शुक्रवारी सकाळ्पासून हेन्गसेन्ग कोसळतच होता, मात्र दुपारी साडेबारा (तेथील वेळेनुसार) नंतर त्याने अचानक ३०० पेक्षा जास्त पोइन्टची सरळ उभी मुसंडी मारली, तेव्हाच जागतिक बाजार सावरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते, आणि
भारत वगळता तसेच झालेही.
आपल्याकडे मात्र ५९५० चा सपोर्ट घेत सावरत असलेला बाजार अचानक कोसळला तो "2G स्पेक्ट्रममुळे पंतप्रधान मनमोहनसिंह अडचणीत आले असून राजिनामा देणार" अशी शंका वा अफवा पसरल्याने !
त्यातच आठवड्याचा शेवट असल्याने संभाव्य अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून विक्री करण्यात आली. मात्र बाजारात FII आणि म्युचुअल फंडांनी शुक्रवारी खरेदी केल्याची बातमी मात्र आहे. आता पंतप्रधानांनी अफिडेव्हिट केले आहे, आणि बहुतांशी त्यांना राजिनामा द्यावा लागणार नाही असेच दिसते आहे.
एकूणात काय तर काहीनाकाही कारण शोधून बाजारात PANIC निर्माण करण्यात संबंधितांना यश आले हे मात्र खरे. बाजारात अशा अनपेक्षीत हालचाली झाल्याशिवाय कमी काळातच मोठे अर्थिक लाभ कसे होणार? ही बाब सामान्य गुंतवणूकदारांनी समजून घ्यायला हवी, आणि शांत रहावे. परिस्थिती वाईट आहे असे वाटले तरी त्याचाच फायदा कसा उठवता येइल याचाच विचार करायला हवा.
मला असेच काहीतरी घडणार याचा अदमास असल्यानेच "पुढील आठवड्यासाठी रक्कम तयार ठेवा" असे मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते.
गेल्या आठवड्यात "निफ्टीची घसरण ५६०० पर्यंत कशी होवू शकते" याची चर्चा केली होती. निफ्टी पी/ई हा दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी सुमारे २६ इतका वाढला होता, तो आता २३.४७ झाला आहे.माझ्या अंदाजाप्रमाणे २३ च्या आसपास निफ्टी पी/ई च्या चार्टवर सपोर्ट असल्याने, तेथपर्यंत जाण्यासाठी निफ्टी हा ५७७३ पर्यंत (म्हणजेच अजून १०० पोइन्ट) घसरू शकतो.
तसे झाले तर उत्तम कंपन्यांचे शेअर बर्यापैकी स्वस्त भावात उपलब्ध असतील आणि त्याचाच आपण लाभ उठवायला हवा !
तसे पाहिले तर युरोपमधील आयर्लंडचा कर्जबाजारीपणा वा चीनमधील महागाई हे प्रश्न गेल्या महिन्यातही अस्तित्वात नव्हते काय ? तेव्हा बाजार नवी नवी उंची गाठत होते ! पण प्रत्येक प्रश्नाचा बागुलबुवा कधी उभा करायचा हे ठरलेले असते. आदर्श घोटाळा काय किंवा स्पेक्ट्रम घोटाळा काय - पोतडीतून बाहेर कधी काढायचे याचे नियम ठरलेलेच असतात, आणि सामान्य माणसाला त्यात तोटाच असतो, - फरक एवढाच कि शेअरबाजारातील अशा ठरवलेल्या घोटाळ्याचा सामान्य माणसाला फायदाही होवू शकतो - आणि अगदी कायदेशीरपणे ! खरे ना ?
Nice Analysis :)