Share/Bookmark

१ नोव्हें, २०१०

फायद्याचा आढावा ...आणि "स्विच-ओवर" चे महत्व ....

येत्या आठवड्यात, बाजार एका महत्वाच्या टप्प्यावर उभा असताना सप्टेंबरपासून सुरू झालेल्या तेजीमध्ये आपलेकडील शेअरनी कितपत वाढ दाखवली याचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यापैकी न वाढलेले शेअर का वाढले नाहीत ते शोधून आवश्यक तर
ते विकून त्या पैशात उत्तम शेअरची खरेदी करण्याची ही वेळ आहे.
काही जणांच्या मते आपलेकडील शेअर जोपर्यंत फायद्यात येत नाहीत, तोपर्यंत ते विकू नये हेच (त्यांच्यामते) फायद्याचे सूत्र आहे. मात्र माझ्यामते एखाद्या शेअरने बाजाराच्या प्रमाणात वाढ दाखवली नाही तर त्याला काहीतरी कारण हे असतेच. ते कारण शोधून काढणे आजच्या इंटरनेटच्या जमान्यात कठीण राहिलेले नाही. आणि अशा काही कारणामुळे जर तो शेअर वाढत नसेल, तर आपण आपला पैसा मोठ्या अवधीसाठी अशा शेअरमध्ये अडकवून ठेवणे चूकीचेच ठरेल.
आपण शेअरबाजारात फायद्यासाठी आलो आहोत, आणि हा फायदा बेंक डिपोझिट वा पोस्ट ओफिस स्कीममधील व्याजापेक्षा जास्त नसेल तर आपले नक्कीच काहीतरी चूकते आहे.
  काही जणांच्या मते खरेदी किंमतीच्या खाली आलेला शेअर विकला तर तो तोटा असतो, तो शेअर न विकता धरून ठेवला तर सदर तोटा होत नाही. या म्हणण्यात तेव्हाच तथ्य असते जेव्हा फार थोड्या काळात तो शेअर फायद्यात जात असतो. अन्यथा त्यासाठी लागणारा काळ लक्षांत घेतला तर तो शेअर आपली इतर शेअरमधील फायद्याची सरासरी खाली आणण्याचे काम मात्र दीर्घकाळ करत रहातो, हे लक्षांत घेण्यासारखे आहे.
नीट विचार केला तर हे आपल्या लक्षांत येइल कि आपण एखादा तोट्यात असलेला शेअर विकला म्हणून तेव्हा तोटा होतो असे वाटले तरी खरे पहाता तो शेअर जेव्हा खाली आलेला असतो, तेव्हाच आपला तोटा झालेला असतो, मात्र तो मान्य करण्याची आपली तयारी नसते. बाजारात आपल्या भावनांपेक्षा कठोर वस्तूस्थितीला अधिक महत्व द्यायला हवे. जेव्हा आपण तो शेअर पडलेल्या किंमतीला विकतो तेव्हा आपण एका प्रकारे आपल्या अडकलेल्या पैशाला मुक्त करत असतो- त्याला अन्य ठिकाणी "स्विच-ओवर" करून आपण फायद्याची नवी दारेच जणू खोलत असतो. अशा प्रकारे स्विच-ओवर  करताना जे काही कमिशन जाते तेव्हढाच काय तो आपला तोटा असतो.
असे स्विच-ओवर करताना आपण पूर्वी गुंतवणूक करताना झालेली चूक लक्षांत घेवून अधिक अभ्यासाने नवी खरेदी केल्यास "स्विच-ओवर" हे एक वरदान ठरेल याची मला खात्री आहे.
सध्याच्या बाजाराच्या वेगाकडे पहाता पैसा अडकलेला असणे चूकीचेच ठरेल नाही का ?
येत्या आठवड्यात रिजर्व बेंक रेपो रेट मध्ये वाढ करण्याची कुणकुण आहे. रिलायन्सचे रिजल्ट समाधानकारक आहेत. आयसीआयसीआय बेंकेचे रिजल्ट चांगले आहेत. LIC HOUSING FIN. रु.१० च्या शेअरचे पांच भाग करणार असल्याची बातमी आहे. अमेरिकन फेडरेशनचा स्टिम्युलसचा निर्णय येणार आहे. निफ्टी पी/ई रेशो आता २४ च्या जवळपास इतका खाली आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांचे तिमाही रिजल्ट चांगले आले आहेत अशा कंपन्या निवडून त्यांचे भाव बाजाराच्या पडझडीत खाली येतात का ते बघून त्यांच्या सपोर्ट लेवल्सवर (आवश्यक तर स्विच-ओवर करूनही) थोडी खरेदी करायला हरकत नाही.
टेक्निकली बाजार अजूनही वीक असल्याचे मी गेल्या पोस्टमध्ये लिहीले आहेच, परंतू नवीन आठवड्याची सुरुवात आशियाई बाजार कसे करतात हे पहाणे ही अर्थातच महत्वाचे आहे.