Share/Bookmark

१२ सप्टें, २०१०

बाजारातील तेजी आणि निफ्टी पी/ई -


सर्व वाचकांना गणेशोत्सवानिमित्ताने शुभेच्छा !
गेले काही आठवडे जागतिक बाजारातील वाढ, आपल्या कंपन्यांचे बर्यापैकी निकाल, चांगला मान्सून अशा अनेक कारणांमुळे आपला बाजार वाढत आहे असे सर्व माध्यमातून आपण वाचत-ऐकत आहोत.
ही सर्व कारणे आपापल्या परीने बाजाराला वाढायला कारणीभूत असतीलही, मात्र बाजारात होणारी सततची वाढ, आणि बाजार थोडा खाली येताच तेथे झपाट्याने होणारी खरेदी याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे
FII म्हणजेच विदेशी अर्थसंस्थांकडून होणारी जोरदार गुंतवणूक !
जेव्हा जेव्हा बाजार अशा प्रकारे महाग होत जातो, तेव्हा तेव्हा रोजच बघायला मिळणार्या तेजीमुळे अधिकाधिक नवे लोक आपला पैसा बाजारात गुंतवतात, आणि वाहत्या गंगेत हात धुवायचा प्रयत्न करतात, तसेच याआधीच्या काळात जरा सावधपणे गुंतवणूक करणारे जुने लोकही आता नव्या आत्मविश्वासाने बाजारात चुकलेली गाडी परत पकडण्यासाठी उतरतात.
ही प्रक्रिया किती काळपर्यंत चालू राहील ते कुणालाच सांगता येत नाही.तसेच या सार्याला कारण असलेले FII कधी काढता पाय घेतील तेही सांगता येत नाही. एक गोष्ट मी नक्कीची सांगू शकतो कि बाजारात प्रसिद्ध होणार्या सर्व भल्या-बुर्या, आतल्या गोटांतल्या वगैरे ज्या काही बातम्या असतात त्या सर्वात शेवटी जर कोणापर्यंत पोचत असतील तर ते आपण सामान्य गुंतवणूकदार असतो.  मग अशा वेळी आपण काय करावे? 
काळानुसार जशी महागाई वाढत जाणार, तशी पैशाची किंमत कमी होत जाणार, या गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्यामुळे महाग झालेला बाजार हा नक्की महाग झाला आहे कि नाही हे ठरवणे आपल्याला कठीण होवून बसते.
अशा वेळी निफ्टी पी/ई ही संकल्पना मदतीला येते हे आपण येथे पूर्वीच बघितले आहे. सगळ्यात अलिकडे म्हणजे दि.९ सप्टेंबर रोजी निफ्टी पी/ई रेशो हा २३.७३ दिसत आहे.गेले काही महिने साधारणपणे २० ते २३ या दरम्यान कमी जास्त होणारा हा रेशो आता २३ च्यावर स्थिरावला आहे.गेल्या दहा वर्षांत जेव्हा जेव्हा त्याने २३ ची पातळी ओलांडली आहे तेव्हा बहुतांशी त्याने २५ पर्यंत मजल मारलेली दिसून येते.
आता एक प्रयोग  म्हणून थोडी आकडेमोड करुया.

निफ्टी पी/ई = निफ्टीची सध्याची किंमत(PRICE) / निफ्टीचे अर्निंग पर शेअर (EPS)
२३.७३ =५६४०/ EPS
EPS =५६४०/२३.७३
EPS = २३७.६७
म्हणजेच सध्याचे निफ्टीमधील ५० कंपन्यांचे प्रतिशेअर उत्पन्न २३७.६७ रुपये होते.
आता जर मागील इतिहासाप्रमाणे निफ्टी पी/ई हा नजिकच्या काळात २५ झाला तर सध्याच्या EPS प्रमाणे निफ्टीची त्यावेळची किंमत होते-
२३७.६७ * २५ =५९४१.७५
याचा अर्थ सदर ५० भारतीय कंपन्यांचे प्रतिशेअर उत्पन्न आहे एवढेच राहून जर निफ्टी पी/ई २५ पर्यंत वाढायचा असेल तर निफ्टी निर्देशांक ५९४०( किंवा ६००० सुद्धा!) पर्यंत जायला हवा.
दुसर्या प्रकारे विचार करता निफ्टी निर्देशांक न वाढता (कायम राहून), सदर ५० कंपन्यांचे उत्पन्न (EPS) मात्र घटले तरीही पी/ई ची किंमत २५ वर जावू शकते.
  मग अशा प्रकारे कंपन्यांचे उत्पन्न घटत असेल तर निर्देशांक आहे येथेच रहाण्याची शक्यता कितपत? म्हणजेच कंपन्यांचे उत्पन्न घटले तर बाजार घसरेल म्हणजेच निफ्टी पी/ई सुद्धा आपोआपच कमी होईल.
वरील दोन शक्यतांपैकी कोणती अधिक सहज आहे? 
उपलब्ध आकडेवारी असे दाखवते कि -
निफ्टीचा EPS हा ४ सप्टेंबर २००८ रोजी २३६ होता आणि तेव्हा निफ्टी होता ४४४७.
३ सप्टेंबर २००९ रोजी EPS २२२ होता, आणि निफ्टी होता- फक्त ४६००.
आज आपला बाजार खूपच वाढला आहे -निफ्टी झाला आहे ५६४० ! मात्र सदर ५० कंपन्यांचे प्रतिशेअर उत्पन्न मात्र जवळ जवळ वाढलेले नाहीच. मग भारताची स्थिती इतरांच्या तुलनेत खूपच चांगली आहे, म्हणून परदेशी गुंतवणूकदार जोमाने खरेदी करत आहेत वगैरे बातम्यांचे काय?
एकंदर विवेचनावरून हे लक्षांत येते कि बातम्या आणि अनेकानेक मते ही आपल्याला बर्याच वेळेस दिशाभूल करणारी ठरतात.मला येथे असे मुळीच म्हणावयाचे नाही कि सदर बातम्या अथवा बाजार हा पूर्णपणे खोटा असून कोणीतरी त्याला अनैसर्गिकपणेच वर नेत आहेत. मात्र बाजारात बबल (बुडबुडा) आला आहे असे आपल्याला कधीतरी समजायला हवे कि नको?
तसे आपण कधी म्हणू शकतो ?
आतापर्यंतच्या  इतिहासावरून निफ्टी पी/ई २५ च्यावर गेला तर बबल आला आहे असे म्हणता येइल, मात्र त्यावेळी म्हणजे पुढील तिमाहीत निफ्टीच्या कंपन्यांचे निकाल अतिशय उत्तम येवून EPS मध्ये घसघशीत वाढ झाली तर निफ्टी पी/ई हा विशेष न वाढताच बाजार मात्र वर जात असेल तर ती खरी आणि अर्थपूर्ण वाढ असेल यात शंका नाही.
आता तरी सध्याचा EPS हा बाजारातील वाढीचे समर्थन करत नाही. तेव्हा आपली अर्धी गुंतवणूक काढून घेवून गवर्मेंट सेक्युरिटीज मधे ठेवावी आणि उर्वरीत रकमेमध्ये हाय बीटा असलेल्या म्हणजेच बाजाराच्या तुलनेत अधिक वेगाने वाढणारे शेअर घेवून त्याला ट्रेलींग म्हणजेच रोजच्या वाढणार्या शेअरच्या किंमतीनुसार सरकणारा स्टोपलोस लावून या गंगेत हात धुवून घ्यायला हरकत नाही.
हिंदाल्को, टाटा स्टील, स्टर्लाईट, आयसीआयसीआय बेंक, डीएलएफ असे काही हाय बीटा शेअर आहेत, त्यांच्या हालचालीचा अभ्यास करून लाभ करून घेता येइल.
निफ्टील्ला ५६७० येथे विरोध राहील तर ५६२० व ५५८० येथे आधार राहील.
सकाळी आशियाई बाजारावर आणि दुपारी लंडनवर नजर ठेवून इन्ट्राडॆ करायला हरकत नाही- मात्र STOP-LOSS लावायला विसरू नका.



 










.
 

1 comments:

  • अनामित says:
    ०६ ऑगस्ट, २०११

    खुपच मोलाची माहिती दिली.धन्यवाद.
    असेच लिहित रहा..हा..