतीला उत्पादन विकून फायदा मिळवणारच असतात.
तीच गोष्ट आहे सेवा पुरवण्याची. अमूक एक सेवा महागाईमुळे स्वस्त झाली असं
कधी आपण ऐकलंय का ? तर सर्व प्रकारच्या सेवासुद्धा घसरत्या रुपयामुळे महागच होत असतात.
याचाच अर्थ असा कि शेअर धारण करणे म्हणजे अप्रत्यक्ष रित्या उत्पादन व सेवा पुरवण्याची क्षमताच धारण करण्यासारखे असल्याने ही क्षमता महागली कि शेअरची किंमत नक्कीच वाढणार असते.
उत्तम कंपन्यांची उत्पादने व सेवा या कितीही महाग झाल्या तरी लोक त्यांचा वापर करणारच आहेत. व अशा कंपन्यांना फायदा होतच राहाणार आहे .
तेव्हा डॉलर रूपया दराबाबत मिडीया मध्ये व राजकीय ओरड होत असली तरी 
कंपन्या फायदा कमावण्याचे थांबवणार नाहीत. मग चढत्या भावाच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवायचा कि घसरत्या चलनाला धरून राहायचे हे आपण ठरवायचे आहे.
एक मात्र खरे कि अशा निगेटीव्ह बातम्या येत असताना व 2019 हे निवडणूक वर्ष येत असल्याने मार्केट सावधगिरी बाळगेल.आक्रमक खरेदी कुणीच न केल्याने वीकनेस राहील .तशात एकूणच मार्केटने शिखर आधीच गाठल्याने कदाचित बेअर मार्केट सुरु झाले तर आता दोन तीन वर्षे खाली येण्याची वा नरमाईचीच शक्यता जास्त असेल. मात्र केवळ रुपया घसरला म्हणून बाजार कायम पडत रहाणार नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
शेवटी एकच सांगतो कि 1990 पासून रुपया दरवर्षी सरासरी पाच टक्के घसरत आहे मात्र याच काळात सेन्सेक्स ने तब्बल वार्षिक 14 टक्के वाढ दाखवली आहे हे नाकारता येईल का ?

Read more »

७ एप्रि, २०१८

BSE डॉलेक्स-३० आणि अमेरिकन इंडेक्स ...

माझ्या सर्व वाचकांना आठवतच असेल कि नववर्षदिनी लिहिलेल्या माझ्या या आधीच्या पोस्टमध्ये आपण मार्केट करेक्शनविषयी बोललो होतो. माझ्या अपेक्षेप्रमाणेच मार्केट तेव्हापासून बरेच घसरलेही. मात्र ही तात्पुरती घसरण आहे कि २००८ प्रमाणे रिसेशनची सुरुवात आहे याबद्दल निष्कर्ष काढणे खरोखर कठीण आहे.
अशा परिस्थितीत सर्व माध्यमातून व चॅनेल्स वरून अनेकदा याविषयी मते मांडली जात आहेत. अशाच चर्चेत अलीकडे एक थोडा वेगळा मुद्दा मांडला गेलाय त्याबद्दल आज बोलूया. 

हा वेगळा मुद्दा आहे तो सेन्सेक्सची खरी किंमत डॉलर टर्ममध्ये मोजण्याचा. आपणा सर्वाना माहीतच आहे कि आपल्या भारतीय शेअरबाजारात विदेशी  गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करत असतात. एवढेच नव्हे तर त्यांची ताकद मोठी असल्याने अनेकदा आपल्या बाजाराची दिशा तेच ठरवतात असे बोलले जाते. असो. आपला विषय तो नाही, मात्र हे परकीय गुंतवणूकदार ज्याना (FII) असे म्हटले जाते, ते  साहजिकच सोने वा पेट्रोलियम या ग्लोबल कमोडीटी प्रमाणेच येथील शेअर्सची वा निर्देशांकाची किंमतही रुपयात न मोजता डॉलरमध्येच मोजतात. या कारणाने बॉम्बे स्टोक एक्सचेंज ने एक खास वेगळा निर्देशांक स्थापन केला आहे. जसा बीएसई 30- सेन्सेक्स तसा हा डॉलेक्स-30. हा इंडेक्स सन २००१ मध्ये सुरु केला गेला. हा खरेतर सेन्सेक्सचेच एक रूप आहे पण त्याची किंमत मात्र डॉलर्स मध्ये मोजली जाते. हे डॉलर टर्म म्हणजे काय प्रकरण आहे आणि आताच त्याची एवढी चर्चा कशाला होत आहे ते आता बघुया.

बरोबर दहा वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी २००८ मध्ये सेन्सेक्स २१००० च्या थोडा वर होता आणि त्या काळची ती सर्वोच्च पातळी होती. आणि आता जानेवारी १८ मध्ये तो सर्वोच्च पातळीवर म्हणजे सुमारे ३६००० वर  पोचला होता म्हणजे २००८ ची उच्च पातळी जरी लक्षात घेतली तरी आता सेन्सेक्स त्या उच्च पातळीच्याही  सुमारे पावणेदोन पट झाल्याचे सहजच कळते आहे. याचाच अर्थ तो आता बराच महाग झाला आहे. पण हे सर्व आपण पहातोय ते भारतीय चलनाच्या मोजमापात. मात्र विदेशी गुंतवणूकदार हेच सर्व आकडे पहातात ते डॉलरच्या मोजमापात.आणि खरी मेख येथेच आहे.

दहा वर्षापूर्वी एका डॉलरची किमत त्यावेळच्या  दरानुसार सुमारे  ४० रु. होती. पण सध्याच्या दरानुसार डॉलरची भारतीय चलनातली किंमत पोचली आहे सुमारे ६५ रु. वर !  भारतीय चलन सुमारे साठ टक्के घसरल्याने भारतात सर्वच वस्तूंच्या किमती वाढलेल्या दिसत आहेत. मात्र अमेरिकेत तशा त्या वाढलेल्या नाहीत. याचाच अर्थ आपल्या दृष्टीकोनातून सेन्सेक्स महागला असला तरी डॉलर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करणा-या विदेशी गुंतवणूकदाराना तो तितकासा महाग वाटत नसणार हे स्पष्ट आहे . विशेषत: याच दहा वर्षांत अमेरिकन इंडेक्स 'डाउ जोन्स' मात्र त्यांच्या दृष्टीकोनातूनही  महागला आहे.

अधिक खुलाशाकारता कृपया खालील डॉलेक्स-30 चा ग्राफ पहा.
   
वरील ग्राफ पाहिल्यास लगेच लक्षात येईल कि २००८ साली डॉलेक्स-३० ने ४४०० ही सर्वोच्च पातळी गाठली होती आणि तब्बल दहा वर्षानंतरही जानेवारी २०१८ मध्ये तो ४६०० ही सर्वोच्च पातळी दाखवतोय. म्हणजे प्रत्यक्षात दहा वर्षानंतरही तो आहे तिथेच आहे. अशा परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदाराना तो महाग वाटायची शक्यता नाही कारण याच दहा वर्षाच्या काळात 'डाउ जोन्स' ने १४००० वरून थेट २६००० ची झेप घेतलेली आहे. ही जवळजवळ दुप्पट वाढ बघता डॉलेक्स हा तुलनेत स्वस्तच आहे. आपला सेन्सेक्स जी वाढ दाखवतोय ती प्रत्यक्षात वाढ नसून रुपयाच्या किमतीत झालेली घट आहे - आता बोला !
मित्रानो वरील मत हे माझे मत नसून अलीकडेच वाचनात आलेला मुद्दा आहे जो काही जाणकार मांडत आहेत. त्यांच्या मते सेन्सेक्स मध्ये आता यापुढेच खरी वाढ दिसणार आहे कारण डाउ जोन्स ने शिखर गाठल्याने आता तेथील बाजारातून पैसा काढून घेवून तोच पैसा इमर्जिंग मार्केट्समध्ये म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशाच्या मार्केट्स मध्ये गुंतवला जाईल. या त्यांच्या विधानाला अधिक जोर येण्यासाठी ते जाणकार हेही सांगत आहेत कि यापुढची दहा वर्षे अमेरिकेची नसून भारतासारख्या देशांची असणार आहेत.
आपल्या देशाविषयी आशादायक वा अनुकूल मत असायला माझी काही हरकत नाही, मात्र हे सगळे प्रत्यक्षात होणार आहे का हाच खरा प्रश्न आहे.
अमेरिकेच्या मार्केटने शिखर गाठलेले आहे हे सत्य आहे पण तसे ते जेव्हा २००७  मध्येही गाठले होते त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबरच सर्व जागतिक बाजार व आपला सेन्सेक्सही कोसळत गेला. म्हणजे एकप्रकारे अमेरिकेच्या बाजाराचे आपण अनुकरण करत गेलो इतकेच. 
त्यातच भारतातील सध्याची परिस्थिती सुद्धा बँकांच्या बुडीत कर्ज प्रकरणामुळे फारशी विश्वासार्ह राहिलेली नाही. एक म्हण आहे कि जर किचनमध्ये एक झुरळ दिसले तर त्याला मारून काम भागत नसते. एक झुरळ फिरताना दिसले याचाच अर्थ सिंकखाली, कपाटात सांदीकोप-यात आणखी झुरळे नक्की असतात. आपल्याकडील भ्रष्टाचार प्रकरणाचेही तसेच आहे. त्यातच अमेरिका व चीन दरम्यान 'ट्रेड वॉर' सुरु झाले आहे. हे ही इतक्यात संपण्याची लक्षणे दिसत नाही आहेत. अशामुळे जर अमेरिकेचे मार्केट कोसळले तरी तो पैसा भारतीय शेअर बाजारातच येईल कि सोने वा रिअल इस्टेट (कि बिटकॉईन ?) सारख्या सुरक्षित (?) समजल्या जाणा-या ठिकाणी गुंतवला जाईल हे कसे सांगता येईल ?
  अशा ग्लोबल 'सेल-ऑफ' च्या वातावरणात फक्त भारतीय कंपन्या मात्र उत्कृष्ट कामगिरी करून अर्निन्गचे आकडे सुधारतील ही शक्यता अगदीच कमी असेल. त्यामुळे याही वेळी ग्लोबल मार्केट्स पडत गेली तर आपणही त्याला अपवाद ठरणार नाही असेच माझे मत आहे. त्यामुळेच बाजारात कमी भावात काही शेअर्स मिळत असले तरी फार आक्रमकपणे खरेदी करण्याची ही वेळ नाही हे लक्षात ठेवावे. 
देशविदेशातील परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला तरच मोठी तेजी दिसेल. मात्र ती शक्यता फार कमी दिसते आहे.
सध्या गेले दोन आठवडे निफ्टी इंडेक्स हा २०० DMA च्या आसपास घोटाळताना दिसत आहे. या दोनशे DMA मूव्हिंग अवरेज विषयी पुढील लेखात.

Read more »

१ जाने, २०१८

ढाण्या वाघाच्या शिकारीसाठी बन्दूक भरलेली ठेवा !

माझ्या सर्व वाचक आणि गुन्तवणूकदार मित्राना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
 नोटाबन्दी, जीएसटी, उत्तरप्रदेश व गुजरात निवडणूका अशा घटनानी व्यापून गेलेले जुने वर्ष सम्पून बघता बघता नवे वर्ष येवून ठेपले देखील !
सरत्या वर्षाच्या शेवटी बाजाराने सर्व अनुकुल प्रतिकूल घटनाना पचवत नवी उन्ची गाठलेली आहे हे सर्व भारतीय गुन्तवणूकदारान्चे भाग्यच आहे.
मात्र साहजिकच आता पूढील वर्षीही बाजार असे भरभरून यश देणार का हा नेहमीचाच प्रश्न सर्वान्च्या मनात आहे.आपण शेअर्स खरेदी केले, त्यावर चान्गला फायदाही झालेला दिसत आहे. पण आता बाजार खुप महाग झालेला असताना आणि विशेषतः निफ्टी पी/ई २७ च्या आसपास असताना ते विकावेत का ? पण त्याच वेळी असेही वाटतेय कि देशाची आर्थिक प्रगती आत्ता कुठे सुरु होत आहे, रुपया सतत वधारत आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयाची रिफॉर्म्सची फळे लवकरच दिसू लागणार आहेत, अशा परिस्थितीत MOTHER OF ALL BULL RUNS असे ज्याला मिडियामधुन सतत सम्बोधले जात आहे तो बुल रन तर आत्ता कुठे सुरु होणार आहे आणि त्याचा फायदा घ्यायचा तर बाजारात गुन्तवणूक कायम ठेवायला हवी असेही वाटत आहे. खरे ना ?
मग आपण आणखी किती वर्षे आपले शेअर्स होल्ड करायला हवे? १ वर्ष, दोन वर्षे कि तीन ? मला पण याचे नक्की उत्तर माहिती नाही. पण मला मनापासून काय वाटते ते मी आज सान्गणार आहे.

आपण सर्वानी WARREN BUFFET चे नाव ऐकलेच असेल. हे जगप्रसिद्ध आणि महान गुन्तवणूकदार म्हणतात कि त्यान्चा शेअर्स होल्ड करण्याचा काळ हा  FOREVER आहे. म्हणजेच एकदा घेतलेले शेअर्स ते कायम धारण करतात. ते कधीच विकू नये असे त्यान्चे मत आहे. साहजिकच आहे कारण निवडून पारखून घेतलेल्या उत्तम कम्पन्याचे शेअर्स विकावे तरी कशासाठी ? पण या म्हणण्याचा असा शब्दशः अर्थ काढू नये असे माझे मत आहे. कारण त्यान्ची जी बर्कशायर हॅथवे ही कम्पनी आहे त्या कन्पनीचे १९९२ मधले होल्डीन्ग आणि २०१७ मधील होल्डीन्ग  यात खुपच बदल झालेले दिसत आहेत. (नेटवरील माहितीवर आधारित) तेव्हा परिस्थितीनुसार आपल्या पोर्टफॉलिओमध्ये बदल करणे वा विक्री करणे हे आवश्यकच आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यासारख्या सामान्य गुन्तवणूकदाराचे निवड कौशल्य आणि या वॉरेन बफे साहेबान्चे कौशल्य यात फरक तर असणारच ना ? ;-) 
कम्पनीचा व तीच्या बिझीनेसचा आणि प्रॉफिटॅबिलिटीचा अभ्यास म्हणजेच फन्डामेन्टल स्टडी हा भाग महत्वाचा आहेच पण शेअरचे उन्चावलेले मूल्य किन्वा वॅल्युएशन हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे हे विसरता कामा नये. बाजार नुसताच महाग आहे कि हा एक अती फुगलेला बबल आहे यात मतभेद असू शकतात. त्यामुळे बाजाराचा कडेलोट कधी होणार हे कुणालाच नक्की सान्गता येत नाही. मात्र एका बाबतीत सर्वान्चे एकमत आहे ते म्हणजे बाजारात  OVERBOUGHT आणि OVERSOLD अशा दोन अवस्था आळीपाळीने येत असतात आणि त्या दरम्यान बाजाराला एकदातरी वास्तवाच्या जवळपास अशा किमतीला यावेच लागते. या वास्तवाच्या जवळपास  येण्याच्या प्रक्रियेला MEAN REVERSION असे नाव आहे.साध्या भाषेत आपण याला बाजाराची खरी वा अतिशयोक्त नसलेली पातळी असे म्हणू शकतो. आणि सध्या तरी बाजार या वास्तव पातळीच्या बराच वर आहे हे सत्य कुणी नाकारणार नाही.
तेव्हा आज उद्या वा केव्हातरी बाजार कुठल्याही निमीत्ताने कोसळणार हे अतिशय साधे सरळ सत्य आहे. ताणलेला रबर जसा सोडुन दिल्यावर मूळ स्थितीला जातो तसा बाजार कधीतरी वास्तव पातळीला जाणारच आहे. आणि त्यानन्तर तो पुन्हा तीव्र मन्दीही दाखवणारच आहे. मात्र तो जेव्हा असा तळाला जाईल तेव्हा त्या स्वस्ताईचा फायदा घेण्यासाठी माझ्याकडे पैसा तयार असायला हवा. नाहीतर व्हायचे असे कि देशाच्या प्रगतीच्या मोहक चित्राने आणि 'मदर ऑफ ऑल बुल रन्स' वगैरे कल्पनामध्ये रमून बाजारात आपलीअधिकान्श रक्कम गुन्तवलेली असतानाच एक दिवस अचानक कडेलोटाचा उगवेल.
जर २००८ प्रमाणे तीव्र घसरण झाली तर पैसा बाहेर काढायचीही सन्धी मिळणार नाही. असे यापूर्वीही झालेले आहे आणि यापूढेही होणारच आहे.
तेव्हा पूढील नजिकच्या काळात येवू शकणा-या तीव्र मन्दीत स्वस्तात मिळणारया उत्तम कन्पन्याचे शेअर्स घेण्याची व भरघोस फायदा मिळवण्याची मोठी सन्धी साधायची कि उरल्या सुरल्या तेजीच्या आशेने आणखी थोड्याशा फायद्यासाठी वाट पहात रहायचे हे ठरवावेच लागेल.
माझ्या मते तरी आता लहान सहान प्राण्यान्ची शिकार करण्यात आपल्या बन्दूकीच्या गोळ्या दवडण्यापेक्षा जेव्हा कधी पुढ्यात मोठा ढाण्या वाघ येइल तेव्हा माझ्याकडील बन्दूक भरलेली असणे जास्त महत्वाचे!.
तात्पर्य हे कि आपलयाकडील बहुतान्श शअर्सची  विक्री करुन व थोड्या प्रमाणात शेअर्समधे गुन्तवणूक ठेवून योग्य सन्धीची वाट बघावी. शेअर्स विक्रीतून आलेली  रक्कम अन्य सुरक्षीत योजनेत गुन्तवून आपली बन्दूक भरलेली ठेवा.
सन्धी कुठल्याही रुपात येइल- कधी नॉर्थ कोरियाच्या तर कधी देशी बॅन्कान्च्या बुडीत कर्ज प्रकरणाच्या !
 खरे ना ?

Read more »

३१ ऑक्टो, २०१७

बाजार अत्युच्च शिखरावर - आता काय करावे ?


२०१४ मध्ये नवे सरकार आल्यापासून आपल्या शेअरबाजाराने सतत वाढ दाखवलेली आहे. २०१४ मध्ये २० हजाराच्या आसपास असलेला सेन्सेक्स आज चक्क ३३ हजाराच्या पूढे गेलेला दिसत आहे. ही वाढ गुंतवणूकदाराना नक्कीच सुखावणारी असली तरी निफ्टी पी/ई रेशो २७ जवळ जाऊन पोचल्यावर आता वारंवार शंका येते कि आणखी किती काळ असेच मार्केट वाढत जाईल ? या शिखरावरुन अकस्मात कडेलोट तर होणार नाही ना ? कि मोदी सरकरची ही टर्म संपेपर्यंत म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत मार्केट असेच वाढत जाईल ? २००८ सालच्या मार्केट क्रॅशच्या आधी निफ्टी पी/ई सुमारे २८ झाला होता. मग आताही तसेच होइल का ? आणि तसे असेल तर आपण नेमके काय करायला हवे ?    
वरील प्रश्नांची नेमकी उत्तरे कुणाला देता येत नसली तरी आपण अगदीच असहाय नाही आहोत. कारण इतिहासात अशी परिस्थिती आधीही येवून गेलेली आहे आणि निफ्टी पी/ई रेशो व्यतिरिक्त बाजार नक्की किती महाग वा धोकेदायक झालाय हे मोजण्याचे आणखीही दोन निकष प्रचलित आहेत.
प्रथम जरा इतिहासात डोकावूया. नजिकच्या काळात २००२ मध्ये व २००८ मध्ये जागतिक बाजारात प्रचंड मंदी आल्याची नोंद आहे. २००२ मधील मंदीला टेक्नॉलॉजी वा डॉटकॉम बबल असा तर २००८ च्या मंदीस सबप्राईम लोन बबल असा संदर्भ आहे.( सध्या भारतातही बॅन्कांच्या “एनपीए” चे प्रकरण मला अमेरिकेतील सबप्राईम बबलची आठवण करुन देते. असो.)
   
उपलब्ध नोंदीनुसार दोनही वेळी निफ्टी पी/ई हा २८ पर्यंत गेलेला दिसतो. या एकाच निकषाचा विचार केला तर याक्षणी आपलेकडील सर्व शेअर्स विकून टाकावे असा अर्थ निघेल.. पण थांबा !. निफ्टी पी/ई रेशो हा प्रमुख निकष असला तरी अधिक अचूक अंदाज येण्यासाठी निफ्टी पी/बी रेशो (प्राईस/बूक वॅल्यु) आणि निफ्टी डिव्हीडंड यिल्ड असे आणखी दोन निकषही वापरले जातात.

बूक वॅल्यु म्हणजे काय हे आपल्यापैकी अनेकाना नक्कीच माहिती असेल. थोडक्यात सांगायचे तर एखाद्या कंपनीची सर्व मालमत्ता विकायला काढली तर किती मूल्य होइल ती त्या कंपनीची बूक व्हॅल्यु. अशा बूक व्हॅल्युला त्या कंपनीच्या एकूण शेअर्सच्या संख्येने भागले तर मिळेल ती “बूक वॅल्यु पर शेअर. कंपनीच्या एका शेअरच्या आजच्या किमतीचा, या ‘बूक व्हॅल्यु पर शेअर’शी असलेला रेशो म्हणजे प्राईस पर बूक (पी/बी) रेशो. तर निफ्टीच्या सर्व कंपन्याचा मिळून असा पी/बी रेशो काढला जातो आणि याद्वारे निफ्टी इन्डेक्स हा, निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० कंपन्यांच्या एकुण मालमत्तेच्या किती प्रमाणात वाढला आहे हे समजते. 
संदर्भासाठी कृपया खालील दोन चार्ट पहा. 

२००२ सालच्या मंदीच्या आधी म्हणजे २००० सालाच्या सुरुवातीला जेव्हा पी/ई रेशो हा २८ वर पोचला होता त्यावेळी पी/बी रेशो ५ च्याही पूढे गेला होता. हे बाजार अती महागल्याचे लक्षण होते. आजच्या घडीला निफ्टीचा पी/बी रेशो हा ३.५० एवढा आहे. २००७ सालच्या अखेरीसही चित्र असेच दिसते. तेव्हा पी/ई रेशो हा २८ वर गेला होता तेव्हा पी/बी रेशोही ६ वर पोचल्याचे दिसते. तेव्हा २००० आणि २००७ सालच्या तुलनेत सध्या अजूनही (पी/ई रेशो २७ जवळ पोचला असला तरी) पी/बी रेशो मात्र फार वाढलेला नाही व निदान त्याआधारे निफ्टीमधील तेजी अजूनही बाकि आहे व बाजाराचे शिखर अजूनही यायचे आहे असे मानायला जागा आहे.

या तेजीनंतर आलेल्या २००२ आणि २००९ च्या ऐन मंदीत मात्र हा पी/बी रेशो २ पर्यंत आणि पी/ई रेशो १५ च्या खाली घसरलेला दिसतो. याचाच अर्थ तेव्हा बाजारात स्वस्ताई आली होती आणि ती शेअर्स खरेदीची उत्तम वेळ होती असे म्हणता येइल.

 तिसरा निकष म्हणजे निफ्टी डिव्हीडंड यिल्ड. निफ्टी डिव्हीडंड यिल्ड हा साधारणपणे १ व २ या मर्यादेत रहातो. बाजारातील ऐन तेजीत तो १ वा त्यापेक्षा कमी होवू शकतो तर तीव्र मंदीमध्ये तो २ पेक्षा जास्त झालेला दिसतो. आजच्या घडीला निफ्टी डिव्हीडंड यिल्ड हा १.१ इतका आहे. म्हणजे बाजार हा शिखराच्या जवळ आहे आणि ही विक्री करुन फायदा खिशात घालण्याची वेळ आहे असा अर्थ होतो. तसेच २००९ च्या मार्च महिन्यात ऐन मंदीच्या काळात निफ्टी डिव्हीडंड यिल्ड २.१८ इतका झालेला दिसतो. तेव्हा शेअर्स खरेदी करण्याची ती सर्वोत्तम वेळ होती असे म्हणता येइल.
वरील विवेचनावरुन हे लक्षात येते कि बाजार महाग आहे कि स्वस्त हे ठरवणे तितकेसे कठीणही नाही आणि वरील तीनही रेशोचे अद्ययावत रेकॉर्ड हे एनएससी च्या वेबसाईट वर या ठिकाणी उपलब्ध आहे.

तेव्हा आपल्याकडील सगळेच शेअर्स विकुन टाकण्याची वेळ अजून आलेली नाही मात्र बाजार इतका वाढल्यावर एखाद दुसरी “डीप”येण्याची शक्यता नेहमीच असते. त्यातच नॉर्थ कोरिया प्रकरण व तशा प्रकारची एखादी घटना अचानक झाली तर आपण तयार रहाण्याची ही वेळ आहे हे मात्र नक्की. किंवा आपल्याकडील अर्धे-अधिक शेअर्स विकुन मार्केट पडण्याची वाट बघत बसणे ही “दोन दगडीवर पाय” ठेवण्याची अस्सल म-हाटी कल्पनाही मुळीच चुकीची नाही बरं का ! शेवटी मार्केट पडलेच तर वरील निकषांवर लक्ष ठेवून ऐन स्वस्ताईत उत्तम शेअर्सची खरेदी आपणच करणार आहोत हे नक्की !
    

    

Read more »

२४ ऑक्टो, २०१७

बाहुबली शेअरबाजार - एक आढावा


मित्रहो,
खुप म्हणजे खुपच दिवस झाले येथे शेवटची पोस्ट लिहील्याला!
 विविध कारणामुळे लिखाणात खंड पडला होता पण आज तब्बल दोन वर्षानंतर ्लिहायला मुहुर्त मिळाला आहे. माझ्या सर्व वाचकमित्राना पुन्हा भेटताना मला वेगळाच आनंद मिळत आहे.
मी पुन्हा लिखाण सुरु करण्याची दोन कारणे अशी-
गेल्या पाच वर्षात देशात व जगात फार मोठ्या उलाढाली झाल्या आहेत. जुनी राजकिय व आर्थिक समीकरणे पार बदलून गेली आहेत. अशा सर्व ब-या वाईट बदलामधुन शेअरबाजार तावून सुलाखुन निघालेला दिसतो आहे एवढेच नव्हे तर 'ऑल टाईम हाय' ला पोचला आहे.
दुसरे कारण म्हणजे सुमारे पाच वर्षापूर्वी २०१२ मध्ये 'उत्तम दर्जाचे शेअर्स निवडण्याविषयी मी येथे एक लेख लिहीला होता. त्या लेखाला अनुसरुन तेथे उल्लेख केलेल्या शेअर्सची आजची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेणे मनोरंजक ठरेल.
या व्यतिरिक्त माझ्या ज्या जवळच्या मित्रानी मला लिखाण पुन्हा सुरु करण्यासाठी प्रेरणा दिली, आग्रह केला त्यांचे आभार मानुन लेखाच्या विषयाकडे वळतो.
२०१२ साली लिहिलेल्या त्या लेखाचे पुन्हा एकदा वाचन केले तर आजच्या लेखाशी पटकन जुळवून घेता येइल.  त्यावेळी उल्लेख केलेल्या कंपन्यांच्या तेव्हाच्या व आताच्या किमती बघुया.

१) आयटीसी - एप्रिल २०१२ मध्ये २३६ रु व आजची किंमत २६७ रु. यात २०१६ मध्ये मिळालेले बोनस शेअर्स लक्षात घेता ही किंमत सुमारे चारशे रु. होते. म्हणजे पाच वर्षात दुप्पट वाढ. या व्यतिरिक्त दरवर्षी डिव्हीडंडही मिळालेला आहे. जीएसटी व तम्बाखु उत्पादनांविषयीच्या सरकारच्या बदलत्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी वाईट नाही.

२) हिन्दुस्तान युनिलीवर- एप्रिल २०१२ मधील किंमत सुमारे ४०० रु. तर आजची किंमत तब्बल १२७० रु. -तिपटीपेक्षा अधिक वाढ. शिवाय दरवर्षी दोनदा डिव्हीडंड ! पतन्जली च्या लाटेनंतरही उत्तम कामगिरी !

३) टायटन - त्यावेळची किंमत २३८ रु. तर आजची ६०५ रु. म्हणजे सुमारे अडीच पट अधिक दरवर्षीचा डिव्हीडंड.

४) नेस्ले इन्डीया - एप्रिल २०१२ मधील किंमत ४९०० रु तर आजची किंमत ७२०० रु म्हणजे सुमारे अडीचपट अधिक दरवर्षी दोनदा डिव्हीडंड. मॅगी उत्पादनावरील वाईट शेरा व बदनामीनंतरही ही कामगिरी उत्तमच .

५) कोलगेट - तेव्हाची किंमत सुमारे ११०० रु तर आताची किंमत १०६० रु. यात २०१५ मधील बोनस लक्षात घेता आताची किंमत सुमारे १६०० रु होते. पाच वर्षात सुमारे दीडपट तसेच दरवर्षी दोनदा डिव्हीडंड. कोलगेटलाही पतन्जलीची स्पर्धा जाणवते आहेच.!

६)   एलआयसी हाऊसिंग फायनान्स- तेव्हाची किंमत २६५ रु तर आताची ६३५ रु. म्हणजे सुमारे अडीचपट वाढ अधिक दरवर्षी डिव्हीडंड.

७) बॅन्क ऑफ बरोडा- त्यावेळची किंमत ७८७ रु. तर आजची १४३ रु.म्हणजे २०१५ मधील स्प्लिट लक्षात घेता खरी किंमत सुमारे ७०० रु. अधिक डिव्हीडंड मात्र पाच वर्षात वाढ नाही.  निराशाजनक.

एकुण निश्कर्ष असा कि वरील प्रातिनिधीक अशा सात पैकी  सहा कंपन्यानी उत्तम कामगिरी केलेली आहे.निफ्टी इन्डेक्स ही याच कालावधीत दुप्पट झालेला आहे.
तेव्हा हे स्पष्टच आहे कि आपला शेअरबाजार गेल्या पाच वर्षातील भारतीय सत्तापालट, जीएसटी, नोटाबंदी. दुष्काळ,अतीवृष्टी तसेच जागतिक घडामोडी उदा. युद्धे, दहशतवाद, क्रुड तेलाच्या कोसळत्या किंमतीमुळे तयार झालेली नवी राजकिय समीकरणे, अमेरिकेतील सत्तापालट व अलिकडील नॉर्थ कोरिया प्रकरण या सर्वाना पुरुन उरलेला आहे ! जणू बाहुबली ठरलेला आहे !
गेल्या पाच वर्षात ज्या वाचकाना यामुळे फायदा झाला आहे त्यांचे या ब्लॉगतर्फे अभिनंदन !
तसेच शेअरबाजार अत्युच्च पातळीवर असताना यापूढे काय शक्यता असतील व आपण काय करायला हवे त्याची चर्चा पूढील पोस्ट मध्ये!
 


.


Read more »

२२ फेब्रु, २०१५

बजेटच्या निमित्ताने .......

  बरेच दिवसात येथे काही लिहीलेले नाही मात्र २८ ता. ला सादर होणारे बजेट ही लिखाणाची चांगली संधी चालून आलेली आहे. केन्द्रात नवीन सरकार आल्यापासून व खरेतर त्या आधीपासूनच बाजाराने मोठी घोडदौड केली आहे. त्यामध्ये खनिज तेलाच्या घसरलेल्या किंमती पासून ते सरकार कडून उद्योगक्षेत्राला असलेल्या अपेक्षा आणि पंतप्रधान मोदींनी परराष्ट्रातून होणा-या गुंतवणूकीसंबंधात केलेल्या वेगवान हालचालींचा वाटा होता. मात्र  दिल्ली निवडणूक निकाल आणि एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांच्या प्रतिकूल प्रतिक्रियेनंतर एकीकडे सरकारवरील दडपण वाढलेले आहे, आणि बाजाराला अनुकुल असे बजेट देण्याची जबाबदारीही वाढलेली आहे. त्यामुळे थोडीशी अनिश्चिततेची परिस्थिती असुन बाजारानेही उलटसुलट दिशा दाखविण्यास सुरुवात केलेली आहे. कदाचित बजेटच्या प्रतीक्षेमुळेच बाजाराची गती रोखली गेली असून, बजेटनंतरच बाजार आपली पुढील चाल स्पष्ट करेल असे दिसते आहे.

        अशा परिस्थितीत सामान्य ट्रेडरला एकीकडे बजेटनंतरच्या संभाव्य तेजीचा मोह पडतो तर दुसरीकडे जर बजेट बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नसले तर होणा-या पडझडीच्या शंकेने तो आपला आत्मविश्वास गमावून बसतो. काहीजण तर सरळ बजेटच्या आठवड्यात बाजारापासून दूर रहाणे पसंत करतात. त्यांचे अगदीच चुकते असे मी म्हणणार नाही, कारण बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांच्या वाक्यावाक्यासरशी बाजारात तेजीमंदीच्या लाटा येत असतात. त्यात ट्रेडींग करणे नक्कीच धोक्याचे असते.
याउलट स्थिती म्हणजे, बजेट सादर झाल्यावर बाजार कोणत्यातरी एका दिशेला मोठी हालचाल दाखवेल अशी शक्यता असते व या मोठ्या हालचालीचा फायदा उठविण्यासाठी ऑप्शन बायर्स उत्सुक असतात. खरे सांगायचे तर बजेटच्या आधी, मोठ्या प्रमाणावर कॉल आणि पुट अशा दोन्हीमध्ये झालेल्या खरेदीमुळे  प्रिमिअम ब-यापैकी वाढल्याने अशी खरेदी महागडी ठरते. उदा. निफ्टी ९००० असताना बजेट सादर होणार असेल तर लॉन्ग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजीला अनुसरून ९००० चे कॉल व पुट अशा दोन्ही ऑप्शनमध्ये , किंवा यापेक्षा थोडा स्वस्त पर्याय हवा असेल तर ९१०० चे कॉल ऑप्शन्स आणि ८९०० च्या पुट ऑप्शन्समध्ये  बजेटनंतर मिळणा-या फायद्याच्या आशेने खरेदी होतच असते. मात्र अशा वाढलेल्या प्रिमिअम मुळे महाग झालेल्या दोनही ऑप्शन्सच्या किंमती या,  वोलॅटिलिटी जशी कमी होत जाते तशा वेगाने रोडावत जातात. तेव्हा बजेट नंतर थोड्या कालावधीतच बाजाराने कुठलीतरी एक दिशा राखून मोठी झेप घेतली तरच फायदा होतो. अन्यथा महिना अखेरीची वाट बघत न बसता, वेळीच उरलासुरला प्रिमिअम विकण्यावर समाधान मानावे लागते. या सा-या जर-तर च्या गोष्टी आहेत आणि शेवटी फायदा मिळणे हे ज्याच्या त्याच्या अंदाजावर आणि नशीबावर ठरते असेच मला वाटते.
तेव्हा असे ऑप्शन खरेदी करणे अगदीच चुकीचे नसले तरी प्रत्येकाने ऑप्शन बायर्स सारखाच विचार करण्याची काही आवश्यकता नाही.
तेव्हा मार्केट कुठे जाईल याचा अंदाज बांधत न बसता आपण थोडा वेगळा विचार करूया.  
खरे तर बजेट सादर झाल्यानंतरही ते नेमके कसे आहे यावर कुणातच एकमत नसते. शेवटी बाजारच ते ठरवेल असे म्हणावे, तर बजेटनंतरही आठवडाभर बाजारात प्रचंड वोलॅटिलिटी असल्याचा पुर्वानुभव आहे.
अशा परिस्थितीत निश्चित असे काही असलेच तर ती असते बाजारात येणारी वॉलॅटिलिटी ! कदाचित उद्याच्या सोमवारीच बाजाराच्या वेगवान हालचालींना प्रारंभ होईल. बजेटच्या दिवशी तर वॉलॅटिलिटी कळसाला पोचेल व नंतर कमी होत जाईल. या वाढलेल्या वोलॅटिलिटीचा काही फायदा उठवता येइल का ?
अर्थातच येइल. थोडेसे निरीक्षण आणि योग्य स्टॉपलॉस लावण्याची सावधगिरी बाळगली तर हे शक्य आहे. बजेटच्या दिवशी मार्च महिन्याच्या कॉल आणि पुट ऑप्शन्सच्या अवास्तव वाढलेल्या प्रिमिअमचा फायदा घ्यायला हरकत नाही. उदा. बजेटच्या दिवशी वा त्यानंतरच्या सोमवारी निफ्टी ९००० असेल, तर वाढलेल्या वोलॅटिलिटी मुळे ९५०० किंवा ९६०० चे कॉल्स तसेच ८५०० किंवा ८४०० चे पुट असे दूरचे ओटीएम ऑप्शन्ससुद्धा ब-यापैकी महाग झालेले असतील. असे महाग झालेले ऑप्शन्स विकून त्याचा प्रिमिअम खिशात टाकता येईल. ( कृपया लक्षांत घ्या कि ही माझी शिफारस नसून आपल्या विचारांना चालना देण्यासाठी दिलेले फक्त एक उदाहरण आहे. प्रत्यक्षात त्यावेळच्या परिस्थिती प्रमाणे स्ट्राईक प्राईजेस ची निवड करावी लागेल.)
बजेट नंतरच्या आठवडाभरातच या ऑप्शन्स च्या किंमती उतरत जाण्याची शक्यता आहे. अगदी दूरच्या शक्यतेत समजा निफ्टी एकाच दिशेने सतत जात राहिला तर त्या परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून स्टॉपलॉस लावावा लागेल. असा स्टॉपलॉस हा नेमका कधी लावायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे, मात्र प्रत्यक्ष ट्रेड करण्याच्या आधीच ते ठरवून ठेवावे.
या व्यतिरिक्त निफ्टी फ्युचर्स मध्ये ज्यांच्या पोझिशन्स असतील त्यांनी मात्र त्यांच्या पोझिशन्सना अनुकुल अशी स्ट्रॅटेजी निवडावी लागेल. काही जणांच्या मते बजेट नंतर मार्केट मध्ये एक डीप येईल व त्यावेळी खरेदी करण्याची योग्य संधी असेल. तर काही जणांच्या मते मार्केट तशी खरेदीची संधी न देता बजेटनंतर वेगाने वाढत जाईल. दोनही मतांमध्ये तथ्य असले तरी एका गोष्टीवर मात्र बहुतांशी एकमत असलेले आढळते ते म्हणजे बाजाराची दिशा ही मध्यम कालावधीसाठी वरचीच राहील. तेव्हा बजेटचा विचार बाजूला ठेवला तरी आपल्याजवळ आधीपासून असलेले उत्तम शेअर्स मात्र विकण्याची घाई करू नका. आणि मार्केट वाढलेच तर एक डोळा सतत निफ्टी पी/ई रेशोवर ठेवून द्या !
सर्व वाचकांना बजेट निमित्ताने मनापासून शुभेच्छा !
HAPPY TRADING !!


Read more »

१४ मे, २०१४

खरोखरच 'अच्छे दिन' येणार का...?

मित्रहो,
बर-याच दिवसात ब्लॉग अपडेट केला नाही. मात्र निवडणूक निकालापूर्वीच्या आठवड्यात बाजाराने  विलक्षण उसळी मारलेली आहे. निफ्टीने ७००० च्याही पुढे धडक मारली आहे आणि १६ मे च्या निकालानंतर काय होणार याची उत्सुकता प्रत्येक गुंतवणूकदार/ ट्रेडरला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर थोडे लिहावेसे वाटतेय.
सुमारे दोन वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल २०१२ मध्ये या ब्लॉगवर मी गुंतवणूकीसाठी "बचावात्मक परंतु उत्तम दर्जाच्या शेअर्स " विषयी लेख लिहीला होता .(तो लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा )
 त्यात मी उल्लेख केलेल्या  शेअर्सनी तेव्हापासून ते आजपर्यंत विशेषतः बाजार नवीन उच्चांकावर असताना कशी कामगिरी केली आहे ते बघुया.
१) आयटीसी - दोन वर्षापूर्वी २३६ रु.ला मिळणारा आणि एफएमसीजी सेक्टरमधील एक बचावात्मक समजला जाणारा  हा शेअर आज ३६५ रु. झाला आहे. म्हणजेच दोन वर्षांतच सुमारे दीडपट वाढ आणि दोन डिव्हीडंड !
२) हिंदुस्तान लीवर - आयटीसीच्याच सेक्टर मधील हा शेअर दोन वर्षापूर्वी ४०६ रु.ला ला मिळत होता आणि आजची किंमत आहे ५७७ रु. म्हणजेच येथेही जवळजवळ दीडपट वाढ आणि चार वेळा डिव्हीडंड !
३) टायटन कं. -  तेव्हाची किंमत २३८ रु. आणि सध्याचा भाव २९८ रु.  म्हणजे दोन वर्षात सव्वापट आणि दोन डिव्हीडंड !
४) नेस्टले इंडीया- तेव्हाची किंमत ४९२० रु.  आणि आजची किंमत ४७३८ रु. म्हणजे येथे मात्र बिल्कूल वाढ दिसत नाही मात्र या दोन वर्षात कंपनीने सहावेळा डिव्हीडंड दिला आहे.
५) कोलगेट - दोन वर्षापूर्वी ११०० रु.ला मिळत असलेला हा शेअर सध्या १४२० रु.चा भाव दाखवतोय. म्हणजे सुमारे सव्वापट वाढ आणि दोन वर्षांत तब्बल सहावेळा डिव्हीडंड !
६) एलआयसी हाऊसींग फायनान्स - तेव्हाची किंमत २६५ रु. व सध्याचा भाव २९५ रु. म्हणजे ११ टक्के वाढ आणि दोनवेळा डिव्हीडंड.
७) बॅंक ऑफ बरोडा - तेव्हाचा भाव ७८७ रु. आणि सध्याचा भाव ९०० रु. म्हणजे १४ टक्के वाढ आणि तीन वेळा डिव्हीडंड
वरील आकडेवारी वरून असे दिसते कि नेस्टले इंडीया चा अपवाद वगळता इतर सहा कंपन्यांनी दोन वर्षांच्या काळात किमान ११ टक्के ते कमाल सुमारे ५० टक्के वाढ दाखवली आहे. येथे पुन्हा हे लक्षांत घ्या कि या सर्व कंपन्या वाईट काळातील स्वीकारलेल्या बचावात्मक धोरणाचा भाग म्हणून निवडलेल्या सुरक्षीत कंपन्या होत्या. त्या दृष्टीने ही वाढ उत्तमच म्हणावी लागेल. तेव्हा जर खरोखरच "अच्छे दिन " आले तर पुढील तीन वर्षांत या कंपन्यांमध्ये अधिक वाढीला नक्कीच वाव आहे,तेव्हा या कंपन्या यापूढेही होल्ड करायला हरकत नाही.
असो. आता निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीचा अंदाज घेवूया. गेल्या आठवड्यातील वाढ ही विलक्षण म्हणावी लागेल. निफ्टी व सेन्सेक्सने पूर्वीची सर्व रेकॉर्ड्स तोडली आहेत. मात्र खरा प्रश्न आहे तो निवडणूक निकालानंतरही बाजार असाच मजबूत राहील कि अपेक्षाभंग होवून कोसळेल हा !
मजबूत सरकार आले तर बाजार सध्याच्या पातळीच्या खाली जाण्याची शक्यता कमी आहे, मात्र मजबूत सरकार आल्यास तो सतत वाढत राहील असे काही नाही. सध्या बाजार अशा पातळीवर आहे कि पूर्वी कधीही नव्हता, त्यामुळे टेक्निकल लेव्हल्सना येथे फार महत्व उरत नाही कारण निफ्टी ६८०० च्या वरील प्रदेशात नुकताच पोचलाय आणि या संपूर्णपणे नव्या प्रदेशात टेक्निकल लेव्हल्स तयार व्हायला काही काळ जावा लागेल असे मला वाटते.
फक्त एनडीएचे सरकार येणार अशा हवेमुळे रुपया वधारला आहे आणि जेवढा बाजार वाढायचा तेवढा वाढून झाला आहे. आता १६ ता.च्या प्रत्यक्ष निकालासाठी तो येथे रेंगाळणार आहे. जर निकाल अपेक्षेप्रमाणे लागले व निर्णायक बहूमतासह सरकार स्थापन झाले तर तात्कालिक अशी उसळी मिळू शकेल मात्र जोपर्यंत नवे मंत्रीमडळ कारभार संभाळून प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय वा तशा घोषणा करत नाही तोपर्यंत फार अधिक वाढीची अपेक्षा करता येणार नाही.
समजा कोणालाच पूर्ण बहूमत मिळाले नाही तर बाजार कोसळेल हे नक्की. अशा परिस्थितीत निफ्टी त्वरीत ६८०० ची पातळी गाठेल आणि काही काळात  ६३०० पर्यंत घसरू शकेल.
मात्र असे झाले तरी आपल्याकडील वरील डीफेन्सीव्ह शेअर्स असलेले विकण्याची गरज नाही. रुपयाची पुन्हा घसरण झाली तरी अशा वाईट काळासाठी आयटी, फार्मा इ. शेअर्समध्येही धोका कमी असतो.
बाजाराने एका नव्या 'बुलरन' ला सुरुवात केली आहे असे मत प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी मांडले आहे. सध्या निफ्टी चा पी/ई (प्राईस/अर्निंग) रेशो अजूनही १९ च्या आसपास आहे आणि त्या अनुषंगाने निफ्टीमध्ये अजूनही वाढीला वाव आहे. जोपर्यंत निफ्टी पी/ई हा २३ ते २५ पर्यंत वाढत नाही तोपर्यंत सर्व शेअर्स विकून टाकण्याची वेळ नक्कीच आलेली नाही. अशा परिस्थितीत काही कारणाने बाजारात मोठी घसरण झाली तरी उत्तम शेअर्स घेण्याची ती एक संधी असेल असेच मला वाटते.
सध्या तरी आपण -'अच्छे दिन आनेवाले हैं'  असेच मानून चालूया ! सर्वांना शुभेच्छा !!


Read more »

१८ सप्टें, २०१३

रुपया घसरतोय ? मग डॉलरमध्ये गुंतवणूक कशी कराल ?



अलिकडच्या काळात रुपयामध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे भारतीयांच्या राहणीमानावर मोठा परिणाम होत आहे यात शंका नाही. 

महागाईमुळे सामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या घर, विवाह, उच्च-शिक्षण यांसह सर्वच छोट्या मोठ्या गरजा पुरवणे अधिक कठीण होत आहे. साहजिकच यापूर्वी दर महिन्याला शिल्लक पडणारी जी रक्कम बचत वा गुंतवणूक योजनांमध्ये जात होती ती कमी करावी लागत आहे. नेहमीच्या बचत योजना या महागाईवर मात करू शकत नाहीत हे ही उघड सत्य आहे. नोकरदार लोक ज्या उद्योगधंद्यांमध्ये काम करतात त्या उद्योगांनाही महागाईमुळे फायदा मिळवणे कठीण झाल्याने, नजिकच्या भविष्यात पगारवाढ, बोनस इ. मिळणेही कठीण होणार आहे. एकूणच या कठीण काळात महागाईवर मात करण्यासाठी खर्च कमी करण्याबरोबरच उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधणे गरजेचे बनले आहे.

सुरक्षित गुंतवणूकीचे पर्याय –

आतापर्यंत अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरक्षित मानल्या गेलेल्या सोने आणि जमीन यामध्ये लोक गुंतवणूक करत होते. मात्र गगनाला भिडलेल्या जमीनीच्या भावांमुळे हल्ली जमीन वा स्थावर मालमत्ता खरेदी करणे अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शिवाय त्यात लिक्विडीटी कमी असते. सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय म्हणजे डॉलरमधील भावाच्या उच्च पातळीवरून काहीसा खाली आला असला, तरी रुपयाच्या घसरलेल्या किंमतीमुळे भारतीयांसाठी मात्र सोने त्या प्रमाणात स्वस्त झालेले नाही. त्यातच सरकार भारतीयांच्या सोने खरेदीवर व आयातीवर या ना त्या प्रकारे मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत असल्याने सामान्य गुंतवणूकदार संभ्रमात पडला आहे.

उच्च व्याजदर आणि त्यामुळे अडचणीत असलेले उद्योगधंदे आणि रुपयामधील उलथापालथीने शेअरबाजारात प्रचंड ‘व्होलॅटिलिटी’ आली आहे. त्यातच कमॉडिटी बाजारातील अलिकडेच उघडकीस आलेल्या घोटाळ्यामुळे एकूणच वातावरण गढूळ बनले असून, अनुभवी व कसलेले गुंतवणूकदारही आत्मविश्वास गमावत आहेत. २०१४ मध्ये होणा-या निवडणूकांपर्यंत असेच अनिश्चित वातावरण कायम रहाण्याची शक्यता आहे.

शेअरबाजारात अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या गुंतवणूकीबद्दल बोलायचे तर एस.आय.पी. योजना या दीर्घावधीसाठी फायदेशीर ठरत असल्या, तरी त्याही शेवटी शेअरबाजारावर अवलंबून असल्याने जेव्हा देशाच्या एकूण आर्थिक परिस्थितीबद्दलच शंका उत्पन्न होते, तेव्हा त्याबद्दलही आशा बाळगणे कठीण होत जाते.

ज्या थोड्या भारतीयांना परदेशातील नोकरी वा धंदे याद्वारे डॉलर वा तत्सम मजबूत विदेशी चलनांमध्ये उत्पन्न मिळते त्यांचे रुपयामधे रेमीट होणारे उत्पन्न हे रुपयाच्या घसरणीमुळे वाढल्यासारखे दिसत असले तरी तेही फसवे असून, भारतातील वाढलेल्या महागाईमुळे हे वाढीव उत्पन्न खर्च होवून जाणार असते.

निर्यातप्रधान कंपन्यांचे शेअर्स –

अशा परिस्थितीत नेहमी सुचविला जाणारा एक पर्याय म्हणजे, ज्या कंपन्यांचे उत्पन्न हे डॉलरमध्ये येते अशा, म्हणजेच आपल्या उत्पादने वा सेवांची निर्यात करणा-या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा होय. अलिकडच्या काळात आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये, रुपयाच्या तुलनेत महाग झालेल्या डॉलरमुळे वाढ झालेली दिसून येत आहे. उदा. जुलै च्या पहिल्या आठवड्यात १५०० रु.च्या आसपास उपलब्ध असणारा टाटा कन्सल्टन्सी या कंपनीचा शेअर ऑगस्ट अखेरीस म्हणजे फक्त दोन महिन्यात २००० रु. वर पोचला होता. इन्फोसीस, विप्रो, टेक महिंद्रा अशा इतर आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही अशीच तेजी दाखवित आहेत. जेव्हा जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा असेच चित्र दिसत असते. त्यामुळे एक प्रकारे रुपयाच्या घसरणीवर मात करण्यासाठी अशा कंपन्यांचे शेअर्स आपल्या पदरी असणे गरजेचे आहे.

आय.टी. क्षेत्राप्रमाणेच औषधी क्षेत्रांतील म्हणजेच फार्मा. कंपन्यांमध्येही अशी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र औषधांच्या मार्केटींगमधील विविध देशांची धोरणे आणि त्यांचे परवाने यांचा या कंपन्यांच्या शेअर्सवर उलटसुलट परिणाम होत असतो. ऊदा. रॅनबॅक्सी लॅबच्या मोहाली येथून होणा-या उत्पादनावर यु.एस.एफ.डी.ए. ने बंदी घातल्याने अलिकडेच त्या शेअरमध्ये तीव्र घसरण झाली. तेव्हा साधारणपणे काहीशा अनिश्चित हालचाली करणा-या फार्मा. शेअर्सच्या तुलनेत आयटी कंपन्यांच्या शेअर्सना मी अधिक पसंती देईन.
डॉलरमध्ये थेट गुंतवणूक-

वधारणा-या डॉलरचा फायदा उठवून भारतातील महागाईवर काही अंशी मात करण्यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये थेट गुंतवणूक करणे सामान्य भारतीयांना शक्य नसले, तरी एक पर्याय भारतातील गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे, तो म्हणजे भारतीय स्टॉक एक्सचेंजेस वर ‘एन100’ नावाने उपलब्ध असणारा ‘ईटीएफ’ होय.

हा ‘एन100’ म्हणजे अमेरिकेच्या सुप्रसिद्ध ‘नॅस्डॅक-100’ या निर्देशांकावर आधारीत असलेला ईटीएफ असून, सर्वसाधारणपणे अमेरिकन शेअरबाजार आणि त्या देशाचे चलन हे समांतर वाढ दाखविण्याची शक्यता असल्याने नॅस्डॅक-100 हा डॉलरप्रमाणेच वधारत असतो. या अमेरिकन इंडेक्समध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर, टेलीकम्युनिकेशन्स, रिटेल ट्रेड आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील मोठ्या आकाराच्या अमेरिकन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या कंपन्यांचा समावेश आहे. या इंडेक्समध्ये प्रामुख्याने ऍपल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, गूगल, इन्टेल, अमेझॉन, ईबे, बायडू. स्टारबक, डेल यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्या असून फायनान्स वा इन्वेस्टमेन्ट क्षेत्रातील कंपन्या मात्र यात नाहीत.

अशा प्रकारे अमेरिकन शेअरबाजारावर आधारीत अशा भारतातील पहिल्या ईटीएफ ची स्थापना मोतीलाल ओसवाल या भारतीय ब्रोकरेज कंपनीतर्फे २०११ मध्ये केली गेली, आणि सामान्य भारतीयांसाठी अप्रत्यक्षपणे का होईना, पण अमेरिकन शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला झाला. या एन100 मध्ये गुंतवणूक करणे, म्हणजे एकप्रकारे संपूर्ण जगातील सुप्रसिद्ध आणि निवडक कंपन्यांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करण्यासारखेच आहे. या कंपन्या विविध क्षेत्रांत काम करत असल्याने आपली गुंतवणूक ‘वेल डायव्हर्सिफाईड’ व म्हणून  स्थिरतेच्या दृष्टीने विश्वासार्ह आहेच, पण वरील कंपन्यांपैकी अनेक कंपन्या या भविष्यातही उत्तम कामगिरी करण्याची शक्यता असल्याने आपली गुंतवणूक चांगली वाढही दाखवू शकते. बीएसई व एनएसई या दोन्ही भारतीय एक्सचेन्जेसवर याचे व्यवहार करता येतात व याचा सिम्बॉल वा टिकर नंबर ‘N100’ असा आहे. कुठल्याही सर्वसाधारण शेअरप्रमाणेच याच्या अगदी एका यूनीटचीही खरेदी अथवा विक्री करता येते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना यात सहज व्यवहार करता येतात.

आता या एन100 ची प्रत्यक्ष बाजारातील भारतीय इंडेक्सच्या तुलनेतील कामगिरी कशी आहे ते पाहूया. एन100 भारतीय बाजारात एप्रिल २०११ मध्ये लिस्ट झाला तेव्हा त्याची किंमत सुमारे १०३ रु. होती. आज सप्टेंबर ’१३ मध्ये म्हणजे सुमारे अडीच वर्षानंतर तो २०० रु.च्या आसपास ट्रेड करत आहे. म्हणजेच अडीच वर्षांतच दुप्पट वाढ दाखवत आहे. याउलट आपला निफ्टी इंडेक्स हा एप्रिल २०११ मध्ये ५८५० च्या जवळपास होता म्हणजेच गेल्या अडीच वर्षांचा विचार करता निफ्टीने काहीही वाढ दाखविलेली नाही.

मार्च ते सप्टेंबर ’१३ या सहा महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण तीव्र होती. निफ्टीने या सहा महिन्यात विशेष वाढ दाखविलेली नाहीच, मात्र प्रचंड चढ-उतार मात्र दाखविले आहेत. या काळात भारतीय गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये केवळ या ‘व्होलॅटिलिटी’ने गिळंकृत केले आहेत. नेमक्या याच काळात एन100 ने मात्र चांगली कामगिरी केल्याचे दिसते. सहा महिन्यापूर्वी १५० रु. पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेला एन100 आज २०० रु. चा आकडा दाखवित आहे. 

आता २००८ सालच्या मोठ्या मंदीनंतरच्या बदललेल्या जागतिक परिस्थितीतील नेमके चित्र जाणून घेण्यासाठी थोड्या अधिक काळाचा म्हणजे गेल्या ४ वर्षांचा विचार करूया. मात्र ४ वर्षांपूर्वी एन100 हा ईटीएफ अस्तित्वातच नसल्याने, तो ज्याच्यावर आधारीत आहे, त्या नॅसडॅक-100 या इंडेक्सच्या तुलनेत आपल्या निफ्टीची कामगिरी पाहूया. सुमारे ४ वर्षांपूर्वी सप्टेंबर २००९ मध्ये नॅस्डॅक इंडेक्स हा २१०० च्या जवळपास होता आणि आजची त्याची किंमत ३७५० आहे. म्हणजेच मंदीनंतरच्या चार वर्षांत नॅसडॅकने सुमारे पावणेदोनपट वाढ दाखविली आहे. याउलट सप्टेंबर २००९ मध्ये ४९०० च्या जवळपास असलेल्या निफ्टीने आजपर्यंत जेमेतेम सव्वापट वाढ दाखविली आहे.
  एन100 ची भारतीय बाजारातील सौद्यांची संख्या म्हणजेच ट्रेडींग ‘व्हॉल्युम्स’ हे अजूनही कमी आहेत. मात्र तरीही भारतीय गुंतवणूकदारांना जशी या पर्यायाची ओळख होत जाईल आणि महत्व पटेल तसे
बाजारातील व्हॉल्युम्स हे वाढत रहाणार आहेत.
‘गतकाळातील कामगिरी ही भविष्याची हमी होवू शकत नाही’ हे अगदी खरे असले तरी गेल्या सहा महिन्याप्रमाणे भविष्यातही जेव्हा जेव्हा रुपयाच्या तुलनेत डॉलर वधारेल तेव्हा घसरलेल्या रुपयामुळे होणारे आपले नुकसान काही अंशी तरी भरून काढण्यासाठी या एन100 मधील गुंतवणूकीचा उपयोग  होईल यात शंका नाही.       

Read more »