Share/Bookmark

२७ जाने, २०१३

ऑप्शन्स (भाग ६) – आणखी काही स्ट्रॅटेजीज –





३) लॉन्ग पुट स्ट्रॅटेजी –

 ‘लॉन्ग पुट’ म्हणजे ‘पुट’ खरेदी करणे, ही क्रिया कॉल खरेदी (लॉन्ग कॉल) करण्याच्या बरोबर उलट आहे. ‘कॉल’ खरेदी करणारा हा अंडरलाईंगची किंमत वाढेल या अपेक्षेने कॉल खरेदी करत असतो, तर अंडरलाईंगची किंमत कमी होईल अशी अपेक्षा असणारा ट्रेडर ‘पुट’ खरेदी करतो. म्हणजेच ‘लॉन्ग पुट’ ही बेअरीश स्ट्रॅटेजी आहे. यात पुट खरेदी करणा-याला ठराविक किंमतीला अंडरलाईंगची विक्री करण्याचा हक्क असतो. अंडरलाईंगची किंमत घसरली तरी त्याला ठरलेल्या म्हणजे स्ट्राईक प्राईजच्या किंमतीतच अंडरलाईंगची विक्री करता येते, अथवा अंडरलाईंगची किंमत कमी झाल्याने वाढलेल्या पुट ऑप्शनच्या प्रिमिअम मुळे तो पुट विकून फायदा घेता येतो.

* पुट ऑप्शन बायरच्या दृष्टीने ब्रेक इव्हन पॉइन्ट = (स्ट्राईक प्राईज - प्रिमिअम)



४) बाय स्टॉक बाय पुट (‘सिन्थेटीक कॉल’) स्ट्रॅटेजी -

समजा एखादा स्टॉक वा इंडेक्स खरेदी केलेले असल्यास त्यामधील रिस्क कमी करण्यासाठी असे ‘पुट’ खरेदी केले जातात. अशा प्रकारे ‘अंडरलाईंग’ व त्याचे ‘पुट ऑप्शन’ असे दोन्हीही खरेदी केलेले असल्यास त्याला ‘सिंथेटीक  कॉल’ असे म्हणतात, याचे कारण ज्याप्रमाणे ‘लॉन्ग कॉल’ स्ट्रॅटेजीत मर्यादीत तोटा व अमर्यादीत फायदा असू शकतो अगदी तसेच रिझल्ट्स या ‘सिन्थेटीक कॉल’ च्या बाबत मिळतात. स्टॉक वा इंडेक्सच्या किंमतीत वाढ झाल्यास पुट ऑप्शनच्या प्रिमिअमची रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम ही निव्वळ फायदा असते. हा फायदा कितीही असू शकतो. आणि अंडरलाईंगची किंमत घसरल्यास पुट ऑप्शन खरेदीदाराला स्ट्राईक प्राईजच्या किंमतीत अंडरलाईंगची विक्री करण्याचा हक्क असल्याने होणारा तोटा मर्यादीत असतो.

* अंडरलाईंगसह पुट बायरच्या (सिन्थेटीक कॉल) दृष्टीने ब्रेक इव्हन पॉइन्ट = (अंडरलाईंग प्राईज + प्रिमिअम)


५) शॉर्ट पुट स्ट्रॅटेजी – 
यात पुट ऑप्शनची विक्री केली जाते. ही बुलीश आणि साईडवेज/न्युट्रल  स्ट्रेटेजी आहे. म्हणजेच अंडरलाईंगची किंमत वाढेल किंवा स्थिर राहील अशा अपेक्षेने पुट ऑप्शन विकले जातात. असे पुट विकून मिळणारा ‘प्रिमिअम’ म्हणजे, स्ट्राईक प्राईजच्या किंमतीत अंडरलाईंगची विक्री करण्याचा हक्क तुम्ही दुस-या कुणालातरी विकल्यामुळे मिळणारी ‘फी’ असते. अंडरलाईंगची किंमत वाढली वा स्थिर राहिली तर हा प्रिमिअम म्हणजे निव्वळ ( आणि जास्तीतजास्त तितकाच ) फायदा असतो, मात्र अंडरलाईंगची किंमत स्ट्राईक प्राईजपेक्षा खाली घसरली तर त्या प्रमाणात वाढलेल्या प्रिमिअममुळे तोटा सहन करावा लागतो. जर (स्ट्राईक प्राईज – प्रिमिअम) एवढी अंडरलाईंगची प्राईज घसरली तर तेथून पुढे तोटा सुरु होतो आणि तो थिरॉटिकली कितीही असू शकतो, कारण अंडरलाईंगची किंमत ही कितीही म्हणजे शुन्यापर्यंतही घसरू शकते. अर्थात असे होण्याची शक्यता अगदी कमी असते.

चढत्या किंवा रेंजबाऊंड मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी ही एक नियमीत उत्पन्नाचे साधन म्हणून वापरली जाते. मात्र मार्केट जोरात पडल्यास यात मोठा तोटा होवू शकतो.

*ब्रेक इव्हन पॉइन्ट = (स्ट्राईक प्राईज – प्रिमिअम) .......म्हणजेच अंडरलाईंगची किंमत ही जर (स्ट्राईक प्राईज - प्रिमिअम) या पातळीच्या वर असेल तरच पुट शॉर्ट करणा-याला फायदा असतो.


६) कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजी –

माझ्या मते सामान्य गुंतवणूकदारांसाठी समजण्यास सोपी व अत्यंत उपयोगी अशी ही बुलीश/न्युट्रल स्ट्रॅटेजी असून ती योग्यरीत्या समजून नियमीत वापर करण्याचे मी माझ्या वाचकांना सुचवेन.

समजा आपल्याकडे मिडीयम टर्म किंवा लॉन्गटर्म साठी गुंतवणूक म्हणून घेतलेले एखाद्या कंपनीचे शेअर्स आहेत. अर्थातच ते लगेचच वाढतील वा वाढावेत अशी आपली अपेक्षा नाही. त्यासाठी काही काळ थांबण्याचीही आपली तयारी आहे. मात्र तोपर्यंत त्या शेअर्समध्ये असलेल्या गुंतवणूकीवर व्याज तर मिळत नसतेच, तेव्हा त्याऐवजी काहीतरी परतावा मिळावा आणि बुडत असलेल्या व्याजाची अंशतः तरी भरपाई व्हावी असे वाटते ना ? मग कव्हर्ड कॉल स्ट्रॅटेजी त्यासाठीच आहे.

एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये वरीलप्रमाणे गुंतवणूक असेल तर या स्ट्रॅटेजीनुसार त्याच शेअरचे कॉल ऑप्शन विकले जातात. साधारणपणे हे OTM कॉल ऑप्शन असतात. 
उदा. आपल्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स असतील आणि रिलायन्सचा सध्याचा भाव ९०० रु. आहे तर आपण ९०० पेक्षा जास्त स्ट्राईक प्राईजचे कॉल ऑप्शन्स विकणे अभिप्रेत आहे. रिलायन्सची लॉट साईझ २५० आहे आणि दर २० पॉइन्ट्च्या अंतराने स्ट्राईक प्राईज उपलब्ध आहेत. तेव्हा ९२०, ९४०, ९६०, ९८०, १००० अशा स्ट्राईक प्राईजमधून आपल्याला निवड करायची आहे. अर्थातच ९२० किंवा ९४० या किंमतीपर्यंत रिलायन्ससारखा शेअर अगदी २-३ दिवसातही वाढू शकतो हे लक्षांत घेवून जरा दूरची म्हणजे Far OTM स्ट्राईक प्राईज निवडावी. उदा. जर ९८०चा फेब्रुवारी कॉल ऑप्शन १ रु. किंमतीला विकला गेला तर लगेचच आपल्याला प्रतिलॉट २५० रु. इतका प्रिमिअम मिळेल. आपण किती लॉट विकावेत हे आपलेकडील शेअर्सच्या संख्येवर ठरवायचे असले तरी याबाबतीत निर्णय आपला आहे, कारण विकलेल्या ऑप्शनच्या प्रत्येक लॉटसाठी मार्जिनची गरज असते आणि हा मार्जिन मनी साधारणतः रिलायन्सच्या फ्युचर्स लॉट्साठी जेवढा असतो तेवढा असू शकतो. ही सेल केलेली पोझिशन असेपर्यत हा मार्जिन मनी अन्य ट्रेडसाठी आपल्याला वापरता येत नाही, म्हणजेच ‘ब्लॉक’ होतो. तेव्हा आपल्याकडे असलेल्या क्रेडीटचा विचार करूनच किती लॉट विकायचे ते ठरवावे. (ऑप्शन सेलींगसाठी आवश्यक असलेल्या मार्जिन मनीच्या बाबतीत आपआपल्या ब्रोकरकडे विचारणा करून सविस्तर माहिती करून घ्यावी. )

अशा प्रकारे जर रिलायन्सची किंमत फेब्रुवारी सीरीजमध्ये ९८० च्या खालीच राहिल, तर मिळवलेला प्रिमिअम ही पूर्णपणे आपली कमाई असते. म्हणजे एखाद्या शेअरचा गुंतवणूकदार याप्रमाणे दरमहिना नियमीत कमाई करू शकतो. स्ट्राईक प्राईज जेवढी जास्त तेवढी कॉल ऑप्शनची किंमत म्हणजेच प्रिमिअमही कमी असेल, आणि स्ट्राईक प्राईज जेवढी कमी, तेवढा मिळणारा प्रिमिअम जास्त असेल. असे कॉल ऑप्शन महिन्याच्या सुरुवातीला महाग तर शेवटी स्वस्त होत जातील. तेव्हा स्ट्राईक प्राईजची निवड आणि कॉल ऑप्शन विकण्याची वेळ या बाबी महत्वाच्या आहेत.

वरील उदाहरणात जर अचानक रिलायन्सच्या शेअरची किंमत वाढली तर विकलेल्या कॉल ऑप्शनची किंमत वाढल्याने तोटा होईल, मात्र आपल्या मुळ गुंतवणूकीची किंमत वाढल्याने तो न्युट्रलाईझ होतो. याच कारणाने मुळ गुंतवणूक आणि विकलेल्या लॉटची संख्या यांच्यात योग्य समतोल ठेवावा लागतो. (या समतोलाच्या बाबतीत अधिक माहितीसाठी माझी ‘हेजींग’बद्दल माहिती देणारी पोस्ट वाचावी )
‘कव्हर्ड कॉल’ या महत्वाच्या स्ट्रॅटेजीविषयी अधिक सविस्तर आणि आकडेमोडीसह फायद्या-तोट्याचे निश्चित प्रमाण
दाखवणारी माहिती घेवूया पुढील पोस्टमध्ये !

1 comments:

  • Admin says:
    ३१ जानेवारी, २०१३

    फार छान सविस्तर माहीती दिल्या बद्दल आभारी आहे. इंट्रा डे ट्रेडिंग बद्दल माहीती दिल्यास उत्तम होईल. पैसे वाचविणे आणि गुंतवणूक बद्दलच्या टिप्स मराठीत वाचून फार आनंद होतो.