कोल इंडीयाचे उत्तम लिस्टींग, ऐन दिवाळीत ALL TIME HIGH असणारा बाजार, ओबामांचा भारत दौरा अशा भरगच्च घडामोडींचा आठवडा संपून आता पुढील आठवड्याचा अंदाज घेवूया.
उच्च पातळीवर आलेले लंडन व अमेरिकेचे बाजार
गेले दोन दिवस तेथे कन्सोलिडेट होत आहेत. हेन्गसेन्ग मजबूत आहेच पण जपानच्या निक्केइ ने गेल्या महिनाभरात गमावलेले फक्त दोन दिवसात भरून काढलेले दिसत आहे.
आपल्याकडे कोल इंडीया आणि दिवाळी मुहुर्त या दोन्ही घटना स्थानिक महत्वाच्या असल्या तरी ओबामा दौरा हा त्याहून जास्त महत्वाचा आहे, कारण त्यांनी आल्याआल्याच हे स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडील नोकर्या वाढवण्यासाठी ते येथे आले आहेत.त्यांच्या भाषणात "भारत आणि अमेरिका समान महत्वाचे वा बरोबरीचे देश आहेत" आणि "भारत आता विकसनशील नसून विकसीत देश बनला आहे" अशा अर्थाचे उल्लेख आले असले तरी अमेरिकेचे व आपले नुसते जीडीपीचे आकडे बघितले तर अशा भाषणांना किती अर्थ आहे ते लक्षांत येते. मग पूर्वीपेक्षा नेमके काय बदलले आहे?
फरक इतकाच झाला आहे, कि ते आता त्यांच्या इकोनोमीपुढील प्रश्न सोडवत आहेत, आणि भारत हा त्यांच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ असून त्यात अधिकाधिक प्रवेश करण्यासाठी त्यांना दोन्ही बाजूंनी होणार्या ट्रेड्स ची आठवण झाली आहे.
मात्र एकंदर परिस्थितीचा लाभ घेण्याइतपत भारतातील इंडस्ट्री आता सक्षम बनली आहे हे मात्र नक्की, आणि त्याचा बाजारावर चांगलाच परिणाम होइल. मात्र नेमक्या कुठल्या सेक्टरसाठी अनुकूल वा प्रतिकूल करार/ घोषणा होतील हे मात्र बघावे लागेल. येत्या एकदोन दिवसात दिल्लीत काय घोषणा होतात त्यावर लक्ष असू द्या.
आपल्या बाजारात होणारी FII ची गुंतवणूक अशीच पुढे होत राहील का यावर बरेच काही अवलंबून आहे. येत्या ख्रिसमस मध्ये युरोप व अमेरिकेतील व्यवसाय/विक्री चे आकडे वाढण्याची शक्यता आहे, त्यावरून तेथील इन्वेस्टर कोन्फिडन्स दिसून येत असतो. चीन सरकारने महागाई रोखण्यासाठी पावले उचलली आहेत, मात्र आपल्याकडे व्याजदर वाढवूनही महागाईवर नियंत्रण आल्याचे दिसत नाही. याचे एक कारण परकीय गुंतवणूकीमुळे वाढणारी लिक्वीडीटी असून परकीय गुंतवणूकीवर नियंत्रण आणणारी पावले अजूनही टाकली गेलेली नाहीत.
इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स (IIP) ,सेल्स आणि एक्सपोर्टचे सेक्टरनुसार येणारे आकडे यावर नजर ठेवली असता बाजाराच्या पुढील चालीचा काही अंदाज येवू शकतो.
मात्र सामान्य माणूस एकाच वेळी असा सर्व बाजूनी अभ्यास करू शकत नाही. तेव्हा बाजार आता खूप वाढलेला आहे हे ध्यानात ठेवून मर्यादीत धोका पत्करण्याला पर्याय नाही.
यापूढे तांत्रिकदृष्ट्या बाजार पूर्णपणे नवीन झोनमध्ये असून रोज नव्या पातळी तयार होण्याची शक्यता दिसत आहे. एकंदर वातावरण चांगलेच दिसत असले तरी मोहावर विजय मिळवून थोडाथोडा फायदा बाजूला काढत रहा.
पुन्हा एकदा आठवण करून देतो कि तेजीच्या अशा वातावरणात कोणीही कितीही आत्मविश्वासाने "टीप" दिली तरी ज्या कंपनीची उत्पादने आपण बाजारात पहात नाही, जिचे रिजल्ट चांगले नाहीत, कारखाना नेमका कुठे आहे ते माहीत नाही, इपीएस व डिव्हीडंडचे रेकोर्ड नाही, अशा कंपनीमध्ये आपला कष्टाचा पैसा टाकू नका. मोठ्या तेजीमध्ये अशा कंपन्यांचे भावही वेगाने वाढताना दिसतात मात्र ते अळवावरचे पाणी असते हे विसरू नका.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा